Travel from Borivali to Thane Kolshet in just 18 minutes: ठाणे ते बोरिवली प्रवासाचे अंतर कमी करून ते १५ मिनिटांवर आणण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या बोगद्यातून आता थेट ठाण्यातील कोलशेतपर्यंत सुसाट जाता येणार आहे. यासाठी एमएमआरडीएने आणखी एक प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाद्वारे बोगद्याला ठाणे खाडी किनारा मार्गाशी जोडण्यात येणार आहे. तेव्हा हा प्रकल्प नेमका काय आहे, त्यामुळे प्रवास कसा अतिजलद होणार आहे, याचा हा आढावा…

दुहेरी बोगदा आणि ठाणे किनारा मार्ग

ठाणे ते बोरिवली अंतर पार करण्यासाठी आजच्या घडीला एक ते दीड तासाचा अवधी लागतो. ठाण्याहून बोरिवलीला रस्तेमार्गे जाण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन एमएसआरडीसीने ठाणे-बोरिवली भूमिगत मार्ग प्रकल्प हाती घेतला. काही कारणांमुळे हा प्रकल्प २०२१ पर्यंत मार्गी लावणे एमएसआरडीसीला शक्य झाले नाही. मात्र या प्रकल्पाची आवश्यकता लक्षात घेऊन राज्य सरकारने अखेर हा प्रकल्प २०२१ मध्ये एमएमआरडीएकडे वर्ग केला. तर दुसरीकडे ठाण्यातील घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुंबईहून अहमदाबादला जाण्यासाठी याच मार्गाने जावे लागत असल्याने येथे वाहनांची प्रचंड गर्दी असते. तेव्हा येथील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी एमएमआरडीएने ठाणे खाडी किनारा मार्ग प्रकल्प हाती घेतला आहे.

कसा असेल भुयारी मार्ग?

ठाणे-बोरिवली भूमिगत मार्ग ११.८ किमी लांबीचा असून या भूमिगत मार्गात १०.२५ किमी लांबीचे दोन बोगदे आहेत. हे दोन्ही बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहेत. हा मार्ग सहा मार्गिकांचा (येण्यासाठी तीन-जाण्यासाठी तीन) असणार आहे. या प्रकल्पासाठी १८ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तीन मार्गिकांपैकी दोन वाहतुकीसाठी असतील, तर एक मार्गिका आपत्कालीन आहे.

कसा आहे ठाणे खाडी किनारा मार्ग?

खारेगाव ते गायमुख असा १३.१४ किमीचा ठाणे खाडी किनारा मार्ग असून तो सहा मार्गिकांचा असणार आहे. या प्रकल्पासाठी ३३०० कोटींहून अधिकचा खर्च अपेक्षित आहे. या खाडी किनारा मार्गात एक उड्डाणपूल, एक भुयारी मार्ग आणि तीन किमीचा एक स्टील्ट रस्ता बांधण्यात येणार आहे. हा खाडी किनारा मार्ग खारेगाव येथून सुरू होऊन गायमुखला संपणार आहे. बाळकुम, कोलशेत, वाघबीळ, ओवळा, कासारवडवली, मोघरपाडा परिसरांना हा मार्ग जोडणार असल्याने या ठिकाणी पोहोचणे सोपे होणार आहे.

दुहेरी बोगदा खाडी किनारा मार्गाशी

ठाणे-बोरिवली बोगद्याचे आणि ठाणे खाडी किनारा मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. हे दोन्ही प्रकल्प २०२८ मध्ये पूर्ण करून सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. अशात आता राज्य सरकारने दुहेरी बोगद्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणाही नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. बोगद्याचा विस्तार ठाणे खाडी किनारा मार्गापर्यंत करून बोगदा आणि खाडी किनारा मार्गाची जोडणी केली जाणार आहे. यासाठी एक स्वतंत्र प्रकल्प लवकरच हाती घेतला जाणार असून या प्रकल्पाची जबाबदारी एमएमआरडीएवर टाकण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार दुहेरी बोगद्याचा विस्तार ठाणे खाडी किनारा मार्गापर्यंत २.६५ किमीच्या उन्नत रस्त्याअंतर्गत केला जाणार आहे. हा उन्नत रस्ता टिकुजी-नी वाडी येथून सुरू होऊन कोलशेतला येऊन संपणार आहे. २.६५ किमीच्या या उन्नत रस्त्यातील ५००-६०० मीटरचा भाग भुयारी असणार आहे. या प्रकल्पाचे संरेखन आणि नियोजनाचे काम सध्या सुरू आहे. या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार झाल्यानंतर प्रकल्पाचे स्वरूप स्पष्ट होणार आहे.

बोरिवली ते कोलशेत, ठाणे अवघ्या १८ मिनिटांत?

दुहेरी बोगद्यामुळे २०२८ मध्ये बोरिवली ते ठाणे अंतर केवळ १५ मिनिटांत पार करता येणार आहे. त्याचवेळी ठाणे खाडी किनारा मार्गामुळे घोडबंदरमधील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची, वाहनचालकांची सुटका होणार असून तरीही २०२८ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर या दोन्ही प्रकल्पांना जोडणारा २.६५ किमीचा उन्नत रस्ता पूर्ण होऊन सेवेत दाखल झाल्यास बोरिवलीवरून कोलशेतला आणि कोलशेतवरून बोरिवलीला केवळ १८ मिनिटांत पोहोचता येणार आहे. मात्र या अतिजलद प्रवासासाठी ठाणेकरांना, मुंबईकरांना काही वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण आताच या प्रकल्पाची घोषणा झाली असून प्रकल्प प्राथमिक स्तरावर आहे. प्रकल्पाचे संरेखन, आराखडा तयार होऊन त्यास मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया पार पाडल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्पाच्या कामास सुरुवात केली जाणार आहे. यासाठी बराच कालावधी लागणार आहे. नेमका किती कालावधी लागणार आहे, हे या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच समजेल.