How to File Food Adulteration Complaint in Maharashtra : तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून राज्यभरात कारवायांचा सपाटा लावला आहे. अन्नपदार्थांत भेसळ करून जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांची कोणतीही गय केली जाणार नाही, अशा इशाराच त्यांनी दिला आहे. त्यांच्या या कारवायांचे अनेकांनी समर्थक केले असून, त्यामुळे भेसळखोर आणि गुटखामाफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. राज्यात कुठेही भेसळयुक्त खाद्यपदार्थ किंवा निकृष्ट दर्जाची औषधे आढळल्यास थेट एफडीकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. यादरम्यान तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार करायची झाल्यास ती कशी करावी? असा प्रश्न समाजमाध्यमांवर विचारला जाऊ लागला आहे, त्याविषयी…

तुकाराम मुंढेंच्या कारवाईची चर्चा का?

तुकाराम मुंढे यांनी २५ मे २०२६ रोजी अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाची सूत्रे आपली हाती घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी राज्यभरातील भेसळखोर, गुटखामाफिया आणि नियमबाह्य औषध विक्रेत्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम उघडली. अवघ्या काही दिवसांतच मुंढे यांनी शेकडो आस्थापनांवर धाडी टाकून कोट्यवधी रुपयांचा माल जप्त केला. कडक शिस्त, आकडेवारीवर आधारित निर्णय आणि नियमांच्या तडजोडीशिवाय पालन ही तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. त्यांच्या कारकिर्दीतील काही गाजलेल्या निर्णयांमुळे आजही अनेक विभागांमध्ये त्यांचे नाव चर्चेत असते. तुकाराम मुंढे यांची शासकीय सेवेत आतापर्यंत २५ वेळा बदली झाली आहे. प्रशासनातील अनेक अधिकारी आणि ठेकेदार त्यांच्या कार्यपद्धतीचा उल्लेख करताना विशेष सावध भूमिका घेतात.

आयुक्त तुकाराम मुंढे यांची पोस्ट काय?

१५ जुलै रोजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे भेसळयुक्त खाद्यपदार्थांची तक्रार कशी करावी, याबाबतची माहिती दिली. ते लिहितात की, सुशासन म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा वापर नव्हे, तर नागरिकांसाठी शासन अधिक सुलभ, जलद आणि उत्तरदायी बनवणे होय. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेले AI-सक्षम नागरिक तक्रार पोर्टल हे त्याच दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. आता कोणताही नागरिक मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलून भेसळयुक्त अन्न, बनावट किंवा निकृष्ट दर्जाची औषधे, तसेच सार्वजनिक आरोग्याशी संबंधित कोणत्याही उल्लंघनाबाबत तक्रार नोंदवू शकतो. कृत्रिम बुद्धिमत्ता आपोआप तक्रार तयार करते, ती संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवते, विलंब झाल्यास स्वयंचलित एस्कलेशन करते आणि तक्रारीचा संपूर्ण प्रवास पारदर्शकपणे ट्रॅक करता येतो.

तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार कशी करावी?

तुकाराम मुंढे पुढे सांगतात की, नागरिकांचा सहभाग, तंत्रज्ञानाची ताकद आणि प्रशासनाचे उत्तरदायित्व यांचा संगम घडवून सार्वजनिक आरोग्य संरक्षण अधिक प्रभावी करण्याचा हा प्रयत्न आहे. प्रत्येक तक्रार महत्त्वाची आहे. कारण- प्रत्येक नागरिक महत्त्वाचा आहे. अन्न असो किंवा औषध, फक्त बोला — तक्रार आपोआप तयार होईल. भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा बनावट, निकृष्ट दर्जाच्या औषधांबाबत तक्रार नोंदविणे आता अत्यंत सोपे झाले आहे. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र शासनाच्या AI-आधारित व्यासपीठावर मराठी, हिंदी किंवा इंग्रजीत बोला — तुमची तक्रार स्पष्ट व पूर्ण मुद्द्यांत आपोआप तयार होईल. अन्न सुरक्षा असो वा औषध सुरक्षा — दोन्ही तक्रारींसाठी एकच व्यासपीठ आहे. यादरम्यान नागरिकांना आपली तक्रार नोंदविण्यासाठी मुंढे यांनी https://complaints.mahafda.in ही अधिकृत वेबसाईटही शेअर केली. या साईटवर जाऊन एका क्लिकवर तक्रार सबमिट करा आणि तिची स्थिती ट्रॅक करा. तुमची जागरूकता म्हणजेच सर्वांची सुरक्षा. आजच तक्रार नोंदवा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

ऑनलाईन तक्रार दाखल करण्याची पद्धत

अन्न व औषध विभागाच्या ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून घरबसल्या भेसळयुक्त खाद्यपदार्थांची तक्रार करता येते. त्यासाठी complaints.mahafda.in या ऑनलाईन संकेतस्थळाला भेट द्या. मुख्यपृष्ठावर “तक्रार नोंदवा” या बटणावर क्लिक करा. तिथे तुमचा १० अंकी मोबाईल क्रमांक टाका. वन-टाईम पासवर्ड (OTP) टाकून पडताळणी पूर्ण करा. त्यानंतर तक्रारीचा प्रकार (जसे की – भेसळयुक्त अन्न, कालबाह्य (Expired) उत्पादन, निकृष्ट दर्जाचे औषध, बनावट औषध, चुकीचे लेबलिंग, अस्वच्छता, इतर FDA संबंधित तक्रार) निवडा. त्यानंतर तक्रारीची सविस्तर माहिती भरा. त्यात दुकान/हॉटेल/कंपनीचे नाव, पूर्ण पत्ता, घटनेची तारीख व वेळ, उत्पादनाचे नाव, बॅच क्रमांक (असल्यास) काय समस्या आढळली याचे स्पष्ट वर्णन जोडा. शक्य असल्यास उत्पादनाचे फोटो, बिलाची प्रत, व्हिडीओ, पॅकेजिंगचे फोटो, इतर संबंधित पुरावे यांसारखे पुरावे अपलोड करा. घटना ज्या ठिकाणी घडली, ते ठिकाण नकाशावर किंवा पत्त्याद्वारे नमूद करा. सर्व माहिती तपासून Submit बटनावर क्लिक करा. त्यानंतर प्राप्त झालेला तक्रार क्रमांक जतन करून ठेवा.

तक्रारीची स्थिती कशी तपासाल?

तक्रारीची स्थिती तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर जाऊन, तक्रारीचा मागोवा घ्या हा पर्याय निवडा. तिथे तक्रार क्रमांक किंवा आवश्यक तपशील भरून, सद्य:स्थिती पाहू शकता. ऑनलाईन तक्रार शक्य नसल्यास टोल-फ्री हेल्पलाईन: १८००-२२२-२६५ या टोल फ्री क्रमांकावरूनही तक्रार दाखल करता येते. जर प्रकरण गंभीर असल्यास आपल्या जिल्ह्यातील सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांच्या कार्यालयाला भेट द्या. यादरम्यान तक्रार दाखल करताना संबंधित अन्नपदार्थांच्या खरेदीचे बिल आणि वस्तूचे पॅकिंग, तसेच फोटो जवळ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रशासनाला संबंधित विक्रेत्यावर किंवा कंपनीवर तत्काळ धाड टाकून कायदेशीर कारवाई करणे सोपे जाते. खोटी किंवा दिशाभूल करणारी तक्रार करू नका; अशा तक्रारींसंदर्भात कायदेशीर कारवाई होऊ शकते. तक्रार क्रमांक सुरक्षित ठेवा. कारण- त्याद्वारेच पुढील पाठपुरावा करता येतो, असे आवाहन संकेतस्थळावर करण्यात आले आहे.