व्याघ्र प्रकल्पांतील वाढत्या पर्यटनामुळे वाघांच्या वर्तनात कोणते बदल?

भारतातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाढत चाललेल्या पर्यटनामुळे वाघांच्या नैसर्गिक वर्तनावर परिणाम होत असल्याचे आता वैज्ञानिक अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. जंगल सफारी आणि ‘व्याघ्रदर्शना’साठी वाढलेल्या स्पर्धेमुळे वाघांमध्ये तणाव वाढत असून विशेषत: त्यांच्या प्रजनन प्रक्रियेत बदल दिसून येत आहेत. सीसीएमबी (सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलेक्युलर बायोलॉजी) आणि सीएसआयआरच्या (कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च) संशोधनानुसार पर्यटक वाहनांची गर्दी, सततचा आवाज आणि मानवी हस्तक्षेपामुळे वाघिणी आता प्रजननासाठी अधिक शांत आणि निर्जन भागांचा शोध घेत आहेत. पूर्वी ज्या भागांत वाघ सहजपणे वास्तव्य करत होते, त्या भागांपासून ते आता दूर सरकत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

या अभ्यासातून कोणते निष्कर्ष समोर आले?

हा अभ्यास २०२० ते २०२३ या कालावधीत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, कान्हा व्याघ्र प्रकल्प, बांधवगड व्याघ्र प्रकल्प, कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प आणि पेरियार व्याघ्र प्रकल्प या पाच प्रमुख व्याघ्र प्रकल्पांमध्ये करण्यात आला. संशोधकांनी ६१० वाघांच्या ७२८ विष्ठा नमुन्यांचे परीक्षण करून तणाव आणि प्रजननाशी संबंधित संप्रेरकांचा अभ्यास केला. त्यातून आढळले की पर्यटनाच्या दबावाखाली असलेल्या क्षेत्रांमध्ये वाघिणींमधील तणावामुळे निर्माण होणार्या संप्रेरकांचे प्रमाण वाढलेले होते. विशेषत: ताडोबा आणि बांधवगडसारख्या पर्यटनप्रधान व्याघ्र प्रकल्पांमध्ये तणावग्रस्त वाघिणींमध्ये प्रजननाची क्षमता कमी होत असल्याचे आढळले. हा अभ्यास ‘झूलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन’च्या ‘ॲनिमल कन्झर्व्हेशन’ जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

वाघांवर नेमका कसा परिणाम होतो?

देशातील बहुतांश व्याघ्र प्रकल्पांमध्ये पर्यटन मार्गांवर पाणवठे तयार करण्यात आले आहेत. उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी वाघ हमखास या भागात येत असल्याने पर्यटकांसाठी व्याघ्रदर्शनाची संधी वाढते. मात्र, याच भागात वाहनांची गर्दी, इंजिनांचा आवाज, छायाचित्रणासाठी होणारा पाठलाग आणि मानवी उपस्थितीचा सततचा दबाव वाघांच्या नैसर्गिक हालचालींमध्ये अडथळा निर्माण करतो. सीसीएमबी आणि सीएसआयआरच्या अभ्यासानुसार, दीर्घकाळ अशा परिस्थितीचा सामना करावा लागल्यास त्याचा त्यांच्या आरोग्य आणि प्रजनन चक्रावर परिणाम होण्याची शक्यता वाढते.

वाघिणींसाठी शांत अधिवास का महत्त्वाचा?

वाघिणींना बाळंतपणासाठी आणि बछड्यांचे संगोपन करण्यासाठी सुरक्षित, शांत आणि मानवी हस्तक्षेपापासून दूर जागा आवश्यक असतात. मात्र, जंगलातील ‘गाभा’ क्षेत्रामध्येही पर्यटनाचा दबाव वाढत असल्याने वाघिणी आता जंगलाच्या अधिक आतल्या आणि दुर्गम भागांकडे सरकत असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे. दीर्घकालीन दृष्टिकोनातून हा बदल वाघांच्या प्रजननावर परिणाम करू शकतो. 

संशोधक काय म्हणतात?

भारतामध्ये व्याघ्रसंख्या वाढणे हे संवर्धनाच्या दृष्टीने मोठे यश मानले जाते. मात्र, उपलब्ध अधिवास मर्यादित असताना एकाच क्षेत्रात अधिक वाघ राहू लागल्यास परस्पर संघर्ष वाढण्याची शक्यता असते. त्यात पर्यटनामुळे शांत अधिवास आणखी संकुचित होत असल्याने वाघांवरील मानसिक ताण अधिक वाढू शकतो. संशोधकांच्या मते, वाघांची संख्या त्यांच्या मूळ क्षेत्रांपुरती मर्यादित राहिल्यास क्षेत्रीय वाद, संसाधनांवरील ताण आणि संघर्षाचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे केवळ व्याघसंख्या वाढवणे पुरेसे नसून त्यांच्या अधिवासाची गुणवत्ता आणि शांतता टिकवणे तितकेच आवश्यक आहे.

संशोधकांनी कोणते उपाय सुचवले आहेत?

संशोधकांनी व्याघपर्यटन पूर्ण बंद करण्याची भूमिका घेतलेली नाही. पर्यटनाचे वैज्ञानिक नियमन अत्यावश्यक असल्याचे म्हटले आहे. व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाहनांची संख्या मर्यादित ठेवणे, वाघाभोवती होणारी गर्दी रोखणे, सफारीचा कालावधी कमी करणे आणि प्रजनन क्षेत्रांना विशेष संरक्षण अशा उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. त्यांच्या मते, वाघांच्या जैविक आणि वर्तनात्मक गरजांनुसार पर्यटनाचे नियमन करण्याची वेळ आता आली आहे.  

rakhi. chavhan@expressindia. com