ठाणे जिल्ह्यात एकीकडे समृद्धी महामार्ग, ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग, खाडी किनारी मार्गाचे जाळे आणि मुंबईत वर्षागणिक नवीन मेट्रोची धाव सुरू होत असताना, मागील १० वर्षांपासून वडाळा-घाटकोपर-कासारवडवली हा प्रकल्प भूमिपूजन झाल्यानंतरही मंदगतीने सुरू आहे. मुंबई आणि ठाण्याला मेट्रोने जोडणारा हा प्रकल्प राज्य सरकारसाठी महत्त्वाकांक्षी मानला जातो. मुख्यमंत्रीपदी येताच देवेंद्र फडणवीस यांनी ११ वर्षांपूर्वी या प्रकल्पाची घोषणा केली. पुढे एकनाथ शिंदे आणि शिवसेनेसाठीही हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी ठरला. असे असतानाही या प्रकल्पाचे काम अपेक्षित वेगाने का सुरू नाही असा सवाल सातत्याने उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, मिरा-भाईंदर मेट्रोचा शुभारंभ होत असताना फडणवीस यांनीच ‘ठाणे जिल्ह्यातील पहिल्या मेट्रोचा मान भाईंदरच्या मेट्रोला जातो’ असे वक्तव्य करत एकप्रकारे मंदगती कामावर टोला हाणल्याची चर्चाही आता रंगली आहे.

हा प्रकल्प नेमका काय होता?

वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्ग चार हा प्रकल्प वडाळा-घाटकोपर-कासारवडवली असा आहे. ठाणे शहरातून हजारो नागरिक मुंबईत कामानिमित्ताने जातात. या प्रकल्पामुळे मध्य रेल्वे मार्गावरील तसेच रस्ते मार्गावरील प्रवासी वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी प्रकल्पाची बांधणी केली जात आहे. एकूण ३२.३२ किमी लांबीचा पूर्णत: उन्नत मार्गिकेचा प्रकल्प असून एकूण ३० मेट्रो स्थानकांचा यामध्ये सामावेश असेल. हा प्रकल्प पूर्व द्रुतगती महामार्ग, मध्य रेल्वे, मोनोरेल, मेट्रो मार्ग २ ब (डीएननगर ते मंडाले), मेट्रो मार्ग ५ (ठाणे ते कल्याण), मेट्रो मार्ग ६ (स्वामी समर्थनगर ते विक्रोळी) यांच्यात परस्पर जोडला जाणार आहे, असा दावा करण्यात आला होता.

प्रकल्पात स्थानके कोणती?

या मेट्रो प्रकल्पात एकूण ३० स्थानके आहेत. यातील ११ स्थानके ठाण्यातील तर उर्वरित मुंबई शहर आणि उपनगरांमधील आहे. यामध्ये भक्ती पार्क मेट्रो, वडाळा टीटी, आणिकनगर बस डेपो, सिद्धार्थ कॉलनी, गरोडिया नगर, पंतनगर, लक्ष्मीनगर, श्रेयस सिनेमा, गोदरेज कंपनी, विक्रोळी मेट्रो, सूर्या नगर, गांधीनगर, नेव्हल हाऊसिंग, भांडुप महापालिका, भांडुप मेट्रो, शांग्रीला, सोनापूर, फायर स्टेशन, मुलुंडनाका, ठाणे तीनहात नाका, ठाणे आरटीओ, महापालिका मार्ग, कॅडबरी जंक्शन, माजिवडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकूजी-नि-वाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन आणि कासारवडवली या स्थानकांचा सामावेश असेल.

प्रकल्पाची सद्यःस्थिती काय?

या प्रकल्पासाठी ठाणे शहरातील घोडबंदर रोड, पूर्व द्रुतगती महामार्ग, ठाणे-मुलुंड मार्गावर ठिकठिकाणी खोदकामे करण्यात आली होती. घोडबंदर मार्गाची खोदकामांमुळे अक्षरश: दैना झाली होती. सध्या मेट्रो स्थानकांची कामे सुरू असून अनेक ठिकाणी ही कामे अपूर्ण असल्याचे दिसते. निवडणूकांपूर्वी घोडबंदर भागात मेट्रोची चाचणीदेखील करण्यात आली. या मेट्रोचा पहिला टप्पा म्हणजेच, गायमुख ते कॅडबरी जंक्शन लवकरच सुरू होणार असा दावा सरकारकडून करण्यात आला होता. परंतु ही घोषणा फक्त कागदावरच राहिली. त्यानंतर ही मेट्रो धूळखात पडली आहे. येथील रहिवासीदेखील मेट्रो केव्हा सुरू होणार असा प्रश्न विचारत आहेत. दुसरीकडे घोडबंदर भागात नागरीकरण देखील वाढू लागले आहे. मागील १० वर्षांत अनेक बदल झाले. त्यामुळे आता मेट्रो सुरू झाल्यानंतर त्याचा किती प्रमाणात वापर होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

मेट्रो पूर्णत्वाच्या किती मुदती हुकल्या?

२०१६ मध्ये मेट्रोच्या कामास सुरुवात झाली होती. सुरुवातीला हा प्रकल्प अवघ्या सहा वर्षांत पूर्ण होईल असे स्वप्न दाखविण्यात आले होते. परंतु २०२० मध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढला. सर्व प्रकल्पांची कामे ठप्प झाल्याने त्याचा परिणाम मेट्रो चार प्रकल्पांवरही झाला. मजूर गावी निघून गेले. त्यामुळे या मेट्रोच्या मुदतीचे नियोजनदेखील बदलले. करोनाचा प्रादुर्भाव गेल्यानंतर हा प्रकल्प २०२४ मध्ये पूर्ण होणार असल्याचे सांगितले गेले. परंतु त्यानंतरही प्रकल्प पूर्ण झाला नाही. घोडबंदर भागातील मेट्रो स्थानकांची कामे सुरू झाल्यानंतर जून २०२५ मध्ये हा प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन आखले गेले. परंतु त्यावेळीही प्रकल्प पूर्ण झाला नाही. सप्टेंबर २०२५ मध्ये निवडणूकीपूर्वी या प्रकल्पाची चाचणी झाली. मेट्रो रुळांवर आल्याने ठाणेकरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण पदरी निराशा पडली. अनेक ठिकाणी स्थानकांची कामे पूर्ण नव्हती. असे असतानाही चाचणी घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.

पूर्ण प्रकल्प २०२७ नंतरच?

काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेमध्ये प्रकल्पाविषयी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी मेट्रो चारचा पहिला टप्पा एप्रिल २०२६ मध्ये खुला केला जाईल. दुसरा टप्पा डिसेंबर २०२६ मध्ये आणि तिसरा टप्पा नोव्हेंबर २०२७ मध्ये पर्यंत सुरू केला जाईल असे उत्तर मंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले होते. एप्रिल महिना सुरू असतानाही पहिला टप्पा अद्याप सुरू झाला नाही. त्यामुळे हा पूर्ण प्रकल्प २०२७ नंतर तरी सुरू होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.