Third Anglo Maratha War Khadki : ५ नोव्हेंबर १८१७ रोजी पुण्याच्या खडकीजवळ मराठ्यांनी इंग्रजांवर जोरदार हल्ला चढवला. पण मराठ्यांना निर्णायक विजय मिळवता आला नाही. या अपयशामागे दुसऱ्या बाजीरावांची धरसोड वृत्ती, युद्धापूर्वी गमावलेली संधी आणि निर्णायक क्षणी घेतलेले माघारीचे निर्णय किती कारणीभूत होते?

५ नोव्हेंबर १८१७. पुण्याच्या खडकीजवळ मराठ्यांची प्रचंड फौज आणि इंग्रजांची तुलनेने लहान तुकडी आमनेसामने उभी होती. बापू गोखल्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी इंग्रजांवर हल्ला चढवला. लढाई संध्याकाळपर्यंत सुरू राहिली. दोन्ही बाजूंनी माघार घेतली; पण युद्धाचा निकाल स्पष्ट झाला नाही.

या लढाईत इंग्रजांची परिस्थिती नाजूक होती. मराठ्यांचं संख्याबळ मोठं होतं. त्यांच्या बाजूला बापू गोखल्यांसारखा अनुभवी सेनानी होता. पण, युद्धभूमीवर सैन्याचं सामर्थ्य जितकं महत्त्वाचं असतं, तितकाच महत्त्वाचा असतो त्यामागचा राजकीय निर्णय. खडकीच्या लढाईत हाच निर्णय पेशव्यांच्या बाजूने निर्णायक ठरू शकला नाही.

दुसऱ्या दिवशी पुन्हा हल्ला करण्याची संधी मराठ्यांकडे होती का? बापू गोखले इंग्रजांना पराभूत करू शकले असते का? दुसऱ्या बाजीरावांनी माघारीचा आदेश दिला नसता तर पेशवाईचा इतिहास वेगळा घडला असता का? या प्रश्नांची उत्तरं शोधताना खडकीच्या लढाईकडे केवळ एक युद्ध म्हणून न पाहता, पेशवाईच्या अखेरच्या राजकीय आणि लष्करी अपयशाचा महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहावं लागतं.

हेही वाचा

तहानंतर वाढलेला अविश्वास

दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीत १८१७ हे वर्ष अत्यंत अस्थिर होतं. १८१८ मध्ये पेशवाईचा अंत होण्याआधीच इंग्रजांनी मराठा सत्तेभोवती आपला पाश आवळला होता. मराठा सरदारांची स्वतंत्र सत्ताकेंद्रं, त्यांच्यातील मतभेद आणि इंग्रजांचा वाढता हस्तक्षेप, यांमुळे पेशव्यांच्या हातातली प्रत्यक्ष सत्ता मर्यादित होत गेली. १८०२ च्या वसईच्या तहाने या प्रक्रियेला निर्णायक वळण दिलं. इंग्रजांची मदत घेऊन बाजीराव पुन्हा पुण्याच्या गादीवर आले; पण त्याची किंमत म्हणून त्यांना इंग्रजांच्या अटी मान्य कराव्या लागल्या.

इंग्रजांच्या मदतीवर अवलंबून राहावं लागणं आणि स्वतःच्या राज्यकारभारात त्यांचा वाढता हस्तक्षेप यांमुळे बाजीराव अस्वस्थ होते. त्यांना गमावलेली प्रतिष्ठा आणि सत्ता पुन्हा मिळवायची होती. या परिस्थितीत बाजीरावांसमोर दोन पर्याय होते. इंग्रजांच्या अटी स्वीकारून त्यांच्याशी जुळवून घ्यायचं किंवा मराठा सरदारांना एकत्र आणून स्वतंत्र सत्ता पुन्हा उभी करायची. त्यांनी दुसरा मार्ग निवडण्याचा प्रयत्न केला.

इतिहासकार ग्रँट डफ यांनी ‘अ हिस्ट्री ऑफ द मराठाज’च्या तिसऱ्या खंडात नोंदवल्याप्रमाणे, वरकरणी इंग्रजांशी सहकार्य करण्याची भाषा करत असतानाच बाजीरावांनी लष्करी तयारी सुरू ठेवली होती. सैन्याची भरती, किल्ल्यांची दुरुस्ती, शस्त्रसाठा आणि इतर मराठा सत्तांशी संपर्क अशा हालचाली सुरू होत्या. इंग्रजांच्या सैन्यातल्या भारतीय शिपायांना फितवण्याचे प्रयत्नही झाले. बापू गोखले यांच्याकडे युद्धाच्या तयारीची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

पण, या तयारीत एक मोठी विसंगती होती. युद्धाची तयारी सुरू होती पण युद्ध कधी आणि कसं सुरू करायचं, याबाबत पेशव्यांकडे ठाम निर्णय दिसत नव्हता. इंग्रजांच्या फौजा पुण्याच्या आसपास असताना त्यांच्यावर आधी हल्ला करावा असा गोखल्यांचा आग्रह होता. पण, बाजीराव हा निर्णय पुढे ढकलत राहिले, असं रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांनी ‘मराठी रियासत उत्तरविभाग ३’मध्ये नोंदवलं आहे. या विलंबाचा फायदा इंग्रजांना झाला.

बाजीरावांचा लहरीपणा

दुसऱ्या बाजीरावांच्या स्वभावाबद्दल तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्यांनी केलेली वर्णने अनेकदा पक्षपाती असू शकतात, तरीही त्यांच्या राजकीय वर्तनाचं प्रतिबिंब त्यात आढळतं. त्यांच्या निर्णयांवर अनेकदा संशय, असुरक्षितता आणि लहरी मनःस्थितीचा प्रभाव दिसून येतो. इंग्रजांशी बोलताना सहकार्याची भाषा आणि प्रत्यक्षात युद्धाची तयारी, असा विरोधाभास त्यांच्या धोरणात होता.

माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन हे इंग्रज अधिकारी पुण्यात मुक्कामाला होते. त्यांच्याशी झालेल्या भेटीत बाजीरावांनी इंग्रज सरकारबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती; पण बाजीरावांच्या हालचालींवरून त्यांचा हेतू वेगळाच असल्याचं एल्फिन्स्टन यांना जाणवत होतं. सर जॉन माल्कम यांच्यासारखे अधिकारी बाजीरावांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवत असताना एल्फिन्स्टन अधिक सावध होते. त्यांनी संभाव्य संघर्षाचा अंदाज आधीच व्यक्त केला होता असं डफ सांगतात.

बाजीरावांच्या स्वभावाचं वर्णन करताना रियासतकार गो. स. सरदेसाई यांनी एल्फिन्स्टनच्या निरीक्षणाचा संदर्भ दिला आहे. त्यात बाजीरावांच्या शारीरिक धैर्याबद्दल आणि संकटाच्या वेळी त्यांच्या वर्तनाबद्दल कठोर टिप्पणी आढळते. एल्फिन्स्टनच्या मते, बाजीराव शारीरिकदृष्ट्या अत्यंत डरपोक होते आणि स्वतःचा हा दुबळेपणा मान्य करण्यात त्यांना कोणतीही लाज वाटत नव्हती.

हल्ल्याची संधी गमावली

ऑक्टोबर १८१७ मध्ये पुण्यातल्या इंग्रज सैन्याची स्थिती फारशी मजबूत नव्हती. जनरल स्मिथ यांची फौज दूर होती. मुंबईहून येणारी युरोपियन रेजिमेंटही अद्याप पोहोचलेली नव्हती. पुण्यातलं इंग्रज सैन्य संख्येने कमी होतं. पेशव्यांच्या फौजांनी इंग्रज सैन्याच्या आसपासच आपल्या राहुट्या टाकल्या होत्या. अशा वेळी अचानक हल्ला केल्यास मराठ्यांना मोठं यश मिळण्याची शक्यता होती.

२८ ऑक्टोबरच्या रात्री पेशव्यांच्या छावणीत हल्ल्याची तयारी सुरू असल्याची माहिती एल्फिन्स्टनला मिळाली. त्या धास्तीने एल्फिन्स्टन गच्चीवर जाऊन समोरच्या गदारोळाचा अंदाज घेऊ लागला असं डफ नोंदवतात. पण, बाजीरावांनी पुन्हा हल्ला पुढे ढकलला. बापू गोखले तातडीने हल्ला करण्याच्या बाजूने होते; पण पेशव्यांना इंग्रजांच्या शिपायांना फितवण्याच्या प्रयत्नांना आणखी वेळ द्यायचा होता. या विलंबात इंग्रजांची युरोपियन रेजिमेंट पुण्यात दाखल झाली. त्यानंतर त्यांनी आपले बंगले सोडून खडकीला अधिक सुरक्षित ठिकाणी आपली छावणी हलवली.

इथं बाजीरावांची पहिली मोठी चूक दिसते. शत्रू तुलनेने कमकुवत असताना त्याच्यावर निर्णायक हल्ला करण्याऐवजी त्यांनी संधी हातातून जाऊ दिली. युद्ध सुरू होण्याआधीच इंग्रजांना तयारीसाठी वेळ मिळाला; शिवाय मराठ्यांच्या गुप्त हालचालींची माहितीही इंग्रजांपर्यंत पोहोचत होती.

खडकीच्या रणांगणावर

५ नोव्हेंबरला पेशव्यांनी आपल्या लवाजम्यासह पर्वती गाठली आणि बायकापोरांसोबत ते खडकीची लढाई बघण्यासाठी खिडकीत येऊन बसले, असं रियासतकार सरदेसाई सांगतात. सकाळपासून बापू गोखले आणि इतर सरदार सैन्याची जमवाजमव करत होते. दुपारपर्यंत मराठ्यांची फौज खडकीच्या दिशेने बाहेर पडली. दुसरीकडे इंग्रजांना हल्ल्याची चाहूल लागली आणि तेही लढाईसाठी सज्ज झाले.

मराठ्यांचं सैन्य संख्येने मोठं होतं. डफ यांच्या नोंदीनुसार, खडकीच्या लढाईत इंग्रजांकडे सुमारे २,८०० सैनिक होते; तर मराठ्यांकडे १८ हजार घोडदळ, आठ हजार पायदळ आणि १४ तोफा होत्या. बापू गोखल्यांनी इंग्रजांच्या सैन्यावर घोडदळाचा जोरदार हल्ला चढवला. मराठ्यांच्या तोफखान्यानेही मारा सुरू केला. इंग्रज सैन्याला घोडदळाने जवळजवळ वेढलं होतं. काही काळासाठी त्यांची स्थिती अडचणीची झाली; पण इंग्रजांच्या शिस्तबद्ध पायदळाने आणि योग्य वेळी केलेल्या गोळीबाराने मराठ्यांचा हल्ला रोखला. एका ठिकाणी दलदलीमुळे घोडदळाच्या हल्ल्याचा वेगही कमी झाला. या गोंधळाचा फायदा इंग्रजांनी घेतला.

ग्रँट डफच्या वर्णनानुसार, मराठ्यांचं घोडदळ मागे फिरलं आणि पायदळानेही माघार घेतली. इंग्रजांनी रणांगणावर पुढे सरकत मराठ्यांना मागे हटवलं. पण, याचा अर्थ मराठ्यांची संपूर्ण लष्करी ताकद संपली होती असा होत नाही. दोन्ही बाजूंचं सैन्य रात्रीपर्यंत हालचाली करत होतं. या पहिल्या अनिर्णित हल्ल्यात मराठ्यांचे ५००, तर इंग्रजांचे ८६ सैनिक मारले गेले. रात्री युद्धविरामानंतर इंग्रजांच्या रिकाम्या बंगल्यांमध्ये घुसून मराठा सैन्याने जाळपोळ आणि लूट केली. खडकीच्या लढाईत इंग्रजांना तात्कालिक स्वरूपाचं लष्करी यश मिळालं हे खरं; पण मराठ्यांचं सैन्यही पूर्णपणे निष्प्रभ झालं नव्हतं.

निर्णायक आदेश कुणाचा?

खडकीच्या लढाईनंतरचा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दुसऱ्या दिवशी काय घडू शकलं असतं? बापू गोखले यांच्याकडे सैन्याचं नेतृत्व होतं. युद्धाच्या तयारीत त्यांनी पुढाकार घेतला होता. पण, राज्याचा अंतिम निर्णय पेशव्यांचाच होता. युद्ध सुरू करण्यापासून ते सैन्याच्या हालचालींपर्यंत प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर बाजीरावांचा हस्तक्षेप होता.

रियासतकार सरदेसाईंनी ‘पेशवाईची इतिश्री’ या प्रकरणात बापू गोखल्यांच्या धडाडीचं वर्णन केलं आहे. त्यांच्या नोंदीनुसार, खडकीच्या लढाईत बापू गोखले यांनी इंग्रजांची फळी फोडत जोरदार मुसंडी मारली होती; पण त्यांच्या घोड्याला झालेल्या जखमांमुळे आणि बाजीरावांच्या निकडीच्या निरोपांमुळे त्यांना अनिच्छेने माघार घ्यावी लागली. एल्फिन्स्टन घाबरल्याने मराठ्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी हल्ला सुरू ठेवला असता तर इंग्रजांचा टिकाव लागला नसता; मात्र खुद्द बाजीरावांचीच इंग्रजांना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याची मानसिक तयारी नसल्याने आणि त्यांच्या कडक आदेशामुळे गोखल्यांनी शह सोडल्याने मराठ्यांचा हा विजयोन्मुख हल्ला शेवटी निष्फळ ठरला.

पुण्यावर इंग्रजांचा ताबा

एल्फिन्स्टनच्या पत्रव्यवहारावर आधारित माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्या चरित्रातही युद्धापूर्वीच्या काही आठवड्यांत पेशव्यांच्या छावणीत वेगाने सुरू असलेल्या तयारीचा आणि इंग्रजांच्या वाढत्या चिंतेचा उल्लेख आहे. ४ नोव्हेंबरला एल्फिन्स्टन यांनी पुणतांब्यावर मुक्कामाला असलेल्या जनरल स्मिथ यांना पुण्यातल्या चिंताजनक परिस्थितीबद्दल पत्रातून कळवलं. माझ्याकडून ५ तारखेला पत्र न आल्यास तुम्ही पुण्याकडे कूच करा, असंही एल्फिन्स्टन यांनी त्या पत्रात नोंदवलं होतं.

५ तारखेच्या धामधुमीत एल्फिन्स्टन पत्र पाठवू शकले नाहीत आणि जनरल स्मिथ यांची फौज पुण्याकडे आली. या काळात बाजीराव आपल्या धरसोड वृत्तीने वाटाघाटी करत राहिले आणि इंग्रजांनी आपली ताकद वाढवली. बऱ्याच वाटाघाटींनंतर पेशव्यांचं सैन्य पुन्हा एकत्र झालं आणि पुढील संघर्षाची तयारी सुरू झाली; पण तोवर बराच उशीर झाला होता.

१६ नोव्हेंबरला येरवड्याजवळ झालेल्या लढाईत इंग्रजांनी मराठ्यांना पराभूत केलं. त्यानंतर पेशव्यांना पुणे सोडावं लागलं. १७ नोव्हेंबरला शनिवारवाड्यावर इंग्रजांचा युनियन जॅक फडकला. पेशवाईच्या प्रत्यक्ष सत्तेचा अंत झाला. या काळातल्या पेशवे दप्तरातील पत्रव्यवहारातूनही परिस्थितीचं गांभीर्य समोर येतं. ५ नोव्हेंबरच्या नोंदीत इंग्रजांशी संघर्षाची पार्श्वभूमी दिसते, तर १७ नोव्हेंबरच्या नोंदीत पुण्यातल्या सत्ताबदलाच्या काळातल्या घडामोडींचे संदर्भ आढळतात.

पराभवाची बीजं आधीच

खडकीची लढाई ही पेशवाईच्या अंताची एकमेव कारणीभूत घटना नव्हती. १८०२ च्या वसईच्या तहापासून पेशव्यांच्या सत्तेला इंग्रजांच्या आधाराची गरज भासू लागली होती. मराठा सरदारांमधला परस्पर अविश्वास, स्वतंत्र सत्ताकेंद्रांची महत्त्वाकांक्षा आणि इंग्रजांची संघटित लष्करी आणि राजकीय रणनीती यांमुळे मराठा सत्तेची एकजूट कमकुवत झाली होती. दुसऱ्या बाजीरावांना या परिस्थितीची जाणीव होती; पण ती बदलण्यासाठी आवश्यक असलेली ठाम आणि सातत्यपूर्ण भूमिका त्यांना घेता आली नाही.

खडकीच्या लढाईत दुसऱ्या बाजीरावांनी गोखल्यांना पूर्ण मोकळीक दिली असती तर इतिहास बदलला असता का? याचं निश्चित उत्तर देता येत नाही. कदाचित मराठ्यांना विजय मिळाला असता, कदाचित इंग्रजांनी आणखी मोठी फौज आणून पुन्हा हल्ला केला असता. पण, एक गोष्ट स्पष्ट आहे. युद्धाच्या निर्णायक टप्प्यावर नेतृत्वात असलेली अनिश्चितता आणि निर्णय घेण्यात झालेला विलंब यांमुळे मराठ्यांची स्थिती अधिकच कमकुवत झाली.

पेशवाईचा अंत होण्यामागे अनेक वर्षांची राजकीय घसरण होती; पण खडकीच्या लढाईने त्या घसरणीला वेग दिला. बापू गोखल्यांकडे लढण्याची तयारी आणि सैन्याचं नेतृत्व होतं; पण त्यांना साथ देणारा ठाम राजकीय निर्णय पेशव्यांकडून मिळाला नाही. दुसऱ्या बाजीरावांची हीच मोठी शोकांतिका होती. इंग्रजांनी या कमकुवतपणाचा फायदा घेतला आणि पेशवाईचा अंत झाला.