१५ जून रोजी नवी मुंबई पोलीस ठाण्यात एक एफआयआर दाखल करण्यात आला होता. फिर्यादीने सांगितले की, मोहम्मद शफीच्या मटण दुकानाबाहेर एका खांबाला बांधलेल्या बकरीवर “RAM” हा शब्द लिहिलेला होता. दोन महिन्यांच्या कायदेशीर पेचादरम्यान शफीचे दुकान सील करण्यात आले होते. त्याच्या ताब्यातील २२ बकऱ्या जप्त करण्यात आल्या, पोलिसांनी शफीकडून बकरा विकत घेतलेल्या व्यक्तीचा जबाब नोंदवला आहे. रियाझ अहमद मिठानी यांनी त्यांच्या नावाची आद्याक्षरे या शेळीवर असल्याचे सांगितले. याच्या पुष्ट्यर्थ सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गिरीदर गोरे यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “आम्ही एका व्यक्तीचे (मिठानी) स्टेटमेंट नोंदवले आहे. त्याने बकरी खरेदी केल्याचे सांगितले आणि ओळखीसाठी त्यावर त्याचे आद्याक्षर लिहिले. आम्ही इतर पुरावेही तपासत आहोत.” दरम्यान, या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेली बकरी सध्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या (एनएमएमसी) पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे, कारण मिठानी किंवा शफी या दोघांनीही ती परत मागितलेली नाही. १५ जून रोजी विश्व हिंदू परिषदेच्या सदस्याने केलेल्या तक्रारीनंतर, सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता (IPC) कलम २९५A (जाणूनबुजून आणि दुर्भावनापूर्ण कृत्ये) आणि ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत शफी आणि इतर दोघांविरुद्ध प्राण्यांशी संबंधित क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. त्याच दिवशी पोलिसांनी त्याचे दुकान सील करण्याबरोबरच शफीच्या ताब्यातील २२ बकऱ्या महापालिकेच्या ताब्यात दिल्या.
प्राण्यांवर खरेदीदाराची आद्याक्षरे रंगवणे नेहमीचेच
धार्मिक भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता, असे दुकानदाराने आपल्या वकिलामार्फत न्यायालयात सांगितले. त्याचे वकील फैझान कुरेशी यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “आम्ही न्यायालयात सादर केले की, बकरी एका व्यक्तीला विकली गेली होती आणि आद्याक्षरे फक्त खरेदीदाराची ओळख पटवण्यासाठी लिहिलेली होती, ज्याचे नाव रियाझ अहमद मिठानी होते. आम्ही असा युक्तिवाद केला की, बकरी ईद (ईद अल-अधा) दरम्यान जेव्हा अनेक बकऱ्या विकल्या जातात तेव्हा गोंधळ टाळण्यासाठी ही (प्राण्यांवर खरेदीदाराची आद्याक्षरे रंगवणे) ही एक सामान्य पद्धत प्रचलित आहे.”
दुकानाला सील करणे बेकायदेशीर
२३ ऑगस्ट रोजी महानगर दंडााधिकारी कोर्टाने शफीच्या मटणाच्या दुकानाला सील करणे बेकायदेशीर ठरवले आणि पोलिसांना त्याचा ताबा मालकाला परत करण्याचे निर्देश दिले होते. यापूर्वी २७ जून रोजी दंडाधिकारी न्यायालयाने २२ बकऱ्या शफीला परत करण्याचेही निर्देश दिले होते. २७ जून रोजी पशु अधिकाऱ्याने शफीच्या २२ बकऱ्या ताब्यात देण्याची मागणी केली. परंतु, शफीने आपल्या वकिलामार्फत एनएमएमसी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे जनावरे परत मागितली. त्याच्या वकिलाने युक्तिवाद केला की, यात क्रूरतेचे कोणतेही प्रकरण नाही आणि पशुधन अधिकाराशिवाय जप्त केले आहे.
प्राण्यांच्या क्रुरतेचा कोणताही प्राथमिक खटला नाही
“RAM” अशी आद्याक्षर असलेली बकरी दुकानाबाहेर एका खांबाला बांधलेली आढळून आल्याचे सांगून न्यायालयाने म्हटले की, हा प्राणीक्रूरतेचा कोणताही प्रकार नाही. न्यायालयाने पुढे म्हटले की, एफआयआर, पंचनामा आणि इतर पुरावे असे कुठलेही पुरावे दाखवत नाहीत की, ज्यात बकऱ्यांना-क्रूर पद्धतीने वागवले गेल्याचे आढळले आहे. पोलिसांच्या अहवालात कोठेही असा उल्लेख नाही की शेळीवर वापरण्यात आलेला रंग कायमस्वरूपी आहे आणि त्यामुळे प्राण्यांच्या त्वचेला कायमचे नुकसान झाले आहे. उर्वरित शेळ्यांबाबत तपास अधिकाऱ्यांनी जप्ती पंचनामा तयार केलेला नाही. तसेच उरलेल्या शेळ्या क्रूरतेच्या अधीन असल्याचा कोणताही आरोप नाही. त्यामुळे, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत (शफीवर) प्राण्यांच्या क्रुरतेचा कोणताही प्राथमिक खटला चालवला जाऊ शकत नाही, असे एस एस जाधव, न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग, बेलापूर यांनी सांगितले.
अधिक वाचा: भारत खरंच शाकाहारी आहे का? राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण काय सांगते?
बकऱ्या परत करण्याचे आदेश?
बकऱ्यांच्या ताब्यासाठी संबंधित नसलेले इतर कुणीही दावा करू शकत नाही, असे न्यायालयाने याप्रसंगी म्हटले. शफीने त्याची बकऱ्यांवरची मालकी सिद्ध केली होती, असे सांगून न्यायालयाने पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला जनावरांचा ताबा तत्काळ त्याच्याकडे देण्याचे निर्देश दिले. अर्ज प्रलंबित असताना २२ पैकी एका शेळीचा मृत्यू झाल्याने न्यायालयाने तिच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
राम आद्याक्षर असणाऱ्या बकऱ्याचे काय झाले?
एनएमएमसीच्या पशुवैद्यकीय सेवेतील एका अधिकाऱ्याने सांगितले की, न्यायालयाच्या आदेशानंतर २० शेळ्या शफीला देण्यात आल्या. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, शफीने वाद असलेला बकरा ताब्यात घेतला नाही, कारण तो मिठानीला विकला होता.
© IE Online Media Services (P) Ltd