१२ मे २०२६ रोजी भोपाळमध्ये त्विशा शर्मा हीच्या अनपेक्षित निधनामुळे समस्त देश हादरला आहे. प्रारंभी आत्महत्येचा खटला वाटणाऱ्या या घटनेचे रूप आता हुंडाबळी, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आणि न्यायव्यवस्थेवरील कथित दबावाच्या आरोपांमुळे सीबीआय आणि थेट सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आणि क्रमवार आढावा खालीलप्रमाणे आहे:
त्विशा शर्मा कोण होती?
नोयडा येथे जन्मलेल्या त्विशा शर्मा हिने सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठातून आपले ‘बीबीए’चे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर एनएमआयएमएस (NMIMS) मधून ‘एमबीए’ची पदवी मिळवली. सुरुवातीला मॉडेलिंग क्षेत्रात काम करणाऱ्या त्विशाने ‘मिस पुणे’चा किताब जिंकला होता. तिने ‘जरा संभल के’ (हिंदी, २०१८) आणि ‘मुग्गेन मनगल्लू’ (तेलुगू, २०२१) या चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यानंतर तिने कॉर्पोरेट क्षेत्रात प्रवेश केला.
त्विशा आणि समर्थ यांचा विवाह:
२०२४ मध्ये एका लग्नसंस्थेच्या साईट वरून तिची ओळख समर्थ सिंग या वकिलाशी झाली. ९ डिसेंबर २०२५ रोजी दिल्लीत त्यांचा विवाह झाला. समर्थची आई, गिरिबाला सिंग या निवृत्त जिल्हा न्यायाधीश आहेत.
त्विशा आणि समर्थच्या लग्नानंतर काही काळातच तिच्या सासरच्यांकडून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला असा आरोप करत नवनिधी शर्मा (त्विशाचे वडील) यांनी काही घटनांची नोंद पत्रकारांकडे केली आहे:
- व्हिएतनामच्या हनिमूनला जाताना फ्लाइटच्या वेळेत झालेल्या गैरसमजावरून समर्थने विमानतळावरच त्विशाला धक्का दिला आणि सर्व दोष तिच्यावर टाकला.
- सासरच्या लोकांनी त्विशाच्या वडिलांच्या कंपनीतील तिचे शेअर्स स्वतःच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकला. एफआयआर (FIR) नुसार, ‘विदाई’च्या वेळी गिरिबाला सिंग यांच्या मागणीवरून २ लाख रुपये अतिरिक्त देण्यात आले होते.
- सासू गिरिबाला यांनी त्विशावर गांजा ओढल्याचा आणि तिचे मानसिक संतुलन बिघडल्याचा आरोप केला. इतकेच नाही तर, तिच्या मागील नात्यांवरून प्रश्नचिन्ह निर्माण करत, तिच्या पोटातील बाळ अनौरस असल्याचा आरोपही केला.
- समर्थने त्विशाच्या माहेरच्या लोकांशी संपर्क तोडला होता. त्विशाने तिच्या आईला मदतीसाठी मेसेज केले होते, परंतु “सगळे ठीक होईल, तडजोड कर” असा सल्ला तिला माहेरून मिळाला. (व्हॅट्सअँप चॅट वरून समोर आलेली माहिती).
मृत्यूचा दिवस:
आपल्या मृत्यूच्या काही तासांपूर्वी त्विशा दुपारी ३ ते ३:३० च्या सुमारास त्विशा किरण परिहार यांच्या सलूनमध्ये गेली. तिथे तिने हेड मसाज आणि पेडिक्युअर केले आणि संध्याकाळी ६ वाजता ती बाहेर पडली.
समर्थने त्या दिवसाविषयी सांगताना असे म्हटले, कि तिला सलूनमध्ये सोडण्यासाठी आणि आणण्यासाठी तो तिच्यासोबत होता. रात्री ७:३० च्या दरम्यान ते दोघे चालायला बाहेर पडले आणि घरी परतून ते एकत्र जेवले. त्यानंतर बंगळुरूला जाण्याच्या निर्णयावर त्या दोघांचे भांडण झाले. तिने बंगळुरूला जायला नकार दिला. नंतर ती ‘GYM’च्या खोलीत दिसली जी नंतर गळफास लावलेल्या अवस्थेत सापडली.
मृत्यूच्या काही वेळ आधी त्विशाने आपल्या वडिलांना फोन करून, “मी अडकले आहे (I am stuck)” असे सांगितले. फोन कट होण्यापूर्वी वडिलांना पाठून समर्थचा आवाज ऐकू आला. त्याच रात्री भोपाळमधील सासरच्या घरी त्विशा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आणि संशयास्पद हालचाली
त्विशाच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी सासू गिरिबाला यांनी सलूनमध्ये फोन करून त्विशा तिथे आल्याचा पुरावा आणि वेळेची नोंद मागितली. यावेळी त्यांनी त्विशाच्या मृत्यूची माहिती लपवून ठेवली होती. दुसऱ्यांदा त्यांचा कॉल परिहारला आल्यावर त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची चौकशी केली तेव्हा परिहारने सर्व ठीक आहे ना असं विचारल्यावर त्यांनी त्विशाच्या मृत्यूची बातमी परिहारला सांगितली. काही काळाने, वकीलसारखे काळे-पांढरे कपडे घालून सुमारे पाच-सहा जणांचा एक गट सलूनमध्ये आला. गटातील एका महिलेने स्वतःची वकील म्हणून ओळख दिली आणि पोलिसांना याची गरज असल्याचा दावा करत त्विशाच्या भेटीचे फुटेज मागितले.
पतीची शरणागती आणि ‘व्हीआयपी’ वागणूक
पत्नीच्या मृत्यूनंतर समर्थ सिंग १० दिवस बेपत्ता होता. भोपाळ पोलिसांनी त्याच्यावर ३०,००० रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. २२ मे रोजी समर्थने जबलपूर न्यायालयात शरणागती पत्करली. मात्र, यावेळी त्याला जिल्हा न्यायाधीशांच्या बंदिस्त दालनात बसण्याची ‘व्हीआयपी’ वागणूक मिळाल्याचा आरोप त्विशाच्या वकिलांनी केला. समरथचे तत्कालीन वकील मृगेंद्र सिंग यांनी दावा केला की समरथ “लपून बसला नव्हता” तर तो अटकपूर्व जामिनासाठी कायदेशीर तरतुदींचा वापर करत होता.
त्यांनी त्विशाच्या मृत्यूसाठी तिच्या पालकांनाच जबाबदार धरले आणि दावा केला की ‘सायकोट्रॉपिक औषधांच्या’ सेवनामुळे त्विशानेच गर्भपाताचा निर्णय घेतला होता.
‘सीबीआय’चा तपास
सासू निवृत्त न्यायाधीश आणि पती वकील असल्याने राज्य पोलिसांच्या तपासात “संस्थात्मक पक्षपात” (Institutional bias) होत असल्याच्या बातम्यांची सर्वोच्च न्यायालयाने (सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने) गंभीर दखल घेतली. न्यायव्यवस्थेवरील विश्वास टिकून राहावा आणि कोणताही चुकीचा समज पसरू नये यासाठी न्यायालयाने हा तपास ‘सीबीआय’कडे सोपवण्यावर शिक्कामोर्तब केले. ‘सीबीआय’ने हुंडाबळी, छळ आणि गुन्हेगारी कट या कलमांखाली (BNS आणि हुंडा प्रतिबंधक कायदा) गुन्हा दाखल केला आहे.
न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी
सुनावणी दरम्यान, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी “मृत मुलीपेक्षा घटस्फोटीत मुलगी बरी” हे विधान केले, जे पालकांसाठी एक महत्त्वाचा धडा मानले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने साक्षीदार, आरोपी आणि दोन्ही कुटुंबांना माध्यमांसमोर विधाने न करण्याची सक्त ताकीद दिली आहे.
शवविच्छेदन आणि पुढील घडामोडी
भोपाळच्या एम्समधील पहिल्या शवविच्छेदनावर कुटुंबाने संशय व्यक्त केल्यावर (कारण तिथे गिरिबाला यांची बहीण डॉक्टर आहे), दिल्ली एम्सच्या विशेष पथकाने दुसरे शवविच्छेदन केले. याच्या ‘व्हिसेरा’ (Viscera) आणि ‘हिस्टोपॅथॉलॉजी’ (HISTOPATHOLOGY) चाचणीचा अंतिम अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
दुसऱ्या शवविच्छेदनानंतर म्हणजेच मृत्यूच्या १२ दिवसांनंतर (२४ मे रोजी) त्विशावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सासरच्या लोकांनी केवळ सलूनचेच नव्हे, तर स्वतःच्या घरातील ‘सीसीटीव्ही फुटेज’ही नष्ट केल्याचा किंवा त्यात छेडछाड केल्याचा नवा आणि अत्यंत गंभीर आरोप त्विशाच्या कुटुंबाच्या वकिलांनी केला आहे. घटनेच्या रात्री ‘सीसीटीव्ही’ तंत्रज्ञांना केलेले संशयास्पद फोन कॉल्स आणि फुटेजमधील तफावत याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
सध्याची स्थिती
सासू गिरिबाला सिंग यांना मिळालेला अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकार आणि त्विशाच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर २७ मे रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयात अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडली. “आरोपी पुराव्यांशी छेडछाड करत असून तपासात सहकार्य करत नसल्याने जामीन तात्काळ रद्द करावा” असा युक्तिवाद राज्य सरकारतर्फे करण्यात आला. या महत्त्वपूर्ण सुनावणीसाठी गिरिबाला सिंग यांनी आपले वकिलांचे पथकही बदलले आहे.
दरम्यान, ‘सीबीआय’चे विशेष पथक भोपाळमध्ये दाखल झाले असून त्यांनी तपासाची सूत्रे अधिकृतपणे हाती घेतली आहेत. दुसरीकडे, ७ दिवसांच्या पोलीस कोठडीत असलेला पती समर्थ सिंग पोलिसांच्या अनेक प्रश्नांची उडवाउडवीची उत्तरे देत असून तपासात अजिबात सहकार्य करत नसल्याचे सूत्रांकडून समजते. घटनेच्या रात्री नेमके काय घडले आणि १० दिवस तो कुठे लपून होता, यावर तो स्पष्ट उत्तरे देण्याचे टाळत आहे.
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देवनारायण मिश्रा यांच्या एकल खंडपीठाने गुरुवारी (२७ मे) रात्री उशिरा गिरिबाला सिंग यांना १५ मे रोजी कनिष्ठ न्यायालयाकडून मिळालेला अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) अखेर रद्द केला आहे. राज्य सरकारची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी जोरदार युक्तिवाद केला की, खालच्या न्यायालयाने (Trial Court) जामीन देताना मृताच्या कुटुंबीयांचे आरोप आणि सरकारी साक्षीदारांचा अजिबात विचार केला नाही. जामीन मिळाल्यावर गिरिबाला सिंग यांनी तपासात सहकार्य न करता, उलट पत्रकार परिषदा घेऊन मृत त्विशावरच आरोप केले. त्यामुळे आता निवृत्त न्यायाधीश गिरीबाला सिंग यांना कायदेशीररित्या अटक करून त्यांच्यावर कायदेशीर पद्धतीने कारवाई केली जाऊ शकते.
उच्च न्यायालयाने शवविच्छेदन (Postmortem) अहवालाचा हवाला देत नोंदवले की, त्विशाच्या मृत्यूचे कारण गळफास असले तरी, तिच्या शरीरावर मृत्यूआधीच्या (Antemortem) ६ जखमा आढळल्या आहेत. यापैकी ४ जखमा डाव्या हातावर, १ बोटावर (Ring finger) आणि १ डोक्यावर होती. ‘या जखमा मृतदेह खाली उतरवताना किंवा रुग्णालयात नेताना झालेल्या नाहीत’, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या जखमा कशा झाल्या, याबाबत आरोपी कोणतीही माहिती देऊ शकले नाहीत.
त्विशा शर्मा मृत्यू प्रकरणातून हुंडाबळी आणि सासरच्या छळाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सासू निवृत्त न्यायाधीश आणि पती वकील असल्याने, त्यांनी कायद्याचा गैरवापर करून पुरावे नष्ट केल्याचा संशय आहे. पण आता सुप्रीम कोर्टाने यात थेट लक्ष घातले आहे आणि तपास ‘सीबीआय’कडे दिला आहे. मुख्य आरोपीचा जामीनही रद्द झाल्यामुळे न्याय मिळण्याची आशा वाढली आहे. आता ‘सीबीआय’च्या तपासातून मृत्यूच्या रात्रीचे सत्य लवकरच समोर येईल आणि त्विशाला नक्की न्याय मिळेल, अशी संपूर्ण देशाला अपेक्षा आहे.
