दहशतवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तान आणखी एका मोठ्या संकटात सापडला आहे. संयुक्त अरब अमिरातीने (UAE) लादलेली कथित व्हिसा बंदी पाकिस्तानी व्यावसायिकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. या निर्बंधाचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यावसायिक व्यवहारांवर होत असल्याचा आरोप तेथील निर्यातदारांनी केला आहे. पाकिस्तानमधील वृत्तवाहिन्यांनीही या प्रकरणाला दुजोरा दिला असून, यूएईने आपल्या देशातील गुंतवणूकदारांसह व्यापाऱ्यांना व्हिसा देणे थांबवले असल्याचा दावा केला आहे. मात्र, यूएई प्रशासनाने या सर्व आरोपांचे खंडन करीत पाकिस्तानी नागरिकांवर कोणतीही व्हिसा बंदी लागू करण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच सर्व श्रेणींमधील व्हिसा अर्जांची प्रक्रिया नियमितपणे सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील या व्यावसायिक गोंधळाबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.
यूएईकडून पाकिस्तानवर अघोषित व्हिसा बंदी?
संयुक्त अरब अमिरातीने व्यापारी आणि निर्यातदारांवर घातलेल्या व्हिसा निर्बंधांना पाकिस्तानच्या व्यावसायिक समुदायाने ‘गंभीर आव्हान’ असे संबोधले आहे. यूएईकडून कोणतीही व्हिसा बंदी नसल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्ष परिस्थिती पूर्णपणे वेगळी असल्याचा आरोप पाकिस्तानी व्यावसायिकांनी केला आहे. याबाबत पाकिस्तान फेडरेशन ऑफ चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे माजी सरचिटणीस शाहिद अनवर यांनी द एक्स्प्रेस ट्रिब्यूनला सांगितले की, यूएई सरकारची अधिकृत भूमिका आणि अनेक पाकिस्तानी व्यावसायिक प्रवाशांचा प्रत्यक्ष अनुभव यामध्ये स्पष्ट तफावत दिसून येत आहे. दुसरीकडे- रावळपिंडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष शौकत यांनीही या विषयावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, दुबई, शारजा आणि अबुधाबीमध्ये वर्षानुवर्षांचे मजबूत संबंध असलेल्या पाकिस्तानी उद्योजकांनाही व्हिसा मिळवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे महत्वाच्या व्यावसायिक बैठका तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनांमधील पाकिस्तानी व्यावसायिकांचा सहभाग कमी झाला आहे.
पाकिस्तानी व्यावसायिकांचा आरोप काय?
यूएईच्या व्हिसाबंदीच्या या निर्णयामुळे अनेक पाकिस्तानी व्यावसायिकांना महत्त्वाच्या व्यावसायिक बैठका रद्द कराव्या लागल्या असून, अनेक निर्यातदारांना मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्याची संधी गमवावी लागल्याचा आरोपही शौकत यांनी केला आहे. या परिस्थितीवर भाष्य करताना पाकिस्तान सॉल्ट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष इस्माईल सुतार यांनी सांगितले की, यूएईच्या कथित व्हिसा निर्बंधांमुळे त्या देशाच्या बाजारपेठेवर अवलंबून असलेल्या उद्योगांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्हिसा निर्बंधामागील कारणांबाबत कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे व्यावसायिक शिष्टमंडळांच्या भेटी, निर्यात व्यवहार आणि व्यापारी संबंधांवर प्रतिकूल परिणाम होत असून, उद्योग क्षेत्रासमोर नवे आव्हान उभे राहिले असल्याचे सुतार यांनी नमूद केले आहे.
या आरोपांवर यूएईने काय प्रतिक्रिया दिली?
संयुक्त अरब अमिरातीने पाकिस्तानी नागरिकांवर कोणत्याही प्रकारची व्हिसा बंदी लागू नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच सर्व श्रेणींमधील व्हिसा अर्जांची प्रक्रिया नियमितपणे सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मात्र, पाकिस्तानातील व्यावसायिक संघटनांचे म्हणणे आहे की, प्रत्यक्षात व्हिसा मिळवताना अनेक अडचणी येत आहेत. याबाबत कराची चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे (KCCI) सदस्य झिया-उल-अर्फीन यांनी यूएईच्या वाणिज्यदूतांना पत्र पाठवून स्पष्टीकरण मागितले होते. मात्र, त्यांना या पत्राचे कोणतेही उत्तर मिळाले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. केसीसीआयच्या इतर सदस्यांनीही यूएईच्या वाणिज्यदूतांशी संपर्क साधला आहे. त्यांच्या मते, ही समस्या कायम राहिल्यास दुबईमध्ये होणाऱ्या आगामी व्यापारी प्रदर्शनांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. पाकिस्तानातील अनेक कंपन्या दुबईतील ‘गल्फूड’ प्रदर्शनात आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन करण्याची तयारी करत आहेत. मात्र, प्रवासासाठी आवश्यक व्हिसा मंजुरी वेळेत न मिळाल्यास या व्यावसायिक बैठका आणि सहभागावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पाकिस्तानमधील उद्योजकांच्या मते, या परिस्थितीचा निर्यात, आरोग्यसेवा आणि पर्यटन यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. यादरम्यान, विमान वाहतूक क्षेत्रातील सल्लागारांनीही यूएईकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत घट झाल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. विशेषतः ‘व्हिजिट व्हिसा’ आणि ‘फॅमिली व्हिसा’ मिळवण्यात पाकिस्तानी नागरिकांना मोठ्या अडचणी येत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
पाकिस्तान-यूएई संबंधांमध्ये नवा तणाव?
पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात दीर्घकाळापासून घनिष्ठ संबंध आहेत. मात्र, गेल्या वर्षाच्या अखेरीस पाकिस्तानने सौदी अरेबियासोबत संरक्षण करारावर स्वाक्षरी केल्यानंतर दोन्ही देशांतील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे वृत्त आहे. एप्रिल महिन्यात यूएईने पाकिस्तानला सुमारे ३.५ अब्ज डॉलर (सुमारे ३३,४७४ कोटी रुपये) कर्ज परत करण्यास सांगितल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पाकिस्तान सरकारने मिळालेल्या दोन अब्ज डॉलरच्या आर्थिक ठेवीची परतफेड करण्याची प्रक्रिया सुरू केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, ४ एप्रिल रोजी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात कर्ज परतफेडीबाबत सुरू असलेल्या चर्चा दिशाभूल करणाऱ्या आणि तथ्यहीन असल्याचे संबोधले होते. त्याचवेळी सरकारी आणि आर्थिक क्षेत्रातील सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, यूएईने हा निधी तातडीने परत करण्याची मागणी केल्यानंतरच परतफेडीची प्रक्रिया सुरू झाली होती. या सर्व घडामोडींनंतरही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने यूएईसोबतचे संबंध दृढ असल्याचे सांगितले होते. यादरम्यान पाकिस्तानी व्यावसायिकांनी यूएईवर केलेला व्हिसा निर्बंधांचा आरोप खरा ठरल्यास दोन्ही देशांत आणखीनच कटूता येण्याची शक्यता आहे.
