Tobacco Oral Cancer Risk: आपल्या ओळखीत गप्पांचा बादशहा, लग्नात सगळ्यांना हसवणारा, सगळ्यांचा लाडका, असा एक तरी माणूस नक्की असेल. एके दिवशी तो म्हणतो, “अरे, जेवताना तोंडच उघडत नाही.” सगळ्यांना हसवणारा माणूस स्वतःच हसायला घाबरू लागतो. मात्र, त्याला त्रासदायक ठरणाऱ्या या गोष्टीची सुरुवात त्याच्याच एका रोजच्या सवयीपासून झालेली असते. दुपारचे जेवण आटोपलेले, चहाच्या टपरीजवळ चार-पाच जणांचा घोळका, कोणाच्या तरी तळहातावर तंबाखूचा चुरा, चुन्याची डबी आणि तो ओळखीचा आवाज!

तळहातावर चुना आणि तंबाखू एकजीव करून झाल्यावर, हाताला एक विशिष्ट झटका दिला जातो, चुरा अंगठ्याने गोळा केला जातो आणि तो गालाच्या आत, खालच्या हिरडीच्या फटीत दाबून बसवला जातो. एका क्षणात चेहऱ्यावर एक दीर्घ सुटकेचा, समाधानाचा भाव पसरतो. तोबरा व्यवस्थित जागी बसलाय ना? याची खात्री झाल्यावर मग पुढच्या गप्पा रंगतात. गालातल्या त्या गोळ्यामुळे शब्दांचे अडखळणे, तोंडात सतत जमा होणारी थुंकी आणि तोंडाला येणारा उग्र दर्प; पण चेहऱ्यावर मात्र ‘आता कुठे जीवात जीव आला’ हे समाधान दिसते.

शहरातल्या नाक्यांपासून ते गावाकडच्या पारापर्यंत हे दृश्य अत्यंत सामान्य आहे. जेवणानंतरची ती एक तलफ भागवणे असो, गाडी चालवताना झोप उडवणे असो किंवा कामाच्या धावपळीत क्षणाचा थकवा घालवण्यासाठी तंबाखूचा तोबरा भरणे असो – अनेकांसाठी तो दिवसातला अत्यंत हवाहवासा क्षण ठरतो. पण, गालाच्या त्या फटीत दाबून ठेवलेला तो चिमूटभर तंबाखू आतल्या आत मुखारोग्याची किती भयंकर वाताहात करतो, याचा विचार त्या समाधानाच्या क्षणी कोणाच्याच मनात येत नाही.

मशेरीची ‘किक’ आणि पचनाचा गैरसमज

टपरीवर दिसणारं हे दृश्य उघड असतं; पण याहूनही भयानक आणि छुपा प्रकार घराघरांमध्ये पहाटेच्या वेळी घडतो. सकाळी उठल्याबरोबर चुलीतली किंवा डब्यातली काळीभोर ‘मशेरी’ बोटावर घेऊन हिरड्यांवर आणि दातांवर घासणाऱ्या अनेक महिला दिसतात. “मशेरी चोळल्याशिवाय पोटच हलकं होत नाही,” हा त्यामागचा पिढ्यान् पिढ्या चालत आलेला ठाम युक्तिवाद. दात स्वच्छ ठेवण्याच्या नावाखाली हा निव्वळ विषाचा मारा असतो. बरं ही मशेरी घासण्याची सवय केवळ पोट साफ करण्यापुरती मर्यादित राहत नाही. त्याचं व्यसन लागतं. या व्यसनाची दाहकता स्पष्ट करणारे एक कटू वास्तव आमच्याच घरात घडले होते. माझ्या आजोबांचे निधन झाले होते. रीतीप्रमाणे सर्व नातेवाइकांना कळवलं. जसजशी बातमी पसरली तसतसे सगळे नातेवाईक येऊ लागले. त्यात माझी मामी आजी गावाहून आली! धाय मोकलून ती रडू लागली. थोड्या वेळाने लोकांची गर्दी वाढली आणि ती दिसेनाशी झाली. घरभर शोधल्यानंतर शेवटी घराच्या मागच्या दाराच्या उंबरठ्यावर बसून दुःखातही मशेरी घासत होती.

मशेरी म्हणजे अर्धवट भाजलेला तंबाखू. तंबाखूतील ‘निकोटीन’ हा घटक शरीराला आणि मेंदूला स्वतःवर अवलंबून बनवतो (Dose Dependency). मशेरी हिरड्यांवर घासली किंवा तंबाखू गालात दाबला की तोंडाच्या नाजूक त्वचेतून ते निकोटीन अवघ्या काही सेकंदांत थेट रक्तात आणि मेंदूपर्यंत पोहोचतं. मेंदूला मिळणारी ही रासायनिक तरतरी म्हणजेच लोकांना वाटणारी ‘किक’!

बद्धकोष्ठतेचा समज तर निव्वळ शरीराची फसवणूक आहे. निकोटीन शरीरातील मज्जासंस्थेला उत्तेजित करून आतड्यांची हालचाल (Peristalsis) कृत्रिमरीत्या वाढवते. रोजच्या या सवयीमुळे शरीराची स्वतःची नैसर्गिक मलविसर्जनाची क्षमता बोथट होते. निकोटीनचं उत्तेजन मिळालं नाही, तर आतड्यांचं काम मंदावतं. त्यामुळे पोट साफ न होणं हा आजार नसून, शरीरानं निकोटीनच्या विळख्यात टाकलेली नांगी असते.

गालात सतत तंबाखू दाबून का ठेऊ नये?

आपल्या मुखपोकळीच्या (Oral Cavity) आत, गालावर आणि हिरड्यांवर अत्यंत नाजूक, मऊ आणि ओलसर गुलाबी पडदा असतो, ज्याला वैद्यकीय भाषेत श्लेष्मल त्वचा किंवा ‘म्युकस मेंब्रेन’ (Mucous Membrane) म्हणतात.

जेव्हा एखादी व्यक्ती दिवसातून चार-पाच वेळा, तासन् तास त्याच एका जागी तंबाखूचा तोबरा दाबून ठेवते (Tobacco Poaching), तेव्हा तंबाखूतली विषारी रसायने आणि चुन्याचा दाहक गुणधर्म सतत त्या त्वचेवर जळजळीत मारा करतात. या आघातापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तिथली त्वचा जाड, खरखरीत आणि पांढरी पडू लागते. तिथे सुरकुतलेले पांढरे डाग तयार होतात, ज्याला दंतवैद्यकीय भाषेत ‘टोबॅको पाउच केराटोसिस’ (Tobacco Pouch Keratosis) म्हणतात. हा शरीराने दिलेला पहिला गंभीर इशारा असतो.

‘सुपारी’चा विळखा आणि तोंड आक्रसणे (OSMF)

तंबाखूसोबतच सर्रास चघळली जाणारी ‘सुपारी’ ही मुखारोग्याची सर्वांत मोठी वैरीण आहे. सुपारीमुळे ‘ओरल सबम्युकोस फायब्रोसिस’ (OSMF) नावाचा एक असाध्य आणि वेदनादायी आजार जडतो. सुपारीतील रसायनांमुळे गालाच्या आतील स्नायूंची लवचिकता पूर्णपणे नष्ट होते आणि ते चामड्यासारखे ताठर, कडक बनतात (Cheek stiffness).

  • तोंड उघडणे बंद होणे (Trismus): आजार वाढतो तसतसं रुग्णाचं तोंड उघडणं कठीण होत जातं. निरोगी व्यक्तीच्या तोंडात सहजपणे तीन ते चार बोटे जाऊ शकतात; मात्र OSMF जडलेल्या रुग्णाचा जबडा इतका आक्रसतो की, शेवटी तोंडात पाण्याचा साधा चमचा जाईल इतकीच फट शिल्लक राहते.
  • महिलांमधील वाढते प्रमाण: महाराष्ट्रात हा आजार महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. घरात उघडपणे व्यसन करणे शक्य नसल्याने अनेक महिला दात घासण्यासाठी मशेरीचा आधार घेतात किंवा दिवसभर तोंडात सुगंधी सुपारी, मावा दाबून ठेवतात. परिणामी, तोंड बारीक झाल्याची आणि जेवण न जाता अशक्तपणा आल्याची तक्रार घेऊन दंतवैद्यांकडे जाणाऱ्या महिलांचे प्रमाण धक्कादायक आहे.

जळजळ आणि कर्करोगपूर्व धोक्याची घंटा

OSMF आणि तंबाखूच्या सततच्या माऱ्यामुळे तोंडात तयार होणारे पांढरे डाग (ल्युकोप्लाकिया) ही कर्करोगपूर्व स्थिती (Potentially Malignant Disorders) मानली जाते. हा थेट कॅन्सर नसला तरी कॅन्सरच्या दारावर वाजवलेली थाप नक्कीच असते. या अवस्थेत रुग्णाला होणारा त्रास अत्यंत गंभीर असतो:

  • तोंडाची तीव्र जळजळ (Burning Mouth): आतील त्वचा इतकी संवेदनशील आणि पातळ होते की, घरातील साध्या वरणातली किंचित मिरची किंवा लवंगही तोंडात निखारे ठेवल्यासारखी आग भडकवते. तिखट, गरम किंवा आंबट खाणे पूर्णपणे बंद होते.
  • घशावर आणि टॉन्सिल्सवर परिणाम: विषारी रसायनांमुळे घशातील लाळग्रंथी आणि टॉन्सिल्सच्या भागाला सूज येते, ज्यामुळे अन्न गिळणेही यातनादायी ठरते.

ताणतणाव आणि नकळत दात खाणे (Bruxism)

अनेकांचा दावा असतो की, कामाचा प्रचंड ताण असल्यामुळे ते तंबाखू खातात. पण वैद्यकीयदृष्ट्या हा एक मनोशारीरिक भ्रम (Psychosomatic disorder) आहे. निकोटीन शरीरात गेल्यावर मज्जासंस्थेला अधिक उत्तेजित आणि तणावग्रस्त बनवते.

या सततच्या मज्जातंतूंच्या ताणामुळे अनेक तंबाखू सेवकांना झोपेत किंवा कामाच्या तणावात नकळत दात करकरा चावण्याची अथवा जबडा घट्ट आवळण्याची सवय लागते, ज्याला ‘ब्रक्सिझम’ (Bruxism) म्हणतात. यामुळे दातांचे संरक्षणात्मक आवरण (Enamel) घासले जाऊन दात सपाट होतात, दातांना तीव्र कळ जाणवते आणि जबड्याच्या सांध्यांमध्ये (TMJ) कायमस्वरूपी वेदना सुरू होतात.

आरशासमोर उभे राहून आपण काय तपासले पाहिजे?

तोंडाचा कर्करोग एका क्षणात होत नाही; तो अनेक महिने आधी पांढऱ्या चट्ट्यांच्या, आक्रसणाऱ्या जबड्याच्या आणि तोंडाच्या जळजळीच्या रूपाने इशारे देत असतो.

आजच आरशासमोर उभे राहून तीन गोष्टी तपासा:

तोंड उघडून आत चार बोटे सहज जातात का?

गालाच्या आत किंवा जिभेवर पांढरा, लाल चट्टा उठला आहे का?

नेहमीचं घरचं जेवण जेवतानाही तोंडाची आग होते का?

यातले काहीही जाणवत असेल, तर वेळ न दवडता, त्वरित दंत शल्यचिकित्सकांचा (Dentist) सल्ला घ्या. तळहातावर तंबाखू मळताना मिळणारा तो काही मिनिटांचा आभासी आराम तुमच्या हसण्याचा, खाण्याचा आणि बोलण्याचा अधिकार कायमचा हिरावून घेऊ शकतो. मशेरी हे दंतमंजन नाही आणि तंबाखू हा पचनाचा मार्ग नाही ही जाणीव मुखारोग्याला नव्या संकटातून वाचवू शकते.