मुंबई महानगरातील वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध प्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहे. यात ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाचाही समावेश आहे. या प्रकल्पाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून करण्यात येत असून राज्य शासनाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जातो. या प्रकल्पामुळे ठाणे ते बोरिवली हे अंतर पार करण्यासाठी १२ मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. असे असले तरी, या प्रकल्पाच्या उभारणीपासूनच अडथळ्याची मालिका सुरू असून ही मालिका अद्यापही थांबलेली नसल्याचे चित्र आहे.

भुयारी मार्गाची गरज

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला लागूनच ठाणे शहर आहे. ठाणे शहरातून अनेकजण मुंबईत नोकरीनिमित्ताने दररोज प्रवास करतात. हे नागरिक रेल्वे तसेच रस्तेमार्गे प्रवास करीत असून यामुळे रेल्वे तसेच रस्ते वाहतुकीवर भार वाढला आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे एक ते दीड तास प्रवासासाठी लागत आहे. या नागरिकांना दिलासा मिळावा आणि त्यांचा प्रवास वेगवान व्हावा या उद्देशातून ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे ठाणे-बोरिवली अंतर केवळ २० मिनिटांत गाठता येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच या प्रकल्पामुळे नागरिकांचा वाहन इंधन खर्च आणि वेळही वाचणार आहे. राज्य शासनाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जातो.

असा आहे प्रकल्प

मुंबई महानगरातील वाहतुकीसाठी ठाणे ते बोरिवली भुयारी मार्ग हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. सुमारे ११.८ किमी लांबीचा भुयारी मार्ग असून या प्रकल्पाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून करण्यात येत आहे. या मार्गात १०.२५ किमी लांबीच्या दोन भुयारी मार्गांचा समावेश आहे. या प्रकल्पाच्या कामाचा ठेका मेघा इंजिनीयरिंग इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आला. प्रकल्पासाठी १६,६००.४० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या भुयारी मार्ग प्रकल्पासाठी केंद्रीय वन्यजीव मंडळ आणि राज्य वन्यजीव मंडळाने परवानगी दिली असून गेल्या दोन वर्षांपासून प्रकल्पाचे काम सुरू असले तरी त्यात अनेक अडथळे येत आहेत.

सुरुवातीलाच विरोध

ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाचा पोहोच रस्ता ठाण्यातील मुल्लाबाग परिसरातील निळकंठ वुड्स, निळकंठ ग्रीन, व्हेराटन, कॉसमॉस लाऊंज, सत्यशंकर या गृहसंकुलांच्या परिसरातून जाणार होता. भुयारी मार्गामुळे भविष्यात वाहतूक कोंडी, ध्वनी आणि वायू प्रदूषणास सामोरे जावे लागणार असल्याचे सांगत या संकुलातील रहिवाशांनी विरोध दर्शविला होता. प्रकल्पाला विरोध नाही पण, मुल्लाबागऐवजी युनी अपेक्स कंपनीपर्यंत भुयारी मार्ग उभारा, अशी रहिवाशांची मागणी होती. तसेच जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत काम बंद ठेवण्याची मागणीही रहिवाशांनी केली होती. यासंदर्भात रहिवाशांनी आंदोलन केले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांशी चर्चा करून भुयारी मार्ग करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला होता.

प्रदूषण, वृक्षतोडीचा मुद्दा गाजला

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी मुल्लाबाग परिसर आहे. या भागात पालिकेचे मोठे उद्यान होते. या भागात मोठा हरित पट्टा होता आणि काही जुने मोठे डेरेदार वृक्षही होते. ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग उभारताना मुल्लाबाग परिसरातील हरित पट्टा नष्ट करण्यात आला. अनेक वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्यात आली. तसेच या भागात हवा प्रदूषण रोखण्यासाठी ठेकेदाराकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नव्हत्या. यामुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास होऊ लागले होते. यामुळे प्रकल्पालगतच्या संकुलांनी प्रकल्पास कडाडून विरोध केला होता. यानंतर ठेकेदाराने हवा प्रदूषण रोखण्यासाठी यंत्रणा उभारली. पण, हरित पट्टा मात्र नष्ट केला. त्याचे प्रतिबिंब गणेशोत्सवाच्या देखाव्यातून येथील संकुलांनी उभारून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.

माती वाहतुकीमुळे पुन्हा अडथळा

ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाच्या कामासाठी दररोज तीन ते चार लाख लीटर पाणी लागणार असून त्यासाठी पालिकेच्या कोलशेत आणि नागलाबंदर येथील मलप्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. हासुद्धा अडथळा दूर झाला. या प्रकल्पात भुयार खोदताना दररोज तीनशे ते साडेतीनशे ट्रक इतकी माती खणली जाणार आहे. या माती वाहतुकीवरून आता प्रकल्प पुन्हा वादात सापडला आहे. भुयारी मार्गाच्या खोदाईदरम्यान निघणाऱ्या मातीच्या वाहतुकीसाठी कन्वेयर बेल्टचा प्रस्ताव रद्द करून त्याऐवजी डम्परने माती वाहतूक करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला. या निर्णयानुसार, दररोज ३५० डम्पर माती वाहतूक करणार असल्याने परिसरात हवा प्रदूषणात वाढ होण्याची भीती व्यक्त करत त्यास रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे. तर, खोदाईदरम्यान निघणारी माती वाहतूक कन्वेयर बेल्टऐवजी डम्परनेच करण्यात यावी, यासाठी ९० टक्के रहिवाशांची सहमती आहे. तर, केवळ दहा टक्के रहिवाशांचा विरोध आहे. मात्र, या रहिवाशांचीही आम्ही समजूत काढून याबाबत अंतिम निर्णय घेऊ, असे प्रकल्पबाधित रहिवाशांच्या समिती सदस्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. यामुळे माती वाहतूक कन्वेयर बेल्टऐवजी डम्परनेच होणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून प्रकल्पात पुन्हा अडथळे निर्माण झाले असून यानिमित्ताने प्रकल्पातील अडथळ्यांची मालिका थंबता थांबत नसल्याचे चित्र आहे.