१५ एप्रिल रोजी जगप्रसिद्ध टायटॅनिकला जलसमाधी मिळून ११४ वर्षे पूर्ण झालीत. ११४ वर्षांपूर्वी १४ एप्रिल १९१२ च्या मध्यरात्री समुद्राने टायटॅनिकला आपल्या उरात सामावून घेण्यापूर्वी छत्तीसगडमध्ये तब्बल सहा वर्षे मुलींसाठी शाळा चालवणाऱ्या एका महिलेने, लाइफबोटमध्ये मिळालेल्या आपल्या जागेचा एका मातेसाठी त्याग केला, ती महिला म्हणजे अॅनी क्लेमर फंक!
अॅनी क्लेमर फंक या १९०६ पासून जांजगीरमध्ये वास्तव्यास असलेल्या ख्रिस्ती मिशनरी होत्या. त्या मागे थांबल्या आणि अटलांटिक महासागराच्या अथांग लाटांमध्ये कायमच्या विलीन झाल्या. त्यांचे पार्थिव कधीच सापडले नाही. त्यांनी सुरू केलेल्या भारतातील शाळेला त्यांच्या स्मरणार्थ त्यांचेच नाव देण्यात आले. आज त्या शाळेच्या फक्त बाहेरील भिंती आणि एक छोटी पाटी एवढेच अवशेष उरले आहेत. ही पाटी पेनसिल्व्हेनियाच्या एका गावाची नाळ मध्य भारताशी कशी जुळली आणि शेवट इतिहासातील सर्वात प्रसिद्ध जहाजावर कसा झाला याची साक्ष देते.
भारताशी नाळ सांगणार्या फंक या एकट्या नव्हत्या. काळाच्या आड अशी अनेक नाव इतिहासाच्या पानात गडप झालीत. टायटॅनिकच्या अधिकृत प्रवासी यादीत भारतीय वंशाच्या एकाही प्रवाशाची नोंद नाही. तरीही भारताचा टायटॅनिकच्या प्रवासाशी घनिष्ट संबंध होता.
हेन्री रायलंड डायर
हेन्री रायलंड डायर यांचा जन्म १८८७ मध्ये झाशी येथे एका ब्रिटिश दांपत्याच्या घरी झाला. ते व्हाईट स्टार लाइनचे कंपनीचे कर्मचारी होते आणि टायटॅनिकवर वरिष्ठ सहाय्यक चौथे अभियंता म्हणून नियुक्त झाले. जहाज बुडाले, तेव्हा ते अवघे चोवीस वर्षांचे होते. त्यांचा मृतदेह कधीच सापडला नाही.

मेरी डनबार ह्यूलेट
मेरी डनबार ह्यूलेट आपल्या मोठ्या मुलाबरोबर लखनौमध्ये राहत होत्या. नंतर धाकट्या मुलाला भेटण्यासाठी त्यांनी न्यूयॉर्कला जाण्याचा निर्णय घेतला. त्या साउथॅम्प्टनहून टायटॅनिकमध्ये द्वितीय श्रेणीच्या प्रवासी म्हणून चढल्या. जहाज बुडाल्यानंतर एका अमेरिकन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, कॉरिडॉरमधील गोंधळामुळे त्यांना जाग आली. त्यांनी एका स्टुअर्डला काय घडत आहे, असे विचारले असता, सर्व काही सुरळीत असल्याचे त्याने सांगितले. मात्र त्यांनी त्या दिलाश्याकडे दुर्लक्ष केले, वरच्या डेकवर गेल्या आणि त्यामुळे त्यांचा जीव वाचला.
रुथ एलिझाबेथ बेकर
रुथ एलिझाबेथ बेकर यांचा जन्म भारतात झाला होता. त्या फक्त बारा वर्षांच्या होत्या, जेव्हा त्या आपल्या आई आणि दोन धाकट्या भावंडांसोबत साउथॅम्प्टनहून जहाजात चढल्या. त्यांचे वडील मिशनरी होते, ते भारतातच थांबले होते. रुथ या दुर्घटनेतून बचावल्या आणि १९९० पर्यंत जगल्या. टायटॅनिक दुर्घटनेतील शेवटच्या जिवंत बचावलेल्या व्यक्तींमधील त्या एक होत्या. त्यांनी आपल्या अस्थी टायटॅनिक ज्या ठिकाणी विसावले त्या ठिकाणी विसर्जित करण्यात याव्यात, अशी इच्छा व्यक्त केली होती.
अॅनी फंक
अॅनी फंक यांचा टायटॅनिकपर्यंतचा प्रवास आजच्या छत्तीसगडमधील जांजगीर-चांपा जिल्ह्यातून सुरू झाला होता. त्या १९०६ मध्ये भारतात आल्या होत्या. मेनोनाइट चर्चकडून परदेशात पाठवण्यात आलेल्या त्या पहिल्या अविवाहित महिला होत्या. त्या हिंदी शिकल्या आणि सतरा मुलींसाठी एका खोलीतील शाळा सुरू केली.

१९१२ साली मार्च महिन्यात त्यांना एक तार आली. त्यांच्या आईची प्रकृती अतिशय गंभीर होती. आपल्या आईच्या आजारपणाची बातमी कळताच, त्यांनी छत्तीसगडमधील जांजगीर सोडले आणि कोलकात्यामार्गे जहाजाने इंग्लंडला पोहोचल्या. त्या लिव्हरपूल बंदरात गेल्या, तेव्हा त्यांना कळले की त्यांनी आरक्षित केलेले जहाज कोळसा संपामुळे उशिरा निघणार आहे. एका एजंटने त्यांना अधिक जलद पर्याय सुचवला. त्यांनी अतिरिक्त पैसे भरून टायटॅनिकवरील द्वितीय श्रेणीचे तिकीट घेतले. हिमनगाशी धडक होण्याच्या अवघ्या दोन दिवस आधी त्यांनी जहाजावरच आपला ३७ वा वाढदिवस साजरा केला होता.

डेकच्या खाली असणारे भारतीय कामगार
प्रवासी डेक्सच्या खाली, टायटॅनिकवर किमान आठ भारतीय कर्मचारी कार्यरत होते. ब्रिटिश जहाजवाहतूक नोंदींमध्ये त्यांची नोंद एशियाटिक्स अशी करण्यात आली होती. या एशियाटिक्स एवढ्याच नोंदीमुळे त्यांची नावे, त्यांचे मूळ याबद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही. ते बॉयलर रूममध्ये स्टोकर आणि सहाय्यक म्हणून काम करत होते.
ते वाचलेच नाही
जहाजाचा वेग कायम राहावा म्हणून एशियाटिक्स कामगार भट्ट्यांमध्ये कोळसा टाकत असत. त्यांना गोऱ्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत फारच कमी वेतन मिळत होते. त्यांचे छायाचित्रही काढले गेले नाही. जहाजबुडी नंतर त्यांची मुलाखतही घेतली गेली नाही, कारण ते वाचलेच नाहीत. हिमनगावर जहाज आदळले, तेव्हा सर्वप्रथम पाण्याखाली जाणाऱ्या जागांमध्ये बॉयलर रूम्स होत्या. तिथे काम करणाऱ्या या पुरुषांना वरच्या डेक्सपर्यंत जिथे लाइफबोट्समध्ये लोकांना बसवले जात होते तिथे पोहोचण्याची संधी सर्वात कमी होती.

त्यांची नाव धूसरच..
ही गोष्ट फक्त टायटॅनिकपुरतीच मर्यादित नव्हती. १९१२ पर्यंत ‘लस्कर’ म्हणून ओळखले जाणारे हजारो भारतीय खलाशी जगभरातील ब्रिटिश जहाजवाहतूक व्यवस्था चालवत होते. त्यांना गोऱ्या खलाशांच्या तुलनेत केवळ तुटपुंजे वेतन दिले जाई आणि अत्यंत कनिष्ठ, दुय्यम दर्जाच्या परिस्थितीत ठेवले जाई. ब्रिटिश साम्राज्याच्या व्यापारासाठी त्यांचे श्रम अनिवार्य होते. परंतु, इतिहासाच्या नोंदींमध्ये त्यांचे अस्तित्त्व धूसरच आहे.
या शांततेत काय दडलं आहे?
टायटॅनिकवर आधुनिक इतिहासातील कदाचित इतर कोणत्याही एका घटनेपेक्षा अधिक पुस्तके, चित्रपट आणि माहितीपट निर्माण झाले आहेत. तरीही भारताशी त्याचे असलेले संबंध आजही केवळ तळटीपांपुरतेच मर्यादित राहिले आहेत. यामागची कारणे काही गूढ नाहीत. टायटॅनिकची मिथककथा एका ठरावीक पात्रसमूहाभोवती उभी करण्यात आली. श्रीमंत उद्योगपती, उच्चभ्रू समाजातील महिला, शूर अधिकारी आणि मृत्यूला सामोरे गेलेले संगीतकार. ही कथा वर्गभेदाच्या चौकटीत सांगितली गेली, परंतु त्यातही फक्त काही विशिष्ट वर्गांनाच स्थान मिळाले.
