भारताच्या सीमेला लागून असलेल्या चीनला सोमवारी डॉल्फिन चक्रीवादळाने चांगलाच तडाखा दिला. या वादळामुळे चीनचा पूर्व परिसर जलमय झाला असून तेथील जनजीवन विस्कळीत झाले. पावसाची संततधार सुरूच असल्यामुळे वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसला. चिनी प्रशासनाने या परिस्थितीला यंदाच्या वर्षातील सर्वात शक्तिशाली उष्णकटिबंधीय चक्रीवादळ असे संबोधले. हे वादळ उत्तरेकडे सरकत असताना बुधवारपर्यंत चीनमधील अनेक भागांत पूरस्थितीचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान ‘डॉल्फिन’ चक्रीवादळाचा भारतातील मान्सूनवरही मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे, त्याविषयी…
चक्रीवादळाचा चीनला कसा बसला तडाखा?
चिनी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, ‘डॉल्फिन’ चक्रीवादळाने रविवारी (९ ऑगस्ट) चीनच्या झेजियांग प्रांतातील युहुआंग प्रांतात पहिल्यांदा धडक दिली. त्यानंतर सुमारे तासाभराने हे वादळ वेंझोऊ शहरात धडकले. सध्या या वादळाची तीव्रता कमी झाली असली तरी चीनमधील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. शानडोंग, हेनान, हुबेई, अनहुई, जिआंग्सू, झेजियांग तसेच शांघाय शहरातील अनेक भागांना पुराचा फटका बसला आहे. पावसाच्या या स्थितीबद्दल शांघायमधील एका ३९ वर्षीय व्यक्तीने रॉयटर्सला सांगितले की, रविवारी रात्रभर सर्वत्र मुसळधार पाऊस पडत होता. सकाळी उठल्यानंतर मला संपूर्ण परिसर पाण्याखाली गेल्याचे दिसून आले. रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. गेल्या १० वर्षांपासून मी शांघायमध्ये राहत असून एवढ्या मोठ्या प्रमाणात गैरसोय होण्याचा हा माझा पहिलाच अनुभव आहे.
लाखो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले
मुसळधार पावसामुळे शांघायमधील दोन प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील ९४३ विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दिली आहे. याशिवाय चीनच्या या आर्थिक राजधानीतील अनेक स्थानिक रेल्वे गाड्यांसह सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. त्याशिवाय किनारपट्टी भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून समुद्रातील १०० हून अधिक बांधकामाचे प्रकल्प तूर्तास रोखले आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शांघायमधील अनेक प्रमुख पर्यटन स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, चक्रीवादळ धडकण्यापूर्वीच शांघायमधील १० लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. त्याचवेळी वेनझोऊ शहरात ९ लाख रहिवाशांचे स्थलांतर करून त्यांच्यासाठी १,००० हून अधिक आपत्कालीन निवारे सुरू करण्यात आले. त्याशिवाय, तैझोऊ शहरातूनही सुमारे तीन लाख ९० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
चीनबाहेरही ‘डॉल्फिन’ चक्रीवादळाचा तडाखा
‘डॉल्फिन’ चक्रीवादळाचा प्रभाव केवळ चीनपुरताच मर्यादित न राहता दक्षिण चीनच्या किनारपट्टीवरील हाँगकाँग आणि जपानच्या ओकिनावा बेटांपर्यंत दिसून आला. हाँगकाँगमध्ये या वादळामुळे निर्माण झालेल्या उष्ण हवेच्या प्रवाहामुळे ३६.९ अंश सेल्सिअस या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. दरम्यान, जपानच्या ओकिनावा बेटावर जोरदार वाऱ्यामुळे एका १०० वर्षीय वृद्धासह सात जण किरकोळ जखमी झाले. वारा इतका वेगवान होता की, हा वृद्ध जमिनीवर पडून त्याच्या डोक्याला दुखापत झाली, अशी माहिती तेथील स्थानिक सरकारने दिली. या चक्रीवादळाची झळ फिलिपिन्सलाही बसली. रविवारी बागुइओ या उत्तर पर्वतीय पर्यटन शहरात भूस्खलन होऊन तीन घरे कोसळली. या दुर्घटनेत पाच जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले, तर सात जण अद्यापही बेपत्ता आहेत.
चक्रीवादळाचा भारतावर काय परिणाम होणार?
हवामान तज्ज्ञांच्या मते, ‘डॉल्फिन’ चक्रीवादळाचा भारतावर कोणताही प्रत्यक्ष प्रभाव पडणार नसला, तरी त्याच्या निर्मितीचा आणि चक्राकार वाऱ्यांचा भारतीय मान्सूनला मोठा फटका बसू शकतो. आधीच प्रशांत महासागरात सक्रिय असलेल्या एल निनोच्या प्रभावामुळे देशातील अनेक भागांत पावसाने उसंत घेतली आहे. अफगाणिस्तानकडून दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे १५ ऑगस्टपर्यंत हीच स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. डॉल्फिन वादळामुळे भारतातील काही महत्त्वाच्या भागांमध्ये मान्सूनच्या पावसाची कमतरता निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच या वादळाचे वातावरण स्तरावरील प्रचंड मोठे स्वरूप संपूर्ण आशियातील हवामानाचे चक्र बदलून टाकत आहे. ‘डॉल्फिन’सारखी विशाल चक्रीवादळे ही एका ‘वातावरणीय स्पंज’प्रमाणे काम करतात. पश्चिम प्रशांत महासागरातील या वादळाच्या केंद्राभोवती मोठ्या प्रमाणात आर्द्रता आणि ऊर्जा एकवटली जाते.
चक्रीवादळामुळे पावसाचा खंड पडण्याची भीती
डॉल्फिन हे चक्रीवादळ वातावरणातील सर्व ओलावा पूर्वेकडे खेचून घेत असल्याने बंगालच्या उपसागरातील दमटपणा कमालीचा घटला आहे. वास्तविक पाहता, बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे पट्टे हेच भारतातील विशेषतः मध्य, पूर्व आणि उत्तर भागांत मान्सूनला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. याशिवाय चक्रीवादळाच्या तीव्र चक्राकार वाऱ्यांमुळे वातावरणातील वाऱ्यांची दिशा बदलली आहे. त्यामुळे मान्सूनच्या दाबाचा पट्टा त्याच्या मूळ स्थानावरून सरकल्याने भारतात पाऊस आणणाऱ्या वाऱ्यांचा नैसर्गिक आणि सातत्यपूर्ण प्रवाह खंडित होण्याची शक्यता आहे. विविध देशांतील हवामान तज्ज्ञांनीही ‘डॉल्फिन’ चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. त्यांच्या मते, या शक्तिशाली वादळामुळे वातावरणात एक प्रकारची ‘स्पर्धा’ निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरावर पावसाळी प्रणाली विकसित होण्यासाठी आवश्यक असलेली उष्णता आणि आर्द्रता ‘डॉल्फिन’ स्वतःकडे खेचत आहे. याचा परिणाम भारतीय मान्सूनच्या नेहमीच्या प्रवाहावर होत आहे. परिणामी, मध्य आणि उत्तर भारतातील काही भागांत पावसाचा तात्पुरता खंड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चक्रीवादळाबाबत हवामान तज्ज्ञांचे मत काय?
‘डॉल्फिन’ चक्रीवादळाच्या या दुष्परिणामांविषयी भारतीय हवामान अभ्यासकांमध्येही निर्माण झालेली भीती आता खरी ठरताना दिसत आहे. ‘ऑल इंडिया वेदर’ या संस्थेने याबाबत समाजमाध्यमांवर एक पोस्ट शेअर केली आहे. “आमची भीती अखेर खरी ठरली. ‘डॉल्फिन’ चक्रीवादळाने बंगालच्या उपसागरातील अनेक मान्सून प्रणालींमधील ओलावा हिरावून घेतला आहे आणि ते अजूनही आपल्या वातावरणातील दमटपणा शोषून घेत आहे,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. दुसरीकडे- इंडिया टुडेच्या एका वृत्तात या परिस्थितीचे वेगळेच वर्णन करण्यात आले आहे. भारतातील पावसावर परिणाम घडवून आणणारी ही प्रक्रिया केवळ एका वादळापुरती मर्यादित नसून प्रशांत महासागरापासून बंगालच्या उपसागरापर्यंतच्या वातावरणीय बदलांशी संबंधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या घडामोडींमुळे बंगालच्या उपसागरावर नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन पुन्हा पावसाला चालना मिळणार का? की दुसरीकडे एल निनोमुळे भारतातील मान्सूनच्या ढगांवर परिणाम होऊन पावसाचे प्रमाण कमी होणार? याचे उत्तर येत्या काळातील वातावरणीय परिस्थितीवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे डॉल्फिन चक्रीवादळानंतर देशातील मान्सूनची पुढील वाटचाल कशी असेल, याकडेच हवामान तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.
