Turkey School Shooting Kahramanmaras 2026 : आठवीच्या विद्यार्थ्याने केलेल्या अंदाधूंद गोळीबारात शिक्षकासह ९ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना तुर्कीयेच्या काहरमनमारस प्रांतात बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत १३ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती तेथील सरकारी माध्यमांनी दिली. सलग दोन दिवसांत शाळेत गोळीबाराची दुसरी घटना घडल्याने संपूर्ण तुर्कीस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली. या घटनेदरम्यान हल्लेखोराचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली की पोलिसांच्या कारवाईत तो मारला गेला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यादरम्यान ही घटना नेमकी कशी घडली? आठवीच्या विद्यार्थ्याने अंदाधूंद गोळीबार करीत शिक्षकासह ९ विद्यार्थ्यांचा जीव कसा घेतला? त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

इसा अरास मर्सिनली (वय १४) असे मृत हल्लेखोराचे नाव असून त्याचे वडील निवृत्त पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले जात आहे. आठवीत शिकणाऱ्या मुलाकडे शस्त्र आली तरी कोठून आणि या हल्ल्यामागचे कारण काय होते याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले आहे. घरातील शस्त्रांचा वापर या कृत्यासाठी करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वी तुर्कीयेच्या सानलिउर्फा प्रांतामध्ये मंगळवारी अशाच प्रकारच्या घटनेत १८ वर्षीय विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात १६ जण जखमी झाले होते. लागोपाठ दोन दिवस घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर देशातील सुरक्षा व्यवस्थेवर अनेकांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तुर्कीचे गृहमंत्री मुस्तफा चिफ्तची यांनी ही दहशतवादी घटना नसल्याचे स्पष्ट केले.

आणखी वाचा : ४९ लाखांची तिकीटे काढूनही विमानात प्रवेश नाकारला; पेरूला निघालेल्या भारतीय कुटुंबासोबत काय घडले?

गोळीबाराची घटना नेमकी कशी घडली?

काहरमनमारसचे गव्हर्नर मुकर्रम उनलुर यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, परिसरातील एका शाळेत आठवीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी बुधवारी दुपारच्या सुमारास त्याच्या दप्तरात पाच शस्त्रे आणि सात मॅगेझिन घेऊन आला. त्याने पाचवीचे विद्यार्थी असलेल्या दोन वर्गांमध्ये प्रवेश केला आणि अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शाळेत एकच खळबळ उडाली आणि जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पहिल्या मजल्यावरील खिडकीतून खाली उड्या मारल्या. शाळेच्या शेजारील इमारतीत राहणाऱ्या एका नागरिकाने या घटनेचा व्हिडिओ चित्रित केला. या व्हिडीओत हल्लेखोराने सुमारे १५ गोळ्या झाडल्याचे दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी शाळेला वेढा घातला आणि जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्याचे दिसून आले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तुर्कीचे गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री तातडीने काहरामनमरास शहराकडे रवाना झाले.

दप्तरात आणल्या होत्या ५ बंदुका

तुर्कीयेचे गृहमंत्री मुस्तफा चिफत्सी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाचवीतील आठ विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश आहे. जखमींपैकी सहा जण अतिदक्षता विभागात (ICU) असून त्यातील तिघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. सुरुवातीला मृतांचा आकडा चार असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान तो वाढला असल्याची माहिती सरकारी माध्यमांनी दिली आहे. काहरामनमरास प्रांताचे राज्यपाल मुकर्रेम उनलुअर यांनी घटनेचा थरार मांडताना सांगितले की, आठवीत शिकणारा हा विद्यार्थी त्याच्या दप्तरात शस्त्रे घेऊन शाळेत आला होता. त्याने दोन वेगवेगळ्या वर्गांमध्ये शिरून अंदाधुंद गोळीबार केला. राज्यपालांच्या माहितीनुसार, या विद्यार्थ्याकडे पाच बंदुका आणि सात मॅगझिन्स सापडली आहेत. ही शस्त्रे त्याच्या निवृत्त पोलीस अधिकारी असलेल्या वडिलांची असावीत असा दाट संशय आहे.

हेही वाचा : इस्रायलसाठी धोक्याची घंटा? इटलीने रद्द केला संरक्षण करार; युरोप-इस्रायल संबंधांवर काय होणार परिणाम?

गोळीबाराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरला

गोळीबाराच्या या घटनेत मुख्य हल्लेखोर इसा अरास मर्सिनली याचाही मृत्यू झाला आहे. मात्र, त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली की पोलिसांच्या गोळीबारात तो मारला गेला, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. तुर्कीयेचे न्यायमंत्री अकिन गुर्लेक यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. शाळेत एकामागून एक घडलेल्या दोन गोळीबाराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरला आहे. ताज्या गोळीबाराच्या केवळ एक दिवस आधी, सानलिउर्फा प्रांतातील सिव्हरेक जिल्ह्यातील एका शाळेत माजी विद्यार्थ्याने गोळीबार केला होता. या हल्ल्यात १० विद्यार्थ्यांसह एकूण १६ जण जखमी झाले होते. पोलिसांशी झालेल्या चकमकीनंतर हल्लेखोराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, हलगर्जीपणाबद्दल चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

विरोधकांनी सुरक्षा व्यवस्थेवर ओढले ताशेरे

तुर्कीयेचे राष्ट्रपती रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी संसदेत बोलताना या दोन्ही घटनांमधील दोषींना सोडले जाणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. ज्यांच्या हलगर्जीपणामुळे या घटना घडल्या, त्यांना जबाबदार धरून कठोर शिक्षा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तुर्कीयेच्या संसदेतील विरोधी पक्षनेते ओझगुर ओझेल यांनी या घटनांवर तीव्र प्रतिक्रिया देत शाळांमध्ये व्यापक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शाळांमधील हिंसाचाराला स्वतंत्र घटना म्हणून पाहता येणार नाही. हा प्रश्न गंभीर सुरक्षा त्रुटीमध्ये परिवर्तित झाला आहे. शाळांच्या प्रवेशद्वारांवर सुरक्षेचे कडक नियंत्रण, अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, शाळा परिसरात पोलिसांची गस्त वाढवणे आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी आराखडे तयार करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तुर्कीयेमध्ये शाळेत गोळीबार होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. मे २०२४ मध्ये इस्तंबूलमध्ये एका माजी विद्यार्थ्याने मुख्याध्यापकाची हत्या केली होती. देशात शस्त्र परवाना, मानसिक आरोग्य चाचणी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी यांबाबत अत्यंत कडक कायदे असूनही अशा घटना घडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.