US Iran conflict अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध पेटले आहे. त्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव वाढला आहे. इस्रायलबरोबरच्या ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’मध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्यासह अनेक उच्चपदस्थ इराणी अधिकारी मारले गेल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. “अमेरिकेच्या निर्धारावर कोणत्याही राष्ट्राने शंका घेऊ नये,” असे अमेरिकन सेंट्रल कमांडने रविवारी म्हटले आहे.

दरम्यान, इराणने प्रत्युत्तर म्हणून अनेक आखाती देशांवर हल्ले केले आहेत आणि आपण अमेरिकेचा बदला घेणार असल्याचे सांगितले आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष पेटला असून, याचे जगभरात परिणाम पाहायला मिळत आहेत. त्यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबर सुरू असलेला संघर्ष हा काही आठवडे चालू शकतो, असे सूचित केले आहे. पण,अमेरिकेने इराणमध्ये नेमकी कोणती शस्त्रे तैनात केली आहेत? त्याविषयी जाणून घेऊयात…

प्रीसिजन स्ट्राईक बॅलिस्टिक मिसाईल्स

प्रीसिजन स्ट्राईक मिसाईल (पीआरएसएम) हे लॉकहीड मार्टिनने तयार केलेले कमी पल्ल्याचे शस्त्र आहे. ‘द वॉर झोन’च्या मते, ‘आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टीम’च्या पीआरएसएम क्षेपणास्त्राचा युद्धात पहिल्यांदाच वापर करण्यात आला आहे. हे क्षेपणास्त्र M142 हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम वाहनावरून डागण्यात आले. प्रीसिजन स्ट्राईक मिसाईलचे मूळ मॉडेल ‘इन्क्रिमेंट १’ किमान ५०० किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा वेध घेऊ शकते. अमेरिकन सैन्य ही क्षमता ६५० किलोमीटरपर्यंत वाढवण्याचे प्रयत्न करत आहे. एक हजार किलोमीटरपर्यंत मारा करू शकणारे आणखी एक लांब पल्ल्याचे मॉडेलही विकसित करण्यात येत आहे.

ल्युकास ड्रोन्स

‘स्ट्राइप.कॉम’नुसार, सेंटकॉमने गेल्या आठवड्यात जाहीर केले की, इराणमध्ये कमी खर्चाचे मानवरहित लढाऊ ड्रोन्स तैनात करण्यात आले आहेत. टास्क फोर्स स्कॉर्पियन स्ट्राईकने (टीएफएसएस) युद्धात पहिल्यांदाच कमी खर्चाच्या ‘वन-वे अटॅक’ ड्रोन्सचा वापर केला. गेल्या वर्षाच्या अखेरीस पश्चिम आशियामध्ये टीएफएसएस सक्रिय करण्यात आले होते. सैनिकांपर्यंत कमी खर्चात आणि प्रभावी ड्रोन क्षमता जलद गतीने पोहोचवण्यासाठी ही टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे.

ॲरिझोनास्थित स्पेक्ट्रवर्क्स कंपनीने तयार केलेले हे ड्रोन इराणच्या ‘शाहेद-१३६’ ड्रोन्सचे रिव्हर्स-इंजिनिअर्ड व्हर्जन आहे. ‘सीएनबीसी’ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रत्येक ड्रोनची किंमत सुमारे ३५,००० डॉलर्स (अंदाजे ३२ लाख रुपये) आहे. लाखो डॉलर्सचा खर्च येणाऱ्या इतर क्षेपणास्त्रांच्या तुलनेत हे ड्रोन्स खूपच स्वस्त आहेत. ‘फॉर्च्युन’च्या मते, अमेरिकेने डिसेंबरमध्ये पर्शियन गल्फमध्ये नौदलाच्या जहाजावरून ल्युकास ड्रोनची चाचणी घेतली होती.

‘बिझनेस इनसाइडर’नुसार, या ड्रोन्सना ‘लॉयटरिंग म्युनिशन्स’, असेही म्हणतात. रशियाने युक्रेन युद्धादरम्यान याचा मोठ्या प्रमाणावर वापर करून हाहाकार माजवला होता. रशिया आता ‘गेरान-२’ नावाने शाहेद-१३६ ची स्वतःची आवृत्ती तयार करत आहे. ल्युकास ड्रोन कॅटापल्ट्स, वाहने आणि मोबाईल ग्राउंड स्टेशनवरून डागले जाऊ शकतात. हे ड्रोन एखाद्या भागावर बराच वेळ घिरट्या घालू शकतात आणि लक्ष्य निश्चित झाल्यावर वेगाने खाली झेप घेऊन स्फोट घडवून आणतात.

B-2 बॉम्बर्स

अमेरिकन संरक्षण अधिकाऱ्यांनी संगितले आहे की, अमेरिकेने इराणमध्ये ‘B-2 स्पिरिट’ म्हणून ओळखली जाणारी B-2 बॉम्बर्स तैनात केली आहेत. ‘फॉक्स न्यूज’च्या वृत्तानुसार, चार B-2 स्टेल्थ बॉम्बर्सनी इराणमधील भूमिगत बॅलिस्टिक मिसाईल तळांवर २००० पाउंडचे बॉम्ब टाकले. यापूर्वी अमेरिकेने इस्फहान, फोर्डो व नतांझमधील भूमिगत अणू तळांना लक्ष्य करण्यासाठी या बॉम्बर्सचा वापर केला होता. त्यावेळी अमेरिकेच्या ताफ्यातील सर्वांत मोठे पारंपरिक बॉम्ब ‘GBU-57 मॅसिव्ह बंकर बस्टर्स’ वापरण्यात आले होते, जे १३,६०० किलो वजनाचे होते.

वटवाघळाच्या पंखांप्रमाणे आकार असलेले हे स्टेल्थ बॉम्बर्स अमेरिकेचे सर्वांत शक्तिशाली विमान मानले जाते. एका B-2 बॉम्बरची किंमत तब्बल १ अब्ज डॉलर्स (अंदाजे ९,१४७ कोटी रुपये) आहे. चार जेट इंजिन असलेले B-2 बॉम्बर पारंपारिक शस्त्रे आणि अण्वस्त्रे दोन्ही वाहून नेण्यास सक्षम आहे. B-2 बॉम्बरमध्ये हवेतच इंधन भरण्याची सोय आहे. B-2 बॉम्बर ५०,००० फुटांपेक्षा जास्त उंचीवर उडू शकतो. नॉर्थ्रॉप ग्रुमनने तयार केलेल्या या विमानाच्या पंखांचा विस्तार १७२ फूट आहे. हे विमान एकदा इंधन भरल्यावर ६,००० नॉटिकल मैल प्रवास करू शकते. केवळ दोन जणांच्या क्रूद्वारे चालवले जाणारे हे बॉम्बर्स मिसूरी येथील व्हाईटमॅन एअर फोर्स बेसवर तैनात असतात.

टॉमहॉक क्रूझ मिसाइल्स

‘सीएनएन’च्या वृत्तानुसार, अमेरिकेने इराणमधील लक्ष्यांवर अनेक टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रे डागली आहेत. ही क्षेपणास्त्रे या भागातील अर्ले बुर्के-क्लास जहाजांसह मार्गदर्शित-क्षेपणास्त्र विनाशिकांवरून डागण्यात आली. ‘स्ट्राइप.कॉम’नुसार, यूएसएस थॉमस हडनर व USS फ्रँक ई. पीटरसन ज्युनियर या दोन्ही जहाजांनी इराणवर टॉमहॉक क्षेपणास्त्रे डागली आहेत. १६०० किलोमीटर पल्ला असलेल्या या क्षेपणास्त्राची लांबी २० फूट असून, वजन १५०० किलोग्राम आहे. रेथिऑन कंपनीने तयार केलेले हे क्षेपणास्त्र जमीन किंवा समुद्र अशा दोन्ही ठिकाणांहून डागता येते.

पेंटागॉनच्या बजेटनुसार, अमेरिका २०२६ मध्ये अशी ५७ क्षेपणास्त्रे खरेदी करणार आहे. एका क्षेपणास्त्राची सरासरी किंमत १.३ दशलक्ष डॉलर्स (अंदाजे ११.८९ कोटी रुपये) आहे. या शस्त्रास्त्रांच्या मार्गदर्शन प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी लाखो डॉलर्स खर्च केले जात आहेत. रेथिऑन आणि पेंटागॉन यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार टॉमहॉकचे उत्पादन दरवर्षी १००० युनिट्सपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अमेरिकन आणि मित्रराष्ट्रांच्या सैन्याने यापूर्वी येमेनमधील हुथी बंडखोरांच्या तळांवर हल्ले करताना टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा वापर केला आहे.

फायटर जेट्स

अमेरिकन सेंट्रल कमांडने इराणवरील हल्ल्यात वापरल्या जाणाऱ्या F/A-18 व F-35 फायटर जेट्सचे फोटो आणि व्हिडीओ प्रसिद्ध केले आहेत. F-35 हे स्टेल्थ फायटर विमान असून, ते रडारला चकवा देण्यात आणि अचूक मारा करण्यामध्ये सक्षम आहे. अमेरिकेने पश्चिम आशियामध्ये मोठ्या प्रमाणावर F-35 तैनात केली आहेत. F-35 विविध प्रकारची क्षेपणास्त्रे वाहून नेऊ शकते, त्यात शत्रूची रडार यंत्रणा नष्ट करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. इस्रायली हवाई दलाद्वारेदेखील या जेट्सचा वापर केला जात आहे. बोईंगने तयार केलेले F-18 हे बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे.

MQ-9 रिपर्स

अमेरिकेने इराणमध्ये MQ-9 रिपर ड्रोन्सदेखील तैनात केले आहेत. रिपरला प्रीडेटर बी ड्रोन म्हणूनही ओळखले जाते. MQ-9 रिपर्स ११ मीटर लांब असून, त्याच्या पंखांचा विस्तार २२ मीटरपेक्षा जास्त आहे. याची पेलोड क्षमता १७४६ किलोग्रॅम आहे. ‘सीएनएन’नुसार, एका इंजिनावर चालणारे व रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रित केले जाणारे हे ड्रोन्स हेलफायर क्षेपणास्त्रे आणि मार्गदर्शित बॉम्बनी सुसज्ज असतात. त्यांचा वापर प्रामुख्याने अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील लक्ष्यांना टिपण्यासाठी केला जातो.