अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी पदार्थाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर नागपूरसह विदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटली. हलबा समाजासह कोष्टी व्यवसायाशी संबंधित विविध संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला. समाजमाध्यमांवर निषेधाच्या पोस्ट व्हायरल झाल्या, तर सावजी हा केवळ खाद्यपदार्थ नसून विदर्भाच्या अस्मितेचा भाग असल्याचा मुद्दा पुढे आला. या वादामुळे सावजी म्हणजे नेमके काय? तो केवळ झणझणीत मटणाचा प्रकार आहे की त्यामागे मोठा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास दडलेला आहे, हा मुद्दा चर्चेत आला आहे.
सावजीची प्रतिमा काय आहे?
सावजी म्हटले की सर्वप्रथम डोळ्यासमोर येतो तो लालभडक रस्सा, झणझणीत मटण आणि खास मसाल्याचा दरवळ. मात्र सावजीची ओळख एवढ्यावरच मर्यादित नाही. विदर्भातील अनेक पिढ्यांनी जपलेली ही एक समृद्ध पाकपरंपरा आहे. नागपूरच्या खाद्यसंस्कृतीत सावजीला जे स्थान आहे, ते पुण्याच्या मिसळीला किंवा कोल्हापूरच्या तांबड्या-पांढऱ्या रस्स्याला आहे. त्यामुळे सावजीवर टीका किंवा टिप्पणी झाली की ती केवळ एका पदार्थावरील प्रतिक्रिया राहत नाही, तर ती अनेकांच्या सांस्कृतिक भावना आणि स्थानिक अस्मितेशी जोडली जाते, असे खाद्यसंस्कृतीचे अभ्यासक सांगतात.
नागपुरात सावजीची सुरुवात कशी झाली?
सावजी खाद्यसंस्कृतीचा उगम नेमका कोठे झाला, याची अधिकृत सरकारी नोंद उपलब्ध नाही. मात्र हलबा समाज आणि कोष्टी समाजातील ज्येष्ठांच्या माहितीनुसार, १८७७च्या सुमारास उद्योगपती जमशेटजी टाटा यांनी नागपुरात एम्प्रेस मिल सुरू केली. त्यानंतर मध्य प्रदेशातील (आताचा छत्तीसगडसह काही भाग) हलबा-कोष्टी विणकर समाज मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी नागपुरात आला. या समाजातील महिलांनी घरगुती पद्धतीने तयार होणारा खास झणझणीत मसाला आणि मटण-चिकन शिजवण्याची पारंपरिक पद्धत जपली. पुढे हीच पाकशैली ‘सावजी’ म्हणून ओळखली जाऊ लागली. सुरुवातीला हे पदार्थ केवळ घरगुती समारंभ आणि पाहुणचारापुरते मर्यादित होते. नंतर मिलमधील कामगार, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली. कापड उद्योगाला उतरती कळा लागल्यानंतर अनेक कुटुंबांनी छोट्या खानावळी सुरू केल्या आणि सावजी नागपूरची वेगळी ओळख बनली. नागपुरात महाल, इतवारी, गणेशपेठ, सतरंजीपुरा, उमरेड रोडपासून शहराच्या नव्या भागांपर्यंत सावजी भोजनालये आहेत. नागपूरला येणाऱ्या पर्यटकांसाठी संत्र्यांइतकाच सावजी जेवणाचा अनुभवही आकर्षणाचा विषय बनला आहे.
सावजी म्हणजे फक्त तिखटपणा आहे का?
सावजीची खरी ओळख तिच्या मसाल्यात आहे. प्रत्येक घराण्याचा मसाला, त्याचे प्रमाण आणि पदार्थ शिजवण्याची पद्धत वेगळी असते. अनेक कुटुंबे आजही मसाल्याची कृती गुप्त ठेवतात. त्यामुळे प्रत्येक सावजी हॉटेलची चव वेगळी असते. ही पाककला पिढ्यानपिढ्या जपली गेल्यामुळेच तिची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
वादाचे कारण काय?
तुकाराम मुंढे यांनी विदर्भातील एका कार्यक्रमात, ‘मी सावजी खाल्ले तर एक महिना आजारी पडेन’, असे वक्तव्य केले. या विधानावरून वाद निर्माण झाला. टीकाकारांचे म्हणणे आहे की, एखाद्या पदार्थाच्या आरोग्यविषयक परिणामांवर चर्चा करणे वेगळे आणि त्या पदार्थाशी जोडलेल्या संस्कृतीबाबत सर्वसाधारण भाष्य करणे वेगळे. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्याची प्रतिक्रिया उमटली. दुसरीकडे, अन्न व औषध प्रशासनाचे प्रमुख म्हणून सुरक्षित अन्न, स्वच्छता आणि दर्जेदार अन्ननिर्मितीवर भर देणे ही मुंढे यांची वैधानिक जबाबदारी असल्याचे मतही व्यक्त होत आहे. त्यामुळे या वादाकडे भावनिक आणि प्रशासकीय अशा दोन्ही अंगांनी पाहण्याची गरज आहे.
पोट बिघडण्याला सावजीच जबाबदार ठरते का?
सावजी खाल्ल्यानेच पोट बिघडते, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरत नाही. पचनाच्या तक्रारी केवळ सावजीमुळे होत नाहीत. व्यक्तीची शारीरिक प्रकृती, तिखट पदार्थ सहन करण्याची क्षमता, अन्न तयार करताना पाळलेली स्वच्छता, मांसाचा दर्जा, वापरलेले साहित्य आणि खाल्लेल्या अन्नाचे प्रमाण या सर्व बाबी त्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. कोणताही पदार्थ अति प्रमाणात किंवा अस्वच्छ पद्धतीने तयार झाल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दोष एखाद्या खाद्यसंस्कृतीला देण्यापेक्षा सुरक्षित अन्ननिर्मिती, दर्जेदार कच्चा माल आणि स्वच्छतेच्या निकषांवर भर देणे अधिक महत्त्वाचे आहे.
सावजी ही विदर्भाची ओळख कशी बनली?
गेल्या काही दशकांत सावजी खाद्यसंस्कृतीमुळे हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे. मसाला तयार करणारे उद्योग, मटण व्यवसाय, पोल्ट्री, भाजीपाला, केटरिंग, पर्यटन आणि हॉटेल व्यवसायाला त्यातून मोठी चालना मिळाली. नागपूरची खाद्यओळख राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यात सावजीचा मोठा वाटा आहे.
सावजी संस्कृती जपण्याची गरज काय?
सावजी खाद्यसंस्कृतीचा शास्त्रीय आणि ऐतिहासिक अभ्यास अजूनही मर्यादित आहे. तिचा उगम, विविध समाजांचे योगदान आणि नागपूरच्या आर्थिक-सामाजिक विकासातील भूमिका यांचे अधिकृत दस्तावेजीकरण होणे आवश्यक आहे. इतिहास अधिक समजला तर अशा वादांमध्ये भावनांपेक्षा तथ्यांना अधिक महत्त्व मिळेल. सावजीवरून निर्माण झालेला वाद काही दिवसांनी शांत होईल. मात्र या निमित्ताने विदर्भाच्या एका महत्त्वाच्या सांस्कृतिक वारशाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. कोणत्याही खाद्यसंस्कृतीचे मूल्य केवळ तिच्या चवीत नसते; ते तिच्या इतिहासात, परंपरेत आणि समाजाशी असलेल्या नात्यातही असते. त्यामुळे सावजीकडे केवळ झणझणीत मटण म्हणून नव्हे, तर विदर्भाच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणून पाहण्याची गरज आहे.
mahesh.bokade@expressindia.com
