राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी (२५ जुलै) राष्ट्रपती भवनातील ‘दरबार हॉल’ आणि ‘अशोक हॉल’ या दोन हॉलचे अनुक्रमे ‘गणतंत्र मंडप’ आणि ‘अशोक मंडप’ असे नामांतर करण्याची घोषणा केली. राष्ट्रपती सचिवालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दरबार हॉल हे नाव बदलण्यात आले आहे. दरबार हा शब्द भारतातील राजे आणि ब्रिटिशकालीन न्यायालये तसेच संमेलनांचा संदर्भ देतो. भारत हा देश आता प्रजासत्ताक आहे. त्यामुळे दरबार या शब्दाने प्रासंगिकता गमावली आहे. म्हणूनच या हॉलचे नामांतर गणतंत्र मंडप असे करण्यात आले आहे. १९११ साली राजधानी कोलकात्याहून दिल्लीला हलवण्याची घोषणा पंचम जॉर्जने केली. त्यामुळे राजधानी दिल्लीत राष्ट्रपती भवनाचे काम सुरु झाले होते. १९२९ साली हे काम पूर्ण झाले. सध्या नामांतरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवनाच्या इतिहासाचा घेतलेला हा आढावा. अधिक वाचा: Vasco da Gama ‘या’ गुजराती तांडेलाने ‘वास्को द गामा’ला भारतात आणले; इतिहास नेमके काय सांगतो? दरबार हॉलचे महत्त्व काय? दरबार हॉलमध्ये देशातील अत्यंत महत्त्वाचे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जातात. राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जाणारे महत्त्वाचे पुरस्कार याच ठिकाणी दिले जातात. तसेच देशाच्या सरन्यायाधीशांच्या शपथविधी समारंभासारखे महत्त्वाचे समारंभही याच हॉलमध्ये आयोजिले जातात. १९४७ साली भारताच्या पहिल्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याचाही दरबार हॉल हा साक्षीदार होता. या हॉलमध्ये प्रवेश करण्याचे अनेक मार्ग आहेत. एक मार्ग थेट राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणातून जातो. यावर्षीच्या सुरुवातीला एनडीए सरकारच्या शपथविधीचा सोहळा येथे आयोजित करण्यात आलेला होता. प्रसिद्ध इतिहासकार क्रिस्टोफर हसी यांनी म्हटले आहे की, आपण या दरबाराच्या जवळ गेलो तरी त्याचा प्रभाव जाणवणारा आणि शांत करणारा आहे. या दालनाच्या भिंती पांढऱ्या संगमरवरी ४२ फूट उंच आहेत. घुमट सुमारे २२ मीटर व्यासाचा आहे. जमिनीपासून ३३ मीटर उंचीवर छताला एक सुंदर बेल्जियम काचेचे झुंबर आहे. राष्ट्रपती भवनाचे बांधकाम सुरू होण्यापूर्वीच या वास्तूरचनेत भारतीय स्थापत्यकलेचा किती समावेश होता, हा प्रश्न वादग्रस्त ठरला होता. ‘द आर्ट्स अँड इंटिरिअर्स ऑफ राष्ट्रपती भवन: लुटियन्स अँड बियॉन्ड’ (२०१६) या पुस्तकात म्हटले आहे की, 'शेवटचा मुघल शासक बहादूर शाह जफरला बर्मामध्ये निर्वासित केल्यावर, इंग्रजांनी मुघलांच्या पायावर पाय ठेवत दिल्ली येथे राजधानी स्थापन केली. दरबार हॉलच्या निमित्ताने मुघल दरबाराच्या प्रतिकृतीचा राष्ट्रपती भवनाच्या रचनेत समावेश करून घेण्यात आला. म्हणूनच या हॉलला मुघल साम्राज्याचा वारसा असल्याचे मानले जाते.' वास्तुविशारद एडविन लुटियन्स यांची राष्ट्रपती भवनाच्या बांधकामाचे नेतृत्त्व केले. या वास्तूची रचना प्रामुख्याने पाश्चात्य धाटणीची होती. त्यात काही भारतीय स्थापत्य रचनेतील घटकांचा समावेश करण्यात आला. उदाहरणार्थ संगमरवरात घडवलेली जाळी (झरोका). ज्याचा उपयोग वायुविजन आणि प्रकाश परिवर्तनासाठी करण्यात आला. या हॉलमध्ये संगमरवर मोठ्या प्रमाणात वापरण्यात आला आहे. हॉलमधील पिवळ्या जैसलमेर संगमरवरात घडवलेले स्तंभ विशेष लक्षवेधक आहेत. याशिवाय अलवर, मारवाड आणि अजमेर येथून मागवलेल्या वेगवेगळ्या रंगाच्या संगमरवर दगडांचा वापर या हॉलमध्ये करण्यात आला आहे. एक चॉकलेटी संगमरवरही वापरण्यात आला, जो इटलीवरून मागवण्यात आला होता. या हॉलमध्ये व्हाईसरॉय आणि त्यांच्या पत्नीसाठी दोन सिंहासनेही बसवण्यात आली होती. नंतरच्या काळात या सिंहासनाची जागा राष्ट्रपतींच्या खुर्चीने घेतली. म्हणूनच अगदी सुरुवातीच्या कालखंडात या हॉलला सिंहासनकक्षही म्हणत होते. राष्ट्रपतींच्या खुर्चीच्या मागे पाचव्या शतकातील बुद्धमूर्तीही आहे. पुस्तकात म्हटले आहे की, या हॉलमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. परंतु सिंहासनाच्या वरील छतावर काहीही बदल करण्यात आलेले नाहीत. भारत स्वतंत्र झाल्यावर व्हाइसरॉयचे सिंहासन मात्र हलवण्यात आले. अधिक वाचा: भारतीय बांगड्यांची किणकिण ८००० वर्ष जुनी.. अशोक हॉलचा इतिहास काय आहे? ‘अशोक हॉल’ हा मुळात बॉलरूम होता. या हॉलमध्ये परदेशातील प्रमुख व्यक्तींची ओळखपत्रे सादर करणे, राष्ट्रपतींकडून दिलेल्या मेजवानीपूर्वीच्या औपचारिक भेटी, महत्त्वाच्या समारंभांपूर्वी राष्ट्रगीताचे गायन याच हॉलमध्ये होते. या हॉलमध्ये छताला सहा बेल्जियम झुंबरं आहेत. भिंतीला असलेली पेंटिंग्स या हॉलच्या सौंदर्यात भर घालतात. त्यातील एक चित्र पर्शियाचा शासक फत अली शाह याने दिले होते. त्यात वाघाची शिकार करताना दाखवण्यात आले आहे. इटालियन कलाकार टोमासो कोलोनेलो आणि २३ भारतीय कलाकारांकडे या हॉलमधील इतर चित्रांचे श्रेय जाते. या हॉलच्या छतावर पर्शियन भाषेतील लेख कोरण्यात आले आहेत. शिवाय शिकारीची काही चित्रेही आहेत. हॉलच्या भिंतीवर शाही मिरवणुकीचे चित्र आहे. येथेही भारतीय आणि पाश्चिमात्य स्थापत्यकलेचे मिश्रण पाहायला मिळते. या हॉलमधील दोन फायरप्लेस व्हिक्टोरियन डिझाईन्सपासून प्रेरित असल्याचे पुस्तकात म्हटले आहे. परंतु या फायरप्लेसवर पर्शियन लेखही सापडतो. ‘Khudavandi ke arso kursi afrdkt; Twanad Kudratas kasre chinsdkt’….याचा अर्थ देवाने सिंहासन निर्माण केले, त्याचे सामर्थ्य महाल देखील तयार करू शकते. Raunako zebuzinat makdn; Nadlde beruye zamin dsmdn’….म्हणजे अशा सुंदर वास्तू पृथ्वीवर किंवा आकाशात कुठेही दिसू शकत नाहीत. अशा या ऐतिहासिक महत्त्वाच्या दालनांची नावे बदलून त्यांना भारतीय परंपरेतील नावे देण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे, असे मानले जाते. यापूर्वी जी २० परिषदेच्या खेपेसही राष्ट्रपतींच्या 'बडा खाना'चे आमंत्रण प्रेसिडेंट ऑफ भारत या नावे जारी करण्यात आले होते