अमेरिकेलाही लक्ष्य करू शकतील, अशी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे पाकिस्तान तयार करीत असल्याचे अमेरिकेच्या गुप्तचर खात्याच्या प्रमुख तुलसी गॅबार्ड यांनी म्हटले आहे. यावर भारत आणि पाकिस्ताननेही प्रतिक्रिया दिली. गॅबार्ड यांच्या या इशाऱ्यानंतर अमेरिका पाकिस्तानच्या बाबतीत नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
तुलसी गॅबार्ड यांचा इशारा काय?
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर खात्याच्या संचालक तुलसी गॅबार्ड यांनी, अमेरिकेला लक्ष्य करू शकतील अशी लांब पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे पाकिस्तान तयार करीत असल्याचे म्हटले आहे. सेनेटच्या गुप्तचर खात्याच्या समितीपुढे गॅबार्ड यांनी हा इशारा दिला. त्या म्हणाल्या, ‘जगामध्ये अमेरिकेच्या मुख्य भूमीला लक्ष्य करू शकतील, अशी तीन हजारांहून अधिक क्षेपणास्त्रे असून, हा आकडा २०३५ पर्यंत १६ हजारांहून अधिक असेल. अमेरिका अण्वस्त्रांच्या माध्यमातून शत्रूला हल्ल्यापासून परावृत्त करीत असली, तरी रशिया, चीन, उत्तर कोरिया, इराण आणि पाकिस्तान क्षेपणास्त्र डागण्याच्या अत्याधुनिक यंत्रणेवर काम करीत आहेत. अमेरिकेची मुख्य भूमी त्यामुळे त्यांच्या टप्प्यात येईल. चीन आणि रशिया क्षेपणास्त्र डागण्याच्या अशा यंत्रणेवर काम करीत आहेत, की अमेरिकेच्या क्षेपणास्त्रभेदी यंत्रणाही काही करू शकणार नाहीत. उत्तर कोरियाची क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या मुख्य भूमीला आत्ताच लक्ष्य करू शकतात. त्यांच्या भात्यातील अण्वस्त्रे ते वाढवू शकतात. पाकिस्तान लांब पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तयार करीत असून, अमेरिकेला लक्ष्य करू शकतील, अशा आंतरखंडीय क्षेपणास्त्राचा त्यात समावेश असू शकतो. इराणनेही अवकाशातून हल्ला करण्याची आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान सर्वांना दाखविले होते. इराणविरुद्ध सध्या सुरू असलेल्या ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’नंतर इराणबाबत पुन्हा आढावा घेतला जाईल.’
पाकिस्तानची बचावात्मक भूमिका
गॅबार्ड यांच्या विधानानंतर पाकिस्तानने नेहमीचेच भारतद्वेषाचे पालुपद पुढे केले. ‘पाकिस्तानचा क्षेपणास्त्र कार्यक्रम प्रादेशिक स्तरावर असून, बचावात्मक स्वरुपाचा आहे,’ असे सांगून गॅबार्ड यांनी पाकिस्तानबाबत केलेला दावा पाकिस्तानने फेटाळून लावला. पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते ताहीर अंद्राबी म्हणाले, ‘पाकिस्तानचा दक्षिण आशियात स्थैर्य राखण्याचा उद्देश असून, पाकिस्तान आंतरखंडीय क्षेपणास्त्रापासून दूर आहे. पाकिस्तानचे धोरण वास्तविक भारताविरोधात ‘क्रेडिबल मिनिमम डेटरन्स’चे आहे. उलटपक्षी विचार करता, भारताची क्षेपणास्त्रक्षमता १२ हजार किलोमीटर अंतरापर्यंत असून, ती प्रादेशिक स्तरावरील सुरक्षास्थितीपलीकडे जाणारी आहे. शेजारी आणि दूर अंतरावरील देशांसाठी ही चिंता आहे. अमेरिकेबरोबर सकारात्मक संबंधांसाठी पाकिस्तान कटिबद्ध आहे.’ इस्रायलचे भारतातील राजदूत रूव्हेन अझर यांनी पाकिस्तानला ‘रोग स्टेट’ म्हणून संबोधले आणि त्यांच्याकडे अण्वस्त्रे असल्याचे विधान केले. पाकिस्तानने अझर यांचेही विधान खोडून काढले.
‘पाकिस्तानचा इतिहास सर्वश्रुत’
भारताचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनीही गॅबार्ड यांच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानचा या बाबतीतील इतिहास सर्वश्रुत असल्याचे वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘पाकिस्तानने छुप्या मार्गाने अण्वस्त्र तंत्रज्ञानाचा प्रसार केला. पाकिस्तानमुळे जगासमोर कुठल्या प्रकारचा धोका तयार झाला आहे, हे यामुळे समोर आले आहे.’
अहवालात ‘ऑपरेशन सिंदूर’वरही भाष्य
अमेरिकेला इस्लामिक दहशतवादापासून धोका कायम असल्याचे अमेरिकेच्या गुप्तचर खात्याच्या वार्षिक अहवालात नमूद करतानाच दहशतवादी हल्ल्यामुळे मोठा संघर्ष कसा उद्भवू शकतो, हे ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान दिसले, असा उल्लेख अहवालात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळे आण्विक तणाव निवळला, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. याखेरीज, रशियापासून अमेरिकेला असलेले आव्हान, आर्क्टिक क्षेत्रातील घडामोडी, युरोप, युरेशिया आदी भागांत अमेरिकेला असलेल्या धोक्यांचा आढावा अहवालात घेण्यात आला आहे.
अमेरिकेची कायमच बोटचेपी भूमिका
पाकिस्तान आपल्या भूराजकीय स्थानाचा शिताफीने वापर करून घेण्यात कायम यशस्वी ठरला आहे. अमेरिकेबरोबर चांगले संबंध ठेवताना चीनबरोबरही तितकेच दृढ संबंध पाकिस्तानचे आहेत. यामागे पाकिस्तानचे भूराजकीय स्थान आणि दोन्ही देशांचे येथील हितसंबंध हे महत्त्वाचे कारण आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान आणि त्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला दिलेली वागणूक सर्वश्रुत आहे. अमेरिकेला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मंजूर झालेला निधी, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि नंतर फील्डमार्शल झालेले आसिफ मुनिर यांना ट्रम्प यांचे निमंत्रण, अमेरिकेच्या भूमीतूनच त्यांनी ‘पाकिस्तानवर अण्वस्त्रांचा हल्ला झाला, तर पाकिस्तान साऱ्या जगाला घेऊन संपेल,’ असे केलेले वादग्रस्त वक्तव्य अशी अनेक उदाहरणे देता येतील. पाकिस्तानचा अणुकार्यक्रम हेदेखील अमेरिकेने डोळेझाक केलेले एक ज्वलंत वास्तव ठरावे. अमेरिकेच्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वर हल्ला करणारा ओसामा बिन लादेन पाकिस्तानात सापडूनही अमेरिकेचे पाकबाबतचे धोरण कायमच बोटचेपी राहिले आहे. त्यामुळे गॅबार्ड यांच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेचे पाकिस्तानबाबतचे धोरण बदलण्याची शक्यता फारशी दिसत नाही.
पुढे काय?
अमेरिकेच्या गुप्तचर खात्याच्या अहवालानंतर पाकिस्तानने नेहमीप्रमाणे भारतविरोधी मानसिकतेचे दर्शन घडवले. मात्र, अमेरिकेच्या या अहवालाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून साऱ्या जगानेच आणि विशेषतः रशिया, चीनसह बड्या देशांनी आढावा घेणे गरजेचे आहे. दहशतवादाचा पुरस्कर्ता, अण्वस्त्रांनी सुसज्ज आणि बेजबाबदार वर्तनासाठी प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानबाबत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जाहीर भूमिका घेणे गरजेचे आहे.
prasad.kulkarni@expressindia.com
