अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. ५ नोव्हेंबर २०२४ रोजी या निवडणुकीसाठीचे मतदान पार पडणार आहे. तत्पूर्वी, या निवडणुकीचा प्रचार आणि आपापले मुद्दे अमेरिकन जनतेसमोर ठेवण्याचे काम दोन्ही पक्ष करणार आहेत. डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे या निवडणुकीसाठी राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार असणार आहेत. अमेरिकेमध्ये द्विपक्षीय अध्यक्षीय लोकशाही आहे. तिथे निवडणुकीपूर्वी निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांनी जाहीर वादविवाद करण्याची प्रथा आहे. याला ‘प्रेसिडेन्शियल डिबेट’ असे म्हणतात. सामान्यत: तीन प्रेसिडेन्शियल डिबेट्स केल्या जातात. त्यातील पहिला वादविवाद २७ जून रोजी पार पडणार आहे. हा वादविवाद टेलिव्हिजन वाहिन्यांवरून प्रसारित केला जाणार आहे. त्यामुळे, या दोघांमधील वादविवाद मोठ्या प्रमाणावर पाहिला जाईल आणि फक्त अमेरिकेतीलच नव्हे तर जगातील माध्यमांना आणि राजकारण्यांना चर्चेसाठी नवनवे विषय प्राप्त होतील. या वादविवादांच्या माध्यमातून हे दोघेही उमेदवार आपल्या अमेरिकन मतदारांवर छाप पाडण्याचा प्रयत्न करतील. पुढील गुरुवारी (२७ जून) CNN वाहिनीवर पार पडणाऱ्या या वादविवादातील कोणत्या पाच महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष दिले पाहिजे, ते पाहूयात.

उमेदवारांची मानसिक स्थिती

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये जो बायडेन (८१) आणि डोनाल्ड ट्रम्प (७८) यांच्यात लढत होणार आहे. या दोघांचेही वय पाहता ते राष्ट्राध्यक्ष पदासाठी किती तंदुरुस्त आहेत, हा मुद्दाही महत्त्वाचा ठरेल. बायडेन आणि डेमोक्रॅट्स डोनाल्ड ट्रम्प यांची मानसिक अवस्था ठीक नसल्याचा दावा सतत करतात. तसेच ट्रम्प हे अमेरिकन लोकशाहीसाठी धोकादायक आहेत, असेही विधान वारंवार करतात. याआधीही बरेचदा ट्रम्प विषय सोडून भरकटताना दिसले आहेत. बरेचदा ते नावे विसरतात आणि त्यामध्येही गोंधळ करतात. मागे एकदा त्यांनी बायडेन यांना बराक ओबामा म्हणून संबोधित केले होते. त्यांच्या अशा वागण्यामुळे लोकांनी भुवया उंचावल्या होत्या. मात्र, दुसऱ्या बाजूला बायडेन यांचे वय ट्रम्प यांच्या वयाहून अधिक आहे. त्यामुळे, त्यांच्या वयाबद्दल आणि त्यांच्या मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीबद्दल अमेरिकन मतदारांना चिंता असल्याचेही दिसून आले आहे. बायडेन यांच्या काही टीकाकारांचे असे म्हणणे आहे की, बायडेन यांच्याही कामाची गती मंदावली आहे आणि बरेचदा तेदेखील बोलताना चुका करताना दिसतात. ज्याप्रकारे बायडेन ट्रम्प यांच्या मानसिक अवस्थेविषयी विधाने करताना दिसतात, अगदी त्याचप्रकारे ट्रम्पदेखील बायडेन यांची खिल्ली उडवताना त्यांना ‘स्लीपी जो’ असे म्हणतात आणि त्यांना वार्धक्यामुळे शारीरिक व मानसिक कमकुवतपणा आल्याची टीका करतात.

हेही वाचा : कबड्डी, खोखोचे सामने ऑलिम्पिकमध्ये रंगणार? नवे खेळ कसे सामील केले जातात?

आक्रमक होण्याची आणि चिडचिड करण्याची पातळी

बायडेन आणि ट्रम्प हे दोघेही त्यांच्या रागासाठी आणि संयम गमावण्यासाठी ओळखले जातात. बायडेन यांनी संयम गमवावा म्हणून ट्रम्प हंटर बायडेन या त्यांच्या मुलाच्या खटल्याचा उल्लेख करू शकतात. जो बायडेन यांचे सुपुत्र हंटर बायडेन नुकतेच एका बंदूक खरेदी प्रकरणामध्ये अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची माहिती लपवल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत. मात्र, बायडेन यांना अशा प्रकारचे हल्ले नवे नाहीत. मात्र, प्रेसिडेन्शियल डिबेट्समध्ये बायडेन आपला संयम कशाप्रकारे राखून ठेवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दुसऱ्या बाजूला ट्रम्प यांनाही आपला संयम टिकवून ठेवावा लागेल. त्यांनी जर आपला संयम गमावला तर त्यांच्या बाजूला असलेले सभ्य आणि सहिष्णू मतदार त्यांच्यापासून दुरावण्याची शक्यता आहे. रिपब्लिकन पक्षाला वादविवादासाठी सल्ले देणाऱ्या सल्लागाराने अति आक्रमक न होण्याबाबत आधीच इशारा दिला आहे. “तुम्ही उद्धट आहात, विरोधकांच्या मुद्द्यांना प्रतिवाद करू शकत नाही असे वाटेल, इतकेही आक्रमक तुम्ही होऊ शकत नाही”, असे मत रॉयटर्सशी बोलताना ब्रेट ओ’डोनेल यांनी मांडले; ते रिपब्लिकन पक्षाचे वादविवादासाठीचे सल्लागार आहेत.

वादविवादादरम्यान चुकीची माहिती

डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या भाषणांमधून वा वक्तव्यांमधून चुकीची माहिती पसरवण्यासाठी अनेकदा टीकेचे धनी झालेले आहेत. बायडेनदेखील बरेचदा आपले मुद्दे वाढवून-चढवून सांगताना आढळले आहेत. काहीवेळा ते चुकीची तथ्येही मांडताना दिसतात. या वादविवादामध्ये प्रभावी ठरण्यासाठी दोघेही वास्तवापेक्षा वेगळी चुकीची माहिती सादर करू शकतात. वादविवादामध्ये वेळेची कमतरता असल्याने या चुकीच्या गोष्टी दुरुस्त करून लोकांना सांगणे दोघांसाठीही कठीण असू शकते. यापेक्षा दोन्ही उमेदवारांचे प्रचार सहाय्यक त्यांच्या विरोधकांनी केलेल्या विधानांची सत्यता तपासतील आणि वादविवादादरम्यानच केलेल्या कोणत्याही खोट्या दाव्याला आव्हान देण्यासाठी ते त्वरीत विधानेही जारी करतील. दुसऱ्या बाजूला माध्यमेही या खोट्या दाव्यांची सत्यता तपासून जनतेसमोर आणतील.

हेही वाचा : पूनम पांडे, दु:खाचे भांडवल आणि लक्ष वेधण्याचा प्रकार; ‘सॅड फिशिंग’बाबतचे नवे संशोधन काय सांगते?

प्रचाराची दिशा आखणे

वादविवादात आपली बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि विरोधकांवर चढाई करण्यासाठी दोन्हीही उमेदवार काही ठोस मुद्द्यांसहित आलेले असतील. बायडेन ट्रम्प यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये सिद्ध झालेले दोष नक्कीच उपस्थित करतील. दुसऱ्या बाजूला ट्रम्प यांनी सातत्याने असा दावा केला आहे की, बायडेन यांनी त्यांच्या राजकीय बळाचा वापर करून ट्रम्प यांचा छळ केला आहे. अर्थात, याला त्यांनी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. बायडेन यांनी ट्रम्प यांची प्रतिमा ‘लोकशाहीसाठी धोका’ असल्याची उभी केली आहे. तेव्हा आपल्या तोंडून कोणतेही लोकशाहीविरोधी वक्तव्य बाहेर पडणार नाही, याची काळजी ट्रम्प यांना घ्यावी लागणार आहे. एकमेकांवर चढाई करण्यासाठी नको ते मुद्दे आणि आरोप करण्यापेक्षा दोन्ही उमेदवारांनी जनतेच्या हिताच्या मुद्द्यांवर भाष्य करावे, अशी तज्ज्ञांची अपेक्षा आहे. आपल्या कार्यकाळात केलेल्या अर्थव्यवस्थेतील कामगिरीचा अति अभिमान व्यक्त करणे बायडेन यांनी टाळले पाहिजे.

प्रेक्षक नसताना वादविवाद

याआधी असे वादविवाद होताना समोर प्रेक्षक बसलेले असायचे, ते आता असणार नाहीत. वादविवाद करताना प्रेक्षकांमधूनही प्रतिसाद मिळायचा, ज्यामुळे वादविवाद करताना नवनवे मुद्दे सुचायचे तसेच हुरूपही यायचा. मात्र, आताच्या वादविवादामध्ये असा कोणताही प्रतिसाद समोरून मिळणार नाही, हे दोघांसाठीही थोडे कठीण असणार आहे. विशेषत: ट्रम्प यांना प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादावर स्वार होण्याची सवय आहे. त्यांच्यासाठी प्रेक्षकांचे नसणे अवघड ठरू शकते. दुसरीकडे, CNN या माध्यम संस्थेने एकमेकांच्या बोलण्यामध्ये आणला जाणारा व्यत्यय टाळण्यासाठी उमेदवारांचा मायक्रोफोन बंद करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, ट्रम्प तरीही बायडेन यांच्या बोलण्यामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करु शकतात, यामुळे त्यांच्यावर काही मतदार नाराजही होऊ शकतात. घरामध्ये बसून हा वादविवाद पाहणाऱ्या मतदारांना कोणता उमेदवार अधिक चांगल्या प्रकारे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यात आणि प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरतो, त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील.