आपल्या घरात पाहुणे येणार असतील, हॉटेलमध्ये जेवायला गेलो किंवा लग्न समारंभ असेल तर- मेन्यूमध्ये जेवणाचे कितीही विविध प्रकार (Cuisine) असले, तरी अनेकांची पहिली पसंती असते ती- पनीरला! पनीर टिक्का मसाला, पनीर कढई, मलई पनीर – अशा एकाच पनीरपासूनचे असे असंख्य पदार्थ तयार केलेले असतात. पनीर म्हणजे शाकाहारी माणसासाठी प्रथिनांचा मोठा स्रोत आणि सुदृढ आरोग्याची खात्री. पण आता ही खात्रीच डळमळीत झाली आहे. तुमच्या ताटातलं पनीर खरंखुरं दुधापासून तयार झालं आहे का? महाराष्ट्रात हा प्रश्न इतका गंभीर झाला की अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जुलै-ऑगस्टदरम्यान अधिसूचना काढून अॅनालॉग पनीरवर एक वर्षाची राज्यव्यापी बंदी घातली. मुंढे यांच्या म्हणण्यानुसार प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नियमभंग आढळला. अॅनालॉग पनीरमध्ये दुधाच्या प्रथिनांऐवजी वनस्पती तेल वापरलं जातं, त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होते आणि आरोग्याला धोका पोहोचतो. आधी हॉटेल्सना फक्त मेनूवर उल्लेख करावा लागत होता, पण तो पुरेसा ठरला नाही. आता ते वापरण्यावर आणि वाढण्यावरसुद्धा बंद आहे. नियम मोडल्यास सहा महिन्यांपर्यंत कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
अॅनालॉग पनीर म्हणजे काय?
FSSAI च्या व्याख्येनुसार अॅनालॉग उत्पादन म्हणजे असे उत्पादन, ज्यात दुधाचे घटक पूर्णतः किंवा अंशतः बिनदुधाच्या घटकांनी तयार झालेले असतात. तरीही हे पनीर दिसायला आणि वापरायला तंतोतंत आपल्या नेहमीच्या दुधापासून तयार झालेल्या पनीर सारखंच असतं. दुधातली मलई काढून तिच्या जागी स्वस्त वनस्पती तेल मिसळलं जातं आणि नैसर्गिक प्रथिनांऐवजी स्टार्च, मिल्क पावडर किंवा इमल्सिफायर्सचा वापर केला जातो. या सगळ्या कच्च्या पदार्थांनी तयार झालेलं हे पनीर हुबेहूब नेहमीच्या पनीरसारखं दिसत असल्याने ग्राहकांना फसवून विकलं जात असतं , असं FDI अलीकडे घातलेल्या धाडीमध्ये लक्षात आलं, त्यावर आता त्यांनी बंदी घातली आहे.
असे बोगस पदार्थ विकणं कायदेशीर आहे?
एक महत्त्वाची बाब इथे आपण लक्षात घ्यायला हवी – योग्य लेबल लावून अॅनालॉग पदार्थ विकणं कायदेशीर मानलं जातं. मात्र, ही समस्या फसवणुकीची आहे!
खऱ्या पनीरपेक्षा अॅनालॉग पनीर वेगळं कसं?
खरं पनीर तयार करण्याची पद्धत अगदी सोपी असली तरी चांगलं पनीर तयार करताना संयम लागतो. दूध एका विशिष्ट तापमानापर्यंत तापवणं, त्यात विशिष्ट प्रमाणात लिंबाचा रस घालणं ( रस जास्त झाल्यास पनीरला विचित्र चव येते), दूध फाटलं (म्हणजेच पाणी आणि पनीर वेगळं झालं) की ते गाळून घ्यायचं आणि स्वच्छ सुती कापडात बांधून त्यावर खलबत्त्यासारखी वजनदार वस्तू ठेवून त्यातले उरलेले पाणी पूर्णपणे निथळून काढायचे. या पारंपरिक पद्धतीमुळे दुधातील प्रथिनं (केसीन), नैसर्गिक मलई, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे टिकून राहतात.
अॅनालॉग पनीर मात्र कारखान्यात तयार होतं. त्यात दुधाची मलई नसते, तिच्या जागी वनस्पती तेल वापरलं जातं. प्रथिनांच्या जागी स्टार्च वापरलं जातं, त्यामुळे पनीरचं वजन वाढतं आणि घट्टपणा टिकून राहतो. खऱ्या पनीरला ताज्या दुधाचा मंद सुगंध असतो आणि त्याचा पोत (Texture) मुलायम असतं. याउलट, अॅनालॉग पनीरला वनस्पती तेलाचा उग्र वास येतो आणि त्याचा पोत रबरासारखा चिवट असतो. हे अॅनालॉग पनीर तुम्ही तेलात तळलं तर ते विरघळतं किंवा गरम तव्यावर ठेवलं तर तेल सोडतं.
याला ‘अॅनालॉग’ का म्हणतात?
‘अॅनालॉग’ हा शब्द ग्रीक-लॅटिन मूळ असलेल्या ‘analogos’ शी जोडलेला आहे, ज्याचा अर्थ ‘सारखं असलेलं’ किंवा ‘समांतर’ असा आहे. म्हणजे असा पदार्थ जो मूळ पदार्थाची नक्कल करतो, पण खरा नसतो. याच अर्थाने दुग्ध क्षेत्रात दुधाच्या पदार्थांची नक्कल करणाऱ्या उत्पादनांना ‘अॅनालॉग’ म्हटलं जातं.
आता तुम्हीच विचार करा. ‘सारखं दिसणारं’ असा अर्थ असलेला शब्द ग्राहकाला कळतो का? बहुतेक लोकांना ‘अॅनालॉग’ या शब्दाचा अर्थच माहीत नसतो. त्यामुळे पॅकेटवर तो शब्द छोट्या अक्षरात लिहिला तरी सामान्य माणूस ते वाचतही नाही आणि त्याला त्याचा अर्थ समजतही नाही. हीच पळवाट आजवर वापरली गेली. अशा नावाच्या आड फसवणूक लपवणं हीच या प्रकरणातली मोठी चिंता आहे.
हे आरोग्यासाठी किती धोकादायक?
योग्य लेबल असलेलं अॅनालॉग पनीर हे विष नाही. मात्र ते खऱ्या पनीरला पर्याय ठरू शकत नाही. या बोगस पदार्थाचे शरीरावर काय परिणाम होऊ शकतात, ते पाहूया :
- ट्रान्स फॅटचा धोका : दुधाची मलई सभोवतालच्या तापमानामुळे घट्ट राहते. तिची नक्कल करण्यासाठी उत्पादक हायड्रोजनेटेड वनस्पती तेलाचा वापर करतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणात ट्रान्स फॅट तयार होतात. ट्रान्स फॅटमुळे कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. भारतात आधीच हृदयविकार आणि मधुमेहाचं प्रमाण चिंताजनक आहे आणि त्यात अशा पदार्थांची भर पडणं धोक्याचं ठरतं.
- पोषणासंदर्भात फसवणूक : अॅनालॉग पनीरमध्ये प्रथिनांचं प्रमाण कमी असतं आणि वनस्पती तेल जास्त प्रमाणात वापरलं जातं. त्यामुळे शरीराला जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळत नाहीत. शाकाहारी लोक, लहान मुलं आणि जिम करणारे तरुण प्रथिनांसाठी पनीर खातात. त्यांनी पनीरचे पैसे दिले, पण प्रथिने मिळालीच नाहीत, तर हे थेट शरीराला नुकसान पोहोचवतं.
- पचनसंस्थेला त्रास : अॅनालॉग पनीरमुळे पोट फुगणं, पित्ताचा त्रास होणं, सतत मळमळणं आणि जुलाब होणं असे त्रास होऊ शकतात. लठ्ठपणा आणि जीवनशैलीशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.
- भेसळीची भीती : अॅनालॉग आणि भेसळयुक्त पनीर हे जरी वेगवेगळे प्रकार असले, तरी दोन्हींत पदार्थांचं नियंत्रण कमकुवत असेल तर धोका वाढतो. ‘एओएल’च्या वृत्तान्तप्रमाणे, गुजरातमध्ये कारखान्यांवर छापे टाकून हॉटेल्सना पुरवलं जाणारं भेसळयुक्त पनीर पकडलं गेलं. झोमॅटोच्या हायपरप्युअर सेवेवर ‘टिक्का आणि ग्रेव्ही पनीरसाठी योग्य’ अशा वर्णनासह अॅनालॉग पनीर विकलं जात असल्याचं एका X वापरकर्त्याने दाखवून दिल्यावर मोठा वाद उठला.
आपल्या ताटात काय वाढलं आहे?
सर्वात गंभीर प्रश्न हा आहे की, बाहेर कुठेही जेवताना आपल्या ताटात कुठल्या प्रकारचं पनीर वाढलं आहे, हे आपण कसं ओळखणार? उत्पादकांना अॅनालॉग पनीरला ‘नॉन-डेअरी’ म्हणून लेबल लावणं बंधनकारक आहे, मात्र रेस्टॉरंट्सवर असं कोणतंही बंधन नव्हतं. म्हणजे कारखान्यातून येताना लेबल असतं, पण ताटात येईपर्यंत ते गायब होतं. नव्या मसुद्यातून हीच पळवाट बंद करण्याचा प्रयत्न आहे. मात्र नियम फक्त कागदावर असून उपयोग नाही. त्यांची कठोर अंमलबजावणी, नियमित तपासणी आणि दोषींवर खरी कारवाई झाल्याशिवाय काहीही बदलणार नाही.
आपण कोणती काळजी घ्यायला हवी?
घरच्या घरी चांगल्या पनीरची खात्री करून घेण्यासाठी पुढील उपाय करू शकता :
- पनीर विकत घेताना त्यातील घटकांची यादी वाचा. दुधाच्या मलईऐवजी वनस्पती तेल आणि स्टार्च लिहिलं असेल तर सावध व्हा.
- पनीर गरम पाण्यात टाकून पाहा. ते जर विरघळलं किंवा त्यातून तेल सुटत असेल तर ते खरं पनीर नाही.
- स्टार्च तपासण्यासाठी आयोडीन चाचणी करता येते. निळसर-काळा रंग आला तर स्टार्च असण्याची शक्यता दाट आहे.
दुधावर आधारित उत्पादन म्हणून पैसे मोजायचे आणि प्रत्यक्षात तेल-स्टार्चचा गोळा खायचा, हा ग्राहकाचा अपमान आहे. FSSAI चा प्रस्ताव योग्य दिशेने टाकलेलं पाऊल आहे, पण तो प्रत्यक्षात उतरेल का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. तोपर्यंत जागरूक राहणं, लेबल वाचणं आणि प्रश्न विचारणं हे करणं गरजेचं आहे. कारण ताटात काय आहे हे जाणून घेण्याचा हक्क प्रत्येक ग्राहकाचा असतो.
