TMC New Symbols Allocated by EC : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार आणि आमदारांनी बंड केल्याने पक्षात मोठी फूट पडली. ममता बॅनर्जी गट आणि ऋतब्रत बॅनर्जींच्या गटातील वाद आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. या वादावर अंतिम निर्णय होईपर्यंत आयोगाने दोन्ही प्रतिस्पर्धी गटांना नवी नावं आणि नवी निवडणूक चिन्हं दिली आहेत. त्यामुळे ६ ऑक्टोबरला होणाऱ्या दोन पोटनिवडणुकांमध्ये तृणमूलच्या दोन्ही गटांना वेगळे नाव आणि वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे.

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गट आता ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ या नावाने ओळखला जाणार आहे. त्यांना ‘फुटबॉलपटू’ हे चिन्ह देण्यात आलं आहे; तर अरूप रॉय यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘लोकशाही तृणमूल काँग्रेस’ हे नाव देण्यात आलं असून, त्यांना ‘लिफाफा’ हे चिन्ह देण्यात आलं. मात्र, निवडणूक आयोगानं दोन्ही गटांनाही तृणमूल काँग्रेसचं मूळ नाव आणि चिन्ह देणं का नाकारलं? दोन्ही गटांचा मूळ पक्षावर दावा असेल, तर नाव आणि चिन्ह कोणाला मिळणार, हे आयोग कसं ठरवतो? हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

निवडणूक आयोग नाव-चिन्ह का गोठवतो?

गुरुवारी दिलेल्या अंतरिम आदेशात निवडणूक आयोगाने म्हटलं की, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसमध्ये दोन प्रतिस्पर्धी गट असल्याचं आयोगाच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळे या वादावर निवडणूक चिन्ह (आरक्षण आणि वाटप) आदेश, १९६८ मधील परिच्छेद १५ अंतर्गत सविस्तर निर्णय घेणं आवश्यक असल्याचं आयोगाने स्पष्ट केलं.

राजकीय पक्षांमध्ये फूट पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलीकडच्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) यांच्यातही पक्षाचे नाव आणि चिन्हावरुन वाद झाला होता. ही दोन्ही प्रकरणं सध्या न्यायप्रविष्ट आहेत. शिवसेना प्रकरणात निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला पक्षाचं अधिकृत नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात अजित पवार यांच्या गटाला पक्षाचं मूळ नाव आणि ‘घड्याळ’ हे चिन्ह मिळालं.

मात्र, दोन्ही प्रकरणांमध्ये आयोगाची प्रक्रिया सारखी नव्हती. शिवसेना प्रकरणात अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवलं होतं. तर राष्ट्रवादीच्या प्रकरणात आयोगाने थेट अंतिम निर्णय देत अजित पवार यांच्या गटाला मूळ नाव आणि चिन्ह दिलं. त्यामुळे तृणमूलच्या वादात आयोगाने आधी नाव आणि चिन्ह का गोठवलं आणि अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मूळ नाव आणि चिन्ह कोणत्या गटाला द्यायचं, हे आयोग कसं ठरवतो? हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.

निवडणूक आयोगाने टीएमसीचं चिन्ह का गोठवलं?

एखाद्या मोठ्या राजकीय पक्षात फूट पडली की, पक्षाच्या निवडणूक चिन्हावरून दोन्ही गटांमध्ये संघर्ष सुरू होतो. कारण- मतदार पक्षाला ओळखण्यासाठी आणि मतदान करताना त्याच्याशी जोडण्यासाठी निवडणूक चिन्ह हे महत्त्वाचं माध्यम असतं. त्यामुळेच अनेक मतदार भाजपासाठी ‘कमळ’, काँग्रेससाठी ‘हाताचा पंजा’ किंवा आम आदमी पक्षासाठी ‘झाडू’ यांचा उल्लेख करून आपली मतदानाची पसंती सांगत असतात.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने ऑक्टोबर २०२२ मध्ये पक्षाचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवलं होतं. त्याआधी ऑक्टोबर २०२१ मध्ये चिराग पासवान आणि पशुपती कुमार पारस यांच्या गटांमध्ये फूट पडल्यानंतर लोक जनशक्ती पक्षाचं नाव आणि ‘बंगला’ चिन्ह गोठवण्यात आलं होतं.

आता तृणमूलच्या प्रकरणातही आयोगानं हेच पाऊल उचललं आहे. नंदीग्राम आणि रेजीनगर विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये टीएमसीचं मूळ नाव आणि चिन्ह दोन्ही गटांना वापरता येऊ नये, यासाठी ते गोठवण्यात आलं आहे.

पक्षात फूट पडल्यास निवडणूक आयोग निर्णय कसा घेतो?

विधानमंडळाबाहेर एखाद्या राजकीय पक्षात फूट पडली आणि दोन किंवा त्यापेक्षा अधिक गटांनी आपणच त्या मान्यताप्राप्त पक्षाचे प्रतिनिधित्व करत असल्याचा दावा केला, तर अशा परिस्थितीत निवडणूक चिन्ह (आरक्षण आणि वाटप) आदेश, १९६८ मधील परिच्छेद १५ महत्त्वाचा ठरतो.

या परिच्छेदानुसार, जेव्हा आयोगाची खात्री पटते की, एखाद्या राजकीय पक्षात फूट पडली आहे आणि प्रतिस्पर्धी गट स्वतःला मूळ मान्यताप्राप्त पक्ष असल्याचा दावा करत आहे, तेव्हा आयोग या वादावर निर्णय घेऊ शकतो. त्यासाठी आयोग उपलब्ध तथ्यं आणि परिस्थितींचा विचार करतो. तसेच संबंधित सर्व गटांच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्यापैकी कोणता गट मूळ मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहे किंवा दोन्हीपैकी कोणताही नाही, यावर आयोग निर्णय घेऊ शकतो. आयोगाचा हा निर्णय प्रतिस्पर्धी गटांना मान्य करावा लागतो.

ही प्रक्रिया टीएमसीसारख्या मान्यताप्राप्त राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय पक्षांना लागू होते. मात्र, नोंदणीकृत, पण मान्यता नसलेल्या पक्षात फूट पडल्यास आयोग साधारणपणे दोन्ही गटांना पक्षांतर्गत पातळीवर वाद सोडवण्याचा सल्ला देतो. गरज पडल्यास न्यायालयात जाण्याचा पर्यायही दिला जातो.

१९६८ च्या या आदेशानुसार १९६९ मधील काँग्रेसमधील फुटीसंदर्भात पहिला मोठा निर्णय देण्यात आला होता. के. कामराज, नीलम संजीव रेड्डी, एस. निजलिंगप्पा व अतुल्य घोष यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या जुन्या गटाला ‘सिंडिकेट’ म्हटलं जात होतं. या गटानं इंदिरा गांधी यांना पक्षातून काढल्यानंतर काँग्रेसमध्ये फूट पडली. निजलिंगप्पा यांच्या नेतृत्वाखालील गट ‘काँग्रेस (ओ)’, तर इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील गट ‘काँग्रेस (जे)’ म्हणून ओळखला गेला. जुन्या काँग्रेसकडे ‘बैलजोडी’ हे मूळ चिन्ह कायम राहिलं! तर इंदिरा गांधी यांच्या गटाला ‘गाय व वासरू’ हे नवं चिन्ह देण्यात आलं.

१९६८ पूर्वी पक्षात फूट पडल्यास निर्णय कसा व्हायचा?

१९६८ मध्ये स्वतंत्र नियम लागू होण्यापूर्वी राजकीय पक्षांमधील फुटीच्या प्रकरणांवर निवडणूक आयोग निवडणूक आचार नियम, १९६१ अंतर्गत अधिसूचना आणि कार्यकारी आदेश जारी करून निर्णय घेत होता. या काळात १९६४ मधील भारतीय कम्युनिस्ट पक्षातील (CPI) फूट सर्वाधिक चर्चेत राहिली.

या पक्षाच्या फुटीर गटानं डिसेंबर १९६४ मध्ये निवडणूक आयोगाकडे धाव घेत स्वतःला CPI (मार्क्सवादी) म्हणून मान्यता देण्याची मागणी केली. या गटानं आंध्र प्रदेश, केरळ व पश्चिम बंगालमधील त्यांना पाठिंबा देणाऱ्या खासदार आणि आमदारांची यादीही आयोगाला दिली. या तीन राज्यांमध्ये त्यानंतर खासदार-आमदारांना मिळालेल्या मतांची एकूण संख्या लक्षणीय असल्याचं आयोगाच्या निदर्शनास आलं. त्यावरून आयोगानं फुटीर गटाला सीपीआय (एम) म्हणून मान्यता दिली.

बहुमताच्या चाचणीशिवायही वाद सोडवता येतो का?

आतापर्यंतच्या बहुतांश प्रकरणांमध्ये पक्षाचे बहुसंख्य प्रतिनिधी, पदाधिकारी, खासदार आणि आमदार एका गटाच्या बाजूनं असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानं पक्षातील कोणता गट मजबूत आहे, हे ठरविण्यासाठी बहुमताची चाचणी केली. शिवसेनेच्या प्रकरणातही पक्षाच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींपैकी बहुसंख्य जण एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले होते.

मात्र, पक्षसंघटनेतील पदाधिकारी आणि त्यांच्या यादीवरच वाद असेल, तर संघटनेतील पाठिंब्याच्या आधारे बहुमत ठरवणं आयोगासाठी कठीण होतं. अशा वेळी निवडणूक आयोगानं पक्षातील संघटनात्मक बहुमताऐवजी केवळ निवडून आलेल्या खासदार आणि आमदारांच्या पाठिंब्याच्या आधारे कोणता गट मजबूत आहे, हे तपासण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

मूळ चिन्ह न मिळालेल्या गटाचं काय होतं?

१९६९ सालच्या काँग्रेसमधील पहिल्या फुटीच्या वेळी निवडणूक आयोगानं काँग्रेस (ओ) आणि जगजीवन राम यांच्या नेतृत्वाखालील फुटीर गट या दोघांनाही मान्यता दिली. काँग्रेस (ओ)ची काही राज्यांमध्ये लक्षणीय संघटनात्मक उपस्थिती होती आणि निवडणूक चिन्ह आदेशातील परिच्छेद ६ व ७ नुसार पक्षाला मान्यता मिळण्यासाठी आवश्यक असलेले निकषही तो गट पूर्ण करीत होता. हीच पद्धत १९९७ पर्यंत कायम राहिली.

मात्र, त्यानंतर काँग्रेस, जनता दल आदी पक्षांत फूट पडून हिमाचल विकास काँग्रेस, मणिपूर स्टेट काँग्रेस, ममता बॅनर्जींची पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेस, लालू प्रसादांचा आरजेडी पक्ष व नवीन पटनाईकांचा बीजू जनता दल यांसारखे पक्ष निर्माण झाले. या प्रकरणांमध्ये निवडणूक आयोगानं भूमिका बदलली. फक्त खासदार किंवा आमदारांचा पाठिंबा असणं पुरेसं नाही, कारण- त्यांनी मूळ पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून ती जिंकली होती, असं आयोगाचं म्हणणं होतं. त्यामुळे मूळ पक्षाचं चिन्ह न मिळालेल्या फुटीर गटाला स्वतंत्र पक्ष म्हणून नोंदणी करावी लागेल आणि त्यानंतरच्या विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांतील कामगिरीच्या आधारेच त्याला राज्य किंवा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळू शकेल, असा नवा नियम लागू करण्यात आला.