सध्या जगभरात चर्चा सुरू आहे ती तुर्कस्थानमध्ये आलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीची. सोमवारी पहाटेच्या सुमारास दक्षिण तुर्कस्थान आणि सीरियामध्ये ७.८ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. तेव्हापासून गेल्या ४८ तासांत टर्कीमध्ये तब्बल ५ भयंकर असे भूकंपाचे धक्के बसले आहेत. या धक्क्यांमुळे तुर्कस्थानमध्ये भयंकर परिस्थिती उद्भवली असून हजारो नागरिक बेघर झाले आहेत. मृतांचा आकडा आता काही हजारांमध्ये पोहोचला आहे. अजूनही परिस्थिती पूर्णपणे आवाक्यात आलेली नसून पुन्हा भूकंपाचे धक्के बसण्याच्या भीतीमध्ये सध्या या भागातले नागरिक आपला उद्ध्वस्त झालेला संसार गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्या परिस्थितीत तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष रिसेप तय्यीप एर्डोगन यांनी तब्बल ९३ वर्षांपूर्वी तुर्कस्थानमध्ये भूकंपामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीशी आत्ताच्या भूकंपाची तुलना केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातली आत्तापर्यंतचं सर्वात भीषण नैसर्गिक संकट!

राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांनी आज तुर्कस्थानमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीची तुलना १९३९ साली देशात आलेल्या नैसर्गिक आपत्तीशी केली आहे. त्यानंतर टर्कीमध्ये सध्या भूकंपामुळे ओढवलेली ही सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती असल्याचं विधान एर्डोगन यांनी केलं आहे. १९३९ सालीही अशाच प्रकारे तुर्कस्थानमध्ये भूकंपाचे मोठे धक्के बसले होते. या धक्क्यांमुळे तुर्कस्थानमध्ये तब्बल ३३ हजार नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याचं सांगितलं जातं.

The Erzincan earthquake म्हणजे काय?

१९३९ साली तुर्कस्थानमध्ये बसलेल्या भूकंपाची दुर्घटना ‘दी एझनजान अर्थक्वेक’ म्हणून ओळखली जाते. २६ डिसेंबर १९३९ रोजी तुर्कस्थानमध्ये अशाच प्रकारे भूकंपाचे मोठे धक्के बसले होते. एझनजानचं पठार आणि केलकित नदी खोऱ्यात प्रामुख्याने हे धक्के बसल्याची माहिती USGS वेबसाईटवरील ऐतिहासिक भूकंपांच्या यादीमध्ये नमूद करण्यात आली आहे. एझनजान भूकंप या वेळेप्रमाणेच ७.८ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता. पण त्याचा परिणाम प्रचंड मोठ्या भूखंडावर दिसून आला. उत्तर अॅनाटोलियन फॉल्ट झोन (NAFZ)वरच हा भूकंप झाला होता. या भूकंपामुळे तब्बल ३६० किलोमीटरपर्यंत जमिनीला तडे गेले. याचे दाखले अजूनही या भागात दिसून येतात.

विश्लेषण: साथरोगतज्ज्ञांची झोप उडवणारे नऊ विषाणू कोणते आहेत?

UCGSच्या नोंदीनुसार या भूकंपामुळे एझनजान आणि निकसार भागात ३०० किलोमीटरहून लांब तडे गेल्याचं पाहायला मिळालं. यातले अनेक तडे हे तब्बल ३.७ मीटर लांबीचे होते. तर काही भागात भूभाग थेट २ मीटरपर्यंत वर उचलले गेले. या भूकंपामुळे टर्कीतील काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर आलेल्या त्सुनामीच्या लाटा रशियातल्या तौपसे स्टेशनपासून ते थेट युक्रेनमधल्या सेवास्तोपोलमधील सागरी केंद्रापर्यंत नोंद झाल्या.

तुर्कस्तान आणि भूकंपाचं नातं!

तुर्कस्तानमध्ये अनेकवेळा भूकंपाच्या घटना घडल्या आहेत. तुर्कस्तान देश आणि आसपासचा भाग हा Arabian Plate, African Plate आणि Eurasian Plate च्या मधल्या भागात वसलेला आहे. या तिन्ही प्लेट घडाळ्याच्या काट्याच्या उलट्या दिशेने फिरतात आणि त्यामुळे या प्लेटच्या मधल्या भागात मोठी उलथापालथ सुरु असते. त्यामुळे तुर्कस्तान देश आणि आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवतात.

२०२०: ऑक्टोबर २०२०मध्ये ग्रीसजवळ एजियन समुद्रातील सॅमोस या बेटावर ७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यामध्ये टर्कीमधील २४ लोकांचा बळी गेला. यापेक्षा ग्रीसमध्ये जास्त जीवितहानी झाली.

२०२०: जानेवारी २०२०मध्ये पूर्व तुर्कस्तानमध्ये ६.७ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला. यामध्ये २२ लोकांचा जीव गेला. या भूकंपाचे झटके बाजूच्या सिरिया, जॉर्जिया आणि अर्मेनियामध्येही जाणवले.

२०११: ऑक्टोबर २०११मध्ये पूर्व तुर्कस्तानमधील व्हॅन प्रांतात ७.२ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला. या घटनेमध्ये १३८ नागरिकांचा मृत्यू झाला होता.

विश्लेषण : उत्तर तारा म्हणजे नेमकं काय? दोन दिग्गजांनी काय उल्लेख केला?

२०१०: मार्च २०१०मध्ये पूर्व तुर्कस्तानमध्ये ६ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला. यानंतर ठराविक अंतराने या भागात काही काळ भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत राहिले होते. या नैसर्गिक संकटात ५१ नागरीक मृत्यूमुखी पडले होते.

१९९९: ऑगस्ट १९९९मध्ये तुर्कस्तानमध्ये झालेल्या इजमित भूकंपामुळे मोठ्या संख्येने नागरिकांचा बळी घेतला होता. ७.६ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा हा भूकंप होता.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Turkey president recep tayyip erdogan reminds the erzincan earthquake of 1939 pmw
First published on: 07-02-2023 at 18:01 IST