बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक आणि कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वरचा २०२७मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यामुळे कायापालट होऊ लागला आहे. त्यामुळे भूखंड, शेतघर (फार्म हाऊस), सदनिका यांच्यात मोठी गुंतवणूक होऊ लागली आहे. धार्मिक पर्यटनाबरोबर मुसळधार पाऊस कोसळणाऱ्या या भागात भटकंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे.
त्र्यंबकेश्वरचे महत्त्व
त्र्यंबकेश्वर काही विशिष्ट पूजाविधीसाठी देशातील एकमेव स्थळ मानले जाते. दक्षिण भारताची गंगा मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचे हे उगमस्थान आहे. ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावणारी गोदावरी नदी गुप्त होऊन कुशावर्तात येते, अशी आख्यायिका आहे. या ठिकाणी संत निवृत्तीनाथ महाराज यांची समाधी आहे. दर बारा वर्षांनी या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. त्र्यंबक राजाचे दर्शन आणि नारायण नागबळी, कालसर्प शांती, त्रिपिंडी श्राद्ध आणि पितृदोष निवारण असे विविध धार्मिक विधी वर्षभर सुरू असतात.
नगरीचे अर्थचक्र
आकाराने लहान असणाऱ्या या नगरीत भाविकांची कायमच गर्दी असते. गावाची लोकसंख्या जेमतेम २० हजारच्या आसपास. आर्थिक चक्र पूर्णत: धार्मिक पर्यटनावर अवलंबून आहे. त्यामुळेच पूजा विधी, साहित्य, हॉटेल, निवास व्यवस्था अशा काही व्यवसायांची भरभराट झाली. मुसळधार पावसाचा हा तालुका असल्याने काही गुंतवणूकदारांनी बेजे, पहिणेसारख्या निसर्गाच्या सान्निध्यात फार्म हाऊस, रिसॉर्ट उभारली. अनेक ठिकाणी योग केंद्र, निसर्गोपचार केंद्र दृष्टीस पडतात. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर शेकडो हॉटेल, रिसॉर्ट, लॉजिंग अर्थात निवास व्यवस्थेच्या सुविधा निर्माण झाल्या. भाविकांची वाढती संख्या पाहून हक्काची जागा असणारे आखाडे आणि धार्मिक संस्थांनी भाविकांना सुविधा उभारणीवर भर दिल्याचे दिसून येते. शैक्षणिक केंद्र म्हणूनही सभोवतालचा परिसर विकसित होत आहे.
जागेचे दर का वाढतायत?
त्र्यंबकेश्वर हा आदिवासीबहुल तालुका आहे. या ठिकाणी बहुसंख्य म्हणजे जवळपास ७० टक्के जमीन आदिवासी तर, उर्वरित ३० टक्के सर्वसाधारण (जनरल) असल्याचे शासकीय अधिकारी सांगतात. सर्वसाधारण जमीन मुळात कमी असल्याने मागणी अधिक आहे. २०१५-१६ मध्ये त्र्यंबकेश्वरचा विकास आराखडा तयार झाला. गावाची सीमा काहीशी विस्तारली. नाशिकच्या दिशेने पेगलवाडी तर, जव्हार रस्त्यावरील गणपतबारी, मेढघर किल्ल्यापर्यंत बांधकामे होऊ लागली. त्र्यंबकेश्वरमध्ये दोन्ही बाजूंनी डोंगर असल्याने विस्ताराला मर्यादा होत्या. तेथील जमिनी आरक्षित करण्यात आल्या. परिणामी, जागेच्या दरात वाढ झाल्याचे स्थानिक सांगतात. आज त्र्यंबकेश्वरमध्ये एक, दोन गुंठा जागा मिळणेही कठीण. दोन वर्षांपूर्वी १० ते १२ लाख रुपये गुंठ्याने असणारी जागा सध्या २५ ते ३० लाख रुपये गुंठ्यावर गेली आहे. त्र्यंबकेश्वरच्या आसपास काही नवीन भाग विकसित झाले. बहुमजली इमारती, रो हाऊसलाही मागणी आली. आसपासच्या जागा बिनशेती होऊन भूखंडांची विक्री जोमात सुरू आहे. पाच महिन्यात नगरपालिकेकडे १६० गृह प्रकल्पांचे प्रस्ताव आले असून त्यापैकी ५७ प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. कुंभमेळ्यानिमित्त देश-विदेशातील कोट्यवधी भाविक येथे येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, निवास व्यवस्था, हॉटेल अर्थार्जनाचा महत्त्वाचा स्रोत ठरू शकतो, हे लक्षात घेऊन स्थानिकांसह बाहेरील मंडळी गुंतवणूक करीत आहेत. मागील पाच वर्षांत जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात वाढ झाल्याचे दिसून येते.
सिंहस्थानिमित्त कायापालट
पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, राज्य आणि केंद्र सरकारकडून तब्बल ३५ हजार कोटींची विकास कामे करण्यात येणार आहेत. नाशिकप्रमाणे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होईल. नाशिक-त्र्यंबकेश्वर हा सध्या चार पदरी असणारा रस्ता सहा पदरी केला जात आहे. घोटी-त्र्यंबकेश्वर, जव्हार-त्र्यंबकेश्वर या मार्गांचे नूतनीकरण, विस्तारीकरण होत आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये मलनि:स्सारण प्रक्रिया, सांडपाणी व्यवस्थापन, वीज उपकेंद्र उभारणी व प्रणालीचे बळकटीकरण आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. मध्यंतरी त्र्यंबकेश्वरला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला. कुंभमेळ्यासाठी सुमारे १२०० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला. त्याअंतर्गत दर्शन पथ, नवीन रस्त्यांचे बांधकाम, घाटांचे नूतनीकरण, स्वागत कमानी उभारणी, सुशोभीकरण, नदी संवर्धन, घनकचरा प्रकल्प उभारणी, त्र्यंबकेश्वर वाढीव पाणी पुरवठा योजना, वाहनतळ उभारणी आदींचा समावेश आहे. कुंभमेळ्यात गोदावरी प्रवाही राखण्यासाठी खास योजना आखण्यात आली. त्र्यंबकेश्वर शहरातील कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नवीन घनकचरा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हजारो कोटींच्या कामांमुळे त्र्यंबकेश्वर परिसरात गुंतवणुकीचा ओघ अधिकच वाढला आहे.
