पॅरिस शहरातील सर्वात उंच इमारत म्हणजे ‘टूर माँटपार्नास.’ या देखण्या शहराच्या सौंदर्याचा डाग म्हणून ही इमारत कुप्रसिद्ध आहे. जनतेच्या आणि पर्यटकांच्या चेष्टेचा विषय झालेल्या या इमारतीच्या नूतनीकरणाची योजना आखण्यात आली होती. मात्र इमारतीच्या सहमालकांनी केलेल्या विरोधामुळे इमारतीच्या नूतनीकरणाचे काम थांबले आहे. ही योजना का ठप्प झाली याविषयी…

‘टूर माँटपार्नास’ या इमारतीचे वैशिष्ट्य काय आहे?

अनेक इमारती शहर सौंदर्यात भर घालत असतात, मात्र पॅरिसमधील टूर माँटपार्नास ही इमारत या शहराचे सौंदर्य बिघडवत असल्याची टीका होते. शहराच्या मधोमध उभी असलेली ही गगनचुंबी इमारत शहरातील सर्वात कुरूप इमारत म्हणून ओळखली जाते. २१० मीटर (६८९ फूट) उंच असलेली ही ५९ मजली इमारत शहरातील सर्वात उंच इमारत, त्यामुळे शहरातील कोणत्याही भागातून ती नजरेस पडते. इतर इमारती बहुधा एकसमान असताना ही उंच इमारत उगीचच डोळ्यात खुपते. या इमारतीचा रंगही अतिशय गडद आणि लोकांच्या नावडतीचा. या इमारतीचे बांधकाम १९६९ ते १९७३ दरम्यान झाले. ही प्रामुख्याने एक व्यावसायिक कार्यालयीन इमारत असून तिथे ५,००० पेक्षा जास्त लोक काम करतात. या इमारतीचा ५६वा मजला आणि ५९ व्या मजल्यावरील टेरेस पर्यटकांसाठी खुले आहे. येथून संपूर्ण पॅरिस शहराचे ३६०-डिग्री विहंगम दृश्य दिसते. मात्र असे गमतीने म्हटले जाते, की येथून ही इमारत दिसत नसल्याने शहर अधिक सुंदर दिसते.

सध्या या इमारतीच्या आधुनिकीकरणाची काय योजना आहे?

फ्रेंच भाषेत ‘टूर’ म्हणजे टॉवर अर्थात मनोरा. त्यामुळेच या इमारतीचे नाव आहे ‘टूर माँटपार्नास.’ मात्र अनेकांच्या टीकेची धनी झाल्याने या इमारतीचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या एका दशकाहून अधिक काळापासून, या इमारतीचे नूतनीकरण करून तिचे भव्य रूप अधिक आकर्षक बनवण्याच्या आणि परिसराचे आधुनिकीकरण करण्याच्या योजनांवर विचारमंथन सुरू आहे. वास्तुविशारदांनी या २१० मीटर उंच इमारतीचे पूर्णपणे नूतनीकरण करण्याची योजना आखली होती; यात इमारतीला काचेचे नवीन बाह्य आवरण लावणे, सर्वत्र हिरवळ निर्माण करणे, १६व्या मजल्यावर ‘गार्डन टेरेस’ आणि सर्वात वरच्या मजल्यावर शेतीसाठी ‘ग्रीन हाऊस’ उभारणे यांचा समावेश होता. या योजनेत ५९ मजली इमारतीमधील तीन मजल्यांवर हॉटेल तसेच नवीन कार्यालये आणि मनोरंजनाच्या जागांचाही समावेश होता.

इमारतीच्या नूतनीकरणाची योजना का बारगळली?

या इमारतीच्या नूतनीकरणाचा सुरुवातीचा खर्च ४० कोटी युरोपेक्षा कमी होता. मात्र ॲस्बेस्टोस काढून टाकण्याच्या मोठ्या प्रक्रियेमुळे या प्रकल्पाचा अंदाजित खर्च दुप्पट होऊन ८० कोटी युरो इतका वाढला. फ्रेंच गुंतवणूक निधी आणि विमा कंपन्यांचा समावेश असलेल्या या इमारतीच्या खासगी सहमालकांनी, नूतनीकरणाच्या पहिल्या टप्प्याबाबत (ज्यात ॲस्बेस्टोस काढणे, आतील भाग मोकळा करणे आणि बाह्य आवरणाचा काही भाग काढणे यांचा समावेश होता) अंतिम मतदानासाठी या आठवड्यात बैठक घेतली. योजना आणि खर्चाबाबत मतभेद झाल्यानंतर, तीन-चतुर्थांशाहून अधिक सहमालकांनी या प्रकल्पाच्या विरोधात मतदान केले. टॉवरच्या नूतनीकरणासाठी मिळालेली बांधकाम परवानगी नोव्हेंबरच्या अखेरीस संपणार होती, त्यामुळे हा प्रकल्प सुरू करण्याची ही शेवटची संधी होती. आता अशी चिंता व्यक्त केली जात आहे की, नूतनीकरणासाठी रिकामी आणि बंद केलेली ही इमारत ओसाड अवस्थेत पडून राहील.

नूतनीकरणाची योजना बारगळल्यानंतर पॅरिसवासीयांची प्रतिक्रिया काय?

ज्या सहमालकांना अजूनही नूतनीकरण हवे आहे, त्यापैकी चौघांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले. उद्योगपती झेवियर निएल यांचाही यामध्ये समावेश आहे. ‘‘टूर माँटपार्नासचे रूपांतर करण्याबाबतच्या सर्व पर्यायांची पडताळणी करण्यासाठी सर्व सहमालक, आर्थिक भागीदार आणि सरकारी अधिकारी यांनी लवकरच एकत्र यावे, अशी आमची इच्छा आहे,’’ असे या निवेदनात म्हटले आहे. काही सहमालकांना अशी आशा आहे की, एका नवीन आणि मर्यादित स्वरूपाच्या प्रकल्पावर सहमती होऊ शकेल. या इमारतीच्या नूतनीकरणाच्या प्रकल्पाबरोबरच आजूबाजूच्या इमारतींच्या नूतनीकरण व परिसराच्या विकासाचेही काम हाती घेण्यात आले आहे. इमारतीच्या नूतनीकरणाचे काम रखडल्यास इतर प्रकल्पांनाही विलंब होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया स्थानिक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पॅरिसच्या १५ व्या जिल्ह्यातील (जिथे ही इमारत स्थित आहे) महापौर फिलिप गुजॉन यांनी ‘सर्वांनी आता शहाणपणाची भूमिका घेण्याची गरज आहे,’ असे सांगितले. ‘‘१० वर्षांच्या कालावधीत विकसित केलेला प्रकल्प वाया घालवणे किंवा जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या या वास्तूची हेळसांड होऊ देणे, मला मान्य नाही,’’ असे ते म्हणाले. पॅरिसचे महापौर इमॅन्युएल ग्रेगोइर यांच्या कार्यालयाने याबाबत सांगितले की, या जागेवरील काम ठप्प होऊ नये म्हणून पर्यायी उपाय सुचवला जावा अशी अपेक्षा आहे. डाव्या विचारसरणीच्या विरोधी नगरसेवकांनी अशी सूचना केली आहे की, हा कालबाह्य झालेला टॉवर पाडून त्याऐवजी एक उद्यान उभारले जावे, ज्यामुळे उन्हाळ्यातील उष्णतेच्या लाटेदरम्यान परिसरातील तापमान कमी राखण्यास मदत होईल.

sandeep.nalawade@expressindia.com