Collarwali Tigress T-15 Pench Success Story: चंद्रपूर, गडचिरोली आणि पेंचलगतच्या भागांत वाघ मानवी वस्तीजवळ वारंवार दिसत असल्याच्या घटना समोर येत आहेत. तज्ज्ञांच्या मते, हे केवळ अपवादात्मक वर्तन नसून अधिवास खंडीत झाल्यामुळे, dispersal आणि वन्यजीव मार्गांवरील मानवी अधिक्रमण याच्याशी संबंधित आहे. रस्ते, रेल्वेमार्ग आणि इतर प्रकल्पांमुळे वाघांचे नैसर्गिक कॉरिडॉर्स बाधित होतात, तर शेतांभोवतीच्या बेकायदा वीजेच्या तारांमुळे त्याचप्रमाणे वाहनांच्या धडकेमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. अनेकदा या समस्येकडे वाघांची वाढती संख्या म्हणून पाहिले जाते; परंतु मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वाघांच्या अधिवासावर वाढते मानवी अधिक्रमण तितकेच कारणीभूत आहे.

१९७२ च्या पहिल्या अधिकृत प्रगणनेनुसार भारतात केवळ १८२७ वाघ शिल्लक होते. मात्र, २०२२ च्या अखिल भारतीय व्याघ्र आकलनाचा सविस्तर अहवाल २०२३ मध्ये प्रसिद्ध झाला आणि त्यानुसार भारतातील वाघांची सरासरी अंदाजित संख्या ३६८२ वर पोहोचली आहे. सध्या जगातील सुमारे ७५% वाघ भारतात आढळतात. या पार्श्वभूमीवर व्याघ्र संवर्धनाच्या यशात मोठी भूमिका बजावलेल्या एका ‘सुपर मदर’ वाघिणीबद्दल जाणून घेणे माहितीपूर्ण ठरावे.

कॉलरवाली-Collarwali (T-15)

तो (२०१०) रणरणता उन्हाळा होता. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पानगळीच्या जंगलात धुळीने माखलेल्या जमिनीवर संशोधक डॉ. अनिरुद्ध मजुमदार आणि त्यांची टीम एका अस्वस्थ करणाऱ्या दृश्याकडे पाहत होती. समोर कॉलरवाली-Collarwali (T-15) या प्रसिद्ध वाघिणीची सुमारे १८ महिन्यांची चार पिल्लं होती. ही पिल्लं भुकेने व्याकुळ, अशक्त, आणि अनेक दिवसांपासून आईची वाट पाहत होती. पेंचच्या जंगलकथेत कॉलरवाली (Collarwali) ही केवळ एक वाघीण नव्हती; ती त्या जंगलाच्या वैभवाला चेहरा देणारी, संवर्धनाच्या यशाला अर्थ देणारी एक जिवंत कथा होती. डॉ. अनिरुद्ध मजुमदार आणि डॉ. के. शंकर यांच्या Collarwali: An Insight into the Secret Family Life of A Remarkable Pench Tigress या लेखातून या प्रसंगाचा उलगडा होतो. त्यांच्या निरीक्षणांमधून कॉलरवालीच्या आयुष्यातील एका विलक्षण मातृत्वकथेची झलक मिळते.

एका आईची निःशब्द रणनीती

त्या काळात त्या परिसरात T-30 नावाच्या एका प्रबळ नर वाघाचा वावर वाढला होता. तो या पिल्लांचा जन्मदाता नव्हता. वाघांच्या जगात अशा नव्या नराकडून आधीच्या नराच्या पिल्लांना धोका असू शकतो, हे वन्यजीव अभ्यासातून ज्ञात आहे. संशोधकांच्या निरीक्षणांवरून असे सुचवले गेले की, कॉलरवाली पिल्लांपासून दूर गेलेली नव्हती; तर उलट ती काही काळ त्या नराचे लक्ष स्वतःकडे वळवून पिल्लांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत होती. तिने पिल्लांना पाणी, आडोसा आणि तुलनेने सुरक्षितता असलेल्या जागी ठेवले असावे, असे वर्णन संशोधक करतात. ही एका आईने आपल्या लेकरांसाठी शब्दांविना दिलेली झुंज होती.

सोळा दिवसांचा विरह

दिवस पुढे सरकत होते. पिल्लांची प्रतीक्षा आणखी तीव्र होत होती आणि मग, तब्बल १६ दिवसांनी, कॉलरवाली पुन्हा आपल्या चार पिल्लांकडे परतली. त्या पुनर्मिलनाचा क्षण हा केवळ एका वाघिणीचा आपल्या बछड्यांकडे परतण्याचा प्रसंग नव्हता; तर तो जंगली जीवनातील मातृत्व, धैर्य आणि जगण्याच्या अदम्य इच्छेचा पुरावा होता. संशोधकांच्या नोंदींनुसार, ती परत आली तेव्हा पिल्लांसाठी अन्नाचीही व्यवस्था तिने केली होती. जंगलातील हा प्रसंग जितका नैसर्गिक, तितकाच हृदयाला भिडणारा होता.

कॉलरवालीच्या मातृत्वाचा हा प्रवास सुरुवातीपासूनच सोपा नव्हता. २००८ साली मे महिन्यामध्ये तिने पहिल्यांदा तीन पिल्लांना जन्म दिला; परंतु ती पिल्लं वाचू शकली नाहीत. त्यानंतर २००८ सालीच ऑक्टोबर महिन्यात तिने पुन्हा चार पिल्लांना जन्म दिला आणि याच दुसऱ्या बाळंतपणातून तिच्या विलक्षण जिद्दीचा आणि मातृत्वाच्या सामर्थ्याचा प्रत्यय येतो. एकूणच कॉलरवालीने आपल्या संपूर्ण जीवन काळात २९ पिल्लांना जन्म दिला. त्यापैकी २५ पिल्लांना जगवून कॉलरवाली पेंचमधील नव्हे, तर भारतीय व्याघ्र संवर्धनाच्या इतिहासातील एक अजरामर माता ठरली.

सौजन्य: Facts Phylum

व्याघ्र प्रकल्प का महत्त्वाचे?

वाघ हा ‘अंब्रेला स्पीशीज’ मानला जातो. वाघाचे संवर्धन केले, तर त्याच्या अधिवासात राहणाऱ्या अनेक इतर प्राणी, पक्षी आणि वनस्पतींचेही संरक्षण होते. १९७३ साली सुरू झालेल्या ‘प्रोजेक्ट टायगर’ या ऐतिहासिक मोहिमेची ५० वर्षे २०२३ मध्ये पूर्ण झाली. NTCA च्या सध्याच्या अधिकृत यादीनुसार देशात आता ५८ व्याघ्र प्रकल्प आहेत. नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी (NTCA) व्याघ्र संवर्धनासाठी धोरण, देखरेख आणि व्यवस्थापनाचे काम करते. वाघांच्या देखरेखीसाठी आणि संरक्षणासाठी M-STrIPES हे तंत्रज्ञानाधारित monitoring platform वापरले जाते. ९ एप्रिल २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी International Big Cat Alliance (IBCA) ची घोषणा केली; या उपक्रमाद्वारे जगातील सात प्रमुख big cat species च्या संरक्षणासाठी भारत पुढाकार घेत आहे. तसेच, दोन जंगलांना जोडणारे wildlife corridors सुरक्षित ठेवण्यावरही भर दिला जात आहे, जेणेकरून वाघ एका अधिवासातून दुसऱ्या अधिवासात सुरक्षितपणे स्थलांतर करू शकतील.

टायगर मॅन-कैलास सांखला

२०व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात सुमारे ४०,००० वाघ असल्याचे मानले जात होते. पण १९७२ च्या पहिल्या अखिल भारतीय अभ्यासात ही संख्या थेट १,८२७ वर घसरल्याचे स्पष्ट झाल्यावर देशासमोर मोठे संवर्धनसंकट उभे राहिले. शिकारीचा कहर, कातड्यांची तस्करी आणि सतत आक्रसत जाणारा जंगलांचा अधिवास यामुळे वाघांचे अस्तित्वच धोक्यात आले होते. अशा वेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली १९७३ मध्ये ‘प्रोजेक्ट टायगर’ची सुरुवात झाली. या मोहिमेला आकार देण्यात कैलास सांखला यांचा मोलाचा वाटा होता; म्हणूनच भारतीय वन्यजीव संवर्धनाच्या इतिहासात त्यांचे नाव ‘टायगर मॅन’ म्हणून आदराने घेतले जाते.

भारत जगातील सर्वाधिक वाघ असलेला देश

भारतातील वाघ संवर्धनाला कायदेशीर बळ वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ मुळे मिळाले, तर १९७३ मध्ये सुरू झालेल्या ‘प्रोजेक्ट टायगर’ने या प्रयत्नांना संस्थात्मक दिशा दिली. या उपक्रमात core-buffer ही रणनीति स्वीकारून वाघांसाठी सुरक्षित अधिवास राखण्यावर भर देण्यात आला. महाराष्ट्रातील मेळघाटसह सुरुवातीला केवळ नऊ व्याघ्र प्रकल्पांपासून सुरू झालेला हा प्रवास आज ५८ टायगर रिझर्व्हज tiger reserves पर्यंत पोहोचला आहे. शास्त्रीय व्यवस्थापन, कायदेशीर संरक्षण आणि अधिवास संवर्धनाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे भारताने व्याघ्र संवर्धनात जागतिक पातळीवर उल्लेखनीय यश मिळवले आहे. आज भारत जगातील वन्य वाघांच्या सुमारे ७५ टक्के वाघांचे घर आहे. त्यामुळे ‘प्रोजेक्ट टायगर’ ही केवळ एक संवर्धन योजना नसून भारताच्या पर्यावरणीय बांधिलकीचे एक ऐतिहासिक उदाहरण ठरते.

विज्ञानाला चेहरा देणारी वाघीण: कॉलरवाली

मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पाची शान ठरलेली ‘कॉलरवाली’ (T-15) तिच्या असामान्य मातृत्वामुळे आणि विलक्षण जगण्याच्या प्रवासामुळे भारतीय व्याघ्र संवर्धनाच्या इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या वाघिणींपैकी एक ठरली. कॉलरवालीने एकूण २९ पिल्लांना जन्म दिला, आणि WWF India ने दिलेल्या माहितीनुसार त्यापैकी २५ पिल्ले जगली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर संतती वाढवणारी आणि ती यशस्वीपणे मोठी करणारी ती अपवादात्मक वाघीण ठरली. तिच्या गळ्यात radio collar बसवल्यानंतरच तिला Collarwali-कॉलरवाली हे नाव मिळाले. या तंत्रज्ञानामुळे संशोधकांना तिच्या हालचाली, प्रजनन आणि territory चा अधिक जवळून अभ्यासता आला.

Panna-पन्ना कथेशी जोडलेला वारसा

कॉलरवालीच्या वारशाचा संबंध Panna tiger recovery च्याही कथेशी जोडला जातो. तिच्या एका पिल्लाने पन्नामधील व्याघ्र पुनर्वसन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे तिची कथा केवळ पेंचपुरती मर्यादित राहत नाही; ती मध्य भारतातील tiger recovery च्या व्यापक कथेशी जोडली जाते.

पर्यटन, ओळख आणि स्थानिक अर्थचक्र

कॉलरवालीच्या लोकप्रियतेमुळे पेंचची ओळख वाइल्ड लाईफ टुरिझमच्या नकाशावर अधिक ठळक झाली. तिच्या सायटिंग स्टोरीज (sighting stories), तिच्याभोवती निर्माण झालेले भावनिक वलय आणि पेंचच्या legend च्या प्रतिमेमुळे या व्याघ्र प्रकल्पाकडे पर्यटकांचा ओढा वाढला. यामुळे इको-टुरिझम आणि स्थानिक livelihood chains ला चालना मिळाल्याचे मानले जाते.

कॉलरवालीने घेतला अखेरचा श्वास…

१५ जानेवारी २०२२ रोजी पेंचच्या Karmajhiri परिसरात Collarwali चा शेवट झाला. ती १६ वर्षांची होती आणि वनअधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वार्धक्यामुळे तिची प्रकृती खालावली होती; प्राथमिक माहितीनुसार multi-organ failure हीच तिच्या मृत्यूमागची शक्यता मानली गेली. ज्या जंगलाला तिने आपल्या २९ पिल्लांच्या वारशाने समृद्ध केलं, त्याच जंगलात तिने शेवटचा श्वास घेतला. Collarwali गेली, पण पेंचच्या मातीत तिची पावलं, तिच्या लेकरांतला वारसा आणि तिची शान अजूनही जिवंत आहे.