Data Free Recharge Plan : केवळ कॉल आणि एसएमएससाठी मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांना रिचार्ज करताना गरज नसतानाही इंटरनेट डेटा असलेला प्लॅन घ्यावा लागतो. त्यामुळे डेटापॅकसाठी अधिक पैसे मोजावे लागत होते. आता मात्र अशा कोट्यवधी मोबाईल वापरकर्त्यांना दिलासा मिळणार आहे. रिचार्ज करताना फक्त कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा असलेला प्लॅन निवडण्याचा पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) ने याबाबत नवे नियम जारी केले आहेत. त्यामुळे इंटरनेट डेटा न वापरणाऱ्या ग्राहकांना अनावश्यक डेटा पॅकचा खर्च आता वाचणार आहे. ट्रायच्या नव्या नियमांनुसार Jio, Airtel आणि Vodafone Idea (Vi) या कंपन्यांना आता केवळ कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा असलेले स्वतंत्र रिचार्ज प्लॅन देणे कायदेशीररित्या बंधनकारक असणार आहे. त्यामुळे इंटरनेट डेटासाठी पैसे देण्याची सक्ती करता येणार नाही.
ट्रायच्या निर्णयामुळे काय बदलणार?
तुम्हाला आतापर्यंत कॉलिंग, एसएमएस आणि इंटरनेट डेटा सर्व एकत्र सुविधा असलेला रिचार्ज प्लॅन घ्यावा लागत होता. मात्र आता फक्त कॉलिंग आणि एसएमएसच्या सुविधेसाठी इंटरनेट डेटा नसलेला प्लॅन तुम्हाला मिळू शकणार आहे. कंपन्यांना हा प्लॅन स्वस्त दरात उपलब्ध करुन देणे बंधनकारक असणार आहे.
अल्प मुदतीचे प्लॅनही उपलब्ध होणार
कंपन्या आता वापरकर्त्यांना दीर्घ मुदतीचे रिचार्ज प्लॅन घेण्यास सक्ती करु शकत नाहीत. ३० दिवस किंवा त्यापेक्षा कमी वैधतेच्या रिचार्ज प्लॅनमध्ये कॉलिंग आणि एसएमएसचा स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. त्यामुळे महिन्याभरासाठी किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना आपल्या गरजेनुसार रिचार्ज प्लॅन खरेदी करता येणार आहे.
२८ दिवसांचा रिचार्ज सायकल बदलणार
दूरसंचार कंपन्यांना (Telecom Companies) आता असा किमान एक व्हॉइस आणि एसएमएस (Voice & SMS) रिचार्ज प्लॅन द्यावा लागणार आहे, जो दर महिन्याला एकाच ठरावीक तारखेला आपोआप ‘रिन्यू’ (नूतनीकरण) होईल. यामुळे केवळ कॉलिंग आणि एसएमएस वापरणाऱ्या ग्राहकांची २८ दिवसांच्या रिचार्ज सायकलच्या कचाट्यातून सुटका होणार आहे. जर एखाद्या महिन्यात ती ठराविक तारीख नसेल (उदा. ३० किंवा ३१ फेब्रुवारी), तर हा प्लॅन त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपोआप रिन्यू केला जाईल.
कोणाला जास्त फायदा होणार?
या महत्वाच्या बदलामुळे ज्येष्ठ नागरिक, ग्रामीण भागातील ग्राहक आणि दोन सिम कार्ड वापरणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. डेटा वापरत नसतानाही महागडा डेटा प्लॅन घेण्याची गरज राहणार नसल्याने त्यांचा मोबाईलवरील अतिरिक्त खर्च कमी होऊ शकतो.
ग्राहकांना दूरसंचार कंपनीच्या मोबाइल अॅप किंवा अधिकृत वेबसाइटवर नवीन व्हॉईस ओन्ली प्लॅन पाहता येणार आहेत तसेच त्यांना आवश्यक असलेले प्लॅन निवडता देखील येणार आहेत.
हा बदल का गरजेचा होता?
याआधी २०२४ मध्येही दूरसंचार कंपन्यांना किमान एक व्हॉइस-ओन्ली प्लॅन देण्याचा नियम करण्यात आला होता. मात्र, कंपन्यांनी असे प्लॅन प्रामुख्याने ८४ दिवस किंवा ३६५ दिवसांच्या दीर्घ मुदतीसाठी उपलब्ध केले. त्यामुळे ग्राहकांना कमी कालावधीसाठी रिचार्ज करायचा असेल, तर स्वस्त डेटा-फ्री पर्याय मिळत नव्हता. विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांसाठी एकाच वेळी ८४ किंवा ३६५ दिवसांचा रिचार्ज करण्यासाठी मोठी रक्कम खर्च करणे शक्य नसायचे. त्यामुळे कॉलिंग-एसएमएस सुरू ठेवण्यासाठी त्यांना डेटा असलेला महागडा प्लॅन घ्यावा लागता होता. यामुळे त्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत होता.
या दीर्घकाळाच्या रिचार्ज प्लॅनमुळे फीचर फोन वापरणाऱ्यांना फटका बसत होता. ज्यांच्याकडे दुसरा एक सिम आहे ते त्या नंबरचा वापर इंटरनेटसाठी न करता बँकेचे अलर्ट, एसएमएस किंवा सरकारी सेवांसाठी येणारे ओटीपी मिळवण्यासाठी करत होते. अशा नंबरसाठी इंटरनेट डेटाचा उपयोग नसतानाही तो सिम सक्रीय ठेवण्यासाठी डेटा प्लॅनवर पैसे खर्च करावे लागत होते.
याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील ग्राहक, ज्येष्ठ नागरिक आणि साधे फीचर फोन वापरणाऱ्या लोकांना बसत होता. डेटा नसलेले स्वतंत्र प्लॅन उपलब्ध नसल्यामुळे या ग्राहकांना अतिरिक्त खर्चाचा भार सहन करावा लागत होता. त्यामुळे मोबाईलद्वारे मिळणाऱ्या मूलभूत डिजिटल सेवा आणि बँकिंगसारख्या गरजेच्या संवादासाठीही त्यांच्यासमोर अडचणी निर्माण होत होत्या.
मात्र आता नव्या नियमामुळे अशा ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. त्यांना त्यांच्या गरजेनुसार केवळ कॉलिंग आणि एमएससाठी रिचार्ज प्लॅन खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. त्यामुळे अशा ग्राहकांसाठी मोबाईल कनेक्शन सुरू ठेवणं अधिक सोपं आणि कमी खर्चाचं ठरणार आहे.
