ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या गटात सहभागी होण्यासाठीच्या नवे निकषांची घोषणा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने अलीकडेच केली. शारीरिकदृष्ट्या पूर्णांशाने महिला असणाऱ्या खेळाडूंनाच संधी मिळावी यासाठी हे निकष लागू करण्यात आले आहेत. यामुळे पारलिंगी व्यक्तींना ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता मावळली आहे.
ऑलिम्पिक चार्टरनुसार, स्पर्धेदरम्यान संतुलन, सुरक्षितता, खरेपणा राहावा आणि जैविकदृष्ट्या महिला असणाऱ्या खेळाडूंनाच व्यासपीठ मिळावं असं नमूद करण्यात आलं आहे.
अमेरिकेत होणाऱ्या २०२८ ऑलिम्पिक स्पर्धेत हे नवे निकष लागू होणार आहेत. गेल्या वर्षी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑलिम्पिक समितीसाठी एक विशेष आदेश पारित केला. महिला गटातून सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी लिंग हा निकष असावा आणि लिंगभाव हा निकष नसावा. लिंगभाव याआधारित प्रवेश न देता लिंग या संकल्पनेवर आधारित प्रवेश द्यावा. यासाठी ट्रम्प यांनी आदेश काढला होता.
पारलिंगी महिला तसंच ज्या महिलांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनचं पातळी अधिक आहे त्यांच्या क्रीडा स्पर्धेतील सहभागावरून नेहमीच वादाला तोंड फुटतं. या मुद्यावरून टोकाची मतंमतांतरं पाहायला मिळतात. २०२४ पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत, इमेन खालिफ हिने सुवर्णपदकावर नाव कोरलं. मात्र तिच्या यशाला वादाची किनार होती. महिला गटातून खेळलेली इमेन ही पारलिंगी महिला असल्याचा आरोप झला होता.
नवे निकष आणि एकूणच या विषयासंदर्भात काय धोरण आहे आणि टीका का होते याचा घेतलेला आढावा.
सेक्स आणि जेंडर यात नेमका काय फरक आहे?
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने २०२१ मध्ये एलिजिबिलिटी पॉलिसी अर्थात पात्रता धोरणाचा पुनर्आढावा घेतला. यासाठी ऑलिम्पिक समितीने स्पोर्ट्स सायन्स, हार्मोन्सशास्त्र, पारलिंगी वैद्यकशास्त्र, क्रीडावैद्यकशास्त्र, महिला आरोग्य, नीतीमूल्य, कायदा अशा क्षेत्रातील तसंच महिला खेळाडूंशी सविस्तर चर्चा केली. यातून सहमतीने एका मुद्यावर मतं एकवटली. महिला गटातून खेळणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या शारीरिकदृष्ट्या महिला असण्याच्या अनुषंगाने प्रवेश दिला जाईल.
यासाठी सेक्स आणि जेंडर या संकल्पनांमधला फरक समजून घेणं आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या मानकांनुसार, सेक्स म्हणजे पुरुष, स्त्री किंवा असल्याची ओळख ही प्रजननात्मक जैविक ओळख याभोवती केंद्रित आहे. पुरुष, स्त्री ही ओळख प्रामुख्याने गुणसूत्रांच्या आधारे होते. गुणसूत्रांमध्ये जनुकं असतात. मानवी शरीरात २३ गुणसूत्रं असतात. २२ गुणसूत्रं ही पुरुष आणि महिला यांच्यात सामाईक असतात. सेक्स अर्थात लिंग निर्देशित करणारं गुणसूत्र वेगळं असतं. XX गुणसूत्रांमुळे स्त्री जन्माला येते आणि xy गुणसूत्रामुळे पुरुष जन्माला येतो.
इंटरसेक्स म्हणजे आंतरलैंगिक व्यक्तींमध्ये अशा गुणसूत्रांचा अभाव असतो. महत्त्वाचा मुद्दा असा की महिलांच्या प्रजननक्षम अवयवांनिशी जन्मलेल्या लोकांमध्ये XY गुणसूत्रं असू शकतात. यालाच Swyer syndrome असं म्हटलं जातं. लिंग वाढीदरम्यान उद्भवणारी समस्या (डिसऑर्डर ऑफ सेक्स डेव्हलपमेंट) असं याला म्हणता येईल. दक्षिण आफ्रिकेची धावपटू कास्टर सेमेन्या हिच्याबाबत असंच काहीसं झालं होतं. तिच्या शरीरात डिसऑर्डर ऑफ सेक्स डेव्हलपमेंट अशी स्थिती होती. शरीरातील टेस्टोटेरनची पातळी जाणीवपूर्वक कमी केल्याशिवाय तिला खेळता येणार नाही असा निवाडा झाला होता. यासाठी तिने लवादाकाडे दाद मागितली होती.
सेक्सच्या तुलनेत जेंडर (लिंगभाव हा सामाजिकतेचा परिपाक असतो) पुरुषाला आपण पुरुष आहोत किंवा स्त्रीला आपण स्त्री आहोत असं वाटणं महत्त्वाचं आहे. लिंगभाव हा प्रत्यक्ष लिंगापेक्षा वेगळा असू शकतो. पारलैंगिक स्त्रीला हिला पुरुषाचे प्रजनन अवयव असू शकतात. पण तिला आपण महिला आहोत असं वाटू शकतं.
महिलांच्या क्रीडा स्पर्धेत जेंडर एलिजिबिटी हा कळीचा मुद्दा का होतो?
आधुनिक क्रीडा स्पर्धांमध्ये पुरुष आणि स्त्री या गटांच्या माध्यमातून खेळवल्या जातात. पुरुषांच्या शरीरात काही घटक वेगळे असतात त्यामुळे महिलांच्या तुलनेत शारीरिकदृष्ट्या त्यांना अधिक फायदा मिळतो.
SRY हे जनुक वाय गुणसूत्रात आढळतं. टेस्टटेरोनच्या निर्मितीसाठी हे जनुक कारणीभूत असतं. हार्मोन्सचा शरीरातल्या गुणवैशिष्ट्यांवर कसा परिणाम होतो हे अनेक अभ्यासांद्वारे अभ्यासण्यात आलं आहे. २०१७ मध्ये ‘Circulating Testosterone as the Hormonal Basis of Sex Differences in Athletic Performance’असा प्रबंध सादर करण्यात आला. एक्ड्रॉक्राईन मध्ये हा प्रबंध प्रसिद्ध झाला होता. यामध्ये टेस्टटेरोन आणि खेळाडूंची कामगिरी यातील परस्परसंबंधांचा अभ्यास करण्यात आला होता.
शरीरात निर्माण होणारी टेस्टोस्टेरॉनची पातळी क्रीडा स्पर्धेतली कामगिरी बदलवू शकते असा निष्कर्ष काढण्यात आला होता. यासंदर्भात पुरेशी माहिती नसली तरी उपलब्ध माहितीनुसार हेच सिद्ध होत आहे. टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढल्यामुळे स्नायूंची ताकद वाढते. हाडांचा आकारही वाढतो. हिमोग्लोबिन तयार होतं. बाकी संशोधनांच्या मते, यासंदर्भात उपलब्ध डेटा पुरेसा नाही.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नव्या धोरणानुसार हा फरक पुरुष आणि महिलांच्या कामगिरीत १० ते २० टक्क्यांचा बदल घडवू शकतो. पॉवरलिफ्टिंग, भालाफेक, जंपिंग यामध्ये हा फरक प्रामुख्याने जाणवतो. टेस्टटेरोनची पातळी किती आहे आणि त्याचा खेळाडूच्या कामगिरीवर किती परिणाम होतो हे खेळानिहाय बदलत जातं. आधुनिक संसाधनं हाताशी असली तरी टेस्टटेरोनमुळे खेळातली कामगिरी उंचावते असं मांडणारा ठोस सिद्धांत नाही. महिला खेळाडूंच्या शरीरात टेस्टटेरोनोची पातळी जास्त आहे त्यांना बाकी खेळाडूंच्या तुलनेत फायदा मिळतो का? यावर सातत्याने चर्चा होते. बास्केटबॉलपटू ले ब्रॉन जेम्स याला मिळालेलं उंचीचं वरदान आणि सार्वकालीन महान जलतरणपटू मायकेल फेल्प्स याला मिळालेले सुपासारखे हात आणि टेस्टटेरोनची पातळी जास्त असलेली महिला खेळाडू हे एकाच पातळीवर मानता येईल का?
महिला क्रीडा स्पर्धांमध्ये लिंगसमानता या मुद्याचा केंद्रबिंदू हाच आहे. ज्या महिलांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनची पातळी जास्त आहे त्यांना स्पर्धेत सहभागी होऊ देता कामा नये. कारण बाकी महिला खेळाडूंच्या अशा महिला खेळाडूला फायदा मिळतो.
ऑलिम्पिक समितीच्या नव्या धोरणानुसार, “XY ट्रान्सजेंडर आणि/किंवा अँड्रोजन-संवेदनशील XY-DSD खेळाडूंना (त्यांची कायदेशीर लैंगिक ओळख काहीही असो) महिला गटात समाविष्ट करणे—विशेषतः ज्या क्रीडा स्पर्धा शक्ती, सामर्थ्य आणि/किंवा सहनशक्तीवर आधारित आहेत, हे स्पर्धांमध्ये न्याय्यता, सुरक्षितता आणि प्रामाणिकता सुनिश्चित करण्याच्या तत्त्वांच्या विरोधात जाते.
याचे परिणाम काय असू शकतात?
२०२१ मध्ये महिला क्रीडा स्पर्धांसंदर्भात संबंधित खेळांच्या संघटनांनीच एलिजिबिलिटी क्रायटेरिया ठरवावेत असं ऑलिम्पिक समितीने म्हटलं होतं. हे निकष ठरवताना प्रासंगिक गोष्टी लक्षात घ्याव्यात मात्र तसं ठरवताना न्यायभाव, सर्वसमावेशकता आणि कोणावरही दुजाभाव होणार नाही याची काळजी घ्यावी. कोणालाही विनाकारण फायदा मिळू नये आणि फायदा मिळाल्यामुळे अन्य कोणाला इजाही होऊ नये असं समितीने म्हटलं होतं
आधीच्या मानकांनुसार, टेस्टोस्टेरॉनची पातळी लिटरमागे १० नॅनोमोल इतकी असणं अपेक्षित होतं. मात्र नव्या धोरणानंतर हे चित्र बदलेल. नवं धोरण आंतरराष्ट्रीय महासंघ, क्रीडा संघटनांनी अनुसरावं. ऑलिम्पिक संदर्भातील निकषांची अंमलबजावणी करताना राष्ट्रीय संघटनांनी बदललेलं धोरण लक्षात घ्यावं.
वर्ल्ड अॅथलेटिक्स संघटनेने टेस्टोस्टेरॉनची पातळी हा निकष प्रमाण मानला होता. Disorders of Sex Development ही स्थिती शरीरात असणाऱ्या खेळाडूंना टेस्टोस्टेरॉनची पातळी लिटरमागे २.५ नॅनोमोल एवढी २ वर्ष आधी ठेवणं बंधनकारक करण्यात आलं होतं. ही पातळी निर्देशानुसार इतकी नियंत्रित झाल्यानंतर ते स्पर्धेसाठी आवश्यक पात्रता स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. गेल्या वर्षी त्यांनी टोकियोत झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर महिला खेळाडूंमना SRY जनुक चाचणी अनिवार्य केली.
फिना अर्थात जागतिक जलतरण संघटना, आंतरराष्ट्रीय सायकलिंग संघटना, आंतरराष्ट्रीय रग्बी युनियन यांनी टेस्टस्टेरॉन पातळीच्या अनुषंगाने पारलिंगी महिला खेळाडूंवर बंदी आणली आहे. खरंच अशा बंदीच्या कारवाईची आवश्यकता आहे का? असा सवाल केला जात आहे. कारण प्रत्येक खेळात लागणारं कौशल्य विभिन्न असतं. पारलिंगी खेळाडूंसाठी खुला गट असावा अशीही मागणी होत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर असे खेळाडूंची संख्या खूपच कमी आहे.
अनेकांनी हा वाद म्हणजे महिलांच्या महिला असण्याच्या टक्केवारीचा वाद असं याचं वर्णन केलं आहे. विविध स्वरुपाच्या लिंगओळखी हे राजकारणाची ओळख बनू पाहत आहे.
एलजीबीटीक्यू समुदायाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, खेळात लोकांना एकत्र आणण्याची ताकद आहे. ध्रुवीकरण झालेल्या आधुनिक जगात ऑलिम्पिक समितीचा हा निर्णय आणखी तट पाडणारा आहे. खेळांमध्ये सुरक्षितता आणि समान न्याय असणं आवश्यक आहेच, याविषयी दुमत नाही. मात्र या धोरणाचे पारलिंगी जगतात अनपेक्षित परिणाम होण्याची शक्यता आहे. तुम्ही खेळ जगतापासून दूर राहिलात तरंच बरं अशा प्रकारचा संदेश नव्या धोरणाद्वारे जाऊ शकतो.
