सणासुदीचे दिवस असोत किंवा घरात एखादा खास प्रसंग, मिठाई खरेदी करताना आपण अनेकदा तिचा रंग, आकार आणि चव पाहतो. पण, खरेदी करत असलेली मिठाई खरोखरच चांगल्या दर्जाची आहे का याचा अंदाज कसा घ्यायचा? महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) अधिकारी तुकाराम मुंढे यांची लाडू तपासण्याची पद्धत सध्या व्हायरल होत आहे. पुण्यातील एका मिठाईच्या दुकानात त्यांनी चक्क हातात लाडू चुरून त्याची गुणवत्ता तपासली. त्यांच्या या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, लाडू हातात चुरून कशी तपासणी केली जाते, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
व्हिडीओमध्ये मुंढे लाडू हातात घेऊन तो दोन्ही तळहातांमध्ये फिरवताना, दाबून पाहताना आणि तो चुरून आतला भाग तपासताना दिसतात. त्यानंतर हातावर राहिलेल्या अवशेषांकडेही ते बारकाईने पाहतात. लाडूमध्ये तेलकटपणा किंवा कृत्रिम रंगाचे अंश आहेत का, याचा अंदाज घेण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसते. ही पद्धत वरकरणी वेगळी वाटत असली, तरी लाडूचा पोत, ताजेपणा, त्यातील घटक आणि त्यात वापरलेल्या चरबीबद्दल काही प्राथमिक संकेत त्यातून मिळू शकतात. मात्र, केवळ लाडू हाताने दाबून त्याची गुणवत्ता कितपत ओळखता येते? आणि सणासुदीला मिठाई खरेदी करताना सामान्य ग्राहकांनी नेमकं काय तपासावं? हे समजून घेऊया.
आधी आपण जाणून घेऊया की, लाडूकडे फक्त पाहण्याऐवजी तो चुरून का पाहावा?
दी इंडियन एक्स्प्रेसने क्लिनिकल डायटिशियन आणि मधुमेह शिक्षिका कनिक्का मल्होत्रा यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, लाडू बाहेरून दिसायला चांगला असला, तरी तो बनवताना कोणते घटक वापरले आहेत याची माहिती केवळ रंग किंवा आकारावरून मिळत नाही. मात्र, हातामध्ये लाडू चुरून पाहिल्यास त्याचा पोत, घट्टपणा आणि त्यातील स्निग्ध पदार्थांचं प्रमाण याबद्दल काही प्राथमिक संकेत मिळू शकतात. तज्ज्ञांच्या मते, लाडू हा तूप किंवा इतर चरबी, साखर आणि पिठाच्या मिश्रणातून तयार होतो, त्यामुळे तो हातात चुरल्यास कसा फुटतो किंवा त्याचा कसा गोळा होतो, यावरून त्याच्या गुणवत्तेचा अंदाज घेता येतो.
डॉ. मल्होत्रा सांगतात, चांगला लाडू हातात चुरला तर साधारणपणे तो आपला आकार टिकवून ठेवतो आणि त्याचे एकसारखे तुकडे होतात. त्याला तुपाचा छान, किंचित भाजलेल्या काजू-बदामासारखा सुगंध असतो. याउलट, लाडू खूप चिकट, गोळ्यासारखा किंवा अतिशय तेलकट वाटत असेल अथवा लाडूमध्ये विचित्र कडकपणा असेल, तर त्यात वापरलेल्या घटकांमध्ये आणि तो बनवण्याच्या पद्धतीमध्ये काही गडबड असण्याची शक्यता असते. अन्न सुरक्षा अधिकारी याप्रमाणे जागेवरच प्राथमिक तपासणी करतात. मात्र, हाताने मिठाईची तपासणी करणे किंवा वास घेणे ही केवळ प्राथमिक चाचणी आहे; मिठाईच्या गुणवत्तेचा पुरावा नाही. याबद्दल ठोस निष्कर्ष काढण्यासाठी प्रयोगशाळेतील तपासणीच आवश्यक असते, असेही त्यांनी नमूद केले.
लाडू हाताने चुरल्यास काय समजतं?
१. पोत आणि बांधणी
लाडू हाताने चुरल्यावर त्याचा मोकळा आणि एकसारखा चुरा होत असेल तर बेसन किंवा पीठ तुपात योग्य प्रकारे भाजलं आहे किंवा त्यातील घटक पाकामुळे व्यवस्थित एकत्र बांधले गेले आहेत असा अंदाज येतो. लाडू अतिशय चिकट किंवा लगद्यासारखा वाटत असेल, तर पाकाचं प्रमाण जास्त असण्याची शक्यता असते आणि जर लाडू खूप कडक असेल तर त्यात शिळे साहित्य किंवा अपुरे चरबीचं प्रमाण असल्याचे सूचित होते.
२. कोणत्या प्रकारचं तूप किंवा तेल वापरलं आहे?
लाडू चुरल्यावर तळहातावर किती तेलकटपणा राहतो हेही तपासलं जातं. हातावर अतिप्रमाणात तेलकट थर राहत असेल आणि तुपाच्या सुगंधाऐवजी जड वास येत असेल तर त्यात शुद्ध तुपाऐवजी स्वस्त स्निग्ध पदार्थ वापरल्याची शक्यता असू शकते.
३. लाडूमधील कण आणि त्याचा पोत
लाडू चुरताना त्यात वाळूसारखे किंवा खडूसारखे कण जाणवले तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. लाडूचा पोत त्यात वापरलेल्या पदार्थांशी सुसंगत असावा; तो विनाकारण खडबडीत किंवा पिठासारखा वाटू नये.
४. रंगातली असमानता आणि भेसळीचा संशय
लाडूचा आतील रंग त्यात वापरलेल्या पदार्थांनुसार नैसर्गिक आणि एकसारखा दिसायला हवा. तो खूपच भडक पिवळा किंवा नारंगी असेल, तर कृत्रिम रंग वापरल्याचा संशय येऊ शकतो. कारण लाडूचा बाहेरचा भाग आकर्षक दिसावा म्हणून त्याला रंग दिला जाऊ शकतो; पण तो फोडल्यावर आतला रंग आणि त्यातील असमानता अधिक स्पष्टपणे दिसते.
५. ताजेपणा कसा तपासावा
लाडूचा ताजेपणा ओळखण्यासाठी त्याचा वासही महत्त्वाचा ठरतो. तुपापासून बनवलेल्या ताज्या लाडवाला खमंग सुगंध असतो; मात्र आंबट, उग्र किंवा आंबवलेल्या पदार्थांसारखा वास येत असेल तर लाडू शिळा असण्याची किंवा त्यातील घटक खराब झाल्याची शक्यता असते.
डॉ. मल्होत्रा यांच्या मते, मुंढेंसारख्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांसाठी ही प्रयोगशाळेत पाठवण्यापूर्वी नमुन्याची प्राथमिक तपासणी करण्याची सोपी पद्धत आहे. यासाठी कोणत्याही उपकरणांची गरज नसते; हात, नाक आणि निरीक्षणशक्ती पुरेशी असते. मात्र, ही पद्धत माव्यापासून बनवलेल्या मिठाईची गुणवत्ता तपासण्यासाठी योग्य नाही असेही त्या स्पष्ट करतात.
घरी लाडूंची शुद्धता कशी तपासावी?
लाडूची शुद्धता तपासण्यासाठी चुरून पाहण्यासोबतच आणखीही काही सोपे उपाय घरच्या घरी करता येतात. स्वच्छ पांढऱ्या टिश्यू पेपरवर लाडू दाबून पाहावा. त्यावर खूप तेलकट डाग किंवा अनोखे रंग दिसल्यास गडबड असू शकते; मात्र केवळ तेलाचा डाग म्हणजे भेसळ असल्याचा पुरावा नाही. ताज्या तुपाला विशिष्ट सुगंध असतो. लाडवाला साबणासारखा, रासायनिक किंवा शिळा वास येत असेल तर तो खाण्यापासून सावध राहिले पाहिजे.
माव्यापासून बनवलेल्या मिठाईत स्टार्च आहे का हे तपासण्यासाठीही एक प्राथमिक चाचणी करता येते. मिठाईचा छोटा नमुना पाण्यात उकळून तो थंड झाल्यावर त्यात आयोडीन द्रावणाचे काही थेंब टाकावेत. मिश्रणाचा रंग निळा-काळा झाल्यास स्टार्च असण्याची शक्यता असते. मात्र, या घरगुती चाचण्यांमधून मिठाईत भेसळ आहे किंवा ती खाण्यास असुरक्षित आहे, असा ठोस निष्कर्ष काढता येत नाही. त्यासाठी प्रयोगशाळेतील तपासणी आवश्यक आहे असं माल्होत्रा स्पष्ट करतात.
सणासुदीला मिठाई खरेदी करताना काय लक्षात ठेवावं?
किंमत तपासा : बाजारात समान प्रकारची मिठाई ज्या दराने विकली जातेय, त्यापेक्षा एखाद्या दुकानात ती खूपच स्वस्त मिळत असेल, तर त्यामागचं कारण जाणून घ्या. मिठाईत वापरलेले घटक आणि ती बनवण्याची पद्धत याबद्दल दुकानदाराला विचारणे महत्त्वाचे आहे
साहित्य तपासा : मिठाई बनवताना तूप, खाद्यतेल की वनस्पती घीचा वापर केला आहे, याची माहिती घ्या. FSSAI च्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सुट्या मिठाईच्या दुकानांमध्ये ही माहिती ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी लावणं आवश्यक आहे. मिठाईच्या डब्यावर किंवा ट्रेवर दिलेली ‘बेस्ट बिफोर’ तारीखही तपासा.
पॅकबंद मिठाईची माहिती वाचा : मिठाईचं पॅकेट घेताना त्यावरील घटकांची यादी, FSSAI परवाना क्रमांक, उत्पादनाची तारीख आणि ‘बेस्ट बिफोर’ तारीख पाहा.
ताजेपणाला प्राधान्य द्या : प्रत्येक मिठाई किती दिवस टिकते हे तिच्यात वापरलेल्या घटकांवर अवलंबून असतं. FSSAI च्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कलाकंदासारखी दुधापासून तयार होणारी मिठाई त्याच दिवशी खाणं अपेक्षित असतं; तर बूंदीचे लाडू आणि खव्यापासून बनवलेल्या काही मिठाई साधारण चार दिवस टिकू शकतात. तूप आणि सुकामेवा वापरून बनवलेल्या काही मिठाईंचा टिकण्याचा कालावधी सात दिवसांपर्यंत असू शकतो. मात्र, हा केवळ अंदाजित कालावधी असून, खरेदी केलेल्या मिठाईवरील ‘बेस्ट बिफोर’ तारीखच अंतिम मानावी.
आहारतज्ज्ञ मल्होत्रा यांच्या मते, मिठाई मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याऐवजी गरजेपुरतीच घ्यावी. स्वच्छतेची काळजी घेणाऱ्या आणि नियमितपणे ताजी मिठाई विकल्या जाणाऱ्या विश्वासार्ह दुकानांतूनच मिठाईची खरेदी करावी. ताज्या मिठाईची निवड करणं चांगलं असलं, तरी ती कशी साठवली आहे आणि किती दिवसांत खाणं आवश्यक आहे, याकडेही विशेष लक्ष द्यावं.
मिठाईचा रंग, वास किंवा पोत योग्य वाटला तरी त्यात हानिकारक पदार्थ नाहीत, याची खात्री देता येत नाही. भेसळीचा संशय आल्यास खरेदीची पावती, उत्पादनाचे तपशील आणि शक्य असल्यास मिठाईचा फोटो किंवा नमुना जतन करावा. याबाबत FSSAI च्या ‘फूड सेफ्टी कनेक्ट’ ॲप किंवा ग्राहक तक्रार पोर्टलवर तक्रार करावी. मात्र, मिठाई अन्नसुरक्षेच्या निकषांनुसार योग्य आहे की नाही, हे निश्चित करण्यासाठी प्रयोगशाळेतील तपासणीच सर्वाधिक विश्वासार्ह ठरते.
