अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी रात्री आदेश जारी करून कॅनडा आणि मेक्सिकोतून अमेरिकेत आयात होणाऱ्या मालावर २५ टक्के शुल्क किंवा टॅरिफ लागू केले. टॅरिफची अंमलबजावणी ४ फेब्रुवारीपासून होईल. ट्रम्प यांनी चीनवरही १० टक्के अतिरिक्त आयात शुल्क जारी केले. या तीन देशांनंतर ट्रम्प यांच्या टॅरिफ अस्त्राचे  पुढील लक्ष्य चीन वगळता इतर ब्रिक्स देश असतील असे सांगितले जाते. यात अर्थातच भारताचाही समावेश आहे. ट्रम्प यांचा आदेश काय? अमेरिकी भूमीमध्ये बेकायदा घुसखोरी आणि फेण्टानिल या वेदनाशामक औषधाची तस्करी थांबत नाही तोवर कॅनडा आणि मेक्सिको या देशांतून येणाऱ्या मालावर २५ टक्के टॅरिफ आकारले जाईल. तसेच विद्यमान शुल्काच्या वर अतिरिक्त १० टक्के टॅरिफ चिनी मालावर आकारले जाईल, असे ट्रम्प यांच्या एक्झेक्युटिव्ह ऑर्डरमध्ये म्हटले आहे.
 

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

हे तीन देशच का?

अमेरिकेचा सर्वाधिक व्यापार चीन, मेक्सिको आणि कॅनडा या तीन देशांशी होतो. मेक्सिको आणि कॅनडा या देशांशी अमेरिकेचा नॉर्थ अमेरिकेन फ्री ट्रे़ड अॅग्रीमेंट (नाफ्टा) नावाचा करार अनेक वर्षे होता. अमेरिकेत येणाऱ्या मोटारी, औषधे, बूट, लाकूड, इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद आणि इतर बऱ्याच वस्तू या तीन देशांतून येतात. ट्रम्प यांचा त्यांच्यावर राग असण्याचे नेमके कारण स्पष्ट नाही. पण कॅनडा आणि मेक्सिकोतून अमेरिकेत मोठ्या संख्येने बेकायदा स्थलांतरित येतात. त्यांना धडा शिकवण्यासाठी टॅरिफ हा उत्तम मार्ग आहे असे ट्रम्प प्रशासनाला वाटते. चीनने अनेक क्षेत्रांमध्ये अमेरिकेला टक्कर देण्यास सुरुवात केली आहे. चीनमधूनही अमेरिकेत मोठ्या प्रमाणात फेण्टानिल येते, असा ट्रम्प यांचा आरोप आहे. अमेरिकी उद्योगाला चालना द्यायची असेल तर ज्या देशांकडून सर्वाधिक आयात होते त्या देशांतील आयात मालावर अधिक टॅरिफ आकारले पाहिजे या विचारातून या तीन देशांना ट्रम्प प्रशासनाने लक्ष्य केले.

फेण्टानिल हे काय आहे?

फेण्टानिल हे वेदनाशामक औषध असले, तरी त्यातील अफूच्या प्रमाणामुळे याचा वापर अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ म्हणूनही होतो. हा कृत्रिम पदार्थ असल्यामुळे त्याचा अतिवापर किंवा वैद्यकीय सल्ल्याशिवाय वापर जीवघेणा ठरू शकतो. एका पाहणीनुसार, अमेरिकेत दरवर्षी जवळपास ८३ हजार नागरिक फेण्टानिलच्या अतिसेवनामुळे मृत्युमुखी पडतात. चीन आणि मेक्सिको या दोन देशांना याबद्दल ट्रम्प प्रशासन थेट जबाबदार धरते. चीनमध्ये फेण्टानिलचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. तेथून ते विविध मार्गांनी अवैधरीत्या अमेरिकेत येते. मेक्सिकोमधूनही मोठ्या प्रमाणावर फेण्टानिलची तस्करी होते.

तीन देशांचे चोख प्रत्युत्तर

कॅनडानेही अमेरिकेतून आयात योणाऱ्या मालावर २५ टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेऊन ट्रम्प यांना खणखणीत प्रत्युत्तर दिले. मेक्सिकोही असा निर्णय लवकरच घेत आहे. चीनने या निर्णयाविरोधात जागतिक व्यापार संघटनेत दाद मागायचे ठरवले आहे. याशिवाय चीन अमेरिकेतून आयात होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर शुल्क आकारू शकतो.

लवकरच ब्रिक्स आणि भारतही…

ब्रिक्स देशांनी स्वतंत्र चलन सुरू करून डॉलरला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, तर या देशांवर जबरी आयात शुल्क आकारू अशी धमकी ट्रम्प यांनी मागेच दिली होती. भारत हा टॅरिफ सम्राट असल्याची टीका त्यांनी मध्यंतरी केली होती. पण बदलत्या वाऱ्यांची दखल घेऊन भारताने आतापासूनच अमेरिकी आयात मालावरील शुल्क कपात करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक वस्तूंचा उल्लेख झाला. तसेच हार्ले डेव्हिडसनसारख्या १६०० सीसी खालील इंजिन क्षमता असलेल्या लग्झुरी बाइक्सवरील शुल्कही कमी करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trump imposes tariffs against china canada and mexico next brics and india print exp zws