वन्यप्राणी व मानव संघर्ष आता नवीन राहिलेला नाही. आपल्या देशात वाघ, बिबट्या यांसह अन्य वन्य प्राण्यांच्या संघर्षात दरवर्षी शेकडो बळी जातात. तळकोकण आणि दक्षिण भारतात हत्ती व मानव यांच्यातील संघर्ष तीव्र झाला असून विविध योजनाही निष्फळ ठरल्या आहेत. जंगली हत्ती हा तर थायलंडचा राष्ट्रीय प्राणी. मात्र गेल्या काही वर्षांत या प्राण्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यावर नियंत्रणासाठी थायलंड सरकारने अजब निर्णय घेतला आहे. हत्तींचे गर्भनिरोधक लसीकरण करण्याचा… हा निर्णय का घेतला? त्यावरून वाद का निर्माण झाला आहे? यांविषयी…

थायलंड सरकारने काय निर्णय घेतला?

थायलंडमध्ये जंगली हत्ती व मानव संघर्ष वाढत असल्याने सरकारने वन्य हत्तींची वाढती संख्या नियंत्रित करण्याच्या प्रयत्नांत त्यांना गर्भनिरोधक लस देण्याचा निर्णय घेतला. वन्यजीव अधिकारी आणि पशू वैद्यकीय पथकाने देशाच्या आग्नेय भागातील त्राट प्रांतात तीन मादी हत्तींना गर्भनिरोधक लस दिली, असे थायलंड वन्यजीव संरक्षण कार्यालयाच्या संचालक सुखी बूनसांग यांनी सांगितले.

पशू वैद्यकीय आणि अधिकाऱ्यांनी या आठवड्यात भूल न देता डार्ट गन वापरून लसीकरण केले, असे संवर्धन कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे. दोन वर्षांपूर्वी उत्तर चियांग माई प्रदेशात बंदिवान असलेल्या सात हत्तींवर लसीची चाचणी घेण्यात आली. या वर्षी मे महिन्यापासून पावसाळा सुरू होण्यापूर्वी थायलंडमधील इतर कळपांमधील हत्तींवर आणखी १५ डोस वापरले जातील, असे सुखी यांनी सांगितले.

गर्भनिरोधक लसीकरण कशासाठी?

वन्य हत्तींच्या संख्येचे व्यवस्थापन करणे हे या मागील उद्दिष्ट असल्याचे थायलंडच्या वन विभागाने सांगितले. पूर्व थायलंडच्या पाच प्रांतांमध्ये या सस्तन प्राण्याचा जन्मदर इतर प्रदेशांमधील तीन टक्क्यांपेक्षा दरवर्षी सुमारे आठ टक्क्यांनी वाढतो. या प्रांतांमध्ये वन्य हत्ती व मानव यांच्यातील संघर्ष गेल्या काही वर्षांत वाढलेला आहे. या प्रांतातील शेतांमध्ये हत्ती घुसून उभ्या पिकांचे नुकसान करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून हत्तींच्या हल्ल्यांत काही जणांचे बळीही गेले आहेत. हत्तींवर नियंत्रण करण्यासाठी त्यांची शिकार केली जात असल्याचेही दिसून आले. वाढत्या संघर्षामुळे हत्तींच्या जन्मदराचे नियंत्रण करण्याचा निर्णय थायलंड सरकारने घेतला.

वन्य हत्तींची वाढती संख्या…

थायलंडमध्ये वन्य हत्तींची संख्या २०१५ मध्ये ३३४ होती, जी गेल्या वर्षी जवळजवळ ८०० पर्यंत पोहोचली आहे. पूर्व थायलंडच्या पाच प्रांतांमध्ये सस्तन प्राण्यांचा जन्मदर दरवर्षी सुमारे आठ टक्क्यांनी वाढतो, तर इतर प्रदेशांमध्ये तो तीन टक्क्यांनी वाढतो. मानव-हत्ती संघर्षामुळे २०१२ पासून जवळजवळ २०० मानवी मृत्यू आणि १०० हून अधिक हत्तींचा मृत्यू झाला आहे, असे संवर्धन कार्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

हा संघर्ष नियंत्रणात आणण्यासाठी थायलंड सरकार गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपाययोजना करत आहे. हजारो हत्तींना ताब्यात घेऊन बंदिस्त ठेवण्यात आले आहे. मात्र हा संघर्ष काही कमी होत नाही. त्यामुळे या प्राण्याची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी गर्भनिरोधक लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला.

लसीकरणानंतर हत्तींची तपासणी…

हत्तींचे लसीकरण करण्यात आल्यानंतर त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये यासाठी त्यांची नियमित तपासणी करण्यात येत आहे. लसीकरणानंतर तीन हत्तींच्या संसर्गाची लक्षणे तपासण्यात आली आहेत, ते बरे आहेत आणि त्यांचे सामान्य जीवन जगत आहेत, असे वन विभागाकडून सांगण्यात आले. वन विभागाचे पथक दर सहा महिन्यांनी रक्त तपासणी करणार असून गर्भनिरोधक लसीकरणाचे काय परिणाम होणार आहेत याची तपासणी करणार आहेत.

पर्यावरणवाद्यांची प्रतिक्रिया काय?

हत्ती हा थायलंडचा राष्ट्रीय प्राणी आहे. हत्ती या प्राण्याचा अनेक शतकांपासून थाय संस्कृती व समाजावर मोठा प्रभाव आहे. थायलंडमध्ये आढळणाऱ्या आशियाई हत्तींना ‘इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचर’ने जागतिक स्तरावर धोक्यात असलेल्या म्हणून वर्गीकृत केले आहे. मात्र तरीही थायलंड सरकारने हत्तींची संख्या नियंत्रित करण्यासाठी मादी हत्तींवर गर्भनिरोधक लसीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने पर्यावरणवाद्यांनी नाराजी व्यक्त केली. वन्य हत्ती व मानव संघर्ष कमी करण्यासाठी इतर अनेक उपाययोजना करण्यात आल्या असत्या. मात्र सध्या धोक्यात असलेल्या या प्राण्यासाठी करण्यात आलेला सध्याचा उपाय घातक असल्याचे मत काही पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केले.