Neck Lymph Nodes Cancer : जीभेच्या कर्करोगाचं निदान झाल्यानंतर रुग्ण आणि कुटुंबीयांसमोर अनेक प्रश्न उभे राहतात. त्यापैकी एक चिंतेचा प्रश्न म्हणजे, कर्करोग जीभेपुरता मर्यादित आहे की तो मानेतील लसिका ग्रंथींपर्यंत पोहोचला आहे? स्कॅन केल्यानंतर अनेकदा याचं स्पष्ट उत्तर मिळत नाही. मात्र, कर्करोगाच्या पेशी मूळ गाठीपासून सुटून लसिका यंत्रणेतून मानेतील ग्रंथींपर्यंत पोहोचल्या असतील, तर पुन्हा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो.
कर्करोगाची शक्यता तपासण्यासाठी प्रत्येक रुग्णावर मानेची मोठी शस्त्रक्रिया करावी लागतेच, असं नाही. मुंबईतील एका रुग्णालयातील डॉक्टर अशा रुग्णांसाठी ‘सेंटिनल लिम्फ नोड बायोप्सी’ नावाची प्रक्रिया वापरत आहेत. या पद्धतीत कॅन्सरच्या गाठीपासून सर्वात आधी कोणत्या लसिका ग्रंथीकडे पेशी पोहोचू शकतात, हे तपासलं जातं.
जीभेच्या कर्करोगाचे लवकर निदान झालेल्या अशा ७५ रुग्णांमध्ये ही प्रक्रिया करण्यात आली. त्यापैकी ७० रुग्णांना मानेतील लसिका ग्रंथी काढण्याची मोठी शस्त्रक्रिया टाळता आली. त्यामुळे कॅन्सर पसरला आहे की नाही, हे तपासतानाच गरज नसलेली मोठी शस्त्रक्रिया टाळण्यास ही पद्धत मदत करू शकते.
कॅन्सरचा ‘पहिला ठाव’ कसा घेतला जातो?
सेंटिनल लिम्फ नोड बायोप्सी या प्रक्रियेत कॅन्सरच्या गाठीपासून सर्वात आधी ज्या लसिका ग्रंथीकडे कॅन्सरच्या पेशी पोहोचण्याची शक्यता असते, ती ग्रंथी काढून तपासली जाते. सोप्या भाषेत सांगायचं तर, कॅन्सर पसरायला सुरुवात झाली आहे का, हे पाहण्यासाठी कर्करोगाचा ‘पहिला थांबा’ तपासला जातो.
या ग्रंथीत कॅन्सरच्या पेशी आढळल्या नाहीत, तर मानेतील इतर अनेक लसिका ग्रंथी काढण्याची गरज नसते. मात्र, तपासणीत कॅन्सर आढळल्यास डॉक्टर पुढील उपचार किंवा मानेची मोठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेऊ शकतात. या प्रक्रियेतील ७५ रुग्णांपैकी ५ रुग्णांच्या लसिका ग्रंथींमध्ये कॅन्सर आढळला. त्यामुळे त्यांच्यावर त्याच शस्त्रक्रियेदरम्यान मानेतील लसिका ग्रंथी काढण्याची प्रक्रिया करण्यात आली.
स्कॅनमध्ये दिसत नसतानाही कॅन्सर पसरण्याची शक्यता
जीभेच्या कॅन्सरचे लवकर निदान झालं असेल तर कॅन्सरच्या पेशी मानेपर्यंत पोहोचल्या असल्या, तरी मान आणि लसिका ग्रंथी बाहेरून पूर्णपणे सामान्य दिसू शकतात. तपासणी आणि स्कॅनमध्ये काहीही संशयास्पद दिसत नसतानाही कॅन्सरच्या पेशी तिथपर्यंत पोहोचलेल्या असू शकतात. हा प्रसार इतका सूक्ष्म असतो की तो नेहमीच स्कॅनमध्ये दिसून येत नाही.
मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील हेड अँड नेक ऑन्कोलॉजी आणि सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. मंदार देशपांडे यांनी सांगितलं की, “तपासणी आणि स्कॅनमध्ये लसिका ग्रंथी पूर्णपणे सामान्य दिसू शकतात. तरीही कॅन्सर तिथे सूक्ष्म पातळीवर पसरलेला असण्याची शक्यता असते,”
लसिका ग्रंथी काढण्याची शस्त्रक्रिया का टाळली जाते?
जीभेचा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या काही रुग्णांमध्ये नेक डिसेक्शन म्हणजेच मानेच्या शस्त्रक्रियेद्वारे कर्करोगाचे निदान केले जाते. मात्र, कर्करोग मानेपर्यंत पसरलेला नसेल, तर ही मोठी शस्त्रक्रिया टाळता येईल का, याचा विचार डॉक्टर करतात. या शस्त्रक्रियेत मानेच्या वेगवेगळ्या भागांतील लसिका ग्रंथी काढल्या जातात. कर्करोग अधिक पसरल्यास ही प्रक्रिया आवश्यक ठरू शकते. मात्र, त्यानंतर मान दुखणे, बधिरपणा, मान आखडणे आणि खांद्याची हालचाल करण्यास त्रास अशा समस्या उद्भवू शकतात. शस्त्रक्रियेला लागणारा वेळ आणि रुग्णाची रिकव्हरी यावर रुग्णालयात राहण्याचा कालावधीही अवलंबून असतो. याशिवाय मानेवर मोठ्या जखमेची खूणही राहू शकते.
“या रुग्णांपैकी केवळ १० ते २० टक्के रुग्णांच्या लसिका ग्रंथींमध्ये प्रत्यक्षात कर्करोग आढळतो. याचा अर्थ, बहुसंख्य रुग्णांवर गरज नसतानाही मोठी शस्त्रक्रिया केली जाते,” असेही डॉ. देशपांडे यांनी नमूद केले.
नवीन शस्त्रक्रिया पद्धत कशी काम करते?
या प्रक्रियेत सर्वप्रथम जिभेत रेडिओॲक्टिव्ह ट्रेसरचे अल्प प्रमाणात इंजेक्शन दिले जाते. त्यानंतर इमेजिंगच्या मदतीने हा ट्रेसर ज्या मार्गाने पुढे जाईल, तसा त्याचा मागोवा घेतला जातो. या प्रक्रियेत कर्करोगाच्या पेशी पोहोचण्याची शक्यता असलेली पहिली लसिका ग्रंथी ओळखली जाते. तिला ‘सेंटिनेल नोड’ असे म्हणतात.
शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टर मानेवर छोटा छेद देऊन ही लसिका ग्रंथी काढतात. त्यानंतर तिच्या ऊतींची (Tissues) तपासणी करून त्यात कर्करोगाच्या पेशी आहेत का, हे पाहिले जाते. शस्त्रक्रियेदरम्यान केली जाणारी तपासणी साधारण ३० मिनिटांत प्राथमिक निष्कर्ष देऊ शकते. सेंटिनेल नोडमध्ये कर्करोग आढळल्यास, डॉक्टर त्याच शस्त्रक्रियेदरम्यान मानेतील इतर लसिका ग्रंथी काढण्याची संपूर्ण शस्त्रक्रिया करू शकतात. मात्र, सेंटिनेल लसिका ग्रंथीमध्ये कर्करोगाच्या पेशी आढळल्या नाहीत, तर रुग्णाला मानेवरील मोठी शस्त्रक्रिया टाळता येते.
७० रुग्णांना मोठी शस्त्रक्रिया टाळता आली
मुंबईतील या रुग्णालयात २०२३ मध्ये सेंटिनेल नोड बायोप्सीची पद्धत सुरू करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत ७५ रुग्णांवर ही प्रक्रिया करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. देशपांडे यांनी दिली. यापैकी सुमारे ९३ टक्के रुग्णांना मानेतील लसिका ग्रंथी काढण्याची मोठी शस्त्रक्रिया टाळता आली.
रुग्णालयाच्या वैद्यकीय तपासणीतील निष्कर्षांनुसार, या पद्धतीत मानेवर दिलेल्या छेदाची सरासरी लांबी सुमारे ३ सेंटीमीटर होती. तसेच, रुग्णांना सरासरी ४.५ दिवस रुग्णालयात राहावे लागले. शस्त्रक्रियेची व्याप्ती कमी असल्याने शरीरावरील ताण कमी होऊ शकतो. त्यामुळे मान आणि खांद्याची हालचाल तसेच दैनंदिन कामे लवकर पूर्ववत होण्यास मदत मिळू शकते, असे डॉक्टरांनी सांगितले.
शस्त्रक्रियेत अधिक अचूक पद्धतीचा वापर
सेंटिनेल लसिका ग्रंथी तपासणी ही प्रायोगिक टप्प्यातील पद्धत नाही. जपान आणि युरोपमध्ये झालेल्या यादृच्छिक नियंत्रित चाचण्यांसह आंतरराष्ट्रीय स्तरावर या पद्धतीचा अभ्यास करण्यात आला आहे. योग्यरित्या निवडलेल्या रुग्णांमध्ये पारंपरिक उपचारांप्रमाणेच परिणाम मिळू शकतात, अशी माहिती डॉ. देशपांडे यांनी दिली.
मात्र, ही पद्धत सर्वच ठिकाणी उपलब्ध नाही. यासाठी विशेष उपकरणे, अणुवैद्यकशास्त्राच्या मदतीने केल्या जाणाऱ्या इमेजिंग चाचण्या आणि लसिका ग्रंथींच्या ऊतींची तपासणी करण्यासाठी तज्ज्ञांची गरज असते. त्यामुळे सध्या भारतातील मोजक्याच रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.
डॉक्टरांच्या मते, या पद्धतीमागचा विचार मात्र सोपा आहे. प्रत्येक रुग्णाला एकसारख्याच मोठ्या शस्त्रक्रियेची गरज नसते. कर्करोगावर उपचार करताना शरीराची नैसर्गिक कार्यक्षमता शक्य तितकी टिकवून ठेवणे, हा या पद्धतीचा उद्देश आहे.
