वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीनंतर आता कर्नाटकमधील श्रीरंगपटनम् येथील जामिया मशिदीवरून नवीन वादाला तोंड फुटलं आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि श्री राम सेनेचा पाठिंबा असलेल्या हिंदुत्ववादी गटाने… श्रीरंगपटनम् येथील जामिया मशिदीमध्ये प्रार्थना करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे. त्यासाठी ४ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात सुमारे १०८ याचिका दाखल केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपटनम् येथील जामिया मशीद पूर्वी हनुमानाचं मंदिर होतं, असा दावा या हिंदुत्ववादी गटाने केला आहे. या घटनाक्रमांनंतर मशीद परिसरात तणाव वाढला असून पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे या लेखातून आपण जामिया मशिदीचा इतिहास, हिंदुत्ववादी गटाचा दावा, यामागील राजकारणाचा आढावा घेणार आहोत.

जामिया मशिदीचा इतिहास काय आहे?
बंगळुरू येथील भारतीय पुरातत्व विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, १४५४ साली विजयनगर साम्राज्याचे सेनापती तिम्मन्ना नायका यांनी श्रीरंगपटनम् येथे हा किल्ला बांधला होता. १४९५ मध्ये हा किल्ला अर्कोटच्या नवाबांच्या ताब्यात गेला. त्यानंतर पुढे हा किल्ला वोडेयर घराणे, मराठा साम्राज्य आणि शेवटी १७८२ साली टिपू सुलतानच्या ताब्यात गेला.

सध्या वादात सापडलेली जामिया मशीद ही याच किल्ल्याच्या आतमध्ये आहे. सध्या या वास्तूचा वापर नमाज पठण करण्यासाठी केला जातो. या मशिदीला ‘मस्जिद-इ-अला’ या नावानेही ओळखलं जातं. म्हैसूरचा शासक टिपू सुलतानसाठी ही मशीद स्वप्नवत वास्तू होती. चार अँग्लो-म्हैसूर युद्धांदरम्यान इंग्रजांनी या किल्ल्यावर हल्ला केला होता. पण किल्ला भक्कम असल्याने याचं फारसं नुकसान झालं नाही. तेव्हापासून या मशिदीत नियमितपणे नमाज पठण केलं जात आहे.

किल्ल्याबाबतची आख्यायिका
या मशिदीत एक मदरसा देखील आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक खोल्या आहेत. तसेच या किल्ल्यात दोन उंच मिनार आहेत. हे मिनार शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी टीपू सुलतानने बांधले होते, अशी आख्यायिका स्थानिक लोकांकडून ऐकायला मिळते.

म्हैसूर येथील भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यानं नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर ‘द क्विंट’ ला सांगितलं की, “श्रीरंगपटनम् येथील किल्ला आणि मशिदीची स्थापत्यकला भारतीय आणि इस्लामिक सास्कृतिक शैलींचं एक अनोखं मिश्रण दर्शवते. येथील शासक मुस्लीम असला तरी त्यांनी स्थानिक कारागीरांच्या कौशल्याला वाव दिला. किल्ल्यातील मिनार उभारण्यासाठी टिपू सुलतानने केवळ सौंदर्यशास्त्रालाच नव्हे तर त्याच्या धोरणात्मक गरजांनाही महत्त्व दिले. त्यामुळे, शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी रक्षकांकडून मिनारांचा वापर केला जात असे.

हिंदुत्ववादी गटाचा दावा आणि युक्तीवाद
ही मशीद मुळात हनुमानाचं मंदिर होतं, असा दावा काही हिंदुत्ववादी गटाकडून केला जात आहे. त्यासाठी १९३५ साली म्हैसूरच्या पुरातत्व विभागाने प्रकाशित केलेल्या वार्षिकी अहवालाचा दाखला दिला जातो. ‘द क्विंट’ने मिळवलेल्या संबंधित अहवालानुसार, १७८२ साली टीपू सुलतानने आपले वडील हैदर अली यांच्याकडून राज्यकारभार स्वीकारला होता. त्यानंतर टीपू सुलतानने श्रीरंगपटनम् येथील किल्ल्यातून हनुमानाची मूर्ती काढून टाकण्यास हिंदुंना भाग पाडलं आणि या हनुमानाच्या मंदिराच्या जागी जामिया मशीद उभारली.

म्हैसूरच्या पुरातत्व विभागाने १९३५ साली प्रसिद्ध केलेल्या अहवालात असंही म्हटले आहे, या मशिदीच्या नमाज पठणाच्या खोलीतील भिंतींवर कुराणातील शिलालेख आहेत. तसेच या मशिदीचं बांधकाम १७८७ साली केल्याचा उल्लेखही या शिलालेखांवर आहे. टिपू सुलताननेच ही वास्तू बांधल्याचा उल्लेखही शिलालेखावर आढळला आहे.

भारतीय पुरातत्व विभागातील अधिकाऱ्याचं म्हणणं
हिंदुत्ववादी गटांकडून केलेल्या दाव्याला उत्तर देताना, भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी म्हणाले, “केवळ कर्नाटकच नव्हे तर संपूर्ण देशातील अनेक मशिदी भारतीय शैली आणि रचनेनुसार बांधल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी आधी हनुमानाचं मंदिर होतं किंवा जामिया मशीद भारतीय शैलीनुसार उभारली, असा कोणताही थेट दावा करता येत नाही. यासाठी सखोल संशोधन करणं आवश्यक आहे. केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतरच यावर संशोधन केलं जाऊ शकतं.”

सध्या हा किल्ला आणि मशिदीची देखभाल भारतीय पुरातत्व विभागाकडून ‘ऐतिहासिक वारसा संरक्षण कायदा-१९५८’ अंतर्गत केली जात आहे. तथापि, कर्नाटक राज्य वक्फ बोर्डाकडून या मशिदीत आणि मदरशात दैनंदिन कार्यक्रम चालवले जातात.

हिंदुत्ववादी गटाची नेमकी मागणी काय आहे?
बजरंग सेनेच्या नेतृत्वाखालील हिंदुत्ववादी गटाने कर्नाटक उच्च न्यायालयात सुमारे १०८ याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांमध्ये याचिकाकर्त्यांनी संबंधित वास्तू हनुमानाचं मंदिर होतं, असा दावा केला आहे. तसेच याठिकाणी आम्हाला दररोज पूजा करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

हेही वाचा- विश्लेषण: बंडखोरी, ‘आप’चे भाजप-काँग्रेससमोर आव्हान! सत्ताबदलाची परंपरा हिमाचलमध्ये तुटणार?

बजरंग सेनेचे अध्यक्ष बी मंजुनाथ यांनी ‘द क्विंट’ला सांगितलं की, आमच्या प्रमुख दोन मागण्या आहेत. पहिली मागणी म्हणजे, हे मंदिर असल्याने ते हिंदूंच्या ताब्यात दिले पाहिजे. दुसरं म्हणजे, ही भारतीय पुरातत्व विभागाची मालमत्ता आहे. केंद्र सरकार दरमहा यावर १० लाख रुपये खर्च करते. तरीही या मशिदीचे अधिकारी कोणत्याही परवानगीशिवाय येथे मदरसा चालवत आहेत. त्यामुळे मशिदीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे.

हिंदू-मुस्लीम समुदायातील तणाव
मेलुकोटे चालुवनारायण स्वामी मंदिराचे पुजारी आणि सुत्तूर मठाचे श्री शिवरात्री देशीकेंद्र महास्वामी यांनी श्रीरंगपटनम् येथील मशीद बंद करावी आणि हनुमान जयंतीपूर्वी ही जागा हिंदूंच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली.

हेही वाचा- विश्लेषण : ‘जावो साने सीमा पार, नही खुलेगा विठ्ठल द्वार’, या घोषणेनंतरही साने गुरुजींनी पंढरपुरात दिलेला लढा काय आहे?

दरम्यान, जून २०२२ मध्ये, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि इतर उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी संबंधित मशीद पाडण्यासाठी ‘श्रीरंगपटनम् चलो’ची हाक दिली होती. त्यासाठी उजव्या विचारसरणीचे अनेक लोक श्रीरंगपटनम् किल्ल्याच्या दिशेनं वाटचाल करत होते. मात्र, मंड्या पोलिसांनी तातडीने पावलं उचलत या जमावाला श्रीरंगपटनम् किल्ल्याच्या गेटजवळ थांबवलं. तसेच मशीद परिसरात अतिरिक्त सुरक्षा तैनात करत संचारबंदी लागू केली. यावेळी काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मशिदीत घुसण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

कर्नाटक वक्फ बोर्डाची भूमिका
जून २०२२ मध्ये ‘श्रीरंगपटनम् चलो’बाबत प्रतिक्रिया देताना, टिपू वक्फ बोर्डाचे सचिव इरफान अहमद म्हणाले, “हिंदू गटाकडून केलेल्या कृतीला त्याच पद्धतीने उत्तर मिळेल. जर कोणी जामिया मशिदीत घुसण्याचा प्रयत्न केला किंवा प्रार्थना करण्याचा प्रयत्न केला, तर मुस्लीम शांत बसणार नाहीत.” हिंदू आणि मुस्लीम समुदायाकडून आक्रमक भूमिका घेतल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tipu sultan jamia mosque hanuman temple new dispute hindu muslim tension in srirangapatna karanataka rmm
First published on: 09-11-2022 at 16:54 IST