डॉ, शशांक सामक आणि डॉ. जेसिका सामक
Healthy Married Life And Sexual Harmony: तडजोडीने जोडीदार जोडला जात असतो, न केल्यास तो तोडला जात असतो. आदर्शवाद हा कधीही वास्तववादी नसतो, पण आयुष्य मात्र वास्तववादीच असते. ‘आदर्श जोडपे’ कुठलेही नसते. अनुरूपता दिसण्यात असेल, पण वागण्यात, स्वभावात ती कधीच आढळत नसते. म्हणून आदर्श जोडीदाराच्या अपेक्षेने आपल्या जोडीदाराकडे बघणे हे निराशा निर्माण करणारेच असते.

जोडीदाराच्या मर्यादा व वास्तव ओळखा

अपेक्षाभंग हेच कित्येक उद्वेगलेल्या जोडप्यांचे मूळ कारण असते. वैवाहिक जीवनात अपेक्षा या असतातच, किंबहुना त्या असाव्यातही; परंतु आपल्या जोडीदाराच्या मर्यादा व परिस्थितीचे वास्तव ओळखूनच त्या ठेवल्या तर अपेक्षा व्यवहार्य ठरतील. इतरत्र बघून तुलनात्मक अपेक्षा ठेवणे म्हणजे दाम्पत्य जीवनाच्या स्थिरतेला सुरुंग लावण्यासारखेच असते. जोडीदाराच्या कमजोरी स्वीकारूनच वैवाहिक आयुष्य काढणे आवश्यक असते.

अॅडजस्ट करा

लग्न करणाऱ्या दोन्ही व्यक्ती मुळात वेगवेगळ्या वातावरणात वाढलेल्या असतात, त्यांचे विचार, कल्पना हे पूर्णपणे भिन्नच असतात. पण लग्नसंस्थेमुळे ते एकत्र आयुष्य काढत असतात. लग्न म्हणून केवळ दोन व्यक्तींचे नसून दोन व्यक्तिमत्त्वांचे असते. एकत्रपणामुळे जोडीदाराच्या व्यक्तिमत्त्वाची नकारात्मक बाजूही प्रकर्षांने लक्षात येत असते. हे घडणारच असते. त्यामुळे निराशा, उद्विग्नता, राग, चीड यांना थारा न देता आपण एकमेकांना कसे अ‍ॅडजस्ट होऊ हे दोघांनीही पाहिले पाहिजे. एकमेकांशी चर्चा, गप्पा, संवाद हे त्यासाठी महत्त्वाचे साधन असते. गरज लागल्यास काउन्सेलिंगचा आधार घ्यावा.

Marriage-sexual-harmony
वैवाहिक आयुष्यात सुखी कामजीवन महत्त्वाचे असते

सुसंवाद कला विकसित करा

बहुतेक दाम्पत्यांना लग्न म्हणजे इतरांशी भांडण्यापासून दूर ठेवण्यासाठी समाजाने केलेली एक महत्त्वाची उपाय-योजनाच वाटते. सु-संवादापेक्षा वि-संवादात पती-पत्नींचा वेळ जात असतो. सुसंवाद ही एक कला असून ती विकसित करण्यासाठी विशेष कष्ट दोघांनीही घेणे गरजेचे असते. सततची भुणभुण (नॅगिंग), उगीचच चिडवणे (टीझिंग), टोमणे मारणे (टाँटिंग) आणि वाद (आर्ग्युमेंट) हे विसंवादाचे प्रकार आहेत.
बहुतेक वाद अत्यंत क्षुल्लक कारणांनी होतात हे ओळखून ते ताणले जाणार नाहीत हे बघा.

जिंकाल, पण आपुलकी गमावाल

वाद करताना आपण आपल्या जिवलग व्यक्तीशी तो करतोय हे नेहमी ध्यानात ठेवा. कारण वादामुळे तुम्ही मुद्दा जिंकालही, पण त्यातील जहालपणामुळे तुम्ही त्या व्यक्तीच्या आपुलकीला गमवाल. एका बायकोने नवऱ्याच्या अशा नेहमीच्या हमरीतुमरीच्या सवयीला कंटाळून शेवटी त्याला एकदा विचारले, ‘तुला आत्ता वादात खूश व्हायचंय का रात्री?’

काय योग्य, काय अयोग्य ते पाहा

सुसंवादासाठी जसं आपलं म्हणणं नीट मांडण्याची गरज असते, तशीच आवश्यकता आपल्या जोडीदाराचे म्हणणे ऐकण्याची. म्हणून सुसंवाद एक कला आहे. जोडीदाराचा विचार तुमच्या विचारापेक्षा वेगळा विचार असला तरी तो योग्य असू शकतो. कोणाचेही म्हणणे बरोबर की चूक यापेक्षा त्या वेळी काय योग्य किंवा काय अयोग्य हे लक्षात घेणे आवश्यक असते. बहुतांशी गोष्टी किरकोळ महत्त्वाच्या असतात. महत्त्वाच्या मुद्द्यावर योग्य व्यक्तीचे मत घेणे वा समुपदेशन करणे जरुरीचे असते.

रोमँटिक व्हा

मुळात कामजीवन हाच वैवाहिक जीवनाचा पाया असल्याने त्याला दुर्लक्षून वैवाहिक जीवन हे विफल ठरण्याची शक्यता असते. मग इतरही गुंतागुंत होऊन निराशा व उदासीनता येण्याची शक्यता असते. कामजीवनाचे शास्त्र जाणून घेऊन आपल्यामध्ये योग्य तो बदल करणे महत्त्वाचे असते, कारण जोडीदाराला एकटेपणा वाटू न देणे ही तुमची जबाबदारी असते. उदासलेल्या कामजीवनाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मधूनमधून आउटिंग किंवा मैत्री-सहल करणे पती-पत्नींच्या दृष्टीने आवश्यक असते. जवळपासच्या ठिकाणी केवळ रात्रीपुरते वा दिवसभरासाठी दोघांनी जाण्याने कित्येकदा त्यांच्या कामजीवनात शृंगारिकतेचा ‘स्पार्क’ यायला मदत होत असते.

‘काम’चुकारपणा करू नका

सेक्स हे निसर्गाचे वरदान असून वैवाहिक जीवनात हे वरदान उपभोगण्याचा हक्क आपल्या जोडीदाराला निश्चितच आहे हे जाणून घ्या. ‘काम’चुकारपणा करून तुम्ही तो त्याच्याकडून हिरावून घेणे म्हणजे वैवाहिक अशांततेला आमंत्रित करणेच. कित्येकदा पुरुष ‘काम, काम आणि काम, कामजीवनात नाही राम’ अशी वृत्ती बाळगतो. तर स्त्रीनेसुद्धा लक्षात ठेवले पाहिजे की, ‘बायको कमी, आई जास्त, तर काहींना देवधर्मच वाटतो रास्त’ अशा विचारांमुळे नाते दुरावले जाते.

मोबाईलचा पॉझिटिव्ह उपयोग

आपण एकाच वेळी व्यावसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यही जगत असतो हे कित्येकांना लक्षात येत नाही. ऑफिसमध्ये बॉस किंवा नोकरदार जरी असाल तरी त्याच वेळी तुम्ही कुणाचा तरी नवरा/ बायको हेही असता. अर्थात ही ओळख अध्याहृत असते, पण पडछायेसारखी सतत आपल्याबरोबर असते. या वैयक्तिक पडछायेत वैवाहिक ओळख ही जास्त महत्त्वाची असते. ती जिवंत ठेवण्याची कला जाणीवपूर्वक आत्मसात करा. म्हणूनच रोमँटिक राहा. वेळ काढून ‘दूरस्पर्शी संवाद’ कला वापरा. मोबाइलचा हा पॉझिटिव्ह उपयोग वैवाहिक जीवनाचा तारणहार ठरू शकतो. ‘तुझी आठवण आली म्हणून.’ ते ‘लाल ड्रेसमध्ये तू यम्मी दिसत होतीस.’ असे डायलॉग शोधा आणि करा. मग बघा ती लाल ड्रेसवाली रात्री खुशीत कुशीत शिरेल की नाही (त्या वेळी तो ड्रेस नसला तरी!).

तर वैवाहिक जीवनातील वादळेही शमतील!

पती-पत्नी नाते हेच प्राथमिक नाते असून समाजस्वास्थ्यासाठी ते सुदृढ असणे आवश्यक असते. हे प्रायमरी किंवा प्राथमिक नाते या वैवाहिक प्रेमसूत्रांनी मजबूत झाले तर वैवाहिक जीवनातील वादळे निश्चितच शमवता येतील. आणि ही प्रेमसूत्रे दोघांनीही, सतत व वारंवार वापरायची असतात हेही लक्षात ठेवले पाहिजे. कामजीवन हा वैवाहिक जीवनाचा पाया आहे, तर सहजीवन हा सुखी कामजीवनाचा पाया आहे. आता प्रेम करायलाच आयुष्यात वेळ कमी उरलाय, कमी पडणार आहे, हे लक्षात ठेवून भांडणामध्ये वेळ का दवडायचा?