एखादा मित्र सतत तुमच्यावर टीका करत असेल, तुमच्या भावना समजून घेत नसेल किंवा त्या मित्राच्या प्रत्येक भेटीनंतर तुम्हाला मानसिकदृष्ट्या थकवा जाणवत असेल तर एक प्रश्न मनात येतो – हे नातं अजून टिकवावं का? सोशल मीडियावर अशा वेळी एक सल्ला सहज पाहायला मिळतो, ‘स्वतःची शांतता महत्त्वाची आहे, त्यामुळे टॉक्सिक व्यक्तीला आयुष्यातून काढून टाका.’

सोशल मीडियावर आता मैत्रीबाबतचे अनेक संदेश पाहायला मिळतात; स्वत:च्या मर्यादा ठरवा, स्वत:ची मानसिक शांतता जपा आणि टॉक्सिक लोकांना आयुष्यातून काढून टाका. यातूनच ‘कट-ऑफ कल्चर’ नावाचा ट्रेंड वाढला आहे. या माध्यमातून मानसिकदृष्ट्या त्रासदायक वाटणाऱ्या नात्यांपासून दूर जाण्याला प्रोत्साहन दिलं जात आहे.

माउंट रॉयल विद्यापीठाचे सोशल वर्क विषयाचे सहायक प्राध्यापक जिओ डोल्सकोअर यांनी मैत्रीतील अनेक कंगोरे स्पष्ट केले आहेत. ते म्हणतात, स्वतःच्या मर्यादा ओळखणं आणि नात्यातील अस्वस्थ करणारं वर्तन समजून घेणं स्वसुधारणेसाठी नक्कीच महत्त्वाचं आहे. मात्र, मैत्रीच्या बाबतीत प्रत्येक कठीण प्रसंगाचा शेवट थेट नातं तोडण्यानेच व्हावा असं नाही, त्यामुळे एखाद्या मित्राला ‘टॉक्सिक’ ठरवून मैत्री संपवण्यापूर्वी एक मूलभूत प्रश्न विचारणं गरजेचं आहे—मैत्री म्हणजे नेमकं काय आणि या नात्याकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत?

मैत्री का महत्त्वाची आहे?

मैत्री म्हणजे फक्त रिकाम्या वेळेत बोलण्यासाठी किंवा कुठेतरी फिरायला जाण्यासाठी असलेली सोबत नाही. मैत्रीसंबंध हे आपल्या आरोग्यापासून आनंदापर्यंत आणि एकूणच मानसिक-सामाजिक स्वास्थ्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये योगदान देतात. इतरांशी असलेल्या नात्यांमधूनच आपण स्वतःबद्दलही अनेक गोष्टी शिकत असतो.

मैत्री आपण स्वतः निवडतो ही खासियत आहे, त्यामुळे आपल्यापेक्षा वेगळा विचार करणाऱ्या व्यक्तींशी जोडले जाण्याची, नवे अनुभव घेण्याची आणि कठीण किंवा अनोळखी परिस्थितीत एकमेकांना आधार देण्याची संधी या नात्यातून मिळत असते. पण, मित्रा-मित्रांमध्ये काही गोष्टींबाबत मतभेद निर्माण झाले तर तिथे मैत्री चुकीची ठरत नाही.

एकटेपणा आणि समाजापासून तुटल्याची भावना ही आज आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या मानली जात आहे. विशेष म्हणजे, आजूबाजूला अनेक लोक असतानाही एखाद्या व्यक्तीला एकटेपणा जाणवू शकतो, त्यामुळे फक्त आपल्या आयुष्यात किती लोक आहेत, यापेक्षा त्यांच्याशी असलेली नाती किती अर्थपूर्ण आणि आधार देणारी आहेत हेही तितकंच महत्त्वाचं ठरतं.

आजूबाजूला माणसं असणं आणि त्यांच्याशी खऱ्या अर्थाने जोडलेलं वाटणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. यासंदर्भातील प्रौढांच्या एका सर्वेक्षणात आढळून आले की, २१ टक्के प्रौढांना तीव्र एकटेपणा जाणवतो. एकटेपणाचा अनुभव घेणाऱ्यांपैकी ५७ टक्के लोकांना इतरांसमोर स्वतःचं खरं व्यक्तिमत्त्व मांडताच येत नाही.

एकटेपणा हा केवळ व्यक्तीच्या स्वभावाशी किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित प्रश्न नाही. सामाजिक, राजकीय आणि पर्यावरणाशी संबंधित काही परिस्थितीमुळे अर्थपूर्ण नातेसंबंध निर्माण करण्यापासून आणि एखाद्या समूहापासून वंचित राहिल्याची भावना निर्माण होऊ शकते, त्यामुळे आपल्या आजूबाजूला किती लोक आहेत यापेक्षा त्यांच्यापैकी किती जणांसोबत आपण मनमोकळेपणाने राहू शकतो हे अधिक महत्त्वाचं ठरतं.

ज्या मैत्रीत समोरची व्यक्ती आपल्याला समजून घेते, गरजेच्या वेळी आधार देते आणि तिच्यासमोर आपण कोणताही आव न आणता स्वतःसारखे राहू शकतो, अशी मैत्री महत्त्वाची ठरते.

मैत्रीचा करार नेमका काय असतो?

पण, प्रत्येक मैत्रीतून आपल्याला नेमकं काय हवंय हे अनेकांना समजतच नाही. एखाद्याला रोज बोलणारा मित्र जवळचा वाटतो, तर दुसऱ्याला महिन्यातून एखाद्याच वेळी बोलूनही मैत्री तितकीच घट्ट असल्याचे वाटू शकते, त्यामुळे मैत्रीमध्ये अनेकदा एका व्यक्तीच्या चुकीमुळे नव्हे तर दोघांच्या अपेक्षा वेगळ्या असल्याने वाद निर्माण होतात.

प्रेमसंबंधांच्या तुलनेत मैत्रीचे नियम अधिक लवचिक असतात. किती वेळा बोलायचं, मेसेजला किती लवकर रिप्लाय द्यायचा किंवा अडचणीच्या वेळी किती मदत मिळावी याचे काही ठरलेले नियम नसतात. दोन जवळचे मित्र त्यांच्याप्रमाणे वेगळे अर्थ लावतात आणि मैत्रीतून काय अपेक्षा असावी याबद्दलची मतंही वेगळी असतात.

शिवाय, ‘मित्र’ या एका शब्दात अनेक प्रकारची नाती येतात. काही मित्र असे असतात, ज्यांना संकटाच्या वेळी आपण सर्वांत आधी फोन करतो. काहींची ओळख काम, खेळ किंवा एखाद्या छंदामुळे झालेली असते. काही मित्र वर्षातून मोजक्याच वेळा भेटतात, पण तरीही आयुष्यात त्यांचं स्थान महत्त्वाचं असतं; तर काही जण कधीकाळी अगदी जवळचे राहिलेले असतात आणि काळानुसार त्यांच्यासोबतच्या नात्याचं स्वरूप बदलतं.

मैत्रीत वर्तन तपासणं महत्त्वाचं

एखाद्या मित्राकडून चूक झाली किंवा एखादा वाईट प्रसंग आला म्हणजे तो मित्रच वाईट आहे असं लगेच ठरवू नये. ‘टॉक्सिक मैत्री’ ओळखताना आपल्या मित्राकडून एखाद वेळेस घडलेल्या चुकीपेक्षा त्याचं वर्तन कसं आहे, सतत भावनिक दडपण आणणं, तुमच्या भावनांना कमी लेखणं, तुमच्या मर्यादांना कमी लेखणं किंवा प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हालाच दोषी ठरवणं असं वर्तन वारंवार घडत असेल तर ते नात्यासाठी त्रासदायक ठरू शकतं.

माणसं काळानुसार बदलत असतात, त्यामुळे एखादी व्यक्ती पुढेही तशीच वागेल असं आपल्याला ठरवता येत नाही. उदाहरणार्थ, मित्राने एकदा डिनर रद्द केले तर तो एखादा प्रसंग असतो, पण जर तो वारंवार तुमच्या वेळेचा विचार करत नसेल तर ते गंभीर असू शकतं.

मतभेद, नाराजी आणि अपेक्षा न जुळणं हे नातेसंबंधातील भाग असतात. मात्र, एखाद्या वर्तनामुळे सातत्याने त्रास किंवा नुकसान होत असेल तर तो विचार करण्याचा मुद्दा आहे, त्यामुळे मैत्री संपवायची की नाही याचा निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला काही प्रश्न विचारणं महत्त्वाचं आहे. आपल्या मैत्रीत नेमकं काय घडतंय? हा फक्त एक प्रसंग आहे की वारंवार घडणारं वर्तन? आणि या वर्तनाला प्रतिसाद म्हणून मला काय करायला हवं?

मैत्री बिघडली तर सुधरवता येते का?

मैत्रीत कठीण प्रसंग आले म्हणून ती तोडावीच असं नाही. नात्यात काही वेळा एकमेकांच्या गोष्टी खटकतात, पण दोघांनाही ते नातं महत्त्वाचं वाटत असतं. अशा वेळी मैत्रीतील कटूता दूर करणं, मैत्रीतील अपेक्षा आणि तिचं स्वरूप नव्याने ठरवणं आणि गरज पडल्यास त्या मित्र-मैत्रिणीपासून दूर होणं, असे तीन मार्ग समोर असू शकतात.

Big Friendship या पुस्तकात अमिनातू सो आणि ॲन फ्रिडमन यांनी मैत्री कायम, सहज आणि कोणत्याही प्रयत्नांशिवाय टिकली पाहिजे या कल्पनेला आव्हान दिलं आहे. माणसं आणि त्यांची परिस्थिती बदलत असते, त्यामुळे जवळच्या वाटणार्‍या मित्रांचे वर्तनदेखील बदलू शकतं. गैरसमज आणि मतभेद निर्माण होणं स्वाभाविक आहे; पण ते झाल्यानंतर नातं पुन्हा सावरण्याची दोघांची तयारी आहे का याकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरतं.

जेव्हा नात्यात काही बिघडले असेल, तरीही दोघांना मैत्री टिकवायची असेल तर संवादातून नातं सुधारण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी आपण नेमकं कशामुळे दुखावलो हे स्पष्टपणे सांगणं, समोरच्या व्यक्तीची बाजू ऐकणं, गरज असेल तिथे स्वतःची चूक मान्य करणं आणि पुढे कसं जायचं यावर चर्चा करणं महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येक अस्वस्थ करणारा प्रसंग नात्यासाठी हानी पोहोचवेल असे समजू नये; काही वेळा मित्राने दिलेला एक प्रामाणिक सल्ला किंवा टीका ही तुमच्या काळजीपोटीही असू शकते.

मैत्रीत केव्हा बदल करावा?

काही वेळा मैत्रीत काही चुकीचं झालेलं नसतं; फक्त मैत्रीचं स्वरूप बदलतं. समाजशास्त्रज्ञ विल्यम रॉलिन्स यांच्या मते काही मैत्री टिकून राहतात, तर काही वेळा मित्र दूर जातात; तर काही मित्र बोलत नसतानाही ते आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात नेहमी राहतात. त्यामुळे आपल्या आयुष्यात वेळेप्रमाणे मैत्रीतील अपेक्षाही बदलणं महत्त्वाचं ठरू शकतं.

तुमचा जवळचा मित्र आता अधूनमधूनच भेटत असेल, कंपनी बदलल्यानंतर ऑफिसमधल्या मित्रांसोबतचा संवाद कमी झाला तर त्याचा अर्थ मैत्री अपयशी ठरली असा होत नाही. अशा वेळी ‘ही व्यक्ती माझ्या आयुष्यात राहावी की नाही’ एवढाच प्रश्न नसतो, तर ‘या व्यक्तीला माझ्या आयुष्यात आता नेमकं कोणतं स्थान देता येईल’ हा प्रश्न असतो. आपल्या मैत्रीत काय बदलतंय याबद्दल चर्चा करणं यावेळी महत्त्वाचं असतं.

मैत्री कधी संपवावी?

कोणत्याही परिस्थितीत मैत्री टिकवून ठेवणं हे शहाणपणांचं लक्षण नसतं. एखाद्या नात्यात वारंवार दुखावले जात असाल, सतत आपल्या मर्यादांकडे दुर्लक्ष होत असेल किंवा समोरच्या व्यक्तीची स्वतःची चूक स्वीकारण्याची तयारी नसेल, अशा परिस्थितीत मैत्री दुरूस्त करण्याऐवजी त्यापासून दूर होणंच चांगलं असतं. व्यक्तीने नक्कीच बदलत्या परिस्थितीनुसार जुळवून घ्यावं, पण त्यासाठी तिने अमर्याद त्रास सहन करू नये असे तज्ज्ञ सांगतात.

अशा वेळी मैत्री थेट संपवणं किंवा हळूहळू अंतर वाढवणं हे दोन्ही पर्याय असू शकतात. मात्र, नातं संपवण्याचा निर्णय योग्य वाटत असला तरी त्याची सल मनात कायम राहते. काही मैत्री मोठ्या वादानंतर संपतात, तर काही प्रसंगांत मित्र हळूहळू दूर जातात. दोन्ही परिस्थितींमध्ये एकटेपणा, दुःख, पश्चात्ताप तर कधी कधी सुटकेची भावना वाटू शकते.

शेवटी, प्रत्येक कठीण मैत्रीला ‘टॉक्सिक’ म्हणून संपवण्याची किंवा एखाद्यासोबतची मैत्री कठीण परिस्थितीतही टिकवण्याची गरज नाही, असे तज्ज्ञ सांगतात. यामध्ये महत्वाचं काय ठरतं असेल, तर या मैत्रीत नेमकं काय घडतंय, त्यात बदल होऊ शकतात का आणि हे नातं आपल्या आयुष्यात कोणत्या स्वरूपात राहावं याचा प्रामाणिकपणे विचार करणं.