विश्लेषण : नथुराम गोडसेचा खटला काय? महात्मा गांधींच्या हत्येनंतर नेमकं काय झालं? |The trial of Nathuram Godse: What happened after Gandhi was killed | Loksatta

विश्लेषण : नथुराम गोडसेचा खटला काय होता? महात्मा गांधींच्या हत्येनंतर नेमकं काय झालं?

नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या केली, त्यानंतर १९४९ पर्यंत त्याच्या विरोधात खटला सुरु होता. काय काय घडलं? वाचा सविस्तर बातमी

Mahatma Gandhi and Nathuram Godse
जाणून घ्या काय काय घडलं होतं?

नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या केली तो दिवस होता ३० जानेवारी १९४८. त्यानंतर नथुराम गोडसे विरोधात खटला चालला. या खटल्यात लाल किल्यावर विशेष न्यायालय स्थापन करण्यात आलं होतं. या न्यायालयाने नथुराम गोडसेला फाशीची शिक्षा ठोठावली. पंजाब हायकोर्टात दाखल केलेल्या आपल्या अपीलामध्ये नथुराम गोडसेने महात्मा गांधींच्या हत्येचा कट रचल्याच्या मुद्द्यावर आक्षेप घेतला होता. मात्र हत्येबाबत त्याने पश्चाताप व्यक्त केला नाही असं अपील ऐकणाऱ्या न्यायमूर्ती खोसला यांनी लिहून ठेवलं आहे.

७५ वर्षांपूर्वी काय घडलं होतं?

७५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजेच ३० जानेवारी १९४८ ला दिल्लीतल्या बिर्ला हाऊस या ठिकाणी महात्मा गांधी होते. ते प्रार्थनेसाठी जात असताना नथुराम गोडसे त्यांच्या समोर आला. त्याने पॉईंट ब्लँक रेंजवरून महात्मा गांधी यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळ्या महात्मा गांधी यांना पोटात, छातीत आणि मांडीवर लागल्या. त्यामुळे १५ मिनिटात महात्मा गांधी यांचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर तिथे असलेल्या लष्करी जवानांनी नथुराम गोडसेला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे असलेलं पिस्तुल जप्त केलं. त्यानंतर त्याला पोलिसांकडे सोपवण्यात आलं. पोलिसांकडे द्यायच्या आधी तिथे आलेल्या जमावाने नथुरामला बेदम मारलं होतं. पोलिसांनी त्याला तुघलक रोडवर आणल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

२० जानेवारी १९४८ ला महात्मा गांधी यांच्या हत्येचा प्रयत्न

२० जानेवारी १९४८ ला महात्मा गांधी यांच्या हत्येचा पहिला प्रयत्न करण्यात आळा होता. त्यानंतरच्या पत्रांमध्ये, भाषणांमध्ये महात्मा गांधी यांनी किमान १४ वेळा आपल्या मृत्यूचा उल्लेख केला होता.

नथुराम गोडसेविरोधातला खटला

दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर स्थापण्यात आलेल्या विशेष न्यायालयात मे १९४८ मध्ये नथुराम गोडसेच्या विरोधातला महात्मा गांधींच्या हत्येचा खटला सुरु झाला. Why They Killed Gandhi : Unmasking the Ideology and the Conspiracy हे पुस्तक अशोक कुमार पांडे यांनी लिहिलं आहे. त्यामध्ये पांडे यांनी म्हटलं आहे की नथुराम गोडसेविरोधात जेव्हा खटला चालला त्याचा खर्च सरकारने केला. तो तुरुंगात असताना त्याने ज्या मागण्या केल्या त्यातल्या अनेक मागण्या मान्य केल्या गेल्या. तुरुंगातून जेव्हा नथुरामला कोर्टात आणण्यात आलं तेव्हा त्याने कोर्टाला हे सांगितलं की तुरुंगात असताना त्याला कुठलाही त्रास झाला नाही. जून १९४८ ते नोव्हेंबर १९४८ या कालावधीत १४९ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. तर फिर्यादीने ४०४ डॉक्युमेंट्री आणि ८० साहित्यकृती समोर आणत पुरावे सादर केले.

नथुराम गोडसे आणि इतरांच्या अपीलावर सुनावणी करणाऱ्या पंजाब उच्च न्यायालयातील न्यायालयीत तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाचा भाग असलेले न्यायमूर्ती जी. डी. खोसला यांनी असं म्हटलं आहे की दिगंबर बडगे हे प्रमुख साक्षीदार होते. हत्येच्या योजनेत दिगंबर बडगे सहभागी होते, त्यानंतर त्यांनी साक्ष दिली होती. न्यायमूर्ती खोसला यांच्या द मर्डर ऑफ महात्मा या पुस्तकातही दिगंबर बडगेंचा उल्लेख आहे. त्याच्या अटकेनंतर तो माफीचा साक्षीदार होण्यास तयार झाला असंही खोसला यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे. या सगळ्या घटनाक्रमानंतर १० फेब्रुवारी १९४९ ला निकाल देण्यात आला. न्यायमूर्ती आत्मचरण यांनी नथुराम गोडसे आणि त्याच्या पाच साथीदारांना दोषी ठरवले. त्यानंतर नथुराम गोडसेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. महात्मा गांधी यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपातून वीर सावरकर निर्दोष सुटले. आपल्या निकालाविरोधात दोषींना कोर्टात अपील करता येईल असंही न्यायाधीशांनी सांगितलं होतं. यानंतर चार दिवसांनी या सगळ्यांनी पंजाब हायकोर्टात अपील दाखल केलं. पंजाब हायकोर्ट त्यावेळी पूर्व पंजाब उच्च न्यायालय या नावाने ओळखले जात होते. महात्मा गांधींच्या हत्येचा कट रचण्यात आला यावर आक्षेप घेतला गेला होता. यानंतर नथुराम गोडसेने वकील नेमण्यास नकार दिला आणि स्वतः युक्तिवाद करण्याची संमती मागितली होती. न्यायालयाने नथुरामची ही विनंती मान्य केली.

नथुराम गोडसेला त्याच्या कृतीचा पश्चात्ताप नव्हता

न्यायमूर्ती खोसला यांनी लिहिलेल्या पुस्तकानुसार नथुराम गोडसेने आपली बाजू मांडत असताना आपण एक निर्भय देशभक्त आहोत असा युक्तिवाद केला. तसंच मी हिंदू विचारसरणीचं प्रतिनिधीत्व करतो, मी जी कृती केली त्याचा मला काहीही पश्चात्ताप झालेला नाही असंही नथुराम गोडसेने सांगितल्याचं खोसला यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केलं आहे. या सगळ्या कोर्टात घडलेल्या वाद प्रतिवादानंतर नथुराम गोडसेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. १५ नोव्हेंबर १९४९ ला नथुराम गोडसेला अंबाला येथील तुरुंगात फाशी देण्यात आली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 16:38 IST
Next Story
विश्लेषण: घरबसल्या काम देण्याच्या नावाखाली २०० कोटींची फसवणूक? नेमका घोटाळा काय?