-सागर नरेकर

कल्याण, डोंबिवली आणि त्यापल्याड ज्या चौथ्या मुंबईचा उल्लेख केला जातो, त्या शहरांमध्ये वाहतूक नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. ठाणे, मुंबईसारखी शहरे या शहरांशी जोडण्यासोबतच ही कोंडी फोडण्यासाठी आता एमएमआरडीएच्या माध्यमातून विविध प्रकल्पांना गती देण्याचे काम केले जाते आहे. यात काही नवीन प्रकल्प मंजूर केले जात आहेत. या प्रकल्पांच्या उभारणीनंतर डोंबिवली, कल्याण ते ठाणे हा प्रवास सुखकर आणि वेगवान होणार आहे. तसेच कल्याणपलीकडे टिटवाळा, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांनाही त्याचा फायदा होईल.

onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
pimpri chinchwad, drain cleaning work
पिंपरी: नालेसफाई अद्याप कागदावर!
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा

कल्याण, डोंबिवली आणि चौथी मुंबई महत्त्वाची का?

मुंबई आणि ठाण्यापलीकडे विस्तारणारा भाग म्हणून कल्याण आणि डोंबिवली या शहरांचा विचार केला जातो. या दोन्ही शहरांच्या चारही बाजूंना पुनर्विकास प्रकल्प, नवी गृहसंकुले, व्यावसायिक संकुले मोठ्या प्रमाणावर उभे राहत आहेत. काही वर्षांपूर्वी कल्याण – डोंबिवली शहरातून मुंबई, ठाणे शहरात जाण्याचा विचारही दूर होता. मात्र गेल्या काही वर्षांत रस्त्यांच्या उभारणीमुळे नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. विस्तारण्याची क्षमता असलेले हे शहर आता महत्त्वाचे आहे. सोबतच अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांकडे चौथी मुंबई म्हणून पाहिले जाते. विस्तारण्याची क्षमता, वाहतूक दळणवळणाची साधणे उभारण्यासाठी जागेची उपलब्धता, कमी लोकसंख्या, नवी मुंबई, ठाणे, तळोजा, पुणे, नाशिक या शहरांना जोडण्यासाठीची संधी ही जमेची बाजू या शहरांकडे आहे. त्यामुळे ही शहरे महत्त्वाची आहेत.

या शहरांची कोंडी कशी झाली ?

शहरातील नागरिकरणाचा वेग आणि त्या तुलनेत पुरवण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचा वेग यात गेल्या काही वर्षांत तफावत पाहायला मिळाली. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा या शहरांत नागरीकरण वेगाने झाले. शहरातल्या जुन्या भागांत पायाभूत सुविधा देताना त्याच्या विस्ताराचा योग्य विचार केला गेला नाही. परिणामी कल्याण – डोंबिवलीतील जुन्या वस्त्यांमध्ये दाटी झाली. या शहरांपासून ठाणे, नवी मुंबई ही शहरे जवळ असली तरी मर्यादित पर्याय असल्याने रस्त्यांवर गर्दी वाढली. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात असूनही टिटवाळ्यासारख्या शहराला पालिका मुख्यालयातून पोहोचणे वेळखाऊ ठरू लागले. तशीच परिस्थिती विठ्ठलवाडी-शहाड या शेजारच्या स्थानक परिसरांचीही झाली. अवघ्या काही किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी मोठा वळसा घालावा लागतो. अंबरनाथ, बदलापूर शहरांचीही हीच परिस्थिती आहे. चाकरमान्यांचे हे परिसर महानगरांपासून दूर राहिले. सध्या या शहरांचा रस्ते प्रवास वेळखाऊ, कंटाळवाणा आणि खर्चीक आहे.

कोंडी फोडणारे नवे प्रकल्प कोणते?

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्राची कोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कल्याण रिंग रोड प्रकल्पाकडून मोठ्या आशा आहेत. सांदपपासून सुरू होणारा हा मार्ग माणकोली, मोठागाव, दुर्गाडी, आंबिवली आणि टिटवाळा असा जातो. या मार्गाला आता कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाशी जोडले जाणार आहे. त्यामुळे प्रवासाचा मोठा वेळ वाचणार आहे. या मार्गातील डोंबिवली – माणकोली पुलही महत्त्वाचा आहे. यात आता विठ्ठलवाडी-शहाड स्थानक असा नवा उन्नत मार्ग उभारला जातो आहे. शहाड येथील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे रुंदीकरण केले जाणार आहे. खोणी ते जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हा नवा मार्ग कल्याण-शीळ रस्त्याला पर्यायी म्हणून उभारला जात आहे. खोणी-तळोजा मार्गाची उभारणी केली जाते आहे. मेट्रो-१२ हा प्रकल्प यात नवा पर्याय मिळणार आहे.

विकास प्रकल्पांमुळे वाहतुकीला बळ कसे मिळेल?

कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, शहाड या सर्व भागांसाठी कल्याण रिंग रोड महत्त्वाकांक्षी ठरणार आहे. या मार्गामुळे कल्याण-शीळ रस्त्यापासून ते थेट टिटवाळा आणि राजणोलीमार्गे ठाणे, वसई हा प्रवास अगदी काही मिनिटांत करता येणार आहे. डोंबिवलीतील माणकोली पुलाच्या उभारणीनंतर डोंबिवली-ठाणे प्रवास अवघ्या काही मिनिटांवर येईल. डोंबिवली ते कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग हा वेळखाऊ प्रवास अवघ्या काही मिनिटांत करणे शक्य होणार आहे. रिंग रोड प्रकल्पात आठवा टप्पा समाविष्ट करून टिटवाळ्याला संपणारा हा मार्ग आता अहमदनगर महामार्गापर्यंत जाणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी टाळू या रिंग रोडने प्रवास करता येणार आहे. मेट्रो-१२ मुळे ठाण्यातून सुरू झालेला प्रवास भिवंडीमार्गे कल्याण – डोंबिवली – खोणी आणि तळोजा असा होईल. शहरी भागासह ग्रामीण भागही मेट्रो मार्गाने जोडला जाणार आहे. हा मेट्रो मार्ग अनेक अर्थांनी फायद्याचा ठरणार आहे. सध्या कल्याण पूर्व, विठ्ठलवाडी भागातून शहाड स्थानकात पोहोचणे जिकिरीचे आहे. नव्या उन्नत मार्गामुळे हा प्रवास अवघ्या काही मिनिटांवर येऊन ठेपेल. शहाड येथील पुलाच्या रुंदीकरणामुळे अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी फुटणार आहे. खोणी-तळोजा ते थेट जुना राष्ट्रीय महामार्गामुळे कल्याण-शीळ मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल, अशी अपेक्षा आहे.