ब्रिटनमधील पीटरबरो शहरात गेल्या ४० वर्षांपासून असलेल्या ‘भारत हिंदू समाज’ या मंदिराच्या अस्तित्वावर मोठे संकट ओढवले आहे. वर्षभरापूर्वी पीटरबरो शहर परिषदेने या हिंदू मंदिराची जागा ब्रिटन इस्लामिक मिशनचा भाग असलेल्या खादिजाह मशिदीला विकण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात तेथील हिंदू समाजाने आक्रमक पवित्रा घेत न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी सुरू असून त्याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. १९८६ मध्ये शहरातील न्यू इंग्लंड कॉम्प्लेक्समध्ये ‘भारत हिंदू समाज’ हे मंदिर उभारण्यात आले होते. १९७२ मध्ये युगांडाचे तत्कालीन हुकूमशहा इदी अमीन यांनी देशातून हद्दपार केलेल्या भारतीय वंशाच्या कुटुंबांनी या मंदिराची स्थापन केला होती. ‘द टेलिग्राफ’च्या वृत्तानुसार, शहरातील ३५ मैलांच्या परिसरात हे एकमेव हिंदू मंदिर आहे. केंब्रिजशायर, नॉरफोक आणि लिंकनशायरमधील सुमारे १४,००० हिंदू बांधवांचे ते मुख्य श्रद्धास्थान आहे.

‘भारत हिंदू समाज’ मंदिरावर अस्तित्वाचे संकट

अनेक दशकांपासून हिंदू समुदायाचे केंद्र असलेले ‘भारत हिंदू समाज’ मंदिर आता आपले अस्तित्व टिकवण्यासाठी न्यायालयीन लढा देत आहे. मंदिराच्या जागेच्या विक्रीच्या निर्णयामुळे भाविकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत ७४ वर्षीय दमयंती भाटिया यांनी ‘द टेलिग्राफ’शी बोलताना सांगितले की, हे मंदिर आमच्यासाठी सर्वस्व आहे. दररोज अनेक हिंदू भाविक येथे प्रार्थना करतात आणि एकमेकांना भेटत असतात. हिंदू समाजासाठी हे मंदिर अतिशय महत्वाचे असून मी दररोज येथे नियमित दर्शनासाठी येते. माझी मुले आणि नातवंडे सुद्धा दररोज पुजेसाठी येत असतात. २०२५ मध्ये लेबर पक्षाच्या नेत्या शबिना कय्यूम यांच्या नेतृत्वाखालील पीटरबरो शहर परिषदेने आपल्यावरील ५०० दशलक्ष पौंड (सुमारे ६,४५६ कोटी रुपये) कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी मंदिराची जागा विकण्याचा निर्णय घेतला होता.

पीटरबरो शहर परिषदेचा धक्कादायक निर्णय

मंदिर समितीच्या विश्वस्तांनी माध्यमांना सांगितले की, १.३ दशलक्ष पौंड (सुमारे १६.८६ कोटी रुपये) किंमतीत ही जागा खरेदी करण्याबाबत आमची परिषदेबरोबर सहमती झाली होती. मात्र, त्यानंतर शहर परिषदेने ही मालमत्ता खुल्या बाजारात विक्रीसाठी ठेवली आणि युनायटेड किंग्डम इस्लामिक मिशन अंतर्गत कार्यरत असलेल्या खादिजाह मशिदीची खरेदीदार म्हणून निवड केली. या निर्णयामुळे हिंदू समाजासह मंदिराच्या विश्वस्तांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला. मंदिराच्या विश्वस्त गौरी चौधरी यांनी इंडिया टुडेला सांगितले की, मार्च २०२५ मध्ये पीटरबरो शहर परिषदेने आम्हाला ही मालमत्ता खरेदी करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार आम्ही त्यांना १.३ दशलक्ष पौंडांची ऑफर दिली. मात्र, सप्टेंबर २०२५ पर्यंत आम्हाला कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यानंतरच ही मालमत्ता अंतिम बोली प्रक्रियेत गेल्याचे समजले आणि आम्हालाही नव्याने बोली लावण्यास सांगण्यात आले.

विश्वस्तांकडून जागा विक्रीच्या निर्णयावर आक्षेप

यादरम्यान पीटरबरो शहर परिषदेने मंदिराची जागा मशिदीला विकण्याचा निर्णय घेतल्यानंतर हिंदू समाज आक्रमक झाला. त्याचवेळी मंदिराच्या विश्वस्तांनी न्यायालयात धाव घेत शहर परिषदेच्या निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती केली. द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, मंदिराच्या विश्वस्तांनी ‘GoFundMe’ या ऑनलाइन निधी संकलन मोहिमेद्वारे अल्पावधीतच ८६ हजार पौंड (सुमारे १.१० कोटी रुपये) जमा केले. शहर परिषदेने घेतलेला निर्णय पूर्णपणे बेकायदा असल्याचा दावा मंदिर समितीकडून करण्यात आला. दुसरीकडे, खादिजाह मशिदीच्या प्रतिनिधींनी आपली सध्याची अपुरी पडत असल्याने नवीन जागा खरेदीचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. शहर परिषदेकडून खरेदी केलेल्या जागेवर मशीद उभारली जाईल. त्यामध्ये नमाज पठणासाठी जागा, मुस्लीम विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र राहण्याची सोय, क्रीडा सुविधा आणि मुस्लीम बांधवांसाठी विविध सोयी उपलब्ध करून दिल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

न्यायालयाबाहेर दोन समुदायांमध्ये जातीय तेढ

पीटरबरो शहरातील हा वाद केवळ न्यायालयापुरता मर्यादित राहिलेला नसून या प्रकरणावरून दोन समुदायांमध्ये जातीय तेढ निर्माण होत असल्याचे चित्र आहे. न्यायालयातील सुनावणीपूर्वी हिंदू बांधवांमध्ये फिरणाऱ्या मेसेजेसमध्ये स्थानिक प्रशासनावर भेदभावाचा आरोप करण्यात आला आहे. या वादावर भाष्य करताना एका भारतीय वंशाच्या तरुणाने सांगितले की, हिंदूंच्या विरोधात उघडपणे भेदभाव होत असल्याचे पाहून आमचे रक्त सळसळते; पण आपण समाज म्हणून याविरोधात फारसे बोलत नाही. जर हेच एखाद्या मशिदीच्या बाबतीत घडले असते, तर देशभरात तीव्र पडसाद उमटले असते. आम्ही मात्र सर्व काही शांतपणे सहन करत आहोत. ब्रिटनमध्ये कोणतीही विविधता उरलेली नसून येथे आवाज उठवणाऱ्यांना गप्प बसवले जाते किंवा माफी मागण्यास भाग पाडले जाते.

परिषदेचे आश्वासन, विश्वस्तांचा अविश्वास कायम

द टेलिग्राफशी बोलताना पीटरबरो शहर परिषदेच्या नेत्या शबिना कय्यूम यांनी मंदिराच्या जागा विक्रीच्या निर्णयामुळे हिंदू समाजामध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याची कबुली दिली. तसेच, हिंदू समाजाच्या मंदिराला दुसरी जागा उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. मात्र, कय्युम यांचा हा दावा हिंदू मंदिराच्या विश्वस्तांनी फेटाळून लावला आहे. विश्वस्तांच्या मते, त्यांना प्रशासनाकडून अद्याप कोणताही योग्य पर्यायी जागा देण्याचा प्रस्ताव मिळालेला नाही. एका हिंदू तरुणाने सांगितले की, परिषदेच्या या निर्णयामुळे आम्हाला पुन्हा एकदा येथून हाकलून दिल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे भूतकाळातील वेदनादायक आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. या प्रकरणावर ११ जुलै रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान शहर परिषदेच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकील कॅथरीन रोलँड्स यांनी न्यायालयात सांगितले की, संबंधित मालमत्तेची विक्री पारदर्शक, निष्पक्ष आणि कायदेशीर निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात आली आहे. मात्र, ‘भारत हिंदू समाज’ मंदिराच्या वतीने बाजू मांडणारे वकील टोबी फिशर यांनी या दाव्याला तीव्र विरोध केला आहे. परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या निर्णयामागील कारणांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचा दावा त्यांनी न्यायालयात सांगितले आहे. दरम्यान, मंदिराच्या जागेचे भवितव्य न्यायालयीन निर्णयावर अवलंबून असल्याने पीटरबरोतील हिंदू समाजाचे लक्ष आता या प्रकरणाच्या निकालाकडे लागले आहे.