How Intermittant Fasting Support Weight Loss : वजन कमी करण्यासाठी इंटरमिटंट फास्टिंग (Intermittent Fasting) हा पर्याय गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला आहे. अनेकजण १४:१० (१४ तास उपवास, १० तास जेवणाची वेळ) किंवा १६:८ (१६ तास उपवास, ८ तास जेवणाची वेळ) या पद्धती अवलंबतात. पण, वजन कमी करण्यासाठी इतक्या वेळेचा उपवास खरंच फायदेशीर ठरतो का? याबद्दल आहारतज्ज्ञ सिमरत कठुरिया यांनी मार्गदर्शन केले आहे.
डॉ. सिमरत यांच्या मते, १४ ते १६ तासांचा उपवास न करता रात्रीचे जेवण आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये किमान १२ तासांचे अंतर ठेवले, तरी शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यांसोबत ही उपवासाची सवय लावली तर नैसर्गिक पद्धतीनेच दीर्घकाळासाठी वजन नियंत्रणात राहू शकते.
आहारतज्ज्ञांच्या मते, शरीराला उपाशी ठेवण्यापेक्षा पचनसंस्थेला विश्रांती देणे, या पद्धतीमागील उद्देश आहे. रात्रीचे १२ तास पोटाला आराम दिला तर शरीरातील नैसर्गिक चयापचय क्रिया (Metabolism) सुरळीतपणे सुरू राहते. तसेच, नियमित वेळेत खाण्याची सवय लावली तर आरोग्यदायी जीवनशैली टिकवणे सोपे होते.
आपण जेव्हा काही खातो, तेव्हा शरीरात इन्सुलिन नावाचे हार्मोन तयार होते. हे हार्मोन अन्नातून मिळालेली साखर शरीराच्या पेशींमध्ये ऊर्जा म्हणून पोहोचवण्याचे काम करते. मात्र, सतत काही ना काही खाणे किंवा रात्री उशिरापर्यंत खाण्याची सवय असेल, तर शरीराला विश्रांती मिळत नाही.
रात्रीचे जेवण आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये १२ तासांचे अंतर ठेवल्यास इन्सुलिनची पातळी हळूहळू कमी होते. त्यामुळे पचन पूर्ण झाल्यानंतर शरीराला साठवून ठेवलेली ऊर्जा वापरण्याची संधी मिळते. ही प्रक्रियेमुळे वजन नियंत्रणात राहण्यास आणि शरीराचा ऊर्जा समतोल सुधारण्यास मदत होऊ शकते.
शरीराच्या नैसर्गिक जैविक घड्याळाशी जुळते वेळापत्रक
आपल्या शरीराची चयापचय क्रिया २४ तासांच्या नैसर्गिक जैविक घड्याळानुसार (Circadian Rhythm) काम करत असते. संशोधनानुसार, दिवसाच्या सुरुवातीला शरीर अन्नाचे पचन आणि त्यातून ऊर्जा निर्माण करण्याचे काम अधिक परिणामकारकपणे करते. रात्री उशिरा जेवण केल्यास ही नैसर्गिक प्रक्रिया विस्कळीत होऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते, रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान जेवण पूर्ण करून त्यानंतर सुमारे १२ तासांनी सकाळचा नाश्ता करणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. उलट, रात्री उशिरा खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे संतुलन बिघडू शकते, गरजेपेक्षा जास्त कॅलरी शरीरात जाऊ शकतात आणि ज्यांचा झोपेवरही परिणाम होतो. या सगळ्या गोष्टी कालांतराने वजन वाढण्याचे कारण ठरू शकतात.
सतत काहीतरी खाण्याची सवय कमी होते
डॉ. सिमरन यांच्या मते, अनेकांच्या बाबतीत जेवण हे वजन वाढण्यामागचे मुख्य कारण नसते, तर जेवणानंतर चिप्स, बिस्किटे, गोड पेये किंवा टीव्ही पाहताना नकळत खाल्ले जाणारे स्नॅक्स हे वजनवाढीसाठी कारणीभूत ठरतात. यातील अतिरिक्त कॅलरीज वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत अडथळा ठरतात.
रात्रीचे जेवण आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये १२ तासांचे अंतर ठेवण्याची सवय लागल्यानंतर ही उशिरा खाण्याची कृती आपोआप कमी होऊ लागते. त्यासाठी कोणतेही कठोर डाएट किंवा गुंतागुंतीचे नियम पाळावे लागत नाहीत. तज्ज्ञांच्या मते, रात्री पचनसंस्थेला विश्रांती मिळाल्याने सकाळी पोट फुगल्यासारखे वाटणे, अॅसिडिटी आणि जडपणा जाणवण्याची समस्या देखील कमी होऊ शकते.
छोट्या बदलांमुळे दीर्घकालीन फायदा
- कठोर डाएटपेक्षा साध्या सवयी अधिक प्रभावी ठरतात. वजन कमी करण्याचे अनेक प्लॅन काही दिवसांनी मोडतात, कारण ते पाळणे अवघड जाते
- जास्त वेळ उपाशी राहिल्याने काहींना भूक, थकवा आणि चिडचिड जाणवू शकते. त्यामुळे नंतर क्रेविंग्स वाढतात परिणामी माणूस जास्त प्रमाणात खात असतो
- मात्र १२ तासांचे फास्टिंग दैनंदिन जीवनात सहज शक्य होऊ शकते, त्यामुळे क्रेविंग्स कमी होतात. विद्यार्थी, नोकरदार, पालक किंवा ज्येष्ठ नागरिकही सहज हे फास्टिंग करु शकतात
- दीर्घकाळ वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कठोर नियमांपेक्षा नियमित आणि टिकाऊ सवयी अधिक फायदेशीर ठरतात, असेही डॉ. डॉक्टर सिमरत सांगतात.
वजन कमी करण्यासोबतच अन्य फायदे
रात्रभर १२ तासांचा उपवास केल्यामुळे केवळ वजन कमी करण्यासह अनेक फायदे होतात. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यांसोबत उपवासाची सवय लावल्यास शरीराची इन्सुलिनला प्रतिसाद देण्याची क्षमता (Insulin Sensitivity) सुधारु शकते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास आणि शरीराची चयापचय प्रक्रिया (Metabolic Health) अधिक चांगले राहण्यास मदत होते.
विशेषतः जास्त वजन असलेल्या, डायबिटीज असलेल्या किंवा मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका असलेल्या व्यक्तींना या सवयीचा फायदा होऊ शकतो, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
मात्र, उपवास हा वजन कमी करण्याचा जादुई उपाय नाही. निरोगी जीवनशैलीचा एक भाग म्हणूनच त्याकडे पाहणे आवश्यक आहे. आरोग्य दीर्घकाळ चांगले राखण्यासाठी संतुलित आहार, नियमित शारीरिक हालचाल आणि पुरेशी झोप यांची जोड तितकीच महत्त्वाची आहे.
