Tirupati Balaji Donations Handling Process: अयोध्येतील श्रीराम मंदिर देणगीत अपहार झाल्यानंतर मंदिरांमध्ये अर्पण केलेले दान व त्या दानाचे पुढे काय होते, याबाबत चर्चा रंगली आहे. भारतातील मंदिरांमध्ये दररोज हजारो भाविक श्रद्धेने दानधर्म करतात. आपण हुंडीत किंवा दानपेटीत अर्पण केलेले दान देवापर्यंत पोहोचेल अशी भावना त्यांची असते. दान दिल्यानंतर त्या दानाला हाताळणारी एक यंत्रणा मंदिर व्यवस्थापनेत असते. त्यात अधिकृत व्यक्ती, देणगी मोजण्यासाठीचे हॉल, बँक अधिकारी, ऑडिटर्स, सीसीटीव्ही कॅमेरा यांची पडद्यामागे एक स्वतंत्र व्यवस्था कार्यरत असते. अयोध्येतील राम मंदिर देणगीत अपहार झाल्यानंतर हे पडद्यामागील जग कसे चालते याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.
तिरूपती, जगन्नाथ, वैष्णो देवी, सिद्धिविनायक आणि काशी विश्वनाथ या महत्त्वाच्या मंदिरांमध्ये दरवर्षी शेकडो कोटींचे दान भाविक करतात. कितीतरी टन सोने, चांदी आणि दागिने हे वेगळे अर्पण केले जातात. या मंदिरांमध्ये भाविकांनी दिलेल्या दानाचे व्यवस्थापन कसे होते? कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत? देणगीच्या मोजणीची जबाबदारी कोणावर असते? ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने भारतातील सर्वात मोठ्या पाच मंदिरातील दान व्यवस्थेचा आढावा घेतला आहे.
हुंडीतून (दानपेटीतून) बँकेपर्यंत दान कसे पोहोचते?
भारतातील सर्वात मोठ्या मंदिरांमध्ये दानाशी संबंधित व्यवस्था एकसमान आहे. हुंडीतील दान नेमण्यात आलेल्या अधिकृत व्यक्तीकडून काढले जाते. त्यानंतर ते मोजणी केंद्रात हलवले जाते. नोटा, कॉइन्स व इतर किंमती वस्तूंची विभागणी केली जाते. नियोजित बँकेच्या खात्यात देणगी जमा करण्यापूर्वी ती मोजली जाते. ही सगळी प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत होते.
दान किंवा देणगीला हाताळणारी व्यवस्थेत मंदिरांमध्ये फरक आढळतो. देणगी हाताळणाऱ्या माणसांची नियुक्ती कोण करणार, प्रत्येक टप्प्यात देणगीवर लक्ष कोण ठेवणार, कायदेशीर आणि प्रशासनिक उपाययोजना काय आहेत, विश्वासार्हतेची खात्री कशी केली जाईल याबाबतच्या व्यवस्थेमध्ये प्रत्येक मंदिरात थोडाफार फरक दिसून येतो.

अयोध्येतील व्यवस्था कशी आहे?
अयोध्येतील राम मंदिरात भाविकांकडून दान स्वीकारण्यासाठी ३५ हुंडी आहेत. या हुंडी नेमण्यात आलेल्या एका अधिकृत व्यक्तीकडून, तसेच ट्रस्ट अधिकारी व एसबीआय बँकेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडल्या जातात. त्यानंतर त्यातील दान मंदिराच्या मोजणी केंद्रात (काउंटिंग हॉल) नेले जाते.
दानाची मोजणी करण्याचे काम ट्रस्टचे कर्मचारी व एसबीआयचे कर्मचारी करतात. निवृत्त झालेले बँक अधिकारी सुभाष श्रीवास्तव यांच्या देखरेखीत पैशांची व दागिन्यांची मोजणी केली जाते. दरम्यान, संपूर्ण दान प्रक्रिया सुरळीत चालावी याची जबाबदारी ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. मोजणी झाल्यानंतर सगळे दान ट्रस्टच्या एसबीआय बँकेतील खात्यात जमा केले जाते.
तिरूपती बालाजी मंदिर: खिसा नसलेले कपडे अन् सशस्त्र सुरक्षा रक्षक
तिरूपती बालाजी मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक दान करतात. जगातील सर्वाधिक दान होणाऱ्या धार्मिक स्थळांपैकी तिरूपती एक आहे. तिरूपतीतील देणगी मोजणी प्रक्रियेला ‘पाराकमाणी’ व्यवस्था म्हटले जाते. दान मोजण्याची जबाबदारी तिरूमाला तिरूपती देवस्थानमवर (टीटीडी) आहे. दान मोजण्याच्या प्रक्रियेत टीटीडीचे वित्त विभागातील अधिकारी, राष्ट्रीयीकृत बँकेचे प्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी किंवा निवृत्त झालेले सरकारी अधिकारी किंवा बँक कर्मचारी यांचा समावेश असतो. दानाशी संबंधित सर्व प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत होते.
दान मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांना खिसा नसलेले कपडे परिधान करून मोजणी केंद्रात जावे लागते. तसेच त्यांची मोजणी केंद्रात प्रवेश करण्याआधी व मोजणी केंद्रातून बाहेर पडताना झडती घेतली जाते. सशस्त्र सुरक्षा रक्षकांच्या बंदोबस्तात देणगीची रोकड हलवली जाते. देणगी मोजण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या फायनान्स अधिकाऱ्यांना, देखरेख करणाऱ्या स्टाफला आणि बँक प्रतिनिधींना नियुक्त केलेले असते.

जगन्नाथ मंदिर : कायद्यात नमूद प्रक्रियेने चालते दान मोजणी
ओडिशातील जगन्नाथ पुरी येथे दान हाताळण्यासाठी ‘कोडिफाइड’ प्रक्रिया राबवली जाते. या प्रक्रियेत मंदिर प्रशासक किंवा राजपत्रित अधिकाऱ्यांच्या देखरेखीत हुंडी उघडली जाते. त्यावेळी व्यवस्थापन समितीतील एक सदस्य अपक्ष साक्षीदार म्हणून तिथे उपस्थित असतो. प्रत्येक हुंडी उघडण्याआधी सील केली जाते. उघडल्यानंतर दानाची नोंद एका कायदेशीर प्रक्रियेनुसार केली जाते. दान हाताळण्याची सगळी प्रक्रिया सीसीटीव्हीच्या निगराणीत होते. दान बँकेतील खात्यात जमा करण्याआधी त्यात रोकड व किंमती वस्तू किती व कोणत्या होत्या याची नोंद एका कायदेशीर नोंदवहीत (स्टॅच्युटरी रजिस्टरमध्ये) केली जाते.
वैष्णोदेवी मंदिर : कॉर्पोरेट स्टाइलने होते दान मोजणीची प्रक्रिया
वैष्णोदेवी मंदिरातील देणगी कॉर्पोरेट स्टाइलने हाताळली जाते. दानपेट्या उघडण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. समितीत अकाउंट ऑफिसर्स, एरिया मॅनेजर्स आणि सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. दानपेट्या उघडण्याचा अधिकार ट्रस्टमधील एखाद्या व्यक्तीला किंवा धार्मिक कार्य करणाऱ्या व्यक्तीला देण्यात आलेला नाही. वैष्णोदेवी बोर्डच्या अखत्यारित असलेल्या एका विशेष प्रशासनिक विभागाकडे देणगी हाताळण्याची प्रक्रिया सोपवण्यात आली आहे. वैष्णोदेवी मंदिर डोंगराळ भागात असल्याने दानाला बँकेत जमा करण्यासाठी अनेकदा हेलिकॉप्टरची मदत घेतली जाते.
सिद्धिविनायक मंदिर: काऊंटिंग टेबलपासून प्रक्रियेला सुरूवात
मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात, स्वतंत्र देखरेखीची सुरुवात थेट पैसे मोजण्याच्या टेबलापासूनच होते. कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी यांच्या मते, मुख्य हुंडी प्रत्येक गुरुवारी कार्यकारी अधिकारी, एक विश्वस्त, बँकेचे प्रतिनिधी आणि एक लेखापरीक्षक यांच्या उपस्थितीत आणि सीसीटीव्ही देखरेखीखाली उघडली जाते. यामुळे मोजणी प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याचे साक्षीदार अनेक स्वतंत्र भागधारक असल्याचे सुनिश्चित होते. मोजणी झाल्यानंतर रोख रक्कम खात्याच्या वह्यांमध्ये नोंदवली जाते आणि ती नियुक्त बँक खात्यांमध्ये जमा करण्यासाठी पाठवली जाते. तसेच, भक्तांसाठी अधिकृत बँकिंग आणि डिजिटल देणगीचे मार्गही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
काशी विश्वनाथ मंदिर : सरकारची भूमिका महत्त्वाची
काशी विश्वनाथ मंदिरातील दान हाताळण्याच्या प्रक्रियेत जिल्हा प्रशासन सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. मंदिराच्या ५६ दानपेट्या उपविभागीय दंडाधिकारी (Sub-Divisional Magistrate) यांच्या देखरेखीखाली उघडल्या जातात, तर पैशांची मोजणी बँक अधिकारी आणि एका सेवानिवृत्त राजपत्रित अधिकाऱ्याच्या उपस्थितीत केली जाते. ऑडिट ट्रेल तयार करण्यासाठी प्रत्येक व्यवहाराची ठेव पावती जनरेट केली जाते, तर दागिने सुरक्षित कोठडीत ठेवण्यापूर्वी सरकारी मान्यताप्राप्त मूल्यमापकांकडून त्यांचे मूल्य निश्चित केले जाते.
राम मंदिरातील आरोपांची अद्याप चौकशी सुरू असून कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचता आलेले नाही. परंतु, भारतातील जुन्या मंदिरांचा अनुभव दर्शवतो की, दान प्रक्रिया सुरक्षित करण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालते. भारतातील महत्त्वाच्या मंदिरांमध्ये दान प्रक्रियेवरून वाद व आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर त्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आली. त्यामुळे आज ज्या पद्धती दान हाताळणीसाठी वापरल्या जातात त्या कालांतराने विकसित होत गेल्या. राम मंदिरासाठीही दान हाताळणीच्या प्रक्रियेत काही बदल होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
