‘हश मनी’ खटल्यामध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोषी आढळले. या खटल्यासाठी उपस्थिती सर्व ज्युरींनी त्यांना ३४ विविध आरोपांखाली दोषी ठरवले. आता ११ जुलै रोजी त्यांना शिक्षा सुनावली जाईल. या खटल्याव्यतिरिक्त ट्रम्प यांच्याविरुद्ध आणखी तीन प्रकरणांत फौजदारी खटले सुरू आहेत. या खटल्यांमध्ये मिळून ट्रम्प यांच्या विरोधात आणखी ५१ आरोप ठेवण्यात आले आहेत. पण या खटल्यांची तारीख अद्यापही निश्चित नाही. त्यांचे काय होईल, तसेच ट्रम्प यांना चारही खटल्यांमध्ये तुरुंगवासाच्या शिक्षेची शक्यता किती, याविषयी… 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोपनीय कागदपत्रांचा खटला…

सन २०२०मधील अध्यक्षीय निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर व्हाईट हाऊसमधून फ्लोरिडात स्थानांतरित होताना ट्रम्प यांनी आपल्याबरोबर अनेक गोपनीय कागदपत्रे नेल्याचा आरोप आहे. फ्लोरिडातील मार-ए-लागो येथील निवासस्थानी ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकाराबाहेर ही कागदपत्रे आणून ठेवली. तसेच यासंबंधी न्यायखात्याच्या चौकशीत अडथळे आणले, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. मात्र या प्रकरणी फ्लोरिडातील न्यायाधीशपदी नेमण्यात आलेल्या आयलीन कॅनन यांची नियुक्ती ट्रम्प यांनीच केली आहे. या प्रकरणातील खटल्यास विविध प्रकारे विलंब लावणे सुरू असल्याचे ट्रम्प विरोधकांचे म्हणणे आहे. हा खटलाच दाखल करू नये, अशी याचिका ट्रम्प यांनीही मांडली आहे. तीदेखील प्रलंबित आहे. 

हेही वाचा >>> १८० वर्षांपूर्वी अमेरिका खेळली होती पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना! आता वर्ल्डकपमुळे क्रिकेट तेथे पुन्हा लोकप्रिय होईल?

२०२० निवडणूक हस्तक्षेप खटला…

याच निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेत बाधा आणल्याचा आरोप वॉशिंग्टन डीसीमधील एका न्यायालयात दाखल झाला आहे. आरोप झाला त्या कालावधीत आपण अमेरिकेच्या अध्यक्षपदावर होतो. त्यामुळे आपल्याला कायदेशीर संरक्षण मिळते असा बचाव ट्रम्प आणि त्यांच्या वकिलांनी करून पाहिला. पण तो अमान्य झाला. त्याविरुद्ध ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. ट्रम्प यांचा दावा तेथे मंजूर झाला, तर खटलाच तत्क्षणी निकालात निघेल. पण ट्रम्प यांचा दावा अमान्य झाला, तर खटला सुरू राहील. मात्र हा खटलादेखील केव्हा सुरू होईल याविषयी अनिश्चितता आहे.  

जॉर्जिया निवडणूक बदनामी खटला…

अध्यक्षीय निवडणुकीत जॉर्जिया या रिपब्लिकनबहुल राज्यात जो बायडेन यांच्यासमोर ट्रम्प यांचा धक्कादायक पराभव झाला. यातही फुलटन कौंटी येथे ट्रम्प यांच्या विरोधात मते पडली. त्यावेळी निवडणूक मतमोजणी प्रक्रियेत बाधा आणण्याचा प्रयत्न काही ट्रम्प समर्थकांनी केला. याशिवाय मतमोजणीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांनी जॉर्जियाच्या प्रशासनावर सातत्याने केला. मतमोजणीविषयी आक्षेप असल्यास कायदेशीर मार्ग अनुसरण्याऐवजी बेलगाम आरोप सातत्याने आणि सामूहिकरीत्या करणे हा जॉर्जियात गंभीर गुन्हा मानला जातो. ट्रम्प यांच्यावर या प्रकरणात जवळपास ४१ प्रकारचे आरोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणी फुलटन कौंटीच्या सरकारी वकील फानी विलिस आणि या प्रकरणात नेमले गेलेले विशेष सरकारी वकील नेथन वेड यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा आणि यात विलिस यांचे आर्थिक हितसंबंध गुंतल्याचा आरोप एका सहआरोपीने केला, ज्याला ट्रम्प यांनीही पाठिंबा दिला. फुलटन कौंटी न्यायालयाने हे आरोप फेटाळले, परंतु वेड यांना खटल्यातून बाहेर केले. यात बराच वेळ निघून गेला. याही प्रकरणात ट्रम्प यांनी अध्यक्षीय संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. या खटल्याची सुनावणी नजीकच्या काळात होण्याची शक्यता नाही. 

हेही वाचा >>> आचारसंहितेच्या काळात ध्यानधारणा करुन मोदींनी आचारसंहितेचे उल्लंघन केलंय का?

तुरुंगवासाची शक्यता किती?

तीनपैकी एकही खटला येत्या ५ नोव्हेंबरच्या म्हणजे अध्यक्षीय निवडणुकीआधी सुरू होण्याची वा पूर्ण होण्याची शक्यता नाही. ‘हश मनी’ खटल्याची शिक्षा सुनावणी बाकी आहे. पण त्या प्रकरणात ट्रम्प यांना प्रोबेशनवर पाठवले जाऊ शकते, अटकेची शक्यता फारच कमी आहे. इतर तीन फौजदारी खटले अधिक गंभीर स्वरूपाचे असले, तरी अमेरिकी न्यायव्यवस्थेतील गुंतागुंत आणि वेळ वाया दवडण्यातली ट्रम्प यांची हातोटी यांमुळे ते इतक्यात सुरूच होणार नाहीत. त्यामुळे अध्यक्ष निवडणुकीच्या प्रचारापासून किंवा प्रत्यक्ष निवडणुकीपासून हे खटले ट्रम्प यांना दूर ठेवू शकत नाहीत. 

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trump guilty verdict loksatta analysis how trump guilty verdict will impact the 2024 presidential election print exp zws