मदुराईतील एका ५३ वर्षीय वरिष्ठ अधिकाऱ्याला सकाळी झोपेतून उठल्यानंतर भोवळ येत होती. बेडवर उठून बसल्यानंतर त्यांना रूम मधील भींती त्यांच्याभोवती गरगर फिरत आहेत, असा भास झाला. त्यांनी उठून पाऊलं टाकायला सुरूवात केली तेव्हा त्यांना पायाखाली जमीन ढासळत असल्याचा भास झाला. कॉफी करण्यासाठी त्यांनी कप ओट्यावर ठेवला तेव्हा त्यांना अस्पष्ट दिसू लागले. स्पष्ट दिसावे म्हणून त्यांनी डोळ्यांची उघडझाप केली, तेव्हा त्यांना एकऐवजी दोन कप दिसू लागले. “कदाचित कालच्या पीपीटी प्रेझेंटेशनमुळे किंवा ब्लड प्रेशर कमी झाल्याने असा त्रास होत असेल, असे मला वाटले”, असे त्या अधिकाऱ्याने डॉक्टरांना सांगितले. परंतु, वास्तव मात्र भीषण होते. त्या अधिकाऱ्याला तीन ब्रेन स्ट्रोक येऊन गेले होते. मेंदुचा रक्तपुरवठा खंडित झाल्यास किंवा मेंदुत रक्तस्राव झाल्यास ब्रेन स्ट्रोक येतो. नेमकं काय झालं ते जाणून घेऊया.

नकळत आलेल्या ब्रेन स्ट्रोकची लक्षणे कोणती?

नकळत तीन ब्रेन स्ट्रोक येऊन गेल्यानंतर त्यांचे चालणे मंदावले होते. त्यांच्या एका हातात काहीच बळ नसल्यासारखे त्यांना वाटत होते. “त्यांना ‘पोस्टेरिअर सर्क्युलेशन स्ट्रोक’ आला होता. या स्ट्रोकमध्ये मेंदुच्या मागील बाजूस रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी खंडित होते. त्यामुळे बॅलन्स जाणे, अवयवांचा एकमेकांशी ताळमेळ न राहणे, दृष्टी कमजोर होणे अशी लक्षणे दिसून येतात. हा स्ट्रोक येण्याआधी खूपच सूक्ष्म इशारा मिळतो. तो ओळखू येत नाही. भोवळ येणे, शरीरावरील संतुलन जाणे, चालताना अडथळा येणे, अंधुक दिसणे, अचानक अशक्तपणा येणे किंवा सुन्न वाटणे, अशी लक्षणे हा स्ट्रोक येण्याआधी आढळून येतात”, असे बंगळुरूतील नारायणा हेल्थ सिटी रूग्णालयाचे न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. विक्रम हुडेद यांनी सांगितले.

पोस्टेरिअर सर्क्युलेशन स्ट्रोकचे कधीकधी डॉक्टरांनाही होत नाही निदान?

अधिकाऱ्याला आलेला स्ट्रोक हा ‘स्टटेरिंग स्ट्रोक’चा एक प्रकार असल्याचे डॉक्टर म्हणाले. या स्ट्रोकची लक्षणे खूपच सूक्ष्म असतात. थकवा येणे किंवा भोवळ येणे अशी लक्षणे या स्ट्रोकची आहेत. ही लक्षणे दिसल्यानंतर रूग्ण तसेच कधीकधी डॉक्टरांना देखील या स्ट्रोकचे निदान होत नाही. एक मोठे संकट रूग्णावर आलेले असते, परंतु, ते ओळखले जात नाही. मेंदुच्या मागील भागाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीचा पुरवठा खंडित झाल्यास किंवा मेंदुला नियमितपणे रक्तपुरवठा होत नसल्यास हा स्ट्रोक येतो, असे डॉक्टर विक्रम हुडेद म्हणाले.

भोवळ आल्यास निष्काळजीपणा करू नका

एकूण ब्रेन स्ट्रोकपैकी २५ टक्के केसेस ह्या पोस्टेरिअर सर्क्युलेशन स्ट्रोकच्या असतात. त्यांचे निदान लवकर होत नाही. “स्ट्रोकबाबत मिळत असलेल्या इशाऱ्यांकडे रूग्ण दुर्लक्ष करतात. सतत भोवळ येणे किंवा शरीरावरील संतुलन जात असल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. वेळीच त्यावर उपचार घेतल्यास जीवाला असलेला धोका किंवा मेंदुला होणारी कायमची दुखापत टाळता येऊ शकते”, असे डॉक्टर हुडेद म्हणाले. भारतात दर सातव्या व्यक्तीला ब्रेन स्ट्रोकचा सामना करावा लागतो, असे आयसीएमआरच्या (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) संशोधनातून समोर आले आहे. पोस्टेरियर सर्क्युलेशन स्ट्रोक आलेल्या रूग्णावर सर्जरी करणे अत्यंत धोक्याचे असते.

अधिकाऱ्याला डॉक्टर वाचवू शकले का?

५३ वर्षीय अधिकाऱ्याला तीन ब्रेन स्ट्रोक आले होते. मेंदुला मागील भागाला रक्तपुरवठा करणारी उजवीकडील धमनी ब्लॉक झाली होती. डावीकडील धमनीमधून मेंदुला रक्तपुरवठा होत होता, परंतु, तो कमी पडत होता. या केसमध्ये अधिकाऱ्याचा जीव जाण्याची शक्यता ८० ते ९० टक्के होती. या परिस्थिती अधिकाऱ्यावर सर्जिकल इंटरव्हेन्शन (म्हणजे पारंपारिक पद्धतीने ऑपरेशन) करता येऊ शकत होते. अशा स्ट्रोकवर विदेशात सर्जिकल इंटरव्हेन्शनने ऑपरेशन करण्यात आले आहे, परंतु, त्यांची संख्या खूपच कमी आहे. आम्ही प्रेसिजन इंटरव्हेन्शन ( आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऑपरेशन) वापरण्याचा मार्ग निवडला. रूग्णाच्या पायातील धमनीमध्ये आम्ही एक पातळ तार टाकली. ती त्याच्या हातामार्गे मेंदुला रक्तपुरवठा करणारी जी रक्तवाहिनी ब्लॉक झाली होती, तिच्यापर्यंत पोहोचवली. त्यानंतर आम्ही बलून अँजिओप्लास्टी केली व स्टेंट ठेवले, असे डॉक्टर म्हणाले. ही सर्जरी झाल्यानंतर रूग्णाला भोवळ येणे व अंधुक दिसणे ही लक्षणे आढळली नाहीत. फक्त चोवीस तासांनंतर तो अधिकारी त्याच्या पायांवर चालत रूग्णालयातून बाहेर पडला. त्याचे हातपायदेखील व्यवस्थित काम करत होते, असे डॉक्टर विक्रम म्हणाले.

ब्रेन स्ट्रोकला कसे टाळावे? कोणत्या चाचण्या कराव्यात?

९० टक्के ब्रेन स्ट्रोक केसेसमध्ये रूग्णाला कोणत्याही वेदना होत नाहीत. त्यामुळे चक्कर किंवा भोवळ येणे, डोळ्यांना अंधुक दिसणे, संतुलन जाणे, बोलताना, चालताना अडचण येणे, हातांना गळाल्यासारखे वाटणे ही लक्षणे दिसताच सावध व्हा. डॉक्टरांचा सल्ला घ्या. ब्रेन स्ट्रोकचे वेळीच निदान झाल्यास रूग्णाला पुढील धोका टाळता येतो. हृदयाचे आरोग्य तपासण्यासाठी अनेक चाचण्या केल्या जातात. तशाच चाचण्या मेंदुच्याही करता येतात, असे डॉक्टर म्हणाले. मेंदूचे आरोग्य तपासण्यासाठी कॅरोटीड डॉपलर ही चाचणी करता येऊ शकते. यात मेंदूकडे साउंड वेव्हज सोडल्या जातात. मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होत आहे की नाही, ते यातून कळते. ही चाचणी करताना कोणत्याही वेदना होत नाहीत. तसेच ब्रेन अन्यूरिज्म, बलुनिंग ऑफ ब्लड व्हेसेल्स या चाचण्यादेखील करता येतात. रक्तवाहिन्यांमधून मेंदूला नियमित रक्तपुरवठा होत आहे की नाही, ते यातून कळू शकते. पाच वर्षांतून एकदा मेंदूचे आरोग्य तपासावे, असा सल्ला डॉ. हुडेद यांनी दिला. मेंदूशी संबंधित सूक्ष्म लक्षणे आढळून आली तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका, भविष्यातील मोठा धोका त्यामुळे टाळता येईल.