Tectonic plate is splitting भूवैज्ञानिकांच्या एका अभ्यासानुसार, पर्वतरांगेखाली असलेल्या टेक्टोनिक प्लेट्स्मध्ये काही बदल आढळून आले आहेत. हे बदल लाखो नागरिकांसाठी धोक्याचे ठरू शकतात, असेही सांगितले जात आहे. भूगर्भशास्त्रानुसार, संपूर्ण पृथ्वी १२ टेक्टॉनिक प्लेट्सवर वसलेली आहे. या प्लेट्सची टक्कर झाल्यानंतर बाहेर पडणाऱ्या ऊर्जेला भूकंप, असे म्हणतात. पृथ्वीच्या खाली असलेल्या या प्लेट्स अतिशय संथ गतीने फिरत असतात. त्यादरम्यान एकमेकांच्या खालून काही प्लेट्स घसरल्या जातात, तर काही प्लेट्स वेगळ्या होत जातात.

प्लेट्स सरकताना एकमेकांवर आपटल्यावर भूकंप होतो. शतकानुशतके खंडित होऊन नवीन भूमीचे वस्तुमान तयार करणाऱ्या आणि अवाढव्य पर्वत तयार करण्यासाठी एकत्र येणाऱ्या या टेक्टॉनिक प्लेट्स भूवैज्ञानिकांसाठी नेहमीच सखोल शोधाचा विषय ठरल्या आहेत. मात्र, भूवैज्ञानिकांच्या अभ्यासात या प्लेट्स दुभंगत असल्याचे समोर आले आहे. याचा नक्की काय परिणाम होणार? अभ्यासातून काय समोर आले? त्याविषयी जाणून घेऊयात…

वैज्ञानिकांना नक्की काय आढळले?

भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने हिमालयाला स्वतःचे एक विशेष स्थान आहे, हे पर्वत निसर्गाची भव्यता आणि सामर्थ्य यांचे प्रतीक आहे. हिमालय पर्वतरांग ही पृथ्वीवरील सर्वांत प्रतिष्ठित पर्वतरांगांपैकी एक आहे. अनेक दशकांपासून शास्त्रज्ञांनी हिमालय पर्वताच्या निर्मितीस कारणीभूत असलेल्या इंडियन आणि युरेशियन प्लेट्समधील टेक्टोनिक टायटन्सची टकर होणाऱ्या प्रक्रियेचा अभ्यास केला आहे. ही प्रक्रिया या भागाची रचना आणि भूकंपाच्या हालचालीचे कारण मानले जाते.

हिमालय आणि तिबेटचे पठार हे पृथ्वीवरील सर्वांत शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या याच प्रक्रियेचे परिणाम आहेत. जेव्हा इंडियन प्लेट युरेशियन प्लेटखाली ढकलली जाऊ लागली म्हणजे अंदाजे ५० ते ६० दशलक्ष वर्षांपूर्वी ही प्रक्रिया सुरू झाली तेव्हा शास्त्रज्ञांना असा विश्वास होता की, इंडियन प्लेट ही जाड व एकसमान आहे आणि तिबेटच्या कवचाखाली ती सहजपणे सरकत आहे. परंतु, ‘एस वेव्ह रिसिव्हर फंक्शन तंत्र वापरून केलेल्या नवीन सिस्मिक इमेजिंगने हे अंदाज काही प्रमाणात चुकीचे ठरवले आहेत.

ताज्या भूगर्भीय अभ्यासानुसार, हिमालयाच्या खाली असलेली इंडियन प्लेट एकसमान नाही. ती तिच्या लांबीनुसार वाकते आणि दुभंगते. यादोंग-गुलू व कोना-सांग्री यांसारख्या प्रमुख फटींच्या भागांजवळ ही प्लेट वाकली जाते. पश्चिम हिमालयाच्या भागात प्लेट बऱ्यापैकी अखंड राहते आणि यारलुंग-झांगबो सूचरच्या उत्तरेस सुमारे १०० किलोमीटर खाली सरकते. तसेच पूर्वेकडील भागातही लक्षणीय बदल दिसून येतात. या भागात भारतीय टेक्टोनिक प्लेटचा लिथोस्फेरिक मँटल (पृथ्वीचा अंतर्भाग) विलग झाल्याचे दिसते.

इंडियन प्लेट तुटण्याच्या प्रक्रियेत आहे?

या विलगीकरणामुळे एक अॅस्थेनोस्फेरिक वेज तयार होतो. अॅस्थेनोस्फेरिक वेज हा तुटलेल्या थरांमध्ये अडकलेला मऊ खडक आहे. या शोधातून असे दिसून येते की, तिबेटखालील भारतीय टेक्टोनिक प्लेट केवळ टक्कर देत नसून, दोन भागांत विभागत आहे. त्यामुळे भूगर्भशास्त्रज्ञांना या डोंगराळ प्रदेशाखालील गतिमानता समजून घेण्यासाठी आपल्या अभ्यासाचे स्वरूप बदलावे लागणार आहे.

हा प्रदेश वारंवार भूकंपांसाठी संवेदनशील का ?

तिबेटी झऱ्यांमधून होणारे हेलियम वायूचे उत्सर्जन आणि खोल भूकंपाच्या हालचालींचे नमुने यांच्या निरीक्षणांद्वारे अभ्यासाचे निष्कर्ष समोर आले आहे. या निष्कर्षांमधून शास्त्रज्ञांना गोंधळात टाकणाऱ्या वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या घटनांमागील कारण समोर आले आहे. भारतीय टेक्टोनिक प्लेटचे तुटणे आणि विलग होणे पृथ्वीच्या कवचात अतिरिक्त तणाव निर्माण करते, ज्यामुळे भूकंप सुरू होऊ शकतात आणि रीफ्ट झोन तयार होऊ शकतात. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधील भूभौतिक शास्त्रज्ञ सायमन क्लेम्परर यांनी अमेरिकन जिओफिजिकल युनियनमध्ये सादर केलेल्या याच अभ्यासातील या निष्कर्षांचे महत्त्व सांगितले.

ते म्हणाले, “प्लेटचे तुटणे आणि खाली सरकणे यांमुळे पृथ्वीच्या कवचात नवीन तणाव बिंदू निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वारंवार आणि संभाव्यतः अधिक शक्तिशाली भूकंप होऊ शकतात.” त्याव्यतिरिक्त, कोना-सांग्री रिफ्टसारख्या खोल भेगा या बदलांशी जोडलेल्या असल्याचे दिसून येते, ज्यामुळे या भागातील भूकंपाचा धोका वाढतो, असेही ते सांगतात. मोनाश युनिव्हर्सिटीमधील भूगतिकी शास्त्रज्ञ फॅबिओ कॅपिटानिओ यांनी नमूद केले आहे, “हे संपूर्ण चित्र समजून घेण्यासाठी आणखी डेटा आवश्यक आहे.”

त्यासाठी अभ्यास सुरू असल्याचेही ते सांगतात. या अभ्यासाचा उद्देश हिमालयाच्या निर्मितीची समज वाढवणे आणि या प्रदेशातील भूकंपांचे मूल्यांकन करण्यात मदत करणे हा आहे, असे त्यांचे सांगणे आहे. अभ्यास आणि मॉडेल्स अनेक शतकांपासून भूभागाच्या हालचाली मोजण्याचा प्रयत्न करीत आहेत. पुढील अभ्यासातून आणखी कोणत्या गोष्टी समोर येतात, हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे, कारण- या प्लेट्स दुभंगण्याचा थेट संबंध भूकंपाशी आहे.