PM Sanae Takaichi US Visit : जपानच्या पंतप्रधान सनाई तकाईची यांनी शुक्रवारी (२० मार्च) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीत डोनाल्ड ट्रम्प यांनी विनोद करताना ‘पर्ल हार्बर’चा उल्लेख केला. ट्रम्प यांनी पर्ल हार्बरचा उल्लेख करताच जपानच्या पंतप्रधान तकाईची यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले. त्यामुळे ही भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. इराणवर हल्ला करण्याआधी अमेरिकेने त्याच्या मित्रराष्ट्रांना नोटीस का दिली नाही? असा प्रश्न ट्रम्प यांना पत्रकाराने विचारला होता. त्यावर ट्रम्प म्हणाले, “आम्हाला सरप्राइज द्यायचे होते. सरप्राइजबद्दल जपानपेक्षा जास्त कोणाला माहिती असेल, ओके? तुम्ही मला पर्ल हार्बरबद्दल का सांगत नाहीत. ठिके?” अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली. त्यावर तिथे उपस्थितांमध्ये हशा पिकला पण अस्वस्थताही पसरली. ‘द न्यूयार्क टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, त्यानंतर जपानच्या पंतप्रधान तकाईची यांनी डोळे मोठे करून प्रश्न विचारणाऱ्या जपानी पत्रकाराकडे पाहिले. त्या काही बोलल्या नाहीत. त्या हातावर हात ठेवून शांत बसल्या होत्या.
७ डिसेंबर १९४१ रोजी पर्ल हार्बरवर झालेला हल्ला हा दुसऱ्या महायुद्धातील महत्वाच्या घडामोडींपैकी एक होता. या हल्ल्यानंतर अमेरिका दुसऱ्या महायुद्धात ओढली गेली. पर्ल हार्बरवरील हल्ल्याचे पर्यवसान शेवटी जपानच्या हिरोशिमा व नागासाकीवर या दोन शहरांवर अमेरिकेचे अणुबॉम्ब पडण्यात झाले. पर्ल हार्बरवरील हल्ला ही घटना नेमकं काय होती? ते जाणून घेऊया.
पर्ल हार्बर येथे काय झाले होते ?
२६ नोव्हेंबर १९४१ रोजी जपानच्या इम्पेरियल नेव्हीने युद्धासाठी सज्ज असलेल्या युद्धनौकांच्या समूहाला एक आदेश दिला. त्यानुसार ४१४ लढाऊ विमाने व इतर विमानांना घेऊन सहा विमानवाहू युद्धनौका इतर युद्धनौकांसह मार्गस्थ झाल्या होत्या. या युद्धनौकांनी जपानच्या ‘हितोकप्पू बे’ येथून प्रवास सुरू केला. ५६०० किमीचे अंतर त्यांनी शांततेत कापले. त्या युद्धनौका अमेरिकेच्या ‘हवाई आयलंड ऑफ ओआहू’च्या दिशेने जात होत्या.
७ डिसेंबर १९४१ रोजी सकाळी सात वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास इम्पेरियल जपानीज नेव्हीच्या १८० लढाऊ विमानांनी अमेरिकेच्या ‘पर्ल हार्बर’ या नौदल तळावर बॉम्बवर्षाव केला. हा बॉम्बवर्षाव जवळपास दोन तास सुरू होता. जपानने अचानक केलेल्या हल्ल्यात अमेरिकेचे २३०० सैनिक मारले गेले. तसेच यूएसएस एरिझोना, यूएसएस ओकलाहोमा या युद्धनौका उद्ध्वस्त झाल्या. अमेरिकेची पर्ल हार्बरवरील १६० विमाने उद्ध्वस्त झाली तर १५० विमानांचे हल्ल्यात नुकसान झाले.
पर्ल हार्बरवरील अमेरिकन नेव्ही अधिकाऱ्याने रेडिओवरून यूएस नेव्ही कमांडला संदेश दिला. “पर्ल हार्बरवर हवेतून हल्ला झाला आहे. ही ड्रील नाही.” (एअर रेड ऑन पर्ल हार्बर X धीस इज नॉट ड्रील” असा संदेश त्या अधिकाऱ्याने दिला होता.
जपानने पर्ल हार्बरवर हल्ला का केला?
जपानने पर्ल हार्बरवर हल्ला करण्याआधीच अमेरिका व जपानमधील संबंध बिघडत चालले होते. १९१० मध्ये जपानने कोरियाला जपानमध्ये सामील करून घेतले. त्यानंतर १९३७ मध्ये चीनवर आक्रमण केले. जपानचे विस्तारवादी धोरण पाहून अमेरिका व पाश्चिमात्य देश अलर्ट झाले होते. डिसेंबर १९३७ ते जानेवारी १९३८ या दरम्यान जपानी सैनिकांनी सगळ्याच सीमा पार केल्या होत्या. या कालावधीत ‘नानकिंग मसाकर’ (Nanking Massacre) किंवा ‘रेप ऑफ नानकिंग’ म्हणून ओळखली जाणारी एक भयंकर घटना घडली होती. जपानी सैनिकांनी चीनी नागरिकांची हत्या केली, तसेच चिनी महिलांवर बलात्कार केले होते.
२० हजार चिनी महिलांवर जपानी सैनिकांकडून बलात्कार
जपानमधील इतिहासकारांच्या मते, दोन लाखांहून अधिक चिनी नागरिक मारले गेले होते. ‘इंटरनॅशनल मिलिटरी ट्रिब्यूनल’मध्ये असलेल्या नोंदीनुसार, त्यावेळी २ दोन लाख चिनी नागरिक मारले गेले व वीस हजार चिनी महिलांवर जपानी सैनिकांनी बलात्कार केला, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, यात किती मृतदेहांना जाळण्यात व यांगत्से नदीत फेकले त्याची नोंद नाही. ‘नानजिंग वॉर क्रिमिनल्स ट्रिब्यूनल’च्या मते, “किमान तीन लाख चिनी नागरिकांची हत्या करण्यात आली.”
अमेरिकेचा जपानच्या विस्तारवादी धोरणाला विरोध
जपानने चीनवर आक्रमण केल्यानंतर अमेरिकेने जपानचा कडाडून विरोध केला. जपानवर आर्थिक निर्बंध लादले. जपानला तेल आयात करावे लागत होते. तेलाची आयात सहजपणे करता यावी म्हणून जपानने चीनचा काही भाग ताब्यात घेतला होता. तसेच त्यानंतर फ्रेंच इंडो-चीनला जपानने ताब्यात घेतले. चीनमधील महत्वाच्या बंदरांचा ताबा घ्यावा, त्यामुळे लोखंड, रबर, टीन, तेल यांची सहजपणे आयात करता येईल असा जपानचा उद्देश होता.
तेलाने पडली अमेरिका-जपानमध्ये ठिणगी
जुलै १९४१ मध्ये, अमेरिकेने जपानला तेल देणे बंद केले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली. ‘हल नोट’ बनवण्यात आली. चीनमधून जपानने बिनशर्त बाहेर पडावे, असे अमेरिकेने आवाहन केले होते. परंतु, कोणताही तोडगा निघाला नाही. युकेच्या ‘इम्पेरियल वॉर म्युझियम’मधील दस्तावेजानुसार, “जपानने ९४ टक्के तेलाचा पुरवठा गमावला होता. अमेरिकेच्या मागण्या जपानला मान्य नव्हत्या. हवे असलेले तेल लष्करी कारवाई करून मिळवण्याचा मार्ग जपानने पत्करला होता. पर्ल हार्बरवरील अमेरिकेच्या सैन्य तळावर हल्ला करून अमेरिकेला शांतता मार्ग स्वीकारायला लावावा, असे जपानला वाटत होते. त्यामुळे जपानने पर्ल हार्बरवर अचानक हल्ला केला.”
अणुबॉम्ब हल्ल्यानंतर दुसऱ्या महायुद्धाचा शेवट
अमेरिकेला गुडघ्यावर आणण्यासाठी हल्ला फायदेशीर ठरेल असा जपानचा समज होता. एकदा का यूएस पॅसिफिक फ्लिट उद्ध्वस्त केला की आग्नेय आशियात आपलीच सत्ता राहिल, असे जपानला वाटत होते. परंतु, अमेरिकेने जपानच्या हल्ल्यानंतर मोठा प्रतिकार केला होता. जपानला अमेरिकेने एकटे पाडले. त्याच्यावर अनेक निर्बंध लादले. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या टप्प्यात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकले. हिरोशिमात १ लाख ४० हजार तर नागासाकी ७० हजार नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. या हल्ल्यानंतर दुसरे महायुद्ध थांबले. जपानने शरणागती पत्करली.
