scorecardresearch

Premium

विश्लेषण : नवी मुंबई, ठाण्यापाठोपाठ डोंबिवलीतही? सॅटीस प्रकल्प का ठरतेय गरज आणि अडचणही?

ठाण्यातील ‘सॅटीस’ प्रकल्पाचा गाजावाजा खूप झाला, मात्र यामुळे हा स्थानक परिसर प्रवासासाठी खरोखरच सुसह्य बनला का?

thane satis project
नवी मुंबई, ठाण्यापाठोपाठ डोंबिवलीतही? सॅटीस प्रकल्प का ठरतेय गरज आणि अडचणही?

जयेश सामंत

नवी मुंबईचा अपवाद वगळला तर मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील जवळपास सर्वच स्थानके अतिशय दाटीवाटीच्या क्षेत्रात आहेत. मुंबई आणि उपनगरांमधील जवळपास सर्वच भागांत रेल्वे स्थानक परिसर हा गर्दीचा, कोंडीचा आणि त्यामुळेच प्रवासांसाठी नकोसा असा होत असतो. मुंबईचे हे दुखणे लक्षात घेऊन नवी मुंबईत सिडकोने सर्वच रेल्वे स्थानक परिसरासाठी विस्तीर्ण अशी मोकळी जागा आरक्षित केली आणि त्याप्रमाणेच त्या-त्या भागाचा विकास केला. खासगी वाहने उभी करण्यासाठी मोठ्या क्षमतांचे वाहनतळ, रिक्षा-टॅक्सींसाठी स्वतंत्र मार्गिका, थांबे, स्वतंत्र बस डेपो अशी रचना नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांभोवती दिसते. सिडकोचे हे नियोजन ठाण्यातही आखले जावे यासाठी महापालिकेने दोन दशकांपूर्वी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात विकासाचे प्रारूप तयार केले. स्थानकाच्या पश्चिमेकडे उभारण्यात आलेल्या ‘सॅटीस’ (स्टेशन एरिया ट्रॅफीक इम्प्रूव्हमेंट स्किम) प्रकल्पाचा गाजावाजा खूप झाला खरा, मात्र यामुळे हा स्थानक परिसर प्रवासासाठी खरोखरच सुसह्य बनला का हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.

Bicycle Safari Special Cycle Safari for Tourists in Pench Tiger Reserve
पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसाठी खास ‘सायकल सफारी’
Nagzira Tiger Reserve Safari Begins
नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सफारी सुरू, कोका सफारी लांबणीवर; कारण काय? जाणून घ्या…
three ambitious projects
मुंबई : ‘या’ तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची कामे नव्या वर्षात सुरू होणार
barsu Carvings
बारसूमधील कातळशिल्पे संरक्षित यादीतून वगळली; कशेळीमधील कातळशिल्पांना ‘राज्य संरक्षित स्मारका’चा मान

शहर नियोजन आखणीत रेल्वे स्थानके नेमकी कुठे?

मुंबई आणि आसपासच्या शहरांमधील नागरिकांसाठी आजही दळणवळणाचे महत्त्वाचे साधन म्हणून लोकल रेल्वेकडे पाहिले जाते. राज्य सरकारने गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात मेट्रोचे जाळे उभारण्यास सुरुवात केली आहे. हे जाळे पूर्णपणे विणले गेले तरीही महानगर प्रदेशाच्या वाहतुकीची धमनी असलेल्या उपनगरीय रेल्वेचे महत्त्व कमी होणार नाही, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. मुंबईपाठोपाठ ठाणे आणि त्यालगतची शहरे विस्तारत असताना जिल्ह्याची लोकसंख्याही वर्षागणिक काही पटींनी वाढताना दिसत आहे. ठाण्यापासून अंबरनाथ, बदलापूर आणि पुढे वांगणी, कसाऱ्यापर्यत आता चौथी मुंबई विस्तारली जात असताना रेल्वेगाडी आणि तिचे थांबे असलेली स्थानके येत्या काळातही लाखो प्रवाशांच्या दैनंदिन जगण्याचा भाग राहतील असेच चित्र आहे. शहरांच्या विकासाच्या मोठ्या गप्पा एकीकडे मारल्या जात असल्या तरी रेल्वे स्थानक परिसर सातत्याने बकाल, विस्कळीत आणि नियोजनशून्य बनल्याचे पहायला मिळते.

नवी मुंबईचे वेगळेपण नेमके कशात?

राज्य सरकारने ठरवून आणि सिडकोसारख्या मोठ्या प्राधिकरणाची नियुक्ती करत नवी मुंबई हे वेगवेगळ्या उपनगरांचे एक शहर उभे केले. चंडीगडनंतर देशातील सर्वांत नियोजित शहर असा नवी मुंबईचा नावलौकीक असला तरी केवळ विस्तीर्ण रस्ते, मोकळ्या जागा, पायाभूत सुविधांचे भक्कम जाळे एवढ्यापुरते हे नियोजन मर्यादित नाही. नवी मुंबईला मुंबईशी जोडण्यासाठी आखण्यात आलेल्या उपनगरीय रेल्वे प्रकल्पात सिडकोने तब्बल ६७ टक्क्यांची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक मुळात रेल्वे स्थानके आणि स्थानक परिसर सुशोभीकरण तसेच नियोजनात आहे. सिडकोने प्रत्येक उपनगरातील रेल्वे स्थानके आणि परिसरासाठी विस्तीर्ण अशा जागा आरक्षित केल्या आणि नीटनेटकी स्थानक संकुले उभारली. तसेच त्यालगत असलेल्या परिसरात ये-जा करणे प्रवाशांना सुसह्य व्हावी यासाठी वाहनतळे, मोठे रस्ते, हाॅटेल तसेच व्यापारी संकुलांसाठी आरक्षित भूखंडाची आखणी केली. सिडकोने नवी मुंबईत राबविलेला ‘सॅटीस’चा हा प्रयोग देशभरातील यशस्वी प्रकल्पांपैकी एक मानला जातो. केवळ रेल्वेचे जाळे विस्तारून चालणार नाही तर स्थानक परिसरात येजा करणेही नागरिकांना सुसह्य ठरायला हवे असे नियोजन त्यामागे होते.

विश्लेषण: कार्बन डेटिंग काय आहे? ज्ञानवापीत सापडलेल्या शिवलिंगाचा काळ या पद्धतीने ठरवला जाऊ शकतो?

ठाण्यातील सॅटीसचे नेमके काय झाले?

ठाणे महापालिका क्षेत्रात ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या चार रेल्वे स्थानकांचा समावेश होता. असे असले तरी जवळपास ६५ टक्क्यांहून अधिक क्षेत्रातील नागरिकांचा भार एकमेव ठाणे रेल्वे स्थानक वाहत असते. जुने ठाणे, त्यालगत असलेला कोपरी, वागळे सारखा परिसर, विस्तारत जाणारे घोडबंदर, वर्तकनगर, त्यालगत उभ्या रहाणाऱ्या नव्या वसाहतींमधून काही लाखांच्या घरात नागरिकांचे वास्तव्य आहे. घोडबंदर तसेच आसपासच्या परिसरात झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येला दळणवळणाचा नवा पर्याय देण्यासाठी मेट्रो प्रकल्पाची उभारणी अंतिम टप्प्यात असली तरी ठाणे स्थानकावरील भार त्यामुळे किती कमी होईल हा प्रश्नच आहे. त्यामुळे कोपरी भागातील मनोरुग्णालयाच्या जागेवर नवे ठाणे स्थानक उभारण्याचा प्रस्ताव मंजुरीच्या टप्प्यात असला तरी जुन्या ठाणे रेल्वे स्थानक परिसराच्या विकासासाठी आतापर्यंत केल्या गेलेल्या प्रयत्नांना नेमके किती यश मिळाले याचे उत्तर फारसे समाधानकारक नाही.

ठाणे रेल्वे स्थानक परिसराच्या विकासासाठी सर्वप्रथम पश्चिमेची निवड महापालिकेने केली आणि याठिकाणी सॅटीसची उभारणी केली. याठिकाणी उभारण्यात आलेल्या डेकवर बसथांबे उभारले गेले खरे मात्र खालचा परिसर अत्यंत दाटीवाटीचा असल्याने या बसेस स्थानकापर्यंत येताना परिसरात होणाऱ्या कोंडीचा प्रश्न अजूनही महापालिका प्रशासनाला सोडविता आलेला नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभा केला जात असताना याच भागात आवश्यक अशा वाहनतळांची उभारणीदेखील वेळेत करण्याची आवश्यकता होती. मात्र पुरेशा वाहनतळांअभावी हा भाग अजूनही कोंडीचा आहे. ठाणे महापालिकेने आताकुठे गावदेवी मैदान भागात वाहनतळ उभे केले असले तरी दोन दशकानंतरही ही उपरती आहे. याशिवाय स्थानक परिसरात एखादी दुर्घटना घडली तर या भागात अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहचू शकेल याचीही शाश्वती नाही. त्यामुळे ठाण्याचा सॅटीस सदोष आणि या भागातील गर्दी वाढविणारा ठरला आहे.

विश्लेषण : विमान प्रवासादरम्यान मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवायला का सांगतात? जाणून घ्या खरं कारण…

नवे सॅटीस प्रकल्प किती आवश्यक?

असे असले तरी ठाणे आणि त्यापलिकडच्या स्थानकांमध्ये नवे सॅटीस प्रकल्प उभारणीची गरज मात्र कायम आहे. ही गरज ओळखून ठाणे महापालिकेने स्थानकाच्या पूर्व भागात थेट मनोरुग्णालयालगच्या नव्या स्थानकाला जोडणारा महत्त्वाकांक्षी सॅटीस प्रकल्प हाती घेतला आहे. कोपरी आणि पूर्व भागातील दाटीवाटीच्या रस्त्यावरील कोंडी यामुळे काही प्रमाणात कमी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत वाहतूक सुधारणा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे, तर डोंबिवली स्थानकाबाहेरही अशा प्रकल्पांची मागणी आता होताना दिसते. या स्थानकाबाहेरील परिसरात दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारती आणि वाहनतळासाठी जागांची मर्यादा लक्षात घेता हा प्रकल्प उभारणे हे आव्हानात्मक ठरेल यात शंका नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thane satis project to come in dombivali benefits and drawbacks print exp pmw

First published on: 25-09-2022 at 09:49 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×