पाकिस्तानचा मित्रदेश असलेल्या तुर्कीयेने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत काश्मीरचा मुद्दा पुन्हा एकदा उकरून काढला. तुर्कीयेचे अध्यक्ष रेचेप तय्यिप एर्दोगान यांनी २०१९ पासून तब्बल सातव्यांदा भारत-पाकिस्तान आणि काश्मीरच्या मुद्द्यावर भाष्य केले. त्यांच्या या भूमिकेला भारताने सातत्याने विरोध केला असून हा भारताच्या अंतर्गत बाबींमधील अस्वीकार्य हस्तक्षेप असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. जम्मू आणि काश्मीरशी संबंधित सर्व प्रश्न पूर्णपणे द्विपक्षीय असून ते १९७२ मधील ऐतिहासिक शिमला करारानुसारच सोडवले जाणे बंधनकारक असल्याची ठाम भूमिका भारताने कायम ठेवली आहे. तरीदेखील तुर्कीयेच्या अध्यक्षांकडून काश्मीरबाबत वारंवार विधाने का केली जात आहे? पाकिस्तानशी नुकत्याच झालेल्या मक्का करारानंतर त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ काय? त्याविषयीचा हा आढावा…
एर्दोगान काश्मीरबाबत नेमके काय म्हणाले?
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या उपस्थितीत बोलताना रेसेप एर्दोगान यांनी जम्मू-काश्मीरबाबत भाष्य केले. दक्षिण आशियातील काश्मीर प्रश्नासह सर्वच वाद हे संयुक्त राष्ट्रांच्या सनदेत आणि संबंधित ठरावांच्या चौकटीत राहून चर्चेच्या माध्यमातून सोडवले जाणे अत्यंत गरजेचे आहे, असे त्यांनी महासभेत सांगितले. तसेच याबाबत तातडीने सकारात्मक पावले उचलली गेल्यास सर्व प्रश्न सोडवणे शक्य होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या या वक्तव्यावर संयुक्त राष्ट्रांमधील सदस्य देशांत काही काळ झाल्याने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील काश्मीरबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला.
तुर्कीयेने काश्मीरचा मुद्दा किती वेळा उपस्थित केला?
- तुर्कीयेच्या अध्यक्षांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील आपल्या भाषणांमध्ये आतापर्यंत तब्बल ७ वेळा काश्मीरचा प्रश्न उपस्थित केलेला आहे.
- २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर एर्दोगान यांनी पहिल्यांदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता.
- २०२० मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७५ व्या अधिवेशनातील आभासी भाषणादरम्यान त्यांनी पुन्हा काश्मीरचा उल्लेख केला.
- २०२१ मध्ये महासभेच्या ७६ व्या अधिवेशनात बोलताना एर्दोगान यांनी या प्रदेशातील शांतता आणि समृद्धीबाबत वक्तव्य केले होते.
- २०२२ आणि २०२३ मध्येही त्यांनी काश्मीरचा उल्लेख कायम ठेवत संयुक्त राष्ट्रांच्या नियमांच्या चौकटीत संवादातून प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले.
- २०२५ आणि २०२६ मध्ये एर्दोगान यांनी पाकिस्तानी नेतृत्वाच्या उपस्थितीत पुन्हा एकदा या मुद्द्याला जागतिक मंचावर हवा देण्याचे काम केले.
एर्दोगान वारंवार काश्मीरचा मुद्दा का उपस्थित करतात?
गेल्या अनेक दशकांपासून तुर्कीये आणि पाकिस्तान यांच्यात अत्यंत घनिष्ठ राजकीय व धोरणात्मक संबंध राहिलेले आहेत. अलीकडेच या दोन्ही देशांत मक्का करार झाला असून त्यात एकमेकांना संरक्षण सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक मंचाचा वापर करून तुर्कीयेचे अध्यक्ष आपल्या मुस्लीमबहुल देशाच्या प्रश्नांवर आवाज उठवून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच प्रादेशिक वादांवर चर्चेच्या माध्यमातून आणि संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने तोडगा काढण्याचा आग्रह ते सातत्याने धरत आहेत. दक्षिण आशियात प्रादेशिक शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी एकतर्फी पावले उचलण्याऐवजी संयुक्त राष्ट्रांची सनद आणि संबंधित ठरावांच्या चौकटीत राहून चर्चेच्या माध्यमातून सर्व वाद सोडवणे आवश्यक असल्याचे तुर्कीयेचे म्हणणे आहे.
‘मक्का करारानंतर’ एर्दोगान यांच्या वक्तव्याचे महत्त्व काय?
रेसेप एर्दोगान यांनी यंदा काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यामागचे कारण म्हणजे ७ ऑगस्ट २०२६ रोजी मक्का संयुक्त संरक्षण करारानंतर अवघ्या काही आठवड्यांतच त्यांचे हे वक्तव्य आले आहे. मक्का करार हा तुर्कीये, पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातील ‘नाटो’ शैलीची एक ऐतिहासिक लष्करी आघाडी मानली जात आहे. या करारात नाटोच्या ‘कलम ५’ सारखीच तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार या तीन देशांपैकी कोणत्याही एका देशावर झालेला सशस्त्र लष्करी हल्ला हा तिन्ही सदस्य देशांवरील संयुक्त हल्ला मानला जाईल. या आघाडीमध्ये तिन्ही देशांची भूमिका वेगवेगळी असल्याचे समोर आले आहे. सौदी अरेबिया या आघाडीला आर्थिक पाठबळ देणार आहे, तर तुर्कीयेकडून अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान आणि लष्करी उपकरणांचा पुरवठा केला जाणार आहे. त्याशिवाय पाकिस्तानकडून प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढण्यासाठी लष्करी मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती आहे.
एर्दोगान यांच्या वक्तव्याचे सामरिक परिणाम काय?
पाकिस्तानसोबत परस्पर संरक्षण करार केल्यानंतर लगेचच संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून एर्दोगान यांनी एक मोठा राजकीय संदेश दिला आहे. त्यांच्या वक्तव्यांमधून तुर्कीयेचा सर्व पातळीवर पाकिस्तानला भक्कमपणे पाठिंबा असल्याचे स्पष्ट होत आहे. आपल्या भाषणात काश्मीरचा मुद्दा समाविष्ट करून एर्दोगान यांनी जागतिक मंचावर पाकिस्तानच्या मुख्य परराष्ट्र धोरणाबाबत तुर्कीयेची कटिबद्धता पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आपल्या बाजूने तुर्कीये ठामपणे उभा राहील, असा जणू विश्वासच त्यांनी पाकिस्तानला दिला आहे.
भारत आणि तुर्कीयेतील संबंध आणखीनच ताणणार?
एर्दोगान यांनी काश्मीरबाबत वारंवार केलेल्या वक्तव्यामुळे भारत आणि तुर्कीये यांच्या संबंधात दिवसेंदिवस कटुता येत आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याची भूमिका भारताने सातत्याने मांडली आहे. तसेच काश्मीरचा प्रश्न हा १९७२ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ऐतिहासिक शिमला करारानुसारच द्विपक्षीय चर्चेतून सोडवला जायला हवा, अशी भारताची ठाम भूमिका आहे. काश्मीर प्रश्नाबाबत कोणत्याही तिसऱ्या देशाची मध्यस्थी किंवा संयुक्त राष्ट्रांच्या चौकटीतील हस्तक्षेप आम्ही कधीही स्वीकारणार नाही, असे भारताने स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे एर्दोगान यांच्या भूमिकेमुळे आगामी काळात भारताचे तुर्कीयेबरोबरचे व्यापारी, संरक्षण आणि राजनैतिक संबंध आणखीनच ताणण्यासाठी शक्यता निर्माण झाली आहे.
