वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) आपल्या कारवाईचा मोर्चा थेट बॉलिवूड अभिनेत्यांकडे वळवला आहे. ‘विमल इलायची’ या उत्पादनाची जाहिरात केल्याप्रकरणी त्यांनी अभिनेता अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या तिन्ही अभिनेत्यांकडून राज्यात प्रतिबंधित असलेल्या पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांची ‘सरोगेट जाहिरात’ केली जात असल्याचा संशय एफडीएला आहे. या नोटिसीला १५ दिवसांच्या आत उत्तर देण्याचे आणि आपापल्या समाजमाध्यमांवरून संबंधित जाहिरात सामग्री हटवण्याचे निर्देश अभिनेत्यांना देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सरोगेट जाहिरात म्हणजे नेमके काय? त्याद्वारे अजय, शाहरुख आणि टायगर यांच्यावर काय कारवाई होऊ शकते? अक्षय कुमारने या वादातून स्वत:ला कसे दूर केले? त्याविषयीचा हा आढावा…

‘सरोगेट जाहिरात’ म्हणजे नेमके काय?

दी इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सरोगेट जाहिरात हा मार्केटिंगचा असा एक प्रकार आहे, ज्यामध्ये सरकारी नियमांनुसार थेट जाहिरात करण्यास निर्बंध असलेल्या उत्पादनांची अप्रत्यक्षपणे प्रसिद्धी केली जाते. या पद्धतीमध्ये बंदी असलेल्या मूळ उत्पादनाचा ब्रँड, नाव, लोगो आणि दृश्यशैली वापरून दुसऱ्या एखाद्या वैध उत्पादनाचा प्रचार केला जातो. ग्राहकांच्या मनात संबंधित मूळ ब्रँडची ओळख कायम राहावी हा त्यामागचा उद्देश असू शकतो. सध्याच्या नियमांनुसार, दारू, तंबाखूजन्य पदार्थ आणि पान मसाला यांसारख्या उत्पादनांच्या थेट जाहिरातींवर विविध कायद्यांद्वारे निर्बंध आहेत. त्यामुळे काही कंपन्या त्याच ब्रँडचे नाव, लोगो किंवा जाहिरातीची दृश्यशैली वापरून अन्य उत्पादनांच्या प्रचार करत असल्याचे दिसून येत आहे.

‘विमल’ प्रकरणात नेमका आक्षेप काय?

‘विमल’ हा ब्रँड प्रामुख्याने पान मसाल्यासाठी ओळखला जातो. महाराष्ट्रात गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी आहे. त्यामुळे ‘विमल इलायची’च्या नावाखाली जाहिरात करून प्रत्यक्षात ग्राहकांचे लक्ष बंदी असलेल्या मूळ उत्पादनाकडे वेधले जात असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीत विमल इलायचीच्या जाहिरातीतील त्यांच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. एफडीएच्या मूल्यांकनानुसार, या जाहिरातीमुळे ‘विमल पान मसाला’ ब्रँडशी ग्राहकांचा थेटपणे संबंध जोडला जात आहे. राज्यात सध्या या उत्पादनावर बंदी असल्याने जाहिरातीच्या माध्यमातून त्याचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचे आढळल्यास ही बाब कायद्याच्या कक्षेत येत आहे. यादरम्यान तंबाखू किंवा निकोटीनयुक्त गुटखा आणि पान मसाल्यावर कठोर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाने थेट सरोगेट जाहिरातींची सखोल तपासणी करण्याची ही पहिलीच मोठी घटना आहे.

याबाबत कायदा नेमका काय सांगतो?

शाहरुख, अजय आणि टायगर यांना पाठवण्यात आलेल्या नोटिशीत त्यांची जाहिरातीबाबतची भूमिका स्पष्ट करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच संबंधित जाहिरातीमुळे प्रतिबंधित ‘विमल पान मसाला’ ब्रँडशी संबंध निर्माण होत असल्याच्या आक्षेपावर त्यांना आपापली बाजू मांडण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात तिन्ही अभिनेत्यांना जाहिरातीतील आपली भूमिका, सहभाग आणि त्यामागील परिस्थिती स्पष्ट करावी लागणार आहे. त्यांच्या लेखी उत्तरानंतर अन्न व औषध प्रशासन विभाग कायदेशीर किंवा नियामक कारवाईबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. अभिनेत्यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये अन्न मानके आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींशी संबंधित कायदेशीर तरतुदींचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ अंतर्गत खाद्यपदार्थांच्या विक्री, पुरवठा किंवा सेवनाला प्रोत्साहन देताना अयोग्य व्यापार पद्धतींचा वापर करण्यास, तसेच उत्पादनाचा दर्जा किंवा घटकांबाबत खोटी व दिशाभूल करणारी माहिती देण्यास सक्त मनाई आहे. या कायद्यातील नियम हे खाद्यपदार्थांच्या संदर्भातील जाहिरातींमधील जबाबदारी निश्चित करतात. त्यातील कोणताही दावा स्पष्ट, सत्य आणि दिशाभूल न करणारा असावा, असा नियम आहे. याचे उल्लंघन झाल्यास जाहिरात मोहीम तत्काळ थांबवण्याचे किंवा चूक सुधारणारी नवी जाहिरात जारी करण्याचे आदेश देण्याचे अधिकार प्रशासनाला आहेत.

अभिनेत्यांवर काय कारवाई होऊ शकते?

तुकाराम मुंढे यांनी बजावलेल्या नोटिशीनंतर तिन्ही अभिनेत्यांना आर्थिक दंड आणि जाहिरात बंदी यांसारख्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते. दिशाभूल करणाऱ्या किंवा बेकायदेशीर सरोगेट जाहिरातींचा भाग असणाऱ्या ब्रँड अँम्बेसेडरवर सध्याच्या नियमांनुसार १० लाख रुपयांपर्यंतचा वैयक्तिक दंड होऊ शकतो. त्याशिवाय ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम २१ नुसार, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला संबंधित अभिनेत्यांना ठरावीक कालावधीसाठी कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा अधिकार आहे. ग्राहकांची झालेली दिशाभूल दूर करण्यासाठी अभिनेत्यांना स्वखर्चाने जाहीर सुधारणापर जाहिरात देण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. यादरम्यान हे प्रकरण केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिलेले नाही. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण यांच्याकडे ही प्रकरणे वर्ग केली आहेत. महाराष्ट्रात गुटखा माफियांवर मोक्का अंतर्गत सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.

अक्षय कुमारने वाद कसा हाताळला होता?

‘विमल’ जाहिरातीवरून २०२२ मध्ये मोठा वाद निर्माण झाल्यानंतर अभिनेता अक्षय कुमारने इतर कलाकारांपेक्षा वेगळी भूमिका घेतली होती. त्याच्यावर झालेल्या तीव्र टीकेनंतर त्याने सार्वजनिक माफी मागत या जाहिरातीतील ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून माघार घेण्याची घोषणा केली होती. जाहिरातीसाठी मिळालेले कोट्यवधी रुपयांचे मानधन योग्य कारणासाठी दान करण्याचे आश्वासनही त्याने दिले होते. मात्र, आधीच झालेल्या करारामुळे पूर्वी चित्रित करण्यात आलेल्या काही जाहिराती ठरावीक कालावधीपर्यंत प्रसारित होऊ शकतात, असेही अक्षयने स्पष्ट केले होते. यादर्यान जुन्या जाहिराती पुन्हा समोर आल्यानंतरही अक्षय कुमारने आपण ब्रँडशी आता संबंधित नसल्याचे स्पष्ट केले आहे.पूर्वीच्या कायदेशीर कराराच्या अटी पूर्ण होत असल्यामुळेच जुनी जाहिरात प्रसारित होत असल्याचे त्याने सांगितले आहे. दुसरीकडे- विमल इलायची जाहिरात प्रकरणात शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कायदेशीर नोटिशीला उत्तर देणे बंधनकारक आहे. त्यामुळे या अभिनेत्यांवर पुढील कारवाई काय होणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून आहे.