Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांनी बड्या राजकीय नेत्यांना मागे टाकत सोशल मीडियावरील लोकप्रियतेत आघाडी घेतली आहे. त्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे त्यांना लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्याचेच प्रतिबिंब आता सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे. मुंढेंनी फॉलोअर्सच्या संख्येत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मागे टाकलं आहे.

ऑगस्ट २०२६ मध्ये समोर आलेल्या आकडेवारीनुसार, मुंढेंनी इन्स्टाग्रामवर आघाडी घेतली आहे. त्यांचे सुमारे ३४.१५ लाख फॉलोअर्स आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुमारे २९.०२ लाख, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुमारे १३.०१ लाख फॉलोअर्स आहेत. पण, केवळ फॉलोअर्सची संख्या पाहिली तरी गोष्ट लक्षवेधी आहे; त्याहून महत्त्वाचं म्हणजे मुंढेंच्या पोस्टवर लोकांचा प्रतिसादही मोठा आहे. त्यांचा एंगेजमेंट रेट २०.३५% इतका आहे, तर फडणवीस यांचा ०.५०% आणि शिंदे यांचा ०.२४% आहे.

मुंढेंची इन्स्टाग्रामवरची कामगिरी

तुकाराम मुंढे फारशा पोस्ट करत नसतानाही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटला मोठा प्रतिसाद मिळतोय. गेल्या ६० दिवसांत त्यांनी केवळ १३ पोस्ट केल्या. फडणवीस यांनी ९७ आणि शिंदे यांनी २५ पोस्ट केल्या होत्या. म्हणजेच मुंढेंच्या पोस्टचा एंगेजमेंट रेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. कमी पोस्ट्स असूनही मुंढेंच्या पोस्टकडे लोकांचं लक्ष अधिक वेधलं जात आहे.

मुंढेंची लोकप्रियता केवळ राजकीय नेत्यांशी तुलना करण्यापुरती थांबत नाही. पुणे मिररच्या अहवालानुसार, प्रशासकीय अधिकारी समीर वानखेडे आणि पोलीस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांच्याशी तुलना केली तरी मुंढे डिजिटल लोकप्रियतेच्या बाबतीत पुढे आहेत.

अन्नसुरक्षेची कठोर अंमलबजावणी आणि बेधडक कार्यशैली यामुळे मुंढे गेल्या काही काळापासून चर्चेचा विषय ठरले आहेत. मुंढेंच्या कारवायांचे व्हिडीओ आणि रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. विशेषतः अन्नसुरक्षेच्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी तात्काळ कारवाई करणे, यातून सोशल मीडियावर त्यांची ‘कठोर प्रशासकीय अधिकारी’ म्हणून प्रतिमा तयार झाली आहे. त्यांच्या कामाला समर्थन देण्यासाठी सामान्य नागरिक त्यांचे व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करत आहेत.

तुकाराम मुंढे एवढे लोकप्रिय का?

तुकाराम हरीभाऊ मुंढे हे २००५ च्या महाराष्ट्र कॅडरमधील आएएस अधिकारी आहेत. मे २०२६ पासून ते महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. कडक शिस्त, नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि कोणत्याही दबावाला न जुमानता निर्णय घेणारा अधिकारी अशी त्यांनी स्वत:ची प्रतिमा जनमानसात ठसवली आहे, त्यामुळे इतर सरकारी अधिकाऱ्यांच्या तुलनेत त्यांना मिळणारा सार्वजनिक प्रतिसादही वेगळा आहे.

मुंढेंच्या लोकप्रियतेमागे त्यांच्या कामाची शैली महत्त्वाची ठरते. ते नियमांकडे केवळ कागदावरचे आदेश म्हणून न पाहता, त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यावर भर देतात. एफडीएच्या आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी अन्न भेसळ आणि स्वयंपाकघरातील अस्वच्छतेविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली. त्यांच्या नेतृत्वाखाली ३ हजारांहून अधिक छापे टाकण्यात आले असून, काही देशांतर्गत आस्थापनांवर आणि आंतरराष्ट्रीय फास्ट-फूड ब्रँडच्या दुकानांवर तात्पुरती बंदी किंवा परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.

एफडीएच्या या कारवायांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अचानक रेस्टॉरंटच्या किचनमध्ये पोहोचून अन्न कसे साठवले आहे, कीटक आहेत का, मुदत संपलेले पदार्थ वापरले जात आहेत का याची तपासणी करतानाचे व्हिडीओ नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.

रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना सुरक्षित असे पिण्याचे पाणी मोफत देणे बंधनकारक करणे, रासायनिक घटकांचा वापर करून तयार केलेल्या बनावट ‘ॲनालॉग’ पनीरवर कारवाई करणे आणि वडापावसारखे पदार्थ शाई लागलेल्या वर्तमानपत्रात गुंडाळण्याच्या पद्धतीला आळा घालणे, अशा निर्णयांमुळेही ते चर्चेत आले.

यामुळे मुंढेंच्या लोकप्रियतेचं एक वेगळं चित्र तयार होतं. सरकारी अधिकारी म्हणून ते जे काम करतात, तेच काम सोशल मीडियावर व्हिडीओ, रील्स आणि पोस्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचतं, त्यामुळे त्यांची लोकप्रियता केवळ त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटपुरती मर्यादित राहत नाही; लोक त्यांच्या कामाला समर्थन देणारा कंटेंट लिहित आहेत आणि अशा पोस्ट व्हायरल होत असल्याने मुंढे झपाट्याने लोकप्रिय होत आहेत.

२५ वेळा बदली झालेले ‘सिंघम अधिकारी’

तुकाराम मुंढे यांचं नाव समोर आलं की, त्यांच्या प्रशासकीय शैलीसोबतच त्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांचीही चर्चा होते. भारतीय नोकरशाहीतील ‘सिंघम’ अशी ओळख मिळालेल्या मुंढेंची २१ वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत तब्बल २५ वेळा बदली झाली आहे.

सरकारी यंत्रणेत एखादा अधिकारी कठोर भूमिका घेत असेल, नियमांची अंमलबजावणी करत असेल आणि दबावाला सहज बळी पडत नसेल, तर त्याची बदली हा अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. मुंढेंच्या बाबतीतही हेच चित्र दिसतं. मात्र, या बदल्यांकडे सामान्य नागरिक वेगळ्या नजरेने पाहतात. त्यांच्या मते, वारंवार बदली होऊनही मुंढे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले, त्यामुळे त्यांच्या ‘कठोर प्रशासकीय अधिकारी’ या प्रतिमेला आणखी बळ मिळालं.

मुंढेंनी केवळ सर्वसामान्य दुकानदार किंवा रेस्टॉरंटवरच नियम लागू केले नाहीत, तर शासकीय संस्थांनाही सारखेच नियम लावले. अन्नसुरक्षेच्या नियमांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले, त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि मंत्रालयातील कँटीनचीही तपासणी करण्यासाठी पथकं पाठवली. ज्या कँटीनमध्ये नियमांचे उल्लंघन झाले, त्यावर तात्पुरती बंदीची कारवाई करण्यात आली. सरकारी संस्थांनाही सामान्य विक्रेत्यांप्रमाणेच नियम लागू होतात हा संदेश या कारवाईतून गेला.

‘वॉटरमॅन ऑफ महाराष्ट्र’ अशीही ओळख

एफडीए आयुक्त होण्याच्या अनेक वर्षांआधीपासूनच मुंढे त्यांच्या कामामुळे चर्चेत होते. जालना जिल्हाधिकारी (२०११-१२) आणि सोलापूर जिल्हाधिकारी (२०१५-१६) म्हणून काम करताना त्यांनी पाणीटंचाईचा प्रश्न गंभीरपणे हाताळला. टँकरवर अवलंबून असलेल्या अनेक गावांमध्ये जलसंधारणाची कामं राबवून त्यांनी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला.

या काळात स्थानिक पातळीवरील काम करणाऱ्या ‘टँकर माफियां’विरोधात त्यांनी कारवाई केली. जलसंधारणाच्या उपाययोजनांमुळे शेकडो दुष्काळग्रस्त गावं टँकरमुक्त झाली, त्यामुळे त्यांना ‘वॉटरमॅन ऑफ महाराष्ट्र’ अशी ओळखही मिळाली.

मुंढेंच्या कामाची चर्चा इतकी वाढली की त्यांच्या प्रशासकीय प्रवासावर चरित्रात्मक पुस्तक प्रकाशित झालं. काही आठवड्यांतच या पुस्तकाच्या एक लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्याचं सांगितलं जातं. सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही त्यांच्या कामाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळतो,

म्हणूनच तुकाराम मुंढे यांची लोकप्रियता केवळ इन्स्टाग्रामवरील आकडेवारीत दिसत नाही. बेधडक कारवाई आणि प्रशासनातील ठाम भूमिकेमुळे तयार झालेली सार्वजनिक प्रतिमा आता सोशल मीडियावरही वेगाने लोकप्रिय होत आहे.