Different Versions of Ramayana रामायण हे अस्सल भारतीय महाकाव्य आहे. वेगवेगळे समाज, पंथ, भाषा, प्रांतामध्ये रामायणाचे पुनर्लेखन करण्यात आले आहे. रामकथा कुठलीही असो तिचा जनमानसावर असलेला पगडा अद्भुत आहे. संस्कृत साहित्यापासून ते आधुनिक साहित्यापर्यंत रामकथा अनेक स्वरूपात भेटीस येतात. केवळ भारतातच नाही तर संपूर्ण आशिया खंडाला रामकथेचे आकर्षण आहे; त्याहीमध्ये आग्नेय आशिया अग्रेसर आहे. प्रत्येक भागाचे वैशिष्ट्य सांगणाऱ्या अनेक प्रांतिक रामकथांचे कालौघात लेखन करण्यात आले. प्रांत, भाषा, समाज, धर्म हे सारे भेद असतानाही रामकथेची पाळेमुळे शतकानुशतके सर्वत्र खोलवर रूजण्याचे कारण काय, याचा शोध घेणारे विश्लेषण…

रामकथा अनेक असल्या तरी त्यांचे मूळ मात्र वाल्मिकी रामायणात आहे. म्हणूनच वाल्मिकी रामायण हे संस्कृत साहित्यात आद्य काव्य तर वाल्मिकी ऋषी हे आद्य कवी मानले गेले. मूळ वाल्मिकी रामायण हे संस्कृत भाषेत आहे. संस्कृत साहित्यात त्यानंतर अनेक रामकथा लिहिल्या गेल्या. त्यात अद्भुत रामायण, आनंद रामायण, अध्यात्म रामायण, वशिष्ठ रामायण यांसारख्या अनेक रामकथांचा समावेश होतो. भारत हा देश वैविध्याने नटलेला आहे. यात सांस्कृतिक व भाषिक वैविध्य हे प्रकर्षाने जाणवणारे आहे. हीच विविधता भारतातील विविध भाषक रामायणांमध्येही पाहावयास मिळते.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
lokrang
गीतांचा भीमसागर…: चळवळीची गाणी…
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान
documentry article lokrang marathi news, lokrang article marathi
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : वन्यजीवांवरील रोमांचक प्रकल्प

प्रांतानुसार असलेली विविध रामायणे कोणती?

वेगवेगळ्या रामायण कथांचा गाभा एक असला तरी प्रादेशिक बदलांनुसार कथानकातील पात्रांच्या भूमिका व कृतींमागील तत्वज्ञानात भिन्नत्व दिसून येते. भारतीय प्रादेशिक रामायणांमध्ये उत्तर भारतातील रामचरितमानस, महाराष्ट्रातील भावार्थ रामायण, तामिळनाडूतील कंबन रामायण अशा वेगवेगळ्या रामायण कथांचा समावेश होतो. भारताबाहेरील आग्नेय आशियायी देशांमध्ये अनेक रामकथा लिहिल्या गेल्या, त्यामध्ये स्थानिक बदल प्रकर्षाने दर्शवितात. इंडोनेशिया या मुस्लिमबहुल देशात रचलेले पारंपरिक रामायण मुस्लिम बांधवांकडून तितक्याच आदराने देशाचा सांस्कृतिक वारसा म्हणून जोपासले जाते. देश, धर्म, पंथ भेदून रामायण उभे आहे. यामुळे रामायणात असे कुठले रसायन आहे जे सगळ्या भेदापलीकडे संस्कृतींना जोडण्याचे काम करते हे जाणून घेणे महत्वाचे ठरावे.

आणखी वाचा: विश्लेषण : शूर्पणखा स्वतंत्र स्त्री ते राक्षसी… खरेच कोण होती ती?

भेदांपलीकडे जाऊन रामायण घट्ट रुजण्याचे कारण काय?

रामायण हे एक आदर्श दर्शविणारे महाकाव्य आहे. माणसाला नेहमीच आयुष्य जगण्यासाठी एक आदर्श हवा असतो. तो मनुष्य, समाज कुठल्याही देशाचा, भाषेचा, धर्माचा असो मानसशास्त्रानुसार प्रत्येकाला आदर्शाची आस असते. किंबहुना प्रत्येक संस्कृती ही आदर्श जीवनशैलीच्या शोधात असते. प्रत्यक्षात असा आदर्श जगात कधीच, कुठे अस्तित्वात नाही किंवा निर्माण होणे कठीण आहे, याचीही माणसाला जाणीव असते. तरीही त्याचे मन सतत आदर्शांचा शोध घेते. रामायण या महाकाव्यातून समोर येणारा आदर्श हा जनमानसाला आपलासा वाटतो व त्यानुसार वर्तन हे नैतिकतेची पार्श्वभूमी देणारे ठरते. रामायण ही आदर्श कथा आहे. रोजच्या आयुष्यात असणारी नाती कशी असावी, कशी जपावी याचे उत्तम उदाहरण रामायण देते. त्यामुळे भारत व भारताबाहेर या महाकाव्याचा पगडा मोठा आहे.

तत्त्वज्ञानानुसार रामायणातील भेद कोणते?

रामायण या काव्याचे कर्तेपण वाल्मिकी ऋषींकडे जात असले तरी नंतर लिहिल्या गेलेल्या रामकथा जशाच्या तशा स्वीकारण्यात आलेल्या नाहीत. या कथांमध्ये प्रदेशांनुसार, भाषांनुसार, पंथानुसार, तत्वज्ञानानुसार बदल झालेले दिसतात. या अनेक राम कथांच्या यादीत असलेले जैन रामायण हे विशेष उल्लेखनीय आहे. सर्वसाधारणपणे जैन रामायण म्हटले की ते एकच असावे असा समज होतो. परंतु जैन पंथाशी निगडीत अनेक रामकथा लिहिल्या गेल्या. यातील पौमचरियु हे विशेष लोकप्रिय आहे. हे जैन रामायण महाराष्ट्री प्राकृत भाषेत असून या कथेचा कर्ता विमलसूरी आहे. अपभ्रंश भाषेतील पउमचरिउ (पौमाचरियु) हे आठव्या शतकात महाकवी स्वयंभू याने लिहिले. ही मूळ रामकथा असली तरी ही कथा जैन तत्वज्ञानाचा प्रभाव दर्शविते. जैन तत्वज्ञान हे अहिंसा प्रमाण मानणारे असल्याने या कथेनुसार राम हा रावणाचा वध करत नाही, तर लक्ष्मण करतो. या कथेनुसार रावणाची बहीण चंद्रनखा (शूर्पणखा) हिच्या शंबूक नावाच्या मुलाचा लक्ष्मणकडून वध झाल्याने रावण सीतेला पळवतो. किंबहुना कथेनुसार रावण हा जैन पंथाचे आदरातिथ्य करत होता. किंबहुना अनेक जिनालये बांधण्याचे कर्तेपण त्याकडे जाते. इतकेच नाही तर या हिंसेचे परिमार्जन लक्ष्मणाला नरकात जावून करावे लागले. सीता अग्निपरीक्षेनंतर मुनी सर्वभूषणांकडून दीक्षा घेते. तर राम हा जैन मुनी होतो.

जैन रामायणांमध्येही वेगळेपण…

कुमुदेंदु मुनींनी लिहिलेले कुमुदेंदु रामायण हे कर्नाटक प्रांतात तयार झालेले आणखी एक जैन रामायण आहे. या रामकथांचा काळ तेराव्या शतकाचा आहे. याशिवाय अद्भुत रामायण हे शाक्त पंथिय देवीविषयी भावना व्यक्त कऱणारे रामायण आहे. साहजिकच त्या कथेत सीता ही रावणाची कन्या असल्याचे नमूद केले आहे. या कथेत सीता स्वतःच रौद्ररूप धारण करून शतमुखी रावणाचा वध करते.

द्वयअर्थी अध्यात्म रामायण

हिंदू धर्मानुसार माणसाला दोनच प्रकारे मोक्ष मिळू शकतो. त्यातील पहिल्या प्रकारात त्याला खूप तपश्चर्या करावी लागते. त्यानंतरही मोक्षाची खात्री नसते. मात्र देवाच्याच हातून वध झाला किंवा मृत्यू आला तर थेट मोक्ष मिळतो. रावण हा अंतर्मनातून विष्णूभक्त असला तरी रामाचा अवतार घेऊन विष्णू पृथ्वीवर अवतरणार असल्याचे कळताच तो रामाच्या हातून मोक्ष मिळवण्यासाठी सारा खटाटोप करतो. सीताहरण करण्यामागे रामाने येऊन युद्ध करावे हाच हेतू असतो. म्हणून सीतेचे हरण केल्यानंतरही तो तिची काळजीच घेतो. मात्र यातील संवाद द्वयअर्थी आहेत. म्हणजे अशोकवनामध्ये रावण तिची भेट घेतो त्यावेळेस “कोण तो राम, कुठे असतो कुणास ठाऊक. त्याचे काहीच ठिकाण नाही. आज इथे तर उद्या तिथे जगात भटकणारा…” या आशयाचा संवाद आहे. यात तो देवच असल्याने त्याचे एकच ठिकाण नाही, त्याचे अस्तित्व सर्वत्र आहे. असा लक्ष्यार्थ अपेक्षित आहे. अध्यात्म रामायण हे असे व्यवहार आणि आध्यात्मिक अशा दोन पातळ्यांवर वाचावे लागते.

आणखी वाचा: विश्लेषण: आधुनिक फॅशन ट्रेण्डमध्ये ‘इंडिगो ब्लू’ आला कुठून?

आशियाई देशांमध्येही पाळेमुळे घट्ट

इंडोनेशिया हा मुस्लिमबहुल देश. तिथे काकविन रामायण त्यांच्या परंपरेचा अभिमानास्पद भाग म्हणून जपण्यात आले आहे. हे रामायण ९ व्या शतकात लिहिले गेल्याचे अभ्यासक मानतात. हे जावानीज भाषेत आहे. मुख्यतः ही रामकथा पडद्यावर छायादृश्याच्या स्वरूपात दाखविण्यात येते. तर थायलंडमध्ये रामकथा ही रामांकिन म्हणून प्रसिद्ध आहे. रामांकिन १३ व्या शतकात रचण्यात आले होते. खोन नृत्य हा एक पारंपारिक थाई नृत्य-नाटक प्रकार आहे. रामांकिन (रामायण) महाकाव्यांवर आधारित हे नृत्य हा थायलंडच्या परंपरेचा अनन्यसाधारण महत्त्वाचा भाग आहे. एकूणात रामायणातील आदर्शाने संपूर्ण आशियाला मोहिनी घातली असून खास करून आग्नेय आशियात रामकथा पाळेमुळे घट्ट करून शतकानुशतके उभी आहे!