FDA Commissioner Tukaram Mundhe on MPSC Committee : एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार घडत असल्याचे आरोप केले जात आहेत.पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष उफाळला आहे. त्यातून एमएपीएससीच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. परिणामत: या पेपरफुटीच्या प्रकरणांची चौकशी आणि दोषींवर कारवाई केली जावी या मागणीने जोर धरला आहे. पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी याच मागण्यांसाठी सलग ११ दिवस आंदोलन केले. आता या कथित गैरप्रकारांच्या चौकशीसाठी सरकारने वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

रविवारी मुंढे यांची पाच सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समितीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. मात्र, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त असलेल्या मुंढे यांची या चौकशी समितीवर का निवड करण्यात आली? जाणून घेऊया सविस्तर…

एमपीएससी पेपरफुटी प्रकरण नेमकं काय?

सरकारी नोकरी मिळविण्यासाठी वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेपूर्वीच अडचणींचा सामना करावा लागत असेल, तर आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होतात. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेतील कथित पेपरफुटीवरून असाच वाद निर्माण झाला. या प्रकरणांच्या निषेधार्थ पुण्यात स्पर्धा परीक्षार्थींनी तब्बल ११ दिवस आंदोलन केले. एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा ही परीक्षार्थींची प्रमुख मागणी होती. ११ ऑक्टोबरला हे आंदोलन संपले.

२२ मार्च २०२६ रोजी ऑफलाईन पद्धतीने झालेल्या औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप करण्यात आला. परीक्षेच्या दोन दिवस आधी म्हणजे २० मार्चला प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर प्रसारित झाल्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले. परिणामी एमपीएससीने औषध निरीक्षक पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द केली.

मात्र, हा वाद केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित नव्हता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगात (MPSC) प्रशासकीय भ्रष्टाचार खोलवर रुजल्याचा आरोप करीत परीक्षार्थींनी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला राज्य सरकारने एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपळकर यांची प्रतिनियुक्ती रद्द केली होती; परंतु तरीही आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीवर आंदोलनकर्ते ठाम राहिले.

परीक्षार्थींचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत गेले. या आंदोलनादरम्यान शरद पवार यांनी विद्यार्थी व सरकारमध्ये मध्यस्थी केली; तर आमदार रोहित कदम यांनी आंदोलकांना पाठबळ दिले. आंदोलनाची दखल घेत, राज्य सरकारने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायिक समिती स्थापन केली आहे. या चौकशीचा अहवाल येईपर्यंत आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.

तर आता सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे सचिवपदाची धुरा सोपवण्यात आली असून, त्यांना ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परीक्षा व्यवस्थेची सखोल तपासणी करणे, संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी करणे आणि भविष्यातील भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ठोस सुधारणा सुचवणे, ही या समितीची प्रमुख कामे असणार आहेत.”

तुकाराम मुंढे यांचीच निवड का झाली?

एमपीएससीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत असताना या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी कोणाकडे द्यायची, हा महत्त्वाचा मुद्दा होता. आंदोलक परीक्षार्थींसह विरोधी पक्षातील नेत्यांनीही या चौकशीसाठी तुकाराम मुंढे यांच्या नावाचा आग्रह धरला. भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेणारे आणि नियमांच्या अंमलबजावणीबाबत ठाम असलेले अधिकारी म्हणून मुंढेंची जनमानसात प्रतिमा दृढ झाली आहे.

सध्या मुंढे महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत विविध विभागांतील गैरप्रकारांविरोधात त्यांनी कठोर भूमिका घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळे एमपीएससीच्या अंतर्गत कामकाजाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, यासाठी त्यांच्या नावाला पसंती देण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यासह आंदोलक विद्यार्थ्यांनीही मुंढे यांना समितीत महत्त्वाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी केली होती. आयोगाच्या कामकाजातील त्रुटी शोधून व्यवस्था सुधारावी यासाठी त्यांना पुरेसे अधिकार द्यावेत, अशी त्यांची भूमिका होती.

मुंढे हेदेखील स्पर्धा परीक्षांच्या संघर्षाला तोंड देऊन आयएएस पदापर्यंत पोहोचले. दुष्काळी गावात अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीचा सामना करीत, त्यांनी यूपीएससीची परीक्षा चौथ्या प्रयत्नात उत्तीर्ण केली. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करताना येणाऱ्या अडचणींची त्यांना जाणीव असेल आणि ते उमेदवारांच्या भविष्याचा विचार करून निर्णय घेतील, अशी आंदोलकांना अपेक्षा आहे.

२१ वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत त्यांच्या २५ वेळा बदल्या झाल्या आहेत. भ्रष्टाचाराच्या विरोधातील कठोर भूमिका आणि नियमांनुसार काम करण्याची पद्धती यांमुळे ते चर्चेत राहिले. त्यामुळे या प्रकरणातही कोणाचीही गय न करता, निष्पक्ष चौकशी होईल आणि परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येईल, असा विश्वास विद्यार्थी आणि राजकीय नेत्यांनी व्यक्त केला आहे.

FDA आयुक्त एमपीएससी चौकशीची जबाबदारी सांभाळू शकतात का?

तुकाराम मुंढे यांच्याकडे अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदाची जबाबदारी कायम आहे. त्यात आता त्यांच्याकडे एमपीएससी चौकशी समितीच्या सचिवपदाचीही अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

प्रशासकीय व्यवस्थेत सनदी अधिकाऱ्यांना त्यांच्या नियमित कामासोबत चौकशी समित्या, न्यायिक समित्या किंवा विशेष पथकांच्या नेतृत्वाची अतिरिक्त जबाबदारी दिली जाते. त्यामुळे सनदी अधिकाऱ्यांची समितीवर केली जाणारी नेमणूक कोणत्या तरतुदींनुसार होते, हे जाणून घेणेही महत्वाचे ठरते.

निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समितीच्या सचिवपदी मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चौकशीच्या प्रत्यक्ष कामात मुंढे यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. एमपीएससीच्या अंतर्गत यंत्रणेची तपासणी करणे, संबंधित कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक नोंदी तपासणे, तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी करणे, अशा जबाबदाऱ्या त्यांच्याकडे असणार आहेत.

औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेतील पेपरफुटीच्या आरोपांमुळे या आंदोलनाला सुरुवात झाली. औषध निरीक्षक हे अन्न व औषध प्रशासनाशी संबंधित पद असल्याने, या विभागाचे आयुक्त असलेल्या मुंढे यांचा चौकशीतील सहभाग महत्त्वाचा मानला जात आहे. भरती प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांची चौकशी करून, त्यातील त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंढे यांनी एमपीएससीच्या कामकाजाची सखोल चौकशी करावी आणि त्यात कोणताही राजकीय किंवा प्रशासकीय हस्तक्षेप होऊ नये, अशी मागणी विद्यार्थी नेते आणि राजकीय प्रतिनिधींनी सरकारकडे केली होती. त्यासाठी त्यांना चौकशी करताना पूर्ण अधिकार आणि स्वायत्तता मिळावी, यासाठीही त्यांनी आग्रह धरला.