Analyzing medicated patches reality: कडू गोळ्या, टॅब्लेट आणि इंजेक्शनला फाटा देत थेट त्वचेवर लावले जाणारे ‘ट्रान्सडर्मल पॅचेस’ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पण हे पॅचेस खरोखरच सर्व आजारांवर रामबाण उपाय आहेत की, हा केवळ एक मार्केटिंगचा स्टंट आहे? जाणून घ्या यामागचं वैद्यकीय वास्तव.
हाइप तरी किती करावी माणसाने?
” काय सांगू तुला, मी गेले काही दिवस हे पॅच वापरतेय आणि मला जामच फरक पडलाय…” किमया भलत्याच आनंदाने सांगत होती.
“हे जसे व्हिटॅमिन पॅचेस आहेत, तसे ते वेट लॉस पॅचेस पण उपयोगी ठरतात का ग?”
“पण तुला कसं कळलं की याने फरक पडलाय म्हणून?”
“माझे रेग्युलर सप्लिमेंट्स घेतेच आहे मी ; मला माहितेय देअर आर नो शॉर्ट कट्स” असं म्हणता म्हणता तिने माझी मस्तपैकी मिमिक्री सुद्धा केली.
“चला तू स्वतःच म्हणालीस हे बेस्ट !”
इज इट वर्थ द हाइप ?
“पण एक गोष्ट मला सांग, इज इट वर्थ द हाइप ?”
“अग, असं काय करते, २०२६ मधला सगळ्यात भारी ट्रेंड आहे हा ; आता आहे थोडा कामचलाऊ ; पण -हे करून बघू वाल्यांसाठी उत्तम! एकदम बेस्ट”
“आणि हो ते वापरताना काहीही खाऊ पिऊ शकता म्हणे… नो रिस्ट्रिक्शन्स, नो पथ्यपाणी!”
“कोण म्हणे ?”
“नाही मी आपलं ऐकलं गं, एका इन्स्टा व्हिडिओमध्ये” असं म्हणत किमया स्वतःच हसू लागली…

औषधीपट्ट्यांचा बाजार मोठा
सध्या बाजारात अगदी झोपेपासून ते व्हिटॅमिन्सपर्यंतच्या वेगवेगळ्या शारीरिक-मानसिक आजारांसाठी, स्किनवर चिकटपट्टीसारखे चिकटवले जाणारे ट्रान्स डर्मल पॅचेस खूप धडाक्यात खपताहेत. गंमत म्हणजे, अनेकांना जादुई भासणारे हे पॅचेस अगदी सहज बाजारात अव्हेलेबल असतात. आजच्या लेखात याच ‘हर मर्ज की दवा’ बनत चाललेल्या पॅचेस मागचं विज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ट्रेण्डी पॅचेस
काहीही न करता, कसल्याही टेस्ट करून न घेता नेहमीच्या दगदगीत एक छोटासा स्टिकर मेडिकल स्टोअरमधून विकत घ्यायचा आणि दंडावर, कमरेवर, मनगटावर, पाठीवर किंवा मानेखाली लावायचा. पुढचं काम पॅचेसवर सोडून द्यायचं नि आपण निवांत राहायचं असं साधारण या पॅचेस ऊर्फ चर्मपट्टिकांचं सध्याचं स्वरूप आहे. दिसायला ट्रेण्डी असणारे हे पॅचेस अनेक सेलेब्रिटीसुद्धा सर्रास वापरताना दिसतात. म्हणूनच कदाचित अनेकांना ‘फरक पडल्याचं ऐकिवात येतं.’ पण हे पॅचेस नेमके कोणत्या वैज्ञानिक तत्त्वावर काम करतात? कसा परिणाम साधतात, हे जाणून घेऊया.
टान्सडर्मल टेक्निक म्हणजे काय?
आपली त्वचा अनेक थरांनी तयार झालेली असते. या त्वचेवरचा सर्वात वरचा थर, त्याला म्हणतात, एपिडर्मिस. हे शरीराचे संरक्षक कवच जणू. एपिडर्मिसचे काम विविध जंतू, नित्य वापरात असलेली केमिकल्स आणि सूर्याच्या उष्णतेपासून शरीराला जपणे, त्यांना रोखणे. निसर्गाने बहाल केलेली सिक्युरिटी सिस्टिमच जणू. या सिस्टिमचा आदर राखत त्वचेमार्फत शरीरात उपयुक्त औषध पोहोचवायचे तंत्रज्ञान म्हणजेच, ट्रान्सडर्मल पॅचेस. यात अँटी- इन्फ्लेमेट्री पॅचस निकोटिन पॅच, हार्मोन पॅच अशा औषधीपट्ट्या उलपब्ध असतात. जो तुमचा आजार, ती पट्टी तुम्ही निवडायची आणि स्किनवर चिकटवायची.
औषधपट्टी लावा, आजार पळवा
जगभरात शोध हे सगळीकडेच लागत असतात. पण जपानचे पाणीच वेगळे आहे. तिथे आजवर कोणी कल्पनाही केली नसेल असे एकेक जादूई शोध लागलेत. उगाच नाही, दरवर्षी नोबेल पुरस्कारांची यादी जाहीर होते, त्यात एक तरी जपानी शास्त्रज्ञ असतोच असतो. तर अशा या जपानमध्ये २०१९ साली प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधानुसार शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करण्यासाठी मायक्रोनिडल युक्त पॅचेस तयार करण्यात आले आहेत. या पॅचेसमध्ये बारीक सुया असतात, ज्या त्वचेच्या बाह्य थराला न दुखावता त्वचेच्या चरबीपर्यंत औषध पोहोचवतात. या पॅचेसमुळे चयापचय क्रिया- मेटाबॉलिझम वेगाने काम करतेच, पण सोबतच शरीर उत्तम प्रमाणात ऊर्जा वापरत आहे, असेही सिद्ध झाले आहे.
पॅचेस फायदेशीर… पण
जपानी शास्त्रज्ञांनी असेही सिद्ध केले आहे, की लठ्ठपणा आणि मधुमेह तसेच अनियंत्रित ग्लुकोज असलेल्यांसाठी नियमित गोळ्यांपेक्षा हा पर्याय सोयीस्कर आहे. या पॅचेसची खासियत अशीही सांगितली जातेय की, निरनिराळ्या आजारांमध्ये घेतल्या जाणाऱ्या टॅब्लेट्स किंवा पावडर स्वरूपात घेतले जाणाऱ्या औषधाच्या पेशंटवर होणाऱ्या दुष्परिणामांची शक्यता या पॅचेसमुळे पूर्णपणे नाहीशी झाली. अर्थात, या पॅचेसचे एवढे सगळे फायदे मोजले जात असले तरीही, पॅचेसला मानवी शरीर कसा प्रतिसाद देते, यावर पुरेसे संशोधन अद्याप झालेले नाही. सो, होल्ड युवर हॉर्स… बी केअरफुल… असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.
पॅचेस वापरणाऱ्यांचे झाले काय?
लोकांमध्ये फेमस होत चाललेल्या या पॅचेसच्या परिणामांवर २०२४ आणि २०२५ साली काही शोधनिबंध प्रकाशित केले गेले आहेत. यातल्या एका शोधनिबंधात असे आढळून आले की ३०० लोकांनी वजन कमी करण्यासाठी प्रामुख्याने ग्रीन टी, गार्सिनिया कोम्बोजिया हे दोन पॅचेस वापरले. या ३०० पैकी जवळपास सगळ्यांना ६ आठवड्यांत भूक शमणे, अति खाण्याची हाव कमी होणे, शरीराचा थकवा कमी होणे,
वजन घटणे यासारखे काही लक्षवेधी परिणाम दिसून आले.
पॅचेस वारणाऱ्यांचा केस स्टडी
या केस स्टडीजमध्ये प्रत्यक्ष लोकांचे अनुभव नोंदले असल्याने पॅचेसची विक्री वाढत आहे आणि त्याच्या परिणामांचीही सध्या जोरदार चर्चा होत आहे. असाच आणखी एक शोध निबंध २०२४ साली प्रकाशित केला गेला होता. त्यात जो काही प्रयोग केला गेला, त्यात वयवर्षे ३५ ते ४० दरम्यानच्या ११६ लठ्ठ माणसांवर पॅचेसचा सकारात्मक परिणाम दिसून आला. ज्यात लोकांच्या शरीरातील चरबीचं प्रमाण कमी झाल्याचं आढळून आले. अर्थात, या शोधनिबंधांमध्ये प्रयोगात सहभागी लोक घेत असलेल्या आहारासंबंधांची माहिती अगदीच त्रोटक असल्याने केवळ पॅचेसमुळेच त्यांच्या शरीरातील चरबी कमी झालीये हे म्हणणे थोडे एकांगी आहे, असे तज्ज्ञांचे सांगणे आहे.
केवळ पॅचेस वापरले म्हणून झाले काम ?
ज्यांना आंत्रविकार (Gut issues ) म्हणजेच पोटाचे विकार आहेत, त्यांच्यासाठी मात्र हे पॅचेस सुखावह ठरू शकतात, अशी सध्याची स्थिती आहे. आतड्यातील आम्लांशी कमीतकमी संबंध येऊन पचन सुधारण्याचं काम काही मेडिकल मॅचेस करत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, हे पॅचेस वापरताना हलगर्जीपणा केल्यास त्याचा उपयोग शून्य. म्हणूनच ते स्वच्छ आणि कोणत्याही प्रकारचा रॅश कोणत्याही प्रकारची खाज नसणाऱ्या त्वचेच्या भागावर लावायला हवेत.
पॅचेसची विल्हेवाटही तेवढीच महत्त्वाची
बरे, एवढेच पुरेसे नाही, तर औषधी पॅचेस लक्षपूर्वक वापरणे आणि वापरून झाल्यांनतर ते योग्य पद्धतीने टाकून देणेही तितकाच महत्वाचे ठरते. अनेकदा वापरणाऱ्यांनी नीट न वापरल्याने औषधी पॅचेसवर २५ ते ४० टक्के औषध तसेच राहते ; जे इतरांसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे पॅचेस काढून ते कोणाच्याही संपर्कात येऊ नयेत याची काळजी घेणे गरजेचे असते.
बाबू समझो इशारे…
ज्याचा इफेक्ट होतो, त्याच्या चुकीच्या वापराने साइड इफेक्टही होऊ शकतो, हे त्रिवार सत्य अनेकांना कळत नाही. पॅचेसच्या संदर्भातसुद्धा वरवर निरुपद्रवी वाटणाऱ्या पॅचेसचे दुष्परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे. अनेकजण हे पॅचेस लावून बिनधास्त होतात. आहार नियमन पूर्णपणे वजा करतात किंवा नियमित व्यायामाला सुट्टी देऊन मस्त अवस्थेत राहतात. त्यांना वाटते चेस लावले, आता हातपाय न हलवता वजन कमी होईल. पण प्रत्यक्षात तसे घडत नाही.
त्वचाविकार असलेल्यांनी पॅचेस टाळावेत
वजन कमी करू पाहणाऱ्या पॅचेसमध्ये गार्सिनिया कंबोजिया मधील हायड्रोक्सी सिट्रीक अॅसिड सारखे आकाराने मोठे आणि पाण्यात मिसळू पाहणारे घटक त्वचेच्या आत सहजी जाणं अशक्य मानलं जातं. त्यापेक्षा खाद्य पदार्थातून त्यांचे पचन आणखी व्यवस्थित होऊ शकते. मुळात, ज्यांना त्वचा विकार आहेत त्यांनी हे पॅचेस वापरणे टाळायलाच हवे. अनेकदा काही प्रकारच्या पॅचेसमधील अतिरिक्त कॅफिनच्या प्रमाणामुळे हृदयाचे ठोके वाढणे, रक्तदाब वाढणे असले धोकादायक प्रकार देखील घडतात.
FDA निकृष्ट पॅचेसकडेही लक्ष देणार का?
अर्थात अनेकजण जाणीवपूर्वक प्रयत्न करताना योग्य आहारनियमन, योग्य व्यायाम, झोपण्याच्या वेळेची शिस्त अशी काळजी घेऊन योग्य तो परिणाम देखील मिळवतात. दुसरीकडे हेही लक्षात घेतले पाहिजे की, पॅचेसचे वैज्ञानिक निकष पूर्णपणे वेगळे असतात. प्रत्येक कंपनीला ते पाळावेच लागतात. मात्र भारतात अनेक ठिकाणी जादुई नाव वापरून अत्यंत निकृष्ट दर्जाचे पॅचेस विकले जात आहेत, त्याने ग्राहकांची थेट फसवणूक होते. आपल्याकडे धडाकेबाज झालेले अन्न आणि औषध प्रशासन हळूहळू विविध प्रकारच्या धोकादायक उत्पादनांची दखल घेतंय; त्यात याही उत्पादनाचा समावेश नक्की व्हायला हवा, तसे झाल्यास चुकीचे उत्पादन बाजारात आणून ग्राहकांची फसवणूक होणे बंद होऊ शकेल. सारांश काय, तर मॅजिक पॅच समजल्या जाणाऱ्या एकट्या पॅचेसवर अवलंबून राहू नका. दिमाग की बत्ती हमेशा जला के रख्खो!
