ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांत सुरू असलेल्या ॲशेस मालिकेतील दोन कसोटी सामने दोन दिवसांत निकाली निघाले. या दोन्ही निकालांनंतर खेळपट्ट्यांच्या स्वरूपावरून टीका किंवा चर्चा होणे अपेक्षित होते. उपखंडात विशेषतः भारतात फिरकी गोलंदाजी खेळता आली नाही की क्रिकेट तज्ज्ञ भारतातील खेळपट्ट्यांबाबत आगपाखड करतात. ॲशेसमधील दोन्ही कसोटी सामन्यांनंतर असे काहीच घडले नाही. मात्र, चौथी कसोटी दोन दिवसांत संपल्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉड ग्रीनबर्ग यांनी या संदर्भात थेट विधान केले. दोन दिवसांत सामने निकाली निघणे जेवढे क्रिकेटसाठी आदर्श नाही, तितकेच ते व्यवसायासाठीही नाही, असे मत त्यांनी नोंदवले. कसोटी क्रिकेटच्या अस्तित्वाबाबत चिंता व्यक्त होत असताना ग्रीनबर्ग यांच्या म्हणण्याचा नेमका अर्थ काय हे जाणून घेऊ.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ काय म्हणाले?
कसोटी सामना कुठलाही असला तरी तो दोन दिवसांत निकाली निघणे नक्कीच चांगले नाही. विशेषतः ॲशेस मालिकेत दोन सामने निकाली निघाल्यावर याची जाणीव झाली. सामना दोन दिवसांत संपल्यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीने मला रात्रभर झोप लागली नाही. यामुळे सामन्यामधून मिळणाऱ्या महसुलाच्या स्रोतांवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे कसोटी सामने दोन दिवसांत संपणे हे व्यवसायासाठी वाईट आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.
व्यवसायासाठी वाईट?
ॲशेस मालिकेतील पर्थ येथे झालेला पहिलाच कसोटी सामना दोन दिवसांत संपला होता. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघटना महसूल मिळविण्यासाठी विविध कंपन्या आणि व्यक्तींबरोबर पाच दिवसांचा करार करत असते. ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यांसाठी कायमच प्रेक्षकांची गर्दी होते हा इतिहास आहे. अनेक जण पाच दिवसांचे तिकिट काढतात, अनेक जण जमेल तसे दोन, तीन दिवसांचे तिकिट काढतात. मात्र, सामना दोन दिवसांत संपल्यामुळे संघटनेला उर्वरित तिकिटांचे पैसे परत करावे लागतात. कंपन्या आणि व्यक्तींबरोबर झालेला पाच दिवसांचा करारही अर्धवट मोडावा लागतो. मैदानावरील तसेच थेट प्रसारणाच्या जाहिरातीमधून मिळणाऱ्या पूर्ण महसूलावर पाणी सोडावे लागते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला या सगळ्याचा फटका बसला आणि मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. पर्थमधील कसोटीमुळे सुमारे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे ३.३ दशलक्ष डॉलर इतके नुकसान झाले. आता मेलबर्नवर सामना दोन दिवसांत संपल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे आर्थिक नुकसान १० दशलक्ष डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
सामने दोन दिवसांत का निकाली?
अलीकडे क्रिकेटमध्ये संघ व्यवस्थापन आपल्या संघाची ताकद लक्षात घेऊन त्यानुसार खेळपट्टी तयार करण्याचा प्रघात सुरू झाला आहे. मात्र, याचा फटका कधी-कधी यजमान संघालाही बसू शकतो. हे भारताने गेल्या वर्षी न्यूझीलंड आणि यंदा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सपशेल पराभवाने अनुभवले आहे. भारताने दोन्ही मालिकेत फिरकीसाठी खेळपट्ट्या बनवल्या. संघामध्ये तीन, चार फिरकी गोलंदाज खेळवले. पण, प्रतिस्पर्धी संघाकडेही दर्जेदार फिरकी गोलंदाज असू शकतात याचा विसर पडला आणि त्याचाच फटका भारताला बसला होता. आता तसा फटका ऑस्ट्रेलियाला बसला. इंग्लंड संघात अनुभवी आणि वेगवान गोलंदाजी सहज खेळू शकेल असे फलंदाज नाहीत हा अंदाज बांधून त्यांनी वेगवान गोलंदाजांसाठी खेळपट्ट्या बनवल्या. मात्र, इंग्लंडकडे वेगवान गोलंदाज याचा फायदा उठवू शकतात हे विसरले. मेलबर्नमध्ये दोन्ही डावांत ऑस्ट्रेलियापेक्षा इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी अनुकूल परिस्थितीचा फायदा अचूक घेतला. समोर आलेल्या माहितीनुसार, मेलबर्नवर जवळजवळ १० मि.मी. उंचीचे गवत ठेवले होते. त्यामुळे पहिल्या दिवशी २० फलंदाज गारद झाले आणि सामना दोन दिवसांत निकाली निघण्याची भिती सत्यात उतरली.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने काय बोध घेतला?
माजी खेळाडू तसेच चौथा कसोटी सामना जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने सामने दोन दिवसांत निकाली निघणे क्रिकेटसाठी आदर्श नाही अशी टीका केली. मालिका कुठल्याही संघाविरुद्ध असली, तरी क्रिकेट ऑस्ट्रेलिया खेळपट्टी तयार करण्याच्या प्रक्रियेत ढवळाढवळ करत नाही. त्यांनी सुरुवातीपासूनच अशी भूमिका घेतली आहे. सध्या सुरू असलेल्या मालिकेतील या दोन सामन्यानंतर आर्थिक नुकसानीमुळे का होईना, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे डोळे उघडले. भविष्यात समतोल आणि पाच दिवस सामना चालेल अशी खेळपट्टी बनविण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया लक्ष घालण्याचा विचार करू शकते असे ग्रीनबर्ग यांनीच म्हटले आहे.
प्रशासकांसमोर आव्हान
मेलबर्नमध्ये पहिल्या दिवशी प्रेक्षकांच्या उपस्थितीचे विक्रम मोडीत निघाले. दुसऱ्या दिवशीही पहिल्या दिवसाप्रमाणेच मैदान प्रेक्षकांच्या उपस्थितीने फुलून गेले होते. खेळाडूंच्या प्रत्येक कौशल्याला, त्यांच्या प्रत्येक हालचालींना प्रेक्षकांकडून दाद मिळत होती. खेळाडूही त्याचा आनंद घेताना दिसून आले. ऑस्ट्रेलिया संघ पराभूत होत असतानादेखील स्थानिक चाहत्यांचा समतोल सुटला नव्हता. अशी गर्दी सामन्यांना होत असेल, तर केवळ आपल्या गोलंदाजांना पोषक खेळपट्ट्या बनविण्यामुळे आपण त्यांचा आनंद हिरावून घेत आहोत याची जाणीव व्हायला हवी. त्यामुळे त्यांना पाच दिवस सामने चालतील याची खात्री द्यायला हवी. असे झाल्यास व्यावसायिक फायदाही होणार हे निश्चित आहे. केवळ व्यवसायाचा विचार न करता क्रिकेटच्या दर्जाही राखला जायला हवा.
